बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

जीवरक्षक दिनकर कांबळे

(‘तेजस प्रकाशनाच्या बदलते जग या दिवाळी वार्षिकांकाचं हे सातवं वर्ष. या वार्षिकांकाचा सलग सहाव्या वर्षी अतिथी संपादक होण्याचा बहुमान मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांनी बहाल केला. त्यांचे शेतीप्रगती मासिक यंदा दिमाखदार तेरावा दिवाळी विशेषांक सादर करीत असताना गेल्या सहा वर्षांत तरुण मनांची स्पंदनं टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बदलते जगनंही यंदा चेंजमेकर्स- वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेऊन यंदाचा 'बदलते जग'चा अंक सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांत या अंकानं तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्र, सोशल मीडिया, कौशल्य विकास, डिजीटल इंडिया, डिजीटल यूथ आणि दूरशिक्षण अशा विषयांचा वेध घेतला. आपण वाचकांनीही त्यांचे मनापासून, उत्स्फूर्त स्वागत केले. यंदा चेंजमेकर्स-वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेण्यामागं काही विशेष कारणं आहेत. आजच्या तरुण पिढीवर मागील पिढ्यांकडून अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात. आजचे तरुण वाया जाताहेत, ती करिअरविषयी जागरूक नाहीत, त्यांना सामाजिक भान नाही वगैरे वगैरे आक्षेपांचा त्यात समावेश असतो. आजचा तरुण नित्य या आक्षेपांना सामोरा जात असतो. पण, पूर्वीच्या पिढ्यांत नसलेली एक बेफिकीरी जरूर त्याच्यात आहे; ही बेफिकीरी म्हणजे नेमकं काय मनावर घ्यायचं आणि काय नाही, याचा विवेक त्याच्यात आहे. त्यामुळे तो यातलं काही मनावर न घेता आपले मार्ग धुंडाळण्यात धन्यता मानतो. याचा गैरअर्थ काढला जात असतो. पण, या अंकाचं काम करीत असताना या साऱ्या आक्षेपांना धुडकावून लावतील, अशी सोन्यासारख्या तरुणांची खाणच आमच्या हाती लागली. सुरवातीला असे तरुण मिळतील का, असा विचार आमच्याही मनी आला. पण अंक होता होईतो, पानांच्या मर्यादेत बसणार नाहीत, इतके कर्तृत्ववान तरुण आमच्या हाती लागले. यामध्ये अगदी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तरुणांपासून ते अगदी आपल्या अवतीभोवतीही कुठल्याही प्रसिद्धीची, मोबदल्याची अपेक्षाही न ठेवता काम करणारे तरुण आमच्या नजरेत आले. आमची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन त्यातील काही निवडक तरुणांच्या कर्तृत्वाला आम्ही या अंकात स्थान देऊ शकलो आहोत. हा अंक वाचल्यानंतर हा केवळ शब्दरंजन नाही, तर एक प्रेरणास्रोताचा झरा आम्ही आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आजचा आपला भोवताल अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे खरा, पण त्याचवेळी त्याला निश्चिततेचे ठोस आयाम प्रदान करणारे, सावरणारे तरुण हातही आहेत, हे वास्तवही खरेच! सकारात्मकतेच्या या प्रवासाचा आनंद आपल्यालाही यातून लाभेल. सारंच काही वाईट, चुकीचं होतंय, या धारणेला छेद जाऊन चांगलंही बरंच काही होतंय, चांगलं घडविण्याचा प्रयत्न करणारे आशेचे दीप उजळविणारे तरुण हातही आहेत. या हातांत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे, याची जाणीव वृद्धिंगत होईल. सकारात्मक सामाजिक जाणिवांचा, संवेदनांचा जागर या अंकाच्या माध्यमातून आम्ही मांडला. या अंकाच्या माध्यमातून असे काम करणाऱ्या काही तरुणांच्या कामगिरीचा वेध घेण्याचा प्रयत्न मी स्वतःही केला आहे. त्यातील लेख क्रमाक्रमाने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'बदलते जग'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे. आपल्याला आवडतील, अशी अपेक्षा आहे.- आलोक जत्राटकर)
 




केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांच्याही जिवावर बेतलेल्या प्रकरणांत मदतीचा हात देणारे दिनकर कांबळे म्हणजे जीवरक्षक असे समीकरणच कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात बनले आहे. राज्य शासनानेही त्यांच्या जीवरक्षण व आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेतली आहे.

गल्लीबोळांत, घराघरांत शिरलेला विषारी सर्प पकडण्यापासून ते अगदी महापुराचा झंझावात, विविध घाटांतल्या अवघड दऱ्यांमधील भीतिदायक वातावरण, अपघातानंतरची छिन्नविछिन्नता या साऱ्यांना पाठीवर टाकून कोल्हापुरातील दिनकर कांबळे या तरुणाने गेली 25 वर्षे अधिक काळ जीवरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य अगदी एकहाती म्हणावे, असे चालविले आहे. संकटात सापडलेल्या जिवांना केवळ मदत याच भावनेतून अगदी मोजक्या साधनांसह दिनकर कांबळे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहे. त्याच्या या कामाने आजवर हजारो लोकांना जीवदान मिळाले आहे. तर कित्येक बेवारस मृतदेह त्याने नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहेत. केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांच्याही जिवावर बेतलेल्या प्रकरणांत मदतीचा हात देणारे दिनकर कांबळे म्हणजे जीवरक्षक असे समीकरणच कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात बनले आहे. राज्य शासनानेही त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेतली आहे.
आत्महत्या, खून, पाण्यात बुडून मृत्यू, अपघातात जखमी अशा अनेक दुर्घटनांची यादी आपल्याला माहिती असते. वर्तमानपत्रात येणारी खुनाची, आत्महत्येची बातमी वाचून क्षणभर थांबून हळहळ व्यक्त करीत आपण सकाळचा चहाचा घुटका घेत असतो. पण या बातमीनंतरचं मोलाचं कार्य हा दिनकर करीत असतो. खून झाल्यानंतर बरेच दिवस प्रेत मिळत नाही. कधी तरी सुगावा लागतो, शेतात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला आहे. अशा वेळी ही खबर दिनकरला पोहोचते. तो सडलेला मृतदेह स्वत:च्या खांद्यावर टाकून संबंधित नातेवाईकांच्या हवाली करतो. पोलिसांचा मदतनीस असणारा दिनकर पशाचीही अपेक्षा न ठेवता हे काम करीत असतो. पाण्यातून फुगून आलेले, विहिरीत पडलेले, शेतात सडलेले अशी मृतदेहांची विटंबना झाल्यानंतरच्या अवस्थेला कोणी हातही लावायला तयार नसते. अशा वेळी दिनकर कधी दरीतून मृतदेह वाहून वर आणतो, तर कधी ३-४ कि.मी. चालत, खांद्यावरून वाहतो. हे काम गेली एकवीस र्वष तो करतोय. ज्या कामाला समाजसेवेची प्रतिष्ठा तर सोडाच; परंतु मोबदल्याचीही कधी किंमत मिळत नाही असं काम दिनकर करतोय. जखमी पक्षी, प्राणी सापडला तर त्यांच्यावर तो उपचार करतोच, शिवाय कोणी जखमी व्यक्ती अपघातात सापडली तर त्या व्यक्तीलाही उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहतो. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातच एक चांगल्या घरातला माणूस रस्त्यावर पडलेला होता. सगळेच बघे होते. फक्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. दिनकर आसपासच कुठं तरी होता. त्याला हे कळलं, गर्दीला बाजूला सारत त्या माणसाजवळ गेला. चेहऱ्यावर चापट मारत त्याच्या शुद्धीवर असण्याची दखल घेत, त्याने सरळ त्या व्यक्तीला उचललं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. योग्य त्या उपचारानंतर ती व्यक्ती शुद्धीवर आली. वेळेवर मदत मिळाली नसती तर..
सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, प. महाराष्ट्रात आता दिनकरची ओळख सगळ्यांनाच होऊ लागली आहे. महापुरात लोकांना वाचवण्याचं मोठं कार्य दिनकरने केलं आहे. आतापर्यंत त्याने १४२१ डेड बॉडीज काढल्या आहेत आणि २७५ जणांना वाचवलंय. हे काम का करावंसं वाटतं? याचं उत्तर दिनकर अगदी साधेपणाने देतो. त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्याची थोरली भावजय मूल गेलं त्यामुळे मनोरुग्ण झाली आणि ती विहिरीत तोल जाऊन पडली. विहिरीमध्येच एका खडकाच्या खोबणीत तिचा देह अडकून पडला. पण मृतदेह पाण्यावर येईना. १५ दिवस झाले तरी तिचा मृतदेह विहिरीतच. कुणीही बाहेर काढायला तयार होईना. ५००० रुपये देऊनही सगळ्यांचा नन्नाचा पाढा. तोपर्यंत तिच्या मृतदेहाची पार विटंबना झाली होती. जलचरांनी खाऊन तिचं शरीर खिळखिळं केलं होतं. त्याक्षणी या युवकाने विहिरीत उडी घेतली आणि वहिनीचं छिन्नविछिन्न शरीर बाहेर काढलं. वयाच्या या टप्प्यावर संवेदनक्षम दिनकरनं ठरवलं, कोणाचाही मृतदेह बाहेर काढायचा असला, भलेही तो पाण्यातून असो, नदी-नाल्यातून, दरीतून, शेतातून असो, आपण त्यासाठी मदत करायची. कारण हे काम करायला कोणी पुढे येत नाही. पण मृताच्या नातेवाईकांना, कधी पोलिसांना गरज असते, तेव्हा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, रंग-गंधाच्या जाणिवेपलीकडे जाऊन हे मदतकार्य आपण करायचंच. यासाठी बऱ्याच वेळेला लोक व्यसनाधीन होतात; परंतु दिनकर दारूच्या थेंबालाही स्पर्श करीत नाही. हे आपत्कालीन कार्य करताना दिनकर आठ वेळा मरणाच्या दाढेतून बाहेर पडलाय. नियतीनंच हे त्याचे जीवितकार्य पार पाडण्यासाठी त्याला जीवदान दिलंय, असा दिनकरचा ठाम विश्वास आहे.
स्वतःच्या घरावर ओढवलेल्या आपत्तीने १४ वर्षांचा दिनकर हडबडून गेले होते. आता मात्र त्यांच्यासारख्या दुर्दैवी परिस्थितीत सापडलेल्या जीवांच्या मदतीसाठी दिनकर स्वतः तत्पर असतात. सडलेले, कुजलेले, जीवजंतूंनी पोखरलेले तसेच जळून कोळसा बनलेल्या मृतदेहांना हात लावण्याचे धाडस कुणी करत नाही. अनेकदा नातेवाईकही अशा मृतदेहांच्या जवळ येत नाहीत. दिनकर मात्र अशा मृतदेहांची योग्य पद्ध्तीने हाताळणी करून नातेवाईकांच्याकडे सोपवतात. आतापर्यंत दरीमध्ये अडकलेले, नदीच्या प्रवाहात अडकून केवळ सांगाडा उरलेले, जमिनीमध्ये गाडल्याने सडलेले, विहिरींमध्ये पडून फुगलेले व हात लावताच एकेक अवयव धडावेगळे होणारे सुमारे दीड हजार मृतदेह दिनकर यांनी नातेवाईकांच्या हाती सोपवले आहेत. अपघातामध्ये वाहनात अडकलेले जखमी, आग किंवा दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेले लोक, दरीत कोसळून झालेले जखमी, सर्पदंश, विजेचा शॉक या आपत्तींमध्ये दिनकर संकटग्रस्तांना मदत करत असतात. जंगली पशु-पक्ष्यांवर ओढवलेल्या संकटातही दिनकर मदतीसाठी धावून जातात.

पाण्यात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढायचे असल्यास ऑक्सिजन सिलिंडर आणि मास्क, लाईफ जॅकेट, संसर्गप्रतिबंधक औषधे अशी कोणतीही साधने दिनकर यांच्याजवळ नाहीत. पण साधने नाहीत म्हणून दिनकर यांचे काम मात्र कधीही खोळंबलेले दिसत नाही. संकटात सापडलेल्या जीवांना मदत करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हीच त्यांची कामामागची ताकद आणि प्रेरणा आहे. अग्निशमन दल, पोलिस वा कुणी सामान्यांनीही हाक दिल्यास दिनकर मदतीसाठी तत्परतेने धावून जाताना दिसतात. नुकत्याच नाशिक इथं झालेल्या कुंभमेळ्यादरम्यानही आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यासाठी दिनकर राज्य शासनातर्फे तिथे दाखल झाला होता.
आपल्यासारखे असे आणखी कार्यकर्ते तयार करण्यासाठी आणि तरुण पिढीला आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरिता त्यांनी 'डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटीस्थापन केली आहे. या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एनएसएस, एनसीसीची प्रशिक्षण शिबिरं यांच्यासह शासकीय कार्यालये आदी ठिकाणी संधी मिळेल, तेव्हा दिनकर आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्याचं काम करतो. गॅरेज हे त्याचं चरितार्थाचं साधन. फारशी मिळकत होत नसली तरी आपत्तीत सापडलेल्यांना विनामूल्य मदत करण्याचं समाधान तो गाठीला बांधत असतो. सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी दिनकरना जी काही मदत मिळेल, त्यातून ते जीवरक्षकांची नवी पिढी प्रशिक्षित करत आहे. त्यापलीकडे जाऊन कोणत्याही क्षणी, कुठेही मदतीची गरज भासल्यास जीवरक्षणासाठी सज्ज असलेले पथक तयार करण्यासाठीही दिनकर कांबळे यांची अहोरात्र धडपड सुरू असते.

(दिनकर कांबळे यांचा संपर्क : ९८६०९४५९२४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा