Sopan Patil |
“अरे वेड्या, मी दादा बोलतोय...”
“अरे मूर्खा, तुला सांगतो...”
ही संबोधनं वाचून एखाद्याला
वाटावे की, बोलणारा समोरच्यावर एकदम खफामर्जी होऊन किंवा चिडून बोलतो आहे की काय? पण नाही, कोल्हापुरात सोपान
पाटील तथा सोपानदादा नामक एका ज्येष्ठ पत्रकारासमवेत माझ्यासारख्या ज्यांनी काम
केले आहे, त्या सर्वांना या संबोधनामागे दडलेला दादांचा आपलेपणा जाणवल्याखेरीज
राहात नाही. कधीमधी दादांनी चुकून त्याऐवजी खऱ्या नावानं हाक मारली, तर आपलं काही
चुकलं की काय, असा विचार मनात उभा राह्यचा.
गेले तीन दिवस
दादांच्या या आणि अशाच कित्येक आठवणींनी मनाचा ताबा घेतलाय. २९ डिसेंबरच्या रात्री
दादा गेले. २०१७च्या अखेरच्या दिवशी दादांच्या रक्षाविसर्जनाला उपस्थित राहावं
लागणं, यासारखं मोठं दुःख दुसरं नव्हतं. यंदाचा थर्टी फर्स्ट असा माझ्यासाठी असा विदारक
होता.
सोपान बापूसाहेब
पाटील असे त्यांचे नाव असले ते दादा या नावानेच पत्रकारितेसह सर्वच क्षेत्रांतील
मान्यवरांत पॉप्युलर होते. ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या अगदी सुरवातीपासून दादा जे बातमीदार
म्हणून तिच्याशी जोडले गेले, ते अगदी वरिष्ठ उपसंपादक होईपर्यंत. त्यापूर्वी
सत्यवादीमधून आणि त्यानंतर काही काळ तरुण भारतमध्येही त्यांनी काम केले. दादांनी
केवळ काम केले असं म्हणणं चुकीचं होईल, त्यांच्यावर तो अन्याय होईल. दादांनी श्री.
विजय कुवळेकर, अनंत दीक्षित यांच्यासारख्या अत्यंत चिकित्सक संपादकांच्या हाताखाली
पत्रकारितेचे अनेक धडे गिरवत असताना स्वतःची लेखनाची, निरीक्षणाची एक स्वतंत्र
शैली विकसित केली. कोल्हापूरमध्ये काम करीत असताना इथल्या राजकारणाची, सहकाराची
आणि त्यांच्या परस्परपूरकतेचा त्यांनी पुरेपूर अभ्यास केला. या क्षेत्रातल्या
व्यक्ती, प्रवृत्ती, प्रकृती, विकृती या साऱ्यांची त्यांना नेमकी जाण होती. दादा
ज्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने “दादा” होते, त्या काळात अनेक
प्रकारची आमिषे अक्षरशः त्यांच्या पाठी धावत होती, काही हात जोडून, हात पसरुन समोर
उभी होती. पण, दादांच्या पत्रकारितेचे सर्वात महत्त्वाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे
चारित्र्य आणि नैतिकता यांच्यापासून दादा तसूभरही ढळले नाहीत. खऱ्या अर्थाने
पत्रकारितेचे असिधाराव्रत अत्यंत संतुलितपणे सांभाळणारा हा माणूस होता. त्यामुळे
दादांच्या विषयी माझ्या मनात सदोदित अपार आदराची भावना राहिली.
याचा अर्थ दादा रसिक
नव्हते, असा नाही. कला-संस्कृतीच्या क्षेत्रामधील घडामोडींचीही त्यांना अचूक माहिती
असे. कोल्हापुरातील कोणत्याही महत्त्वाच्या घटना-घडामोडी, कार्यक्रमःउपक्रमाचे ते
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. ओघवत्या आणि रसाळ वाणीचे वरदानही दादांवर होते.
जेव्हा ते कोणताही प्रसंग किंवा घटना सांगायचे, तेव्हा तो डोळ्यांसमोर जिवंत उभा
करण्याची ताकद त्यांच्या शब्दांत होती. बातमीच्या लेखनामध्ये जी ताकद तीच
वाणीमध्ये होती. हे दादांचे फार मोठे वैशिष्ट्य होते. महापालिकेच्या निवडणुकांचे, कुस्तीच्या फडांचे आणि सुरेखाबाईंच्या लावणीचे
किस्से ऐकावेत, तर दादांच्या तोंडूनच. सकाळमध्ये असताना आणि त्यानंतरही दादांच्या
तोंडून वर्तमान आणि इतिहासातल्या अशा घटना ऐकायला मजा येई. त्यातून उपसंपादक
म्हणून काम करताना स्थानिक राजकारणासह अन्य गोष्टींची जाण आणि भानही येण्यास मदत
होत असे. कित्येकदा तासंतास अशा आमच्या गप्पागोष्टी चालत. गप्पा म्हणजे दादा
बोलायचे आणि आम्ही श्रोत्याच्या भूमिकेत. दादांची स्मरणशक्ती इतकी तल्लख की
तारीख-वारानिशी आणि स्थळकाळाच्या संदर्भासह ते सारा माहौल उभा करीत असत. त्यांच्या
त्या नॅरेशनच्या स्टाईलनंच मी भारावून जायचो.
दादांकडून आणखी एक
गोष्ट मी शिकलो, ती म्हणजे कोणतीही बातमी कधी टाकाऊ किंवा दुर्लक्षणीय असत नाही. सकाळच्या
कोल्हापूर सिटी ऑफिसमध्ये दिवसभरात आपल्याकडे असलेली बातम्यांची जबाबदारी पूर्ण
झाली की दादा ठिकठिकाणच्या व्यक्ती, संस्थांकडून आलेल्या पत्रकांसाठीचा ट्रे
पाहायचे. दिवसपाळीतल्या शिकाऊ बातमीदारांनी रोजच्या रोज ट्रेमधल्या पत्रकांच्या
बातम्यांचे सॉर्टिंग करून त्याच्या बातम्या प्राधान्याने करवून घेण्याकडे त्यांचा
कटाक्ष असे. या पत्रकांवर नजर टाकून त्यामधूनही काही वेगळ्या बातम्या दादा करीत
किंवा कोणाला तरी करावयास सांगत. रात्री साडेसात-आठच्या सुमारास महाराष्ट्र शासनाच्या
माहिती कार्यालयाकडून आलेल्या बातम्यांचा ई-मेल ते आवर्जून पाहात. त्यावेळी मी
त्यांना विचारायचो, “दादा, आपल्या बातमीदारानं त्यातले कार्यक्रम अटेंड
केल्यानंतर सुद्धा तुम्ही शासनाचा इ-मेल का पाहता?” त्यावर ते म्हणायचे, “आपल्या माणसाच्या
बातमीतल्या मुद्याव्यतिरिक्त अन्य काही मुद्दे दिसतात का ते मी पाहतो. पण,
त्याखेरीज शासनाच्या ई-मेलमध्ये जनहिताच्या अनेक निर्णयांच्या बातम्या असतात. शासन
निर्णय असतात. त्यांची माहिती लोकांपर्यंत आपण पोहोचविली पाहिजे. त्याशिवाय, मला
त्या छोट्या छोट्या बातम्यांतून असे क्लू मिळतात की त्यातून एखादी खूप चांगली मोठी
स्टोरी करता येऊ शकते.” विधीमंडळ अधिवेशनाच्या वार्तांकनाच्या बाबतीतही दादा खूप
चिकित्सक असत. त्यांनी कित्येक अधिवेशने कोल्हापूरहून जाऊन कव्हर केली होती.
त्याखेरीज पुढच्या काळात नव्या, ताज्या दमाच्या बातमीदारांनीही विधीमंडळ
अधिवेशनाच्या वार्तांकनाचा अनुभव घ्यायलाच हवा, अशी त्यांची भूमिका असे.
दादांनी वृत्तमालिकेच्या
रुपात सकाळमध्ये महापालिकेचा अत्यंत रंजक इतिहास लिहीला, तो ‘खेळ मांडियेला’ या पुस्तकाच्या रुपानं
आपल्याला उपलब्ध आहे. दादा आम्हाला त्याव्यतिरिक्तही जे किस्से सांगत, त्यांचंही
पुस्तक करावं, असा प्रस्ताव घेऊन तेजस प्रकाशनाचे मालक व मित्रवर्य संपादक
रावसाहेब पुजारी यांच्यासह मी त्यांना भेटलो. आधी थोडे आढेवेढे घेऊन ते ‘लिहीतो’ म्हणाले. मी म्हटलं, आता
ते पूर्ण होईपर्यंत तुमची पाठ सोडणार नाही. मात्र, ते घडायचं नव्हतं, कारण त्यानंतर
साधारण महिनाभरातच दादांचं ब्रेन हेमॉरेज झालं. त्यातूनही ते रिकव्हर होत होते-
केवळ इच्छाशक्तीच्या बळावर पण, शुगरनं घात केला आणि अवघ्या ६३व्या वर्षी दादा गेले.
सर्वसामान्य
माणसांप्रमाणं दादांच्या मागंही संसार होता, त्यातली सुखं होती, दुःखं होती.
मात्र, त्या दुःखाचं भांडवल त्यांनी कधीही केलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव एक
आपुलकीचं स्मित विलसत असे. त्यामुळं त्यांच्या ज्येष्ठत्वाची कधी भीती वाटली नाही,
उलट हक्कानं त्यांच्याकडं जाऊन बसावं वाटे, बोलावं वाटे. दादाही तितक्याच प्रेमानं
चौकशी करायचे, “काय रे मूर्खा, असा का नाराज दिसतोयस? काय झालं?”
आता पुन्हा त्यांचा
तो प्रेमळ आवाज कानी पडणार नाही की, फोनवरुन ‘अरे वेड्या, कसा आहेस?’ अशी विचारणा होणार नाही.
दादांच्या जाण्याचं व्यक्तीगत पातळीवर दुःख असलं तरीही कोल्हापूरच्या पाच दशकांतील राजकीय घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी आणि संदर्भांचा
एक चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला, याचं दुःख आणि खंत मोठी आहे.
प्रिय आलोक ,
उत्तर द्याहटवासोपान आणि मी समकालिन .
माझ्या पत्रकारितेचा प्रारंभ कोल्हापूरचा , १९७७ मधला .
विलासराव झुंझार , वासुदेव कुळकर्णी आणि सोपानदादा हे तेव्हापासूनचे माझे सगेसोयरे .
तुझा मजकूर वाचल्यावर ते दिवस आठवले .
पत्रकारीतेचं स्वरूप किती बदललंय , किती संकोच झालाय माध्यमांचा बघ ; सोपानदादाच्या निधनाची बातमीही कळली नाही .
ती तिकडच्या आवृत्तीतच प्रकाशित झाली असेल .
कोल्हापूर सुटल्यावर सोपानदादाशी फारच अधूनमधून का होईना संपर्क होता .
खूप वर्षापूर्वी एकदा दिल्लीत आमची अचानक भेट झाली तेव्हा महाराष्ट्र सदनात रात्री उशीरापर्यंत गप्पा मारत बसलो ; जगण्याचा लेखाजोखा शेअर केला होता .
मन कातर झालं तुझा मजकूर वाचून ...
सर, माध्यमांच्या या संकोचाची जाणीव झाल्यामुळंच खरं तर सोपानदादांविषयी ऑनलाइन लिहीण्याची भावना जागली. कोल्हापुरात पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्यासारखी अनेक माणकं आहेत, पण केवळ भौगोलिकतेमुळं त्यांची नावं मोठ्या पटलावर झळकत नाहीत. त्यांना प्रकाशात आणण्याचा माझा प्रयत्न आहे. दादांशी आपल्या सौहार्दाची कल्पना मला नव्हती, पण ही दुःखद वार्ता या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली, हे या नवमाध्यमाचं फलित.
हटवामन हेलावलं वाचून...
उत्तर द्याहटवातसं बघितलं तर मी फक्त त्यांच्या लिखाणातून त्यांना अनेकदा भेटलो.
ते लिखाणच मला त्यांची ओळख करून द्यायचं.
छान लिहायचे....
पण आता लेखणी थांबली.....
धन्यवाद प्रमोद सर... असे लाखो वाचक, चाहते दादांनी त्यांच्या आयुष्यात मिळविले... त्या बाबतीत ते महाश्रीमंत होते...
हटवा