बुधवार, २८ मार्च, २०१८

सुनी ‘श्रावस्ती’; पोरकं ‘अस्मितादर्श’!


गंगाधर पानतावणे


२७ मार्च २०१८... रात्रीचे बारा वाजताहेत... तरीही अस्वस्थता आहे... झोप येत नाहीये... आज दिवसभरात विद्यापीठाची सिनेट मिटींग होती... ती पूर्ण दिवसभर अटेंड केली, तरी एक विचित्र, सहज स्वाभाविक अस्वस्थता मन भरून पुरून उरली आहे... का असू नये?... आयुष्यातला एक महान मार्गदर्शक हरपल्याची भावना जर सतावत असेल तर त्यात गैर काही असण्याचे कारण नाही... गंगाधर पानतावणे गेले... जीवलग मित्र समाधान पोरे याने आज सकाळी सकाळी फोन करून दिलेली बातमी अस्वस्थ करणारीच आहे... पानतावणे सरांचं माझ्या आयुष्यातलं स्थान केवळ काही शब्दांत सांगावं असं नाही, असूच शकत नाही... प्रत्यक्ष भेटी म्हणाव्यत तर अवघ्या तीन चार इतक्यात होत्या... पण माझं अखंड आयुष्य समृद्ध करायला त्या भेटींखेरीज त्यांचं साहित्य, विशेषतः अस्मितादर्श हे लहानपणापासून आजतागायत कायम सोबत राहिलं आहे....
भारतीय समाजातील दलितपण, अस्पृश्यता, मागासलेपण यांच्या जाणीवा करून देण्याबरोबरच त्याविरुद्ध बंड करून उठण्याच्या जाणीवांची निर्मिती करण्याचं कामही अस्मितादर्शनं सातत्यानं, कायमपणे केलं. आणि त्यात गंगाधर पानतावणे सरांचा सिंहाचा वाटा राहिला. अस्मितादर्शच्या मजकूर निवडीपासून ते अगदी वितरणापर्यंतची जबाबदारी एकहाती सांभाळणारी व्यवस्था म्हणजे पानतावणे सर होते. संपादकीय संस्करणापासून ते डिस्पॅचपर्यंतची सारी यंत्रणा ते एकट्याने सांभाळीत असत. आंबेडकरी चळवळ एकविसाव्या शतकात जबाबदारीने वाहून नेण्यात, त्या जाणीवा कायम राखण्याच्या कामी पानतावणे सरांनी जी कामगिरी बजावली, ती शब्दातीत आहे. अस्मितादर्श साहित्य संमेलनांच्या माध्यमातून दलित साहित्याला प्रतिष्ठा आणि मुख्य प्रवाहात त्यांच्या जाणीवांचे पडसाद निर्माण करण्याचे जे कार्य या चळवळीने केले, तिचे योगदान फार अमूल्य स्वरुपाचे आहे.
पानतावणे सरांचं जाणं, हे माझं व्यक्तीगत स्वरुपातही खूप मोठं नुकसान आहे. सन 2004 साली जेव्हा पीएचडीसाठी नोंदणी करायची वेळ आली तेव्हा विषय निवड अंतिम करण्यासाठी डॉ. अशोक चौसाळकर सरांच्या पाठोपाठ जर मला कोणाचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं असेल, तर ते पानतावणे सरांचं! त्या साली वडिलांसोबत सर्वप्रथम श्रावस्तीला भेट दिली. ताज्या अस्मितादर्शचे अंक समोर येऊन पडलेले होते, त्यांच्या डिस्पॅचचं काम करता करता पानतावणे सर संवाद साधत होते. त्यांनी त्यावेळी जे मार्गदर्शन केलं, त्याचा परिणाम म्हणून माझ्या संशोधनाची दिशा ही खूप क्लिअर झाली. किंबहुना, माझ्या संशोधनाच्या दिग्दर्शनाचं महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते पानतावणे सरांनीच! त्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मी माझ्या संशोधनात केला आहे.
अलीकडेच पद्मश्री घोषित झाल्यानंतर त्यांच्याशी अवघ्या एक दोन वाक्यांत साधलेला संवाद, हीच काय ती अलीकडची आठवण. मात्र, त्यापूर्वी आणखी एकदा औरंगाबाद मुक्कामी त्यांच्याशी साधलेला संवाद, कोल्हापूरला एक-दोन वेळा ते आले असताना मारलेल्या गप्पा, याच काय तेवढ्या आठवणी आता हृदयाशी कवटाळून बसलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेशी किंबहुना दलित पत्रकारितेशी माझा सर्वप्रथम संवाद साधून देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते पानतावणे सरांनीच! त्यांना सोबत घेऊन एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्याचे मी ठरविले होते. पण, आता त्याला काही अर्थ नाही. उशीर माझ्याकडून झाला आहे, एवढं खरं! काळापुढे तुमचं काही चालत नाही. तेव्हा जे आता ठरवलं आहे, ते तातडीनं करून टाकणं, यातच खरं शहाणपण आहे, एवढं या निमित्तानं सांगावंसं वाटतं. पानतावणे सरांच्या आठवणी उराशी जपणे एवढेच आता हाती उरले असले तरी, अस्मितादर्श चळवळ कायम सुरू राखणे, ही मात्र पानतावणे सरांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. त्या दृष्टीने आता आंबेडकरी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. त्यांच्या जाण्याने श्रावस्ती जितकी सुनी झाली आहे, तितकंच अस्मितादर्शही पोरकं झालं आहे, इतकं खरं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा