आमच्या निपाणीला
अत्रेंच्या लखोबा लोखंडेनं प्रसिद्धी (?) मिळवून दिली, पण ती तंबाखूच्या या
व्यापारपेठेचं विदारक सत्य नकारात्मक मार्गानं लोकांच्या मनावर बिंबवून! मात्र, साहित्याच्या
क्षेत्रात निपाणीला एक मानाचं आणि आदराचं स्थान प्रदान करून देणारे एक अत्यंत साध्या राहणीचे
पण ताकतीच्या लेखणीचे साहित्यिक म्हणजे महादेव मोरे होय. आम्ही खाजगीत त्यांच्याविषयी
बोलताना त्यांना प्रेमानं ‘म.मो.’ असं संबोधतो. पत्रकारिता करीत असताना दर खेपी मी ‘म.मों.’वर वेगळी स्टोरी करण्याच्या
प्रयत्नात असायचो. त्यांच्या वाढदिवशी पिठाच्या गिरणीत जाऊन त्यांचा सत्कार केला
होता. संपादक मित्रवर्य संजय आवटेंनी त्यावेळी माझ्या त्या फोटोसह ते फीचर
सोलापूरच्या संचारमध्ये एकदम रंगीत वापरलं होतं. सकाळमध्ये असतानाही युवा सकाळसाठी
‘तरुणाईतील मी’ या सदरासाठी ‘म.मों.’ची मुलाखत घेतली होती. हा माणूस म्हणजे उत्साहाचा, ऊर्जेचा
अखंड झरा आहे. वयानुसार आता थकले असले तरी, लिहीण्याची ऊर्मी कायम आहे. लेखनही
तसेच ताजे, रसरशीत आणि भिडणारे आहे. त्यांची एक मुलाखत माझ्या ब्लॉग वाचकांसाठी
सादर करतो आहे.
येथून पुढील संवाद आता महादेव मोरे यांच्याच शब्दांत...
---
Mahadev More (Nipani) |
नवोदित लेखकाला आपली
ओळख निर्माण करण्यासाठी मोठी धडपड करावी लागते, संघर्ष करावा लागतो, असे जे म्हटले
जाते, त्याला तसा मी अपवाद आहे.
लेखक म्हणून मान्यता
मिळविण्यासाठी धडपड करावी लागली नसली, तरी वास्तव जीवनातील संघर्ष मात्र अजूनही
सुरूच आहे. जीवनात आलेल्या अनेक बऱ्यावाईट अनुभवांतूनच माझ्यातील लेखक प्रगल्भ होत
गेला आणि त्यातूनच अनेक लोकप्रिय कथा-कादंबऱ्यांची निर्मिती झाली.
निपाणीच्या
म्युनिसिपल हायस्कूलमधून १९५७ साली एस.एस.सी. झालो. इथं पुढील शिक्षणाची सोय
नसल्याने कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकतीच भाषावार
प्रांतरचना झालेली असल्यामुळे राजाराम महाविद्यालयात कर्नाटकातील विद्यार्थ्यांना
प्रवेश दिला जात नसे. शाहू बोर्डिंगमध्ये राहण्याची सोय झाली. खानावळीचा महिना १५
ते २० रुपये दरही प्रतिकूल परिस्थितीमुळे परवडत नसे. त्यामुळे बसचा वार्षिक अडीच
रुपये पास काढून निपाणीहून घरून डबा येण्याची व्यवस्था केली. सकाळ-संध्याकाळ तोच
डबा पुरवून खावा लागे. कधी तो हरवण्याचे, अन्न नासण्याचेही प्रकार घडत. नासलेल्या
आमटीतून मूग काढून, पिळून खाऊन भूक भागविल्याचेही आठवते.
महाविद्यालयात मराठी
शिकवायला जुन्या पिढीतील प्रसिद्ध साहित्यिक वि.द. घाटे यांच्या कन्या अनुराधा
पोतदार, ल.म. भिंगारे, प्रा. ग.वि. कुलकर्णी होते. अनुराधाबाईंचा अर्वाचीन
वाङ्मयाचा मोठा अभ्यास होता. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नाही म्हणायला,
हायस्कूलला असतानाही मला वाचनाचा नाद होताच. निपाणीतल्या साखरवाडीच्या बालवीर
क्लबच्या वाचनालयात मी नित्य जात असे. तिथे रोजनिशी लिहायला सांगत. त्यामुळे
हस्ताक्षर आणि शुद्धलेखनही सुधारले होते. अनुराधाबाईंमुळे चांगल्या-वाईट
साहित्याची जाण आली आणि वाचनाला-लेखनाला योग्य दिशा मिळाली.
त्यावेळी मी ‘सत्यकथे’चा वार्षिक वर्गणीदार होतो.
त्यात अरविंद गोखले यांच्या ‘वारयोषितांच्या कथा’ येत. कालांतराने त्यांनी या कथा ‘अनामिका’त एकत्र केल्या. दिशाहीन,
वाट चुकलेल्या स्त्रियांच्या या कथा वाचून आपणही असे काही तरी लिहावे, अशी प्रबळ
इच्छा झाली. त्यातून तंबाखू कामगार स्त्रीच्या जीवनावरील ‘काशी’ कथा एफ.वाय.ला असताना
लिहीली. इंटरला असताना कॉलेजच्या ‘हिरवळ’ या भित्तीपत्रकातर्फे कथा स्पर्धा जाहीर झाली. ‘काशी’ शब्दमर्यादेत बसत नव्हती.
म्हणून खास स्पर्धेसाठी ‘म्हाईचा दिवस’ कथा लिहीली. मावशीच्या शिरगुप्पी या गावी मी म्हाईला
(यात्रेला) जायचो. त्या खेड्यातील संपूर्ण दिवसभरातील घडामोडी ग्रामीण ढंगात कथेत
चित्रित केल्या. तत्पूर्वी, ग्रामीण कथा सरपंच, पाटील, तमाशा, अशा साच्यात अडकली
होती. ‘म्हाईचा दिवस’ यापेक्षा वेगळी होती. कथेला पारितोषिक म्हणून रविंद्रनाथ
टागोर यांचे ‘गृहभंग’ मिळाले. हा माझ्या दृष्टीने शुभसंकेतच!
घरच्या प्रतिकूल
परिस्थितीने इंटरनंतरचे शिक्षण थांबलेच. १९५९ला घरी आलो. मजुरांबरोबर शेतात कामाला
जाऊ लागलो. पण, कथेचा विचार डोक्यात सुरूच होता. त्यावेळी ‘साप्ताहिक स्वराज्य’मध्ये नवोदितांच्या तीन कथा
प्रसिद्ध होत. तिकडे मी ‘म्हाई’ या नावाने तीच कथा पाठविली. १० ऑक्टोबर १९५९ला ती प्रसिद्ध
झाली. दहा दिवसांत तिचे दहा रुपये मानधन मिळाले. एकीकडे आपण लिहीलेले अक्षर अन्
अक्षर छापून आल्याचा आनंद होताच; शिवाय, त्याला मानधनही मिळते, हे मला झालेले नवीन ज्ञान
होते. ज्या काळी शेतात दिवसभर काम केल्यानंतर एक रुपया मजुरी मिळायची, तिथे मला
कथेतून दहा रुपये मिळाले, हीच अभिमानाची बाब होती. त्यानंतर ‘काशी’ची फेररचना केली आणि ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीसाठी ‘तुझी कथा, माझे शब्द’ या नावाने पाठविली. ती
प्रसिद्ध झाली. पंधरा रुपये मानधनही मिळाले.
दरम्यानच्या काळात
माझा वास्तविक जीवनातील संघर्षही सुरूच होता. शेतीची कामे सुरूच होती. मोटार
गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणूनही काम केले. स्वतःचे गॅरेज काढले. मोटारीवर
ड्रायव्हर-क्लिनर म्हणून काम केले. मिरची यंत्रावर (डंग) काम केले. पिठाची गिरण
अजूनही सुरूच आहे. या सर्व ठिकाणी कामाचा अनुभव मात्र मोठा मिळाला. इतर
साहित्यिकांपेक्षा येथील अनुभूती वेगळी होती. चाकोरीपेक्षा वेगळे लिखाण त्यातूनच
शक्य झाले. ड्रायव्हर, क्लिनर, तंबाखू शेतकरी, व्यापारी, हमाल, मजूर, वारयोषिता,
गिरणीवर येणारे खेडोपाड्यातील ग्राहक, भटके, गोसावी, बेलपधारी, अस्वलवाले, डवरी,
गावकुसाबाहेरील डोंबारी, मांगगारूडी, मुढीकर, जोगते-जोगतिणी आदी पददलित लोकच
माझ्या कथांची पात्रे झाली. त्यामुळेच, ज्या काळात दलित साहित्य असा प्रकार
अस्तित्वात आला नव्हता, अशा वेळी माझ्या साहित्यकृतींवर पददलितांच्या जीवनाची
सावली आपसूकच पडलेली होती.
‘मौज’ दिवाळी अंकात (कै.) र.वा. दिघे यांची ‘आई’ ही ग्रामीण शैलीतली कथा
वाचली. तिच्या प्रभावाखालीच १९६१ला ‘बैदा’ ही माझी संपूर्ण ग्रामीण शैलीतली पहिली कथा ‘साप्ताहिक गावकरी’त प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘पाहुणा’ ही ग्रामीण ढंगातली
मराठीतली पहिली कादंबरी लिहीली. त्यापाठोपाठ ‘रैत’ ही दुसरीही कादंबरी लिहीली.
आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ दिवाळी अंक कथा स्पर्धेत
१९६५-६६मध्ये पारितोषिक मिळाले. पाठोपाठ ‘किर्लोस्कर’ कथा स्पर्धेत ‘झुंज’ला आणि ‘गावकरी’ कथा स्पर्धेत ‘वर आभाळ, खाली धरती’ला पारितोषिके मिळाली. या
पारितोषिकांनी लेखक म्हणून नाव मिळवून दिले. १९७५-७६ साली ‘चिताक’ कथासंग्रहाला राज्य
पुरस्कार मिळाला. आरती प्रभू, चित्रा खानोलकर, सुभाष भेंडे, अनिल अवचट, दया पवार,
सखा कलाल आदींना त्यावेळी पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या बरोबरीने मला पुरस्कार
मिळणे, ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची बाब होती.
कथा लिहीण्यासाठी
त्यापूर्वी पासून अनेकांचे प्रोत्साहन लाभले. ‘मराठा’ची रविवार पुरवणी व ‘नवयुग’ची जबाबदारी सांभाळणाऱ्या
अत्रेंच्या कन्या शिऱीष पै यांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी त्यांच्याकडे विजय
तेंडुलकर काम करीत. ते ‘वसुधा’मध्येही पार्ट-टाईम काम करीत. शिरीषताई माझ्या कथा ‘वसुधा’त छापण्यासाठी त्यांच्याकडे
देत. ‘मेनका’चे संपादक पु.वि. बेहेरे यांनीही
प्रोत्साहन दिले. त्यामुळेच किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, सत्यकथा आदींतून कथा,
ललित, परीक्षणे आदी विविधांगी लेखन शक्य झाले.
‘एकोणीसावी जात’ कादंबरीने मला मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
जयवंत दळवी, बा.ब. पाटील, नारायण सुर्वे असे दिग्गज माझे लिखाण आवर्जून वाचू लागले.
माझे लिखाण पूर्णतः
स्वानुभवातून जन्मलेले असल्यामुळे ते वाचकाच्या मनाला कुठे ना कुठे स्पर्श करते.
नवोदित लेखकांनीही साहित्यप्रकार गौण मानून अनुभवसिद्ध लेखनावर भर द्यावा. मग,
विद्यापीठीय समीक्षक त्याला कोणतीही मोजमापे लावोत. स्वतःचे अनुभवविश्व साहित्यातून
मांडत गेलात, तरच वाचनीय साहित्यकृती तुमच्या हातून निर्माण होतील. तसेच
आयुष्यातील संघर्ष संपला, असे मात्र कधीही मानू नका. आज ८०च्या उंबरठ्यावरही मी
माझा संघर्ष संपला असे मानत नाही. धडपडणे सुरूच आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी हे
आवश्यकच आहे. जगण्याचे बळ संकटांतूनच लाभते. त्यांच्यावर मात करण्यासाठी धडपडणे
हेच आयुष्य!
--
महादेव मोरे यांचे
काही साहित्य
कथासंग्रह: तुझी कथा माझे शब्द,
बत्ताशी, ऐन बहरात कैफ कहरात, चिताक, इंगित, दवना, थिल्स, फर्री, बेंडल, तिंगाड,
गब्रू, येड्याप, चकवा, काळोखातील काळोख इत्यादी.
ललित गद्य: इथे फुलांना मरण जन्मता
व्यक्तीचित्र संग्रह: चेहरे
कादंबरी: पाव्हणा, बळी, एकोणीसावी
जात, पनोती, वर आभाळ खाली धरती, रैत, वस्ती, स्टँड, प्रवाह, आडगार, झळा, लाइन,
लोफड, व्हलय, झोंबडं, वेगळा, रानपाखरं, झंगाट इत्यादी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा