रविवार, १७ जून, २०१८

माझे बाबा- माय बेस्ट फ्रेंड




(दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये फादर्स डे निमित्त रविवार, दि. 17 जून 2018 रोजी प्रकाशित झालेला लेख ब्लॉग वाचकांसाठी 'मटा'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)
Dr. N.D. Jatratkar
माझे बाबा म्हणजे डॉ. एन.डी. जत्राटकर. निपाणीनजीकच्या देवचंद महाविद्यालयातून समाजशास्त्र व मानववंश शास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी मोठे शैक्षणिक योगदान दिले. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेल्या माझ्या वडलांनी निपाणीजवळच्या जत्राट या खेड्यातून दररोज उन्हापावसात ओढ्यानाल्यांतून सात-आठ किलोमीटर चालत जात प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. गावच्या पोलीस पाटील यांच्या मदतीमुळे त्यांना उच्चशिक्षण घेता आले. या कृतज्ञतेची जाणीव ठेवत बाबांनी पोलीस पाटलांच्या नावे देवचंद कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती तर सुरू केलीच; पण, दरवर्षी गरीब परिस्थितीतील पण शिकण्यास उत्सुक असलेल्या किमान दोन विद्यार्थी- विद्यार्थिनींना दत्तक घेऊन आवश्यक ती सर्व शैक्षणिक मदत ते करू लागले, आजही करताहेत. विशेषतः विद्यार्थिनींनी शिकले पाहिजे, या कळवळ्यातून अनेक होतकरू विद्यार्थिनींना त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे शिक्षणासाठी मदत केली. मात्र, त्यांनी त्यांच्या या उपक्रमाचा कधीही गवगवा केला नाही. त्यांच्या या सहृदयतेमुळे आज निपाणी परिसरात माझ्या अशा जात-धर्मनिरपेक्ष अनेक मानस भगिनी आणि बंधू आहेत. त्याचा मला अभिमानही आहे.
सार्वजनिक स्तरावर माझ्या बाबांनी जे प्रेम या तमाम विद्यार्थ्यांना दिले, त्याहून कितीतरी अधिक पटीने त्यांच्या या प्रेमाचा मी प्रचंड मोठा लाभार्थी आहे. अगदी लहानपणापासून बाबा माझे बेस्ट फ्रेंड आहेत. कोणत्याही गोष्टीविषयी माझे आईपेक्षाही बाबांशी अधिक शेअरिंग असते. आजही आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा झाल्यास अंतिम निर्णयासाठी मी बाबांकडेच जातो. त्या निर्णयासंदर्भात माझे विचार त्यांच्यासमोर ठेवले की मला बरे वाटते. आणि तुला जे अधिक योग्य वाटते, त्याप्रमाणे तू निर्णय घे, हे बाबांचे शब्द ऐकले की, मला माझा निर्णय घेण्यात कोणतीही अडचण येत नाही अगर पश्चातापाची वेळही येत नाही. आयुष्यातील संपूर्ण वाटचालीत माझे बाबा माझ्या पाठीशी; नव्हे सोबत, कणखरपणे व खंबीरपणे उभे राहिले. माझ्यामुळे लोकांकडून ऐकून घेण्याचा प्रसंगही त्यांच्यावर आला. पण, अशा प्रसंगांना त्यांच्या परीने तोंड देत असतानाच त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम न होऊ देता त्यांनी मला सातत्याने चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित केले. बाबांच्या अनेक मित्रांना, सहकाऱ्यांना वाटते की, बाबांमध्ये अधिक क्षमता असूनही त्यांनी स्वतःला खूप संकुचित ठेवले. या म्हणण्यात तथ्यही आहे. पण, याचे कारण म्हणजे आम्ही कुटुंबिय होतो. बाबांच्या प्राधान्यक्रमावर त्यांची फॅमिली ही नेहमीच टॉप प्रायोरिटी राहिली. बाबांचे विश्व म्हणजे मी आणि माझा भाऊ होतो आणि आहोत. त्यापुढे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक करिअर वृद्धीच्या सर्व शक्यता नगण्य मानल्या आणि त्यांचा हरेक क्षण त्यांनी आम्हा दोघा भावांसाठीच वेचला. आजही वेचताहेत, अगदी वयाच्या सत्तरीतही.
माझ्या वडलांना त्यांचा वाढदिवस ठाऊक नाही. त्यामुळे माझा जन्म झाला, त्यावेळी माझ्या जन्माचा वार, दिनांक आणि अगदी जन्मवेळही त्यांनी त्यांच्या खिशातल्या डायरीत स्वतःच्या सहीनिशी नोंदविला. आजही मी तो डायरीचा कागद जीवापाड जपून ठेवला आहे.
मी कित्येकदा जाहीर भाषणांमधूनही सांगतो की, दोन बाबांमुळे मी घडू शकलो. एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे माझे बाबा. बाबासाहेबांनी प्रदान केलेल्या घटनादत्त अधिकारांमुळे माझे बाबा शिक्षण घेऊन त्यांचे सामाजिक-शैक्षणिक कार्य करू शकले. आणि माझ्या बाबांमुळे मी घडू शकलो. केवळ थँक्यू म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. पण, या निमित्ताने त्यांनी माझ्यासाठी केलेल्या कष्टांप्रती, माझ्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाप्रती कृतज्ञता व्यक्त करता येते आहे, याचा आनंद आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा