मंगळवार, १९ जून, २०१८

रा. गो. गुरूजी


(सिदनाळ (ता. चिकोडी) येथील राजाराम गोविंद कांबळे तथा रा.गो. गुरूजी यांचे गेल्या शनिवारी (दि. १६ जून २०१८) निधन झाले. गुरूजी माझ्या वडिलांचे शिक्षक तर माझे मार्गदर्शक. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...)


रा.गो. कांबळे गुरूजी
सिदनाळचे राजाराम गोविंद कांबळे तथा रा.गो. गुरूजी हे नाव जत्राटची पंचक्रोशी सोडली, तर अन्यत्र ठाऊक असण्याचं कारण नाही. आपल्याला शिकविणारे रा.गो. यांच्यासारखे अनेक गुरूजी आपल्या कर्तव्य तृप्तीच्या आनंदात निवांत उर्वरित पेन्शनर जीवन व्यतित करीत असतात. सच्च्या गुरूला कोणी शिष्यानं आपल्याकडं येऊन कृतज्ञताभाव व्यक्त करावा, अशी अपेक्षा असण्याचंही कारण नसतं. गुरूदक्षिणेपोटी अंगठा मागणारे गुरू आणि गुरूला अंगठा दाखविणारे शिष्य हे या सच्च्या कॅटेगरीत असणार नाहीत, हे उघड आहे.
तर, रागो गुरूजी हे माझ्या वडिलांचे गुरू. साधारण १९६०-६१च्या सुमारास जत्राटच्या प्राथमिक शाळेत गुरूजी म्हणून रुजू झालेले आणि तेथून पुढे सलग १७ वर्षे जत्राटच्या या शाळेला आणि त्या शाळेच्या माध्यमातून स्थानिक सामाजिक-सांस्कृतिक परीघात त्यांनी योगदान दिलं. स्वतः दलित, मागासवर्गीय कुटुंबातून परिस्थितीशी दोन हात करीत शिक्षण मिळवून गुरूजी झालेल्या रागोंना शिक्षणाचं वेगळं महत्त्व सांगण्याची गरज नव्हती. म्हणून केवळ मागासवर्गीयांतीलच नव्हे, तर प्रत्येक मुलामुलीनं शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावं, ही कळकळ आणि तळमळ रागोंमध्ये होती. शाळा सुरू होण्याच्या आधी सायकलवरुन किंवा चालत असा त्यांचा फेरफटका ठरलेला असे. कधीही, कोणत्याही गल्लीत, कोणाच्याही घरासमोर, शिवारात ते अचानक उगवत आणि तिथं शाळा चुकवून एखादा मुलगा अगर मुलगी टवाळक्या किंवा इतर काही काम करताना दिसले की, सरळ त्यांची बखोटी धरून सायकलवर अगर खांद्यावर टाकून त्यांना घेऊनच ते शाळेत जात. हळू हळू मुलांनाही गुरूजींच्या शिकविण्यानं गोडी निर्माण होऊ लागली आणि ती आपसूकच शाळेकडं येऊ लागली.
गुरूजी जे काही शिकवत, ते मनापासून. हस्ताक्षरापासून ते गणितापर्यंत सबकुछ. गणित तर त्यांचा एकदम पेटंट विषय. अगदी पावकी, औटकी, दीडकीच्या पाढ्यांपासून ते लसावि, मसाविपर्यंत सारं काही मुलांच्या अगदी अंगवळणी पडेपर्यंत ते करून घेत. सहावी-सातवीच्या कविता अशा शिकवत की एखादी करुणामय कविता ऐकून मुलांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रूधारा वाहू लागत. राष्ट्रभक्ती, मातृभक्तीनं ओथंबलेली कविता शिकविताना भावनेनं उचंबळून गुरूजींच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी पाहून विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेला हात घातला जाऊन त्यांच्याही डोळ्यांना लागलेल्या धारा, असं दृश्य आज कुठं नजरेस पडेल काय? बोथटलेल्या संवेदनांच्या जगात ते अशक्यच, पण रागो गुरूजींच्या वर्गात हे दृश्य पाहावयास मिळे.
वर्गात शिकविणाऱ्या गुरूजींच्या आयुष्याकडूनही अनेक धडे त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळत. गुरूजींनी आईवडिलांच्या माघारी आपल्या चार बहीण-भावांच्या शिक्षणाची, विवाहाची जबाबदारी खांद्यावर पेलली होती आणि ती कडेपर्यंत निभावली. पगार होता त्यांचा अवघा ६५ रुपये. पण, त्यात स्वतःच्या गरजा अगदी मर्यादित राखून भावंडं आणि गोरगरीब विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी त्या पुंजीचा पै न पै वापरला.
माझ्या वडिलांवर गुरूजींनी अगदी धाकट्या भावाप्रमाणं प्रेम केलं आणि वडिलांनीही त्यांच्यावर अगदी थोरल्या बंधूप्रमाणं.. मात्र, गुरू म्हणून त्यांच्याविषयीचा आदर निरंतर त्यांच्या मनात नित्य होता. या दोघांचा जिव्हाळा गेली सुमारे ५८ वर्षे अखंडितपणे गुरूजींच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिला. या कालावधीत गुरूजींचे आणखी एक शिष्य म्हणजे निवृत्त मुख्याध्यापक नारायण कांबळे- हे बाबांचे आतेभाऊ. त्यांच्यावरही गुरूजींचे अमोल संस्कार. या दोन शिष्यांनी प्रत्येक गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूजींच्या घरी जाऊन, त्यांना वंदन करून, त्यांचा आदरसत्कार करून आशीर्वाद घेतले नाहीत, असे घडले नाही. वडिलांना बहीण नाही, पण गुरूजींच्या बहिणीला त्यांनी बहीण मानलेले. त्यामुळे अशी एकही भाऊबीज नाही, की जेव्हा वडील दिवाळीला गुरूजींच्या घरी गेले नाहीत.
वडिलांच्या लहानपणची भाऊबीजेची गोष्ट. घरची गरीबी तर होतीच. पण, भाऊबीजेला गुरूजींच्या बहिणीकडे जायचे तर ओवाळणी द्यायला हवी म्हणून ते रुपया-दोन रुपये साठवत असत. त्याचवेळी गुरूजी मात्र बहिणीसाठी लुगडं, साडी अशा गोष्टी घेत. ओवाळणीच्या वेळी मात्र बाबांकडचे पैसे ते स्वतःकडं घेत आणि साडी बाबांच्या हातून बहिणीला देववत आणि स्वतः ती दोन रुपायांची ओवाळणी बहिणीला देत. सहजसाध्या वागण्यातून केवढा हा मोठा संस्कार गुरूजी देत. एकदा एका दसऱ्याला आजीच्या अपरोक्षच बाबांना थेट सायकलीवर घालून निपाणीला घेऊन गेले आणि नवेकोरे कपडे अंगावर चढवून घेऊनच घरी जेवायला परतले.
जत्राट गावात सामाजिक सलोखा, सौहार्द निर्माण करण्यातही गुरूजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. शाळेत नव्यानं रुजू झालेल्या गुरूजींनी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. नृत्य, नाटक, एकांकिका, गायन, वादन अशा हरेक कलागुणांचं प्रदर्शन करण्यात येणार होतं. शाळा सहशिक्षणाची होती. त्यामुळं मुलं-मुली सर्वांचाच सहभाग दिसणं, असणं आवश्यक होतं. गावातली ब्राह्मण कुटुंबं ही पुरोगामी विचारांची होती. त्यामुळं त्यांनी आडकाठी घेतली नाही. लिंगायत समाजातील काही वरिष्ठांनी मात्र त्याला आक्षेप घेतला की, आमच्या मुली असं गाणंबजावणं करणार नाहीत. मात्र, रागो गुरूजींनी त्यांना परोपरीनं समजावलं. तुम्ही यंदाचा कार्यक्रम पाहा. तो तुम्हाला नाही आवडला, तर येथून पुढं कधीही कार्यक्रम करणार नाही, असंही आश्वासन दिलं. त्यावर मग ही मंडळी तयार झाली. गावातल्या ईदगाह मैदानावर कार्यक्रमाचं नियोजन झालं. सारा गाव कार्यक्रम पाह्यला लोटलेला. आक्षेप घेणाऱ्या मंडळींना स्टेजजवळ खुर्च्या टाकून कार्यक्रम बयाजवार पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. शाळेच्या मुलांनी असा काही बहारदार, दर्जेदार कार्यक्रम सादर केला की, समस्त गावकऱ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. सुरवातीला आक्षेप घेणाऱ्या मंडळींनीही मोठ्या दिलदारपणानं आपला आक्षेप मागे घेतला आणि दरवर्षी असा कार्यक्रम सादर करण्याचं वचनच गुरूजींकडून घेतलं आणि त्याला सर्वोतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासनही दिलं.
त्या काळात पंचक्रोशीत जत्राटची अशी एकमेव शाळा असेल, जिथं मुलं-मुली एकत्र खेळताना, अभ्यास करताना दिसत. जात-धर्म, उच्चनीच, अशा सर्व भेदांना हद्दपार करून विद्यार्थी म्हणून, भारताचा नागरिक म्हणून एकमेकांशी स्नेहबंध दृढ करण्याची गुरूजींची शिकवण त्यांच्या देखरेखीखाली मुलांनी अंमलात आणली होती. गावकऱ्यांनाही त्याचे फारसे काही अप्रूप राहिलेले नव्हते, इतका एकजिनसीपणा गुरूजींनी गावात निर्माण केला होता.
गुरूजींना निवृत्त होऊन बरीच वर्षे झाली होती. पण, समोर विद्यार्थी दिसला की, त्याच्या अभ्यासाची चौकशी करणं, गुण विचारणं, आवडते-नावडते विषय विचारणं आणि चांगला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करणं हे त्यांच्या अंगवळणी पडलेले गुणविशेष होते. मी स्वतः त्यांना लहानपणापासून पाहात आलो. पण, कधीही त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्यरेषा मावळल्या नाहीत, की राग-तिरस्काराच्या आठ्या कपाळावर उमटल्या नाहीत. प्रत्येकाची भरभरून आस्थेवाईकपणे चौकशी करणं, काळजी घ्या, असं सांगणं, चांगल्या कामासाठी शुभेच्छा देणं, हे त्यांनी अंतापर्यंत केलं. कधीही आपल्या दुःखाचं अवडंबर नाही, की सुखाचा जल्लोष नाही, सर्व परिस्थितीत समाधानाच्या भावनेनं वावरत राहणं त्यांना साधलं होतं. म्हणूनच वडिलांनी त्यांच्या नव्या घराला नाव सुचवलं कर्तव्य तृप्ती. आणि ते गुरूजींनी अत्यंत समाधानानं घरावर कोरलं.
वयाच्या पासष्टी-सत्तरीपर्यंत गुरूजी हिंदू प्रथा-परंपरांचे पाईक होते. इतके की, पंचांग वगैरे पाहिल्याखेरीज कुठच्या कामाला हात घालायचे नाहीत. पण, या वयात त्यांच्या जावयांशी त्यांचा बौद्ध धम्माविषयी संवाद चालला होता. बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेचा गुरूजींच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्यांनी त्या वयात बुद्धाचा, त्याच्या धम्माचा साकल्याने अभ्यास केला आणि अगदी जाणीवपूर्वक त्याच्या विज्ञानवादी धम्माचा अंगिकार केला. आपले अंतिम संस्कारही त्याच पद्धतीने व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करण्याइतका गाढा प्रभाव त्यांच्यावर पडला. तेथून उर्वरित सारे आयुष्य त्यांनी बुद्ध-आंबेडकरांच्या वाचनात, चिंतनात आणि प्रसारात व्यतित केले.
गुरूजींच्या निधनानंतर माझ्या हाती आलेले हे त्यांच्या आठवणींचे काही तुकडे. त्यातून गुरूजी सारे कळणार नाहीत, पण गुरू कसा असावा, शिष्य कसे असावेत, याचे दर्शन नक्कीच होते. या गुरूचे गुरूपण तर अजून सांगायचेच आहे. गेल्या काही दिवसांपासून गुरूजींची प्रकृती ठीक नव्हती. ते अंथरुणाला खिळले होते. घरच्यांना ओळखेनासे झाले. मात्र, नारायण मामा आणि बाबा जेव्हा त्यांना भेटायला गेले, तेव्हा नेहमीसारखे हसण्याचा प्रयत्न करीत अरे व्वा, जोडीच आलीय की!’ असं म्हणून त्यांना ओळखलं होतं. मृत्यूपूर्वी एक दिवस आधी त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केलं. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी म्हणून पुन्हा हे दोन शिष्य गेले. दोघांचे हात त्यांच्या एकेका हातात होते, नजरेत अनोळखी भाव, जणू नजर शून्यात अंतिम क्षणांचा वेध घेत होती. बराच वेळ गेला. गुरूजींनी त्यांचे हात तसेच घट्ट धरलेले होते. या शिष्यांचा हात हाती धरून ठेवतच या गुरूने आपला अंतिम श्वास घेतला.... अन् सोडला.... तो कायमचाच!

२ टिप्पण्या:

  1. आज हे नाते दुर्मिळ होत चालले आहे. तुमचा हा लेख खऱ्या गुरू शिष्य परंपरेचा वारसा सांगणारा आणि अनेकाना प्रेरणा देणारा आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपले म्हणणे अगदी रास्त आहे, सर. माझी अपेक्षाही तीच आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. मनापासून धन्यवाद!

      हटवा