रविवार, २८ ऑक्टोबर, २०१८

आठवण पहिल्या ‘प्रेस रिलीज’ची!जगातील पहिले प्रेस रिलीज दि. २८ ऑक्टोबर १९०६ रोजी प्रसृत झाले. या स्मृतीप्रित्यर्थ पब्लीक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पी.आर.सी.आय.) या जनसंपर्क क्षेत्रातील संस्थेच्या वतीने २८ ऑक्टोबर हा दिवस जागतिक संज्ञापक दिन(वर्ल्ड कम्युनिकेटर्स डे) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने 'दैनिक सकाळ'मध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी 'दै. सकाळ' (कोल्हापूर)च्या सौजन्याने पुनर्प्रसारित करीत आहे...आयव्ही ली यांचे न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेले पहिले प्रेस रिलीज.Ivy Ledbetter Lee
अमेरिकेत जन्मलेल्या आयव्ही लेडबेटर ली (१६ जुलै १८७७ – ९ नोव्हेंबर १९३४) यांना आधुनिक जनसंपर्क क्षेत्राचे जनक मानतात. अत्यंत व्यावसायिक पद्धतीने जनसंपर्क क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवण्याबरोबरच त्याला प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य आयव्ही ली यांनी केले. आज जनसंपर्क क्षेत्राचा व्याप आणि विस्तार ज्या पद्धतीने झालेला आहे, त्याला ती विकासाची दिशा अत्यंत द्रष्टेपणाने त्यांनी प्राप्त करून दिली. रॉकफेलर समूह, पेनसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क सेंट्रल, बाल्टिमोर व ओहियो आदी रेलरोड कंपन्यांसह स्टील, रबर, तंबाखू क्षेत्रात कार्यरत उद्योगांसह कित्येक सार्वजनिक तसेच परदेशी सरकारांनाही जनसंपर्काच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचे काम ली यांनी केले. कोणत्याही उद्योग समूहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्साहवर्धनासाठी व त्यांना प्रेरणा देण्यासाठी अंतर्गत प्रकाशनांचे महत्त्व ली यांनी ओळखले होते. त्याची सुरवातही त्यांनीच केली. ली यांनी जे पहिले प्रेस रिलीज किंवा वार्तापत्र प्रकाशित केले, ज्याच्याकडे जगातील पहिले वार्तापत्र म्हणून पाहिले जाते, त्याच्या प्रसिद्धीचा इतिहास मोठा रंजक आहे.
विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या कालखंडात अमेरिकेतील वेगवेगळ्या प्रांतातील रेल्वे वाहतूक ही खाजगी कंपन्यांकडून चालविली जात असे. या कंपन्या-कंपन्यांमध्ये अत्यंत तीव्र स्पर्धा होती. आपल्याच कंपनीची सेवा ही अन्य कंपन्यांपेक्षा कशी चांगली आहे, हे दर्शविण्याकडे साऱ्या कंपन्यांचा कल असायचा. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या कंपनीचे आणि तिच्याद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवेचे नाव खराब होणार नाही, या बाबतीत साऱ्याच कंपन्यांचे मालक अत्यंत दक्ष असत. एखादी दुर्घटना वगैरे घडली, तर तिची माहिती प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवण्याचा, त्या घटनेविषयी विपर्यस्त माहिती देण्याचा अगर कंपनीच्या चुकांवर पांघरूण घालून इतर वेगळीच कारणे पुढे करून कंपनीची प्रतिमा वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी असे. इतर कंपन्यांचा मात्र या परिस्थितीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न असे. अशी ही तीव्र स्पर्धा होती.
या पार्श्वभूमीवर, पेनसिल्व्हेनिया रेलरोड कंपनीच्या रेल्वेच्या संदर्भात एक दुर्घटना घडली. २८ ऑक्टोबर १९०६ रोजी या कंपनीच्या रेल्वेचा अटलांटिक सिटी (न्यू-जर्सी) येथे डबे घसरून झालेल्या अपघातात सुमारे ५० लोकांचा मृत्यू झाला. ही कंपनी ली यांची क्लाएंट होती. इतक्या मोठ्या दुर्घटनेचा कंपनीच्या प्रतिमेवर मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता गृहित धरून कंपनीच्या संचालकांनी धसकाच घेतलेला होता. त्यावेळी ली यांनी त्यांना, जे काही घडले आहे, त्याची सविस्तर वस्तुनिष्ठ माहिती वृत्तपत्रांना पाठवावी, अशी सूचना केली. त्या काळातील प्रचलित पद्धतीहून त्यांची ही सूचना विपरित होती. संचालकांना ती तत्काळ मान्य होणे शक्य नव्हते. मात्र, ली यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या वस्तुस्थितीनिदर्शक माहिती देण्याचे महत्त्व पटवून दिले. काहीशा साशंक मनानेच कंपनीने त्यांना मान्यता दिली.
ली यांनी कंपनीकडून झालेल्या दुर्घटनेची तपशीलवार माहिती घेतली. त्यावर आधारित प्रेस रिलीज तयार करून वृत्तपत्रांना पाठविले. तत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारचे प्रांजळ निवेदन पाहून न्यूयॉर्क टाइम्सचे संपादकीय मंडळ अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी आयव्ही ली यांचे ते प्रेस रिलीज पुढील अंकात जसेच्या तसे प्रसिद्ध केले.
ली यांच्या त्या कृतीमुळे पेनसिल्व्हेनिया रेलरोड कंपनी ही त्या अपघाताकडे गांभीर्याने पाहात असल्याचे वातावरण निर्माण झाले आणि कंपनीची प्रतिमा खूपच उजळली. ली यांच्या या प्रेस रिलीजने जनसंपर्काच्या क्षेत्राला सकारात्मकचेचे आणि विश्वासार्हतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. आज काळ आणि तंत्रज्ञान दोन्ही बदलले असले तरी, पत्रकारितेच्या क्षेत्रात आजही जनसंपर्क मोहिमा आणि प्रेस रिलीजचे महत्त्व मोठे आहे. कित्येक चांगल्या बातम्यांची सुरवात ही प्रेस रिलीजमधून होत असते. विश्वासार्हता हा त्यांचा आत्मा आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातही ली यांच्यामुळे वस्तुनिष्ठ माहितीचे महत्त्व अधोरेखित झाले. माध्यमांना वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती वेळेत देऊ शकलो, तर आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य सुकर होऊन लोकांमध्ये संबंधित आपत्तीच्या अनुषंगाने ताजी वस्तुनिष्ठ माहिती जाऊन त्यांना दिलासा देण्याचे कामही त्याद्वारे साध्य होते. आयव्ही ली यांच्यातील सकारात्मक वृत्तीमुळे आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याच्या स्वभावामुळे जनसंपर्काच्या क्षेत्रालाही तशीच सकारात्मक दिशा लाभली. म्हणूनच या दिनाचे औचित्य शंभर वर्षांनंतरही कायम आहे.

1 टिप्पणी:

  1. आणि आज, आपल्या बातमीबरोबर 'वीज बंद निवेदन'! हे ही प्रेस रिलीजच!! :-) माहितीबद्दल धन्यवाद. वाचायला मजा आली.

    उत्तर द्याहटवा