(प्रतिकात्मक छायाचित्र) |
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.
'राष्ट्रवीर'कार गुरूवर्य शामराव देसाई |
डिस्क्लेमर: ज्या कोणाला लक्ष्मीच्या यात्रा, जत्रा करायाच्या आहेत, त्यांनी खुशाल कराव्यात. मला मात्र कुणी कृपया बोलावू नये. बोलावूनही आलो नाही, तर आपल्या भावना, अस्मिता आणि तत्सम गोष्टी उगाच दुखावून घेऊ नयेत, ही विनंती.
कोणत्याही जाहिरातीच्या अगर लेखाच्या खाली अगदी न वाचता येण्यासारख्या टाइपात डिस्क्लेमर छापण्याची अर्थात जबाबदारी झटकण्याची प्रथा आहे. मी मात्र या ठिकाणी माझ्या विधानाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून अगदी बोल्ड टाइपात ठळकपणे लिहिण्याचं धाडस करतोय. कारण गुरूवर्य शामराव देसाई यांच्या विचारांचा आणि कार्याचा मी अभ्यासक आहे. त्यांनी केलेल्या कामाचा प्रशंसक आहे आणि त्यांचं काम माहिती आहे म्हणूनच त्या कामाला हरताळ फासण्याचं काम किमान माझ्या हातून होणार नाही, या भावनेतूनच मी कोणत्याही गावच्या लक्ष्मीच्या जत्रा-यात्रांना न जाण्याचा निर्णय घेतलाय.
पंचवीस वर्षांनी यात्रा सुरू
अलीकडेच एका गावात लक्ष्मीची यात्रा झाली. २५ वर्षांनंतर यात्रा होत असल्याने यात्रेचा जल्लोष काही औरच असणं स्वाभाविक होतं. यात्रेच्या निमित्ताने शिकलेल्या शहाण्यासुरत्या लोकांनीही तशा प्रकारच्या पत्रिका वगैरे काढून मोठाच जल्लोष केला. मलाही काही मित्रमंडळींनी निमंत्रणं दिली. मात्र या संपूर्ण कालखंडात मला राहून राहून गुरूवर्य शामराव देसाईंची तीव्रतेनं आठवण येत राहिली.
२५ वर्षांनी, ५० वर्षांनी, साठ-सत्तर वर्षांनी या यात्रा पुनरुज्जीवित केल्या जाताहेत. हे पाहून गुरूवर्यांच्या सत्यशोधकी आत्म्याला किती यातना होत असतील, असाही विचार मनात येत राहिला.
कोण हे शामराव देसाई?
छत्रपती शाहू महाराजांच्या बहुजन समाजात जागृतीसाठीच्या कार्याचा प्रभाव बेळगावमथल्या नवशिक्षित तरुणांवरही पडला. विशेषतः बहुजन समाजाच्या मनावरील, जीवनावरील पुरोहितशाहीचा पगडा दूर करण्यासाठी सत्यशोधक, वैज्ञानिक विचारांची गरज आहे आणि त्यासाठी प्रबोधनाचं कार्य करावं, अशी प्रेरणा या तरुणांच्या मनी जागली. आणि एक दिवस शाहू महाराजांना भेटण्यासाठी हे तरुण कोल्हापूरला पोचले.
यामधे शामराव भोसले, भुजंगराव दळवी, रावसाहेब बिरजे, काकतीकर वकील, शामराव देसाई आदींचा समावेश होता. या तरुणांनी समाजात जागृती करण्यासाठी वृत्तपत्र काढण्याची परवानगी महाराजांकडे मागितली. महाराजांनी त्यांच्या संकल्पाचं तोंडभरून कौतुक तर केलंच, शिवाय त्यांना भरघोस मदतही केली. या मदतीतूनच बेळगावमधे या मंडळींनी शिवछत्रपती प्रिंटींग प्रेसची सुरवात केली. आणि ९ मे १९२१ ला शिवजयंतीच्या दिवशी राष्ट्रवीर नावाने न्यूजपेपर सुरू केला.
सुरवातीची काही वर्ष शामराव भोसले संपादक होते. पण पुढे राजाराम महाराजांनी त्यांना कोल्हापूर संस्थानात असिस्टंट जज म्हणून बोलावलं. त्यामुळे त्यांच्या जागेवर चिकोडीचे कृष्णाजीराव घाटगे संपादक झाले. त्याचवेळी भुजंगराव दळवींच्या सांगण्यावरुन शामराव देसाई नोव्हेंबर १९२५ मधे कुरुंदवाड संस्थानातली शिक्षकाची नोकरी सोडून राष्ट्रवीरचे सहसंपादक म्हणून रुजू झाले.
ध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ अशा शामराव देसाईंनी राष्ट्रवीरची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. हे पाहून १९२९ मधे त्यांच्याकडे संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राष्ट्रवीरकार देसाई यांचं यंदा सव्वाशेवं जन्मवर्ष आहे. ४ मे १८९५ मधे जन्मलेल्या देसाईंचं ४ डिसेंबर १९७१ ला निधन झालं.
अंधश्रद्धांविरोधात झगडणारा सत्यशोधकी संपादक
गुरूवर्य देसाईंनी केवळ खोलीत बसून संपादक पदाची धुरा सांभाळली नाही. तर बेळगाव, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, सांगली, गारगोटी, अथणी, चिकोडी, रायबाग आदी परिसरात झंझावातासारखं प्रबोधनाचं कार्य केलं. त्यांच्या प्रबोधनाचा रोख हा समाजातल्या अंधश्रद्धांच्या विरोधात होता. ज्या प्रथापरंपरा गोरगरीब शेतकरी समाजाला आणखी गरीब करण्यालाच सहाय्यभूत होतात, अशा प्रत्येक गोष्टीला त्यांनी विरोध केला.
या परिसरात सत्यशोधक समाजाच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचंड गतीने फैलाव करण्यात त्यांनी प्रचंड मोठी कामगिरी बजावली. निष्ठा, जिद्द, चिकाटी, जनहिताची तळमळ, निरपेक्ष सेवावृत्ती, अन्यायाविरुद्ध मनस्वी चीड या गुणांच्या जोरावर गुरूवर्य देसाईंनी ३० वर्ष राष्ट्रवीर चालवला.
गुरुवर्यांनी सातत्याने समाज प्रबोधनाचा खटाटोपच मांडला होता. या चळवळीत त्यांना शाहीर बहिर्जी शिरोळकर, कीर्तनकार गोविंदराव मेलगे या सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली. गुरूवर्यांच्या कोणत्याही सभेची सुरवात शिरोळकरांच्या पोवाड्याने होत. शिवाजी महाराजांचा पोवाडा, दारुबंदीवरचा पोवाडा, लक्ष्मची जत्रा करण्याविरुद्ध लोकांना प्रवृत्त करण्यासाछी लक्ष्मीचा पोवाडा, असे बरेच पोवाडे ते सादर करत. त्यानंतर गुरुवर्यांचे भाषण होई.
जत्रा म्हणजे लुच्च्यांचा बाजार
आपल्या भाषणात ते लोकांना प्रभावीपणे समजावून सांगत, ‘आज तुम्ही ज्या जमिनी कूळ म्हणून कसता, त्या एकेकाळी तुमच्या मालकीच्या होत्या. परंतु जत्रा यात्रा करण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी पैसा जवळ नसताना सावकाराकडून कर्ज काढून प्रचंड खर्च केला. कर्ज आणि त्यांचं व्याज मुदतीत फेडता न आल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला आणि सावकाराने जमिनी हडप केल्या. काही ठिकाणी शंभर रुपये कर्ज काढलं, त्यावर सावकाराने हळूच एक शून्य वाढवला. शेतकरी मुळात अंगठेबहाद्दर, त्यात हा शून्याचा घोटाळा. वर तीस ते चाळीस टक्के व्याज. केवळ अडाणीपणाचा फायदा घेऊन सावकाराने शेतकऱ्यांना नागवलं. त्यामुळे शिका, जत्रा यात्रा बंद करा. सण साधेपणाने करा. बकरे, कोंबडे मारु नका. दारू पिऊ नका. दारु तुमचा संसार उद्ध्वस्त करते.’
जगदंबेची यात्रा या स्फुटलेखात त्यांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा अतिशय जळजळीत शब्दांत व्यक्त होतो. ते म्हणतात, ‘देवधर्म सब झूट है, असे कुळंब्याने एकदमच मानावे, असा आमचा हट्ट नाही. परंतु देवधर्माच्या भलत्याच कल्पनेला बळी पडून आपल्या कृतीने आपण दरिद्री बनू नये. आणखी देवाधर्माकरिता पैसा मोडावा आणि वेळ खर्चावा लागत नाही, अशी माझी समजूत आहे. देव असेल तर तो सगळीकडे भरून असला पाहिजे. तो हिंदूकरिता काशीत आणि मुसलमानांकरिता मक्केत दडून बसलेला नसावा.’
ते पुढं लिहितात, ‘आमचे खरे साधुसंत सांगतात की प्रत्येकाच्या अंतःकरणात देव आहे. प्रत्येक माणूस ईश्वराचे लेकरू आहे. आणि हेच समजू उमजू लागले तर तोच धर्म होय. मग असे जर आहे तर, जत्रेच्या धर्मापायी गरिबीच्या खंदकात कुणबी का उतरला? जत्रेत एका भागात अज्ञानाचा खंदक वाढत असतो, तर तेथेच लुच्चागिरीचा डोंगर उठत असतो. अशा स्थितीत जत्रा म्हणजे लुच्च्यांचा बाजार ही गोष्ट कोळ्या, कुणब्यांना कळावयास नको काय?
लक्ष्मीची जत्रा आणि शेतकऱ्याची दैना
‘मालकीच्या जमिनीची फाळापट्टी ज्याची वर्षा आठ-दहा रुपयेही नाही, त्याने जगदंबेच्या जत्रेकरिता वीस पंचवीस रुपये हकनाक उधळण्यास बेफामपणे तयार व्हावे, हे देशाचेच कमनशीब नव्हे काय? म्हणून आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेण्याची कोळ्या-कुणब्यांना लागलेली खोड त्यांच्यापासून सुटावी, या करिता परोपकारी लोकांनी आणि पुढाऱ्यांनी प्रयत्न करावा, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे,’ असं ते म्हणतात.
अशाच प्रकारे सांगलीच्या माविनकट्टी इथल्या लक्ष्मीच्या यात्रेच्या अनुषंगाने प्रबोधन करताना गुरुवर्य देसाई ‘लक्ष्मीची जत्रा’ या स्फुटलेखात जत्रा आणि शेतकऱ्याचा दैन्याचा फेरा या कशा परस्परपूरक बाबी आहेत, ते स्पष्ट करतात.
ते म्हणतात, ‘एकशे दहा घरांच्या गावावर चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे. ते कमी व्हावे, म्हणून हे गाव जर जत्रा करीत असेल तर ते कर्ज होईपर्यंत गाव गप्प कसे बसले, असा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्याजवळ पैसा नसतो. त्यात यंदा दाणे, गूळ, कापूस हे जिन्नस भलतेच सवंग झाले आहेत. यामुळे माविनकट्टीच्या शेतकऱ्यांना लक्ष्मीच्या जत्रेत पट्टी देण्याकरिता रिण काढावे लागले असेल, ते निदान चार-पाच हजार तरी असेल. म्हणजे चाळीस हजारांच्या कर्जात आणखी पाच हजारांची भर. म्हणजे एकंदर कर्ज झाले ४५ हजार. या कर्जाला वर्षाला बारा टक्के व्याज म्हठले तरी व्याजच झाले ५४०० रुपये. गावाचा फाळा अदमासे दोन हजार रुपये. म्हणजे यंदा भागवायची रक्कम झाली. ७५०० रुपये. फाळ्याच्या जमिनीत उत्पन्न चौपट होते, असे गृहित धरले तरी, ते उत्पन्नही बरोब्बर ७५०० रुपयेच होते. म्हणजे यंदाची कमाई व्याज आणि फाळ्यातच गडप होणार. म्हणजे शेतकरी लक्ष्मी बसवित नाही, तर लक्ष्मी घालवितोच अशा जत्रांतून. याचा अर्थच असा की दौलत वाढविण्यासाठी लक्ष्मीच्या यात्रा करावयाच्या हे साफ चुकीचे आणि शेतकऱ्याच्या मुळावर येणारे आहे.’
सत्यशोधक पुरोहित तयार केले
अशा प्रकारे गुरुवर्य देसाई महात्मा फुल्यांचं कार्य अत्यंत प्रभावीपणे पुढे नेत होते. बहुजन समाज अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त व्हावा, यासाठी त्यांनी अत्यंत झपाटल्यासारखं काम केलं. लग्नविधीपासून श्राद्धापर्यंत विविध विधीकार्यातल्या भटभिक्षुकांच्या मक्तेदारीचं उच्चाटन करण्याचा चंग शाहू महाराजांच्या प्रेरणेने अनेक सत्यशोधक कार्यकर्त्यांनी बांधला होता. या चळवळीचा सर्वाधिक प्रसार कोल्हापूरच्या दक्षिणेला बेळगाव, आजरा, चंदगड भागात कुणी केला असेल, तर तो गुरुवर्यांनीच. १९१७ पासून गुरुवर्यांनी बहुजन समाजातल्या शेकडो लग्नांत स्वतः पौरोहित्य केलं.
लग्नाच्या मोसमात एकटे कुठे पुरे पडणार म्हणून सत्यशोधक पुरोहित तयार केले. दलितांच्या वस्त्यांत जाऊन त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होताना त्यांच्या माणुसकीच्या हक्कांची जाणीव ते त्यांच्या मनात पेरत. स्त्रीत्वाचा अवमान करणाऱ्या देवदासी प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. खेडोपाड्यांत शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी १९४१मधे बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीची स्थापना केली. या शिक्षणाच्या लोकचळवळीतून अल्पावधीतच बेळगाव, खानापूर, चंदगड, हुक्केरी, चिकोडी, अथणी आणि रायबाग या तालुक्यांत संस्थेच्या २८९ प्राथमिक शाळा, २५ रात्रशाळा आणि २ हायस्कूल्स स्थापन झाली.
गुरुवर्यांच्या या कृतीशील प्रबोधनाचा त्या काळात समाजावर निश्चित परिणाम होत होता. त्यामुळे या परिसरात साध्या सत्यशोधक पद्धतीने लग्नं साजरी होत. खर्चाला फाटा देत सामूहिक लग्नसोहळे सुरू झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणाऱ्या देवदेवतांच्या विशेषतः लक्ष्मीच्या यात्रा बंद झाल्या. लक्ष्मीची यात्रा केली नाही, तर ती कोपेल, ही भीती लोकांच्या मनातून दूर झाली. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागलं. लग्नातील डामडौल कमी झाला. परिणामी कर्जबाजारीपणा कमी झाला.
या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीचं अवलोकन केलं असता विदारक चित्र नजरेसमोर येतं. गुरूवर्यांनी दाखवलेल्या वाटेने समाज चालला होता. तो तसाच पुढे चालत राहिला, तर एक आधुनिक वैज्ञानिक समाज म्हणून त्याची जडणघडण होईल, अशी रास्त अपेक्षा त्यांनी बाळगली असणार. आणि ते स्वाभाविक होतं. परंतु गुरूवर्यांच्या माघारी त्यांनी निर्माण केलेलं हे सुंदर चित्र दिवसेंदिवस धूसर होतं गेलं.
जत्रांमागे बाजाराचा, अर्थकारणाचा रेटा
प्रबोधनाची चळवळ मंदावत गेली. गुरुवर्यांचं प्रबोधन इतिहासजमा झालं. गावागावांतून पुन्हा लक्ष्मी जागी होऊ लागली. खरं तर जागी केली जाऊ लागली. परंपरेप्रमाणे ती दर पाच दहा वर्षांनी येऊ लागली. तिच्यासमोर हजारो निष्पाप बकऱ्या, कोंबड्यांचा बळी जाऊ लागला, जेवणावळी उठू लागल्या, आहेरावर लाखो रुपये खर्च केले जाऊ लागले.
ज्यांची ऐपत नाही, अशांवरही हा सामाजिक, धार्मिक दबाव लाजेकाजेने वाढून पुन्हा रिण काढून सण साजरा करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. शिकले. सवरलेले लोकही हाती खेळता पैसा असल्याने त्या निमित्ताने लोक घरी येऊन जेवून जातात, असं निमित्त सांगू लागलेत. या साऱ्या जत्रांमागे बाजाराचा, अर्थकारणाचा मोठा रेटा आहे. २०१५ मधे या परिसरातल्या एका गावात लक्ष्मीच्या यात्रेवरचा खर्च हा शंभर कोटी रुपयांच्या घरात गेल्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवर्य देसाईंचं कार्य मला माहिती असल्याने किमान मी तरी त्यांच्या कृतज्ञतेपोटी अशा कोणत्याही लक्ष्मीच्या यात्रेला जाणं म्हणजे गुरुवर्यांच्या विचार आणि कार्याशी प्रतारणाच नव्हे काय? आणि म्हणून मी माझ्यापुरतं तरी असं ठरवलंय की, अशा कोणत्याही जत्रा, यात्रेला जाणार नाही. गुरुवर्यांसारखं डोंगराइतकं महान कार्य माझ्या हातून होईल की नाही, याची साशंकता असली तरी त्यांच्या कार्याशी प्रतारणा मात्र होऊ न देण्याची दक्षता मी निश्चितच घेऊ शकतो.
आणि म्हणूनच माझ्या डिस्क्लेमरची जत्रा-यात्रा साजरेकरूंनी नोंद घ्यावी, अशी अपेक्षा आहे. नोंद नाही घेतली तरी काही फरक पडणार नाही. कारण तो तुमच्या कोणाहीपेक्षा माझ्या स्वतःला लागू करवून घेणंच मला अधिक महत्त्वाचं वाटतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा