सोमवार, २० मे, २०१९

जनसंपर्क व्यावसायिकांनी नव्या बदलांना सामोरे जाण्यास सज्ज व्हावे: प्रा. अनन्य मेहता

पीआरसीआय- कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या पहिल्या परिषदेमध्ये बीजभाषण करताना सिम्बायोसिस सेंटर ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्रमुख प्रा. अनन्य मेहता. व्यासपीठावर चॅप्टरचे उपाध्यक्ष सतीश ठोंबरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर, पीआरसीआय-वायसीसीचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई व चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर.
पीआरसीआय- कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या पहिल्या परिषदेमध्ये प्रमुख बीजभाषक सिम्बायोसिस सेंटर ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्रमुख प्रा. अनन्य मेहता, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर, पीआरसीआय-वायसीसीचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई यांच्यासह (डावीकडून) कोल्हापूर चॅप्टरचे सचिव रावसाहेब पुजारी, उपाध्यक्ष सतीश ठोंबरे, अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर, सहसचिव रविराज गायकवाड आणि खजिनदार राजेश शिंदे.


कोल्हापूर विभागातील जनसंपर्क व्यावसायिकांच्या पहिल्या परिषदेला मोठा प्रतिसाद

कोल्हापूर, दि. १९ मे: जनसंपर्काचे क्षेत्र झपाट्याने बदलत असून त्याची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. बदलत्या काळानुरुप या क्षेत्राने तंत्रज्ञानात्मक बदल स्वीकारले आहेतच. पण नजीकच्या काळातही अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांनी तयार राहावे, असे आवाहन पुण्याच्या सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्रमुख प्रा. अनन्य मेहता यांनी आज येथे केले.
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)च्या कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने कोल्हापूर विभागातील जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिकांची पहिली परिषद आज हॉटेल थ्री लिह्व्ज येथे आज झाली. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह या विषयावर बीजभाषण करताना प्रा. मेहता बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर होते, तर उद्घाटन म्हणून पीआरसीआय- यंग कम्युनिकेटर्स क्लबचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई उपस्थित होते.
प्रा. मेहता म्हणाले, गेल्या काही वर्षांत जनसंपर्क क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. या बदलांशी जुळवून घेण्याचाही या क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आहे. पारंपरिक जनसंपर्क साधने ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान असा हा प्रवास आहे. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे बदल स्वीकारण्याखेरीज गत्यंतर नाही. तथापि, कन्टेन्टचे महत्त्व मात्र अबाधित राहणार आहे. त्यामुळे उत्तम पद्धतीचा आशयगर्भ आणि अर्थपूर्ण कन्टेन्टची निर्मिती करणाऱ्या जनसंपर्क व्यावसायिकाचे महत्त्व कायम राहणार आहे.
डॉ. बी.एम. हिर्डेकर
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर म्हणाले, जनसंपर्काच्या क्षेत्राकडून आता सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळे जनसंपर्क व्यावसायिकांना आता बहुआयामी आणि समाजाभिमुख भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ माहितीने परिपूर्ण असणाऱ्या समंजस जनसंपर्काची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे. जनसंपर्क अधिकारी हा त्यामुळे आता विश्वासार्ह माहितीचा स्रोत किंवा वितरक आहे. सौहार्दपूर्ण सुसंवादाच्या प्रस्थापनेमध्ये अशा जनसंपर्काची भूमिका अत्यंत मोलाची आहे.
यावेळी अविनाश गवई यांनी पीआरसीआय आणि यंग कम्युनिकेटर्स क्लबच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहसचिव रविराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष सतीश ठोंबरे यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह या विषयावर ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. परिसंवादात शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे – पवार यांनी जनसंपर्क क्षेत्राची वृद्धी, प्रगती व विकास या विषयावर, प्रा. राजेंद्र पारिजात यांनी जनसंपर्क, जाहिरात आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी या विषयावर आणि राजेश शिंदे यांनी तंत्रज्ञानात्मक बदलांचा जनसंपर्क क्षेत्रावर प्रभाव या विषयावर मांडणी केली. तत्पूर्वी, कालिदास पाटील यांनी जनसंपर्क आणि व्यक्तीमत्त्व विकास या विषयावर प्रबोधन केले. या परिषदेला जनसंपर्क व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. 

1 टिप्पणी: