रविवार, ३० जून, २०१९

‘सर, फ्यामिली हय क्या?...’

(प्रतिकात्मक छायाचित्र)



काही दिवसांपूर्वी माझे वडिल आणि भाऊ यांच्यासह एका ढाब्यावर जेवायला गेलो होतो. आत आणि बाहेर असे दोन हॉल होते. उन्हाळ्याचे, उष्म्याचे दिवस असल्याने आम्ही बाहेरच्या, तुलनेत बऱ्यापैकी हवेशीर अशा त्या हॉलमधला एक खिडकीकडेचा टेबल निवडला आणि बसलो. काही वेळात वेटर आला. त्यानं विचारलं, सर, फ्यामिली हय क्या?’ आम्ही एकमेकांकडं पाहिलं आणि होय, म्हणून त्याला सांगितलं. थोड्या वेळात तो पुन्हा पाण्याचे ग्लास घेऊन आला आणि पुन्हा एकदा त्यानं तोच प्रश्न विचारला, सर, फ्यामिली हय क्या?’ आम्ही परत त्याला होय म्हणून सांगितलं. त्यावर तो अस्वस्थपणे इकडं तिकडं पाहू लागला. त्याच्या अस्वस्थतेचं कारण एव्हाना आमच्याही लक्षात आलेलं. आम्ही बसलो होतो तो हॉल फॅमिलीसाठी राखीव होता. आजूबाजूच्या दोनेक टेबलांवर त्याला अभिप्रेत असलेल्या फ्यामिली बसलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्यात एखाद-दुसरी महिला होती.
वेटरनं त्याच अस्वस्थतेत आम्हाला सांगितलं, सर, आप अंदर बैठिए। ये फ्यामिली रुम हय। आमच्याही लक्षात आलं की, आपल्याला आता आतल्या रुममध्ये बसायला लागणार. त्यापूर्वी हे प्रकरण कुठवर जातंय, ते पाहण्यासाठी मी त्याला म्हटलं, हम भी फ्यामिली हय। ये मेरे पिताजी हय और ये मेरा सगा भाई। चाहे तो हमारे आयडी देख लो। त्यावर त्याला काय बोलायचं सुचलं नाही. तो थेट गेला आणि त्याच्या मालकालाच घेऊन आला. मालकालाही मी तेच सांगितलं.
त्यावर मालक म्हणाला, सर, आपको बैठने दूँगा, तो बाकी लोग भी शराब पीकर आएँगे और यहाँ बैठने की माँग करेंगे।
पुन्हा मी म्हणालो, एक तो हम फॅमिली है, और ना ही हमने शराब पी रख्खी है। तो हमें यहाँ बैठने का पूरा हक है। और समझो मै शराब पी के किसी गैर महिला को साथ ले आया, जो मेरी कोई रिश्तेदार या फॅमिली नहीं है, तो आप क्या करोगे? मुझे यहाँ बैठने दोगे की नहीं?’
या माझ्या प्रश्नावर मालक अत्यवस्थच झाला. त्याला काय उत्तर द्यावं सुचेना. म्हणाला, सर, प्लीज बात को समझिए। मैं आपको अंदर बैठने की रिक्वेस्ट करता हूँ। त्याची ती हतबलता पाहून आम्हाला मौज वाटली आणि आम्ही आतल्या जनरल रुममध्ये शिफ्ट झालो, जिथे आमच्या आधीपासून असलेले काही शराब पिए हुए दोस्त लोग बटर चिकनवर ताव मारत होते. आम्हालाही भूक लागली असल्यानं आम्ही हा सवाल-जवाब लांबविता येणं शक्य असूनही, न वाढविता आत जाऊन बसलो. जेवणाची ऑर्डर दिली.
ऑर्डर येईपर्यंत आम्हा तिघांना आता हा एक ताजा आणि वेगळा विषय स्टार्टर म्हणून मिळाला होता. आमचे बंधुराज जरा जास्तच भडकलेले. फ्यामिलीचे शेंडेफळ असल्यानं त्यांचा तो अधिकारच होता. पण, त्यांची समजूत घालता घालता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, भारतीय समाजात स्त्रीशिवाय कोणतेही कुटुंब पूर्ण होत नाही, किंबहुना त्याला कुटुंब- फॅमिली म्हणताच येणार नाही, हा केवढा मोठा संदेश या हॉटेल-रेस्टॉरंट्सनी त्यांच्या या कृतीमधून दिला आहे. मात्र, एखाद्या कुटुंबात काही कारणानं स्त्री नसेल, तर त्या उर्वरित पुरूष कुटुंबाला ही हॉटेल कुटुंबाचा दर्जा देणारच नाहीत का? त्यांना फॅमिली म्हणून स्वीकारणारच नाहीत का? हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला.
पूर्वीच्या काळी मुळात कोणी हाटेलात जात नसे. एक तर पैशाच्या काटकसरीची सवय आणि हॉटेलात जाऊन खाणे म्हणजे पैशाचा माज आणि उधळपट्टी, अशी असलेली एक ठाम समजूत. पण काळ बदलला तसा कधी गरज म्हणून तर कधी खास प्रसंग साजरे करण्यासाठी क्वचित हॉटेलात जाण्यास कुटुंबाला मुभा मिळू लागली. मग अशा कधीतरी बाहेर पडलेल्या आणि कधीतरीच हॉटेलात आलेल्या कुटुंबाला थोडेसे मोकळेपण आणि काहीशी प्रायव्हसी म्हणून हॉटेलांनी त्यांच्या एका भिंतीला पार्टीशने घालून, पडदे लावून फॅमिली रुमची सुविधा निर्माण केली. तेव्हाच्या काळात ती सोय होती. पुढच्या काळात या सोयीचा, प्रायव्हसीचा आधार घेऊन गैरप्रकार करण्याचे प्रकारही सुरू झाले. पण, ते अपवाद आणि तसली कुप्रसिद्ध हॉटेले वगळता फॅमिली रुम ही खरेच एक चांगली सोय होती. आताच्या हर दिन दिवाली.. म्हणून साजरा करण्याच्या कालखंडात हॉटेल ही बाब नवीन राहिलेली नाही; तर अगदी नित्याची झाली आहे. उलट, मॉल, मल्टिप्लेक्स आणि मल्टीस्टार (तीन तारांकित आणि पुढची) हॉटेल या तीन ठिकाणी भेट देणारे लोक हे गरज म्हणून कमी आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरविण्यासाठी अधिक जात असल्याचे तिथे गेल्यानंतर सहजी लक्षात येते. आताशा मोठ्या हॉटेलांमधून फॅमिली रुम बऱ्यापैकी हद्दपार झाल्या आहेत. त्याला आता मल्टिक्युझीन रेस्टो-बारचे स्वरुप आलेले आहे. कोठेही पडदे नाहीत की पार्टीशन. पाठीला पाठ लावून असलेल्या टेबल खुर्च्यांवर बसलेल्या या लोकांमध्ये एक अप्रत्यक्ष पडदा असतोच- परस्परांच्या स्टेटसबद्दल परस्परांच्या मनातील उच्चनीचपणाच्या भावनेचा! प्रत्येकजण आपापल्या टेबलवर बसून कॉकटेल-मॉकटेलचे घुटके आपल्या फॅमिलीसहित एन्जॉय करताना दिसतो. इतर जगाशी (म्हणजे शेजारच्या अगर मागच्या टेबलवरील फॅमिलीशी) त्यांना काहीएक देणे नसते.
त्या ढाब्याच्या फ्यामिली रुमच्या चर्चेच्या निमित्ताने, आजच्या काळात आता गे, लेस्बियन अगर ट्रान्सजेंडर व्यक्ती हॉटेलमध्ये आल्या, तर त्यांच्याबाबत ही हॉटेल्स काय भूमिका घेतील? लेस्बियनांना मिळेल फॅमिली रुम; पण गे अगर ट्रान्सजेंडर्सचं काय? त्यांच्याबद्दल ही हॉटेल सहानुभूतीनं विचार करणार की नाही? त्यांचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तीमत्त्व आणि प्रायव्हसीची गरज मान्य करणार की नाही? अशा अनेक मुद्यांना आम्ही स्पर्श केला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा अचानक स्ट्राईक झाला, तो म्हणजे भारतीय समाजाच्या स्त्रियांबाबतच्या दांभिक मानसिकतेचा! एकीकडे स्त्रीशिवाय कुटुंब अपूर्ण असल्याची भावना निर्माण करीत असताना दुसरीकडे त्या कुटुंबात मात्र प्रत्यक्षात तिचे स्थान काय आणि कसे असते, ते कसे असायला हवे, याबाबत मात्र आपला समाज सातत्याने मौन बाळगून असतो. स्त्री ही आज कितीही सबला, सक्षम वगैरे झाल्याचे ढिंढोरे आपण पिटत असलो तरी आपल्या दृष्टीने तिचे कमोडिटीपण, तिची उपभोग्यता आपण हरघडी, हरक्षणी अधोरेखित करीत असतो. माध्यमांतल्या जाहिरातींपासून ते प्रत्यक्ष पदोपदी तिच्या शरीरावर सुरू असलेला नजरांचा बलात्कार आणि यातून तिच्यावर गुदरणारा विनयभंगाचा आणि बलात्काराचा प्रसंग अशा अनेकांगांनी समाज, समाजातील घटक तिचे शोषण करीत असतात. घराबाहेर ही परिस्थिती तर घरातही कौटुंबिक स्थान दुय्यमच. ज्या घरात अगदी पुरूषच नाही, अशाच वेळी फक्त कर्तेपणा स्त्री आपल्याकडे घेते. खंबीरपणे घर चालविते. मुलांना चांगलं शिकवून सवरुन मोठं करते, कमवतं करते आणि मग एका क्षणी तिचा मोठा झालेला मुलगा केवळ पुरूषीपणाच्या बळावर तिचं दुय्यमत्व पुन्हा तिच्या पदरात टाकतो.
एक गोष्ट आपण मान्य करायला हवी की, स्त्रीशिवाय खरोखरीच आपण, आपलं कुटुंब अपूर्ण असतो. कुटुंबाचं पूर्णत्व म्हणजे स्त्री आहे; मात्र, त्या पूर्णत्वाला खऱ्या अर्थानं संपूर्णत्व बहाल करण्यात मात्र आपण व्यवस्था म्हणून खूपच कमी पडलो आहोत, पडतो आहोत, याचा आपण कधी तरी विचार करणार की नाही? हॉटेलवाला पोऱ्या भलेही अजाणतेपणी या पूर्णत्वाचा आग्रह धरत असेल; आपण तो जाणतेपणाने धरायला काय हरकत आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा