रविवार, ३० जून, २०१९

शाहू- आंबेडकर स्नेहबंध: मर्मबंधातली ठेव

माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज. (हे छायाचित्र प्रतिकात्मक आहे, अस्सल नाही.)

(राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने सन्मित्र प्रकाश लिंगनूरकर यांच्या साप्ताहिक 'वार्ता-सम्राट'च्या  दि. २६ जून २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या विशेषांकासाठी लिहीलेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.)

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर ही त्रयी म्हणजे या देशामध्ये समता प्रस्थापनेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. फुले आणि राजर्षींची भेट झालेली नसली तरी त्यांच्या सत्यशोधकी कार्याचा वसा आणि वारसा मात्र महाराजांनी अत्यंत सजगपणे पुढे चालविला. मात्र, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या उभय नेत्यांच्या परस्पर स्नेहभावाचा मी चाहता आहे. या दोघांच्या मोजक्या गाठीभेटी आणि त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार यातून त्यांच्या स्नेहबंधाची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही. त्याचप्रमाणे यंदा माणगाव परिषदेचा शतकमहोत्सव साजरा केला जात असताना राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहबंधांना उजाळा मिळणे, ही एक स्वाभाविक बाब आहे. राजर्षींच्या अकाली जाण्याने बाबासाहेबांचा प्रचंड मोठा आधार नाहीसा झाला तरी राजर्षींचे कार्य पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून देशभरात चिरंतन करण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले.
बडोदा संस्थानच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने विलायतेतील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतलेल्या बाबासाहेबांनी तो पूर्ण करण्यासाठी पुंजी साठवावी म्हणून सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकी पत्करली होती. शिक्षण पूर्ण केल्याखेरीज सामाजिक अगर राजकीय जीवनात प्रविष्ट न होण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र, साऊथबरो कमिशनसमोर अस्पृश्यांच्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या संबंधाने जर बाजू मांडली नाही, तर या समाजाचे घोर नुकसान होण्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले. त्यातून त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये द महार या नावाने त्यांची बाजू मांडणारा लेख लिहीला. त्याचप्रमाणे थेट व्हॉइसरॉय कार्यालयाशी पत्रव्यवहार करून कमिशनसमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपली निवड करवून घेतली. बाबासाहेबांचा टाइम्स ऑफ इंडियामधील लेख राजर्षींच्या वाचनात आलेला होता. त्या लेखाने ते प्रभावितही झालेले होते. आपले विश्वासू दत्तोबा पोवार यांच्याकडून त्यांनी बाबासाहेबांची माहिती मिळविली. महार समाजातील एक युवक विलायतेला जाऊन उच्चविद्याविभूषित होतो, ही बाबच मुळी राजर्षींना अभिमानास्पद वाटली. आपण अंगिकारलेल्या कार्याला अशीच फळे येण्याची स्वप्ने ते पाहात असत. दत्तोबांना सांगून त्यांनी बाबासाहेबांना भेटीला बोलावले. तोपर्यंत भारतातील संस्थानिकांबद्दल, त्यांच्या लहरी वर्तणुकीबद्दल बाबासाहेबांच्या मनात एक प्रकारची अढी होती. मात्र, राजर्षींच्या पहिल्या भेटीतच ती गळून पडली. परळच्या चाळीत आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांच्या या भेटी झाल्या. अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी बाबासाहेबांना वृत्तपत्राची निकड जाणवू लागलेली होती. ती त्यांनी राजर्षींना बोलून दाखविली. त्यांचा हा विचार पसंत पडून राजर्षींनी लगोलग त्यांना अडीच हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. राजर्षींच्या या मदतीमधूनच ३१ जानेवारी १९२० पासून मूकनायक प्रकाशित होण्यास सुरवात झाली. सरकारी नोकरीत असल्याने बाबासाहेबांचे त्यावर नाव नव्हते. पांडुरंग भटकर यांचे नाव संपादक म्हणून लागले. मात्र, अग्रलेखासह बहुतांश लेखन बाबासाहेबच करीत असत.
याच वेळी कागल संस्थानातल्या माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरविण्याचे नियोजन दत्तोबा पोवारांसह निंगाप्पा ऐदाळे वगैरे मंडळी करीत होती. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांना निमंत्रण देण्यात आले. २० व २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे झालेली ही परिषद अनेकार्थांनी ऐतिहासिक स्वरुपाची ठरली. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या या पहिल्या परिषदेस राजर्षींची उपस्थिती आणि त्यांचे भाषण फार महत्त्वपूर्ण ठरले. शिकारीहून परत जाता जाता या परिषदेस उपस्थित राहात असल्याचे राजर्षींनी दर्शविले असले, तरी त्यामागे त्यांचे धोरणीपण अधोरेखित होते. अस्पृश्य समाजाला आंबेडकरांच्या रुपाने त्यांच्यातीलच नेता लाभला असून भविष्यात ते या देशाचे पुढारी होतील, असे भाकितच राजर्षींनी वर्तविले. त्याचबरोबर परिषदेनंतर त्यांना रजपूतवाडीच्या कँपवर भोजनाचे निमंत्रणही दिले. या परिषदेत झालेल्या इतर ठरावांबरोबरच शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचा ठरावही करण्यात आला.
माणगाव परिषदेनंतर दोनच महिन्यांत नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षींनी स्वीकारले. माणगाव परिषद ही जणू या नागपूर परिषदेची बीजपरिषद होती. आक्कासाहेबांची प्रकृती खालावल्यामुळे या परिषदेला राजर्षी उपस्थित राहतील की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना पाठविलेले पत्र हृदयास भिडणारे आहे. या पत्रात बाबासाहेबांनी म्हटले की, नागपूरच्या परिषदेस हुजुरांचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होणे अटळ आहे. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी आपला आधार व टेकू नाही मिळाला, तर काय उपयोग. घरी अपत्य आजारी असताना आपणास सभेस गळ घालणे हे कठोरपणाचेच लक्षण. पण काय करावे? आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हे काय? आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे? आम्ही कालपर्यंत किती आजारी आहोत, हे आपणास सांगायला नको. आमचा परामर्ष यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाही तर आपल्यावर बोल नाही, रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की, अन्य सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान मंडित करून या आपल्या लडिवाळ अस्पृश्य लेकास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्यांची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढणे अशक्य होईल. बाबासाहेबांचे हे शब्द वाचून राजर्षींच्या हृदयाला पाझर फुटला नसता तरच नवल. ते नागपूर परिषदेला उपस्थित राहिले आणि त्यांनी देशभरातून आलेल्या अस्पृश्य बांधवांना प्रेमभराने संबोधितही केले. श्रीपतराव शिंदे यांनी महाराजांचे भाषण वाचून दाखविले. त्यात महाराजांनी जातिनिर्मूलनामध्ये शिक्षण, रोटीव्यवहार आणि बेटीव्यवहाराचे महत्त्व सांगितले. त्याशिवाय जातिनिर्मूलनाचे आणखी एक महत्त्वाचे सूत्र सांगताना महाराज म्हणतात की, लग्नकार्यात निरर्थक पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षणासारख्या उपयुक्त कामाकडे तो लागला पाहिजे. ज्याप्रमाणे जपानमधील उच्चवर्णीय सामुराई यांनी पुढाकार घेऊन जसा तेथील जातिभेद संपवला, त्याचप्रमाणे येथील उच्चवर्णीयांची जातिभेद निर्मूलनातली भूमिका महत्त्वाची आहे. खालील जातींनी आपली सुधारणा करून, दर्जा वाढवून घेण्याचा व वरील पायऱ्यांवर चढण्याचा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. आणि वरील जातींनीही जरुर तर काही पायऱ्या खाली येऊन त्यांना हात देऊन वर घेतले पाहिजे. असे झाले म्हणजे सुरळीतपणे व सलोख्याने हे जातिभेद मोडण्याचे बिकट काम सिद्धीस जाण्याचा संभव आहे. आम्हासारख्या मराठ्यांना सुद्धा जात मोडून एकी करण्यास भाग पाडले पाहिजे, अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. या परिषदेतही महाराजांचा जन्मदिन उत्सवासारखा साजरा करण्याचा ठराव झाला.
याच कालावधीत बाबासाहेबांनी राजर्षींना लिहीलेल्या एका पत्रात २६ जूनचा आपला वाढदिवस सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मूकनायकचा विशेषांक प्रकाशित करण्याचा मानस आहे. असे महाराजांना कळविले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे दरबारकडून उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही केली होती. बाबासाहेबांचे हे पत्र म्हणजे राजर्षींच्या जन्मतारखेचा एक अस्सल पुरावा आहे, यात शंका नाही.
नागपूर परिषदेनंतर बाबासाहेब महाराजांच्या मदतीनेच उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. यावेळी माझी भगिनी रमाबाईला मी कोल्हापूरला तिच्या माहेरी घेऊन जातो, असे भावोद्गार महाराजांनी काढले होते. बाबासाहेबांना त्यांनी त्यांचे मित्र सर अल्फ्रेड पीज यांच्यासाठी बाबासाहेबांचा गौरवपूर्ण परिचय करून देणारे व गरज भासल्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले होते.
बाबासाहेब तिकडे असताना इकडे टिळकांनी महार ही गुन्हेगार जमात असल्याचे उद्गार काढले होते. त्याचप्रमाणे त्यांनी जमविलेल्या सार्वजनिक फंडातील गैरव्यवहाराचे प्रकरणही त्यावेळी चर्चेत आले होते. या दोन प्रकरणांमध्ये टिळकांवर दिवाणी अगर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करता येईल का, याविषयी इंग्लंडमधील मे. लिटल् आणि कंपनीकडे चौकशी करावी, असे पत्रही राजर्षींनी बाबासाहेबांना लिहीले होते. त्यावर अशा खटल्यातून त्रासाखेरीज काहीच निष्पन्न होणार नाही, असे बाबासाहेबांनी महाराजांना कळविले. त्यावर, महाराज पुन्हा त्यांना पत्र पाठवून सांगतात की, अशी केस दाखल करा. बाकी काही नाही झाले तरी, त्यामुळे ही केस कोणी दाखल केली, याची चर्चा होईल आणि तुम्ही साऱ्या इंग्लंडास माहिती व्हाल.
बाबासाहेब इंग्लंडमधील घडामोडींची फर्स्ट हँड माहिती पत्राद्वारे महाराजांना अवगत करीत असत. माँटेग्यू यांच्याशी झालेल्या भेटी आणि त्यातून मुंबई प्रांतिक विधिमंडळात त्यांनी दिलेली सदस्यपदाची ऑफर याविषयीही बाबासाहेब कळवितात. इंग्लंडमधील मजूर पक्षाशीही संवाद प्रस्थापित करीत असल्याचे त्यांनी कळविल्याचे दिसते.
४ सप्टेंबर १९२१चे बाबासाहेबांनी महाराजांना पाठविलेले पत्रही असेच हृदयाला भिडणारे आहे. या पत्रात त्यांनी महाराजांकडे दोनशे पौंडांच्या कर्जाची मागणी केली आहे. चलनाचे दर वाढल्यामुळे माझी लॉ ची फी १०० पौंड आणि भारतात परतण्यासाठी म्हणून १०० पौंड असे दोनशे पौंडांचे कर्ज द्यावे. ते परतल्यानंतर व्याजासह परतफेड करेन, असे बाबासाहेब कळवितात. याच पत्राच्या अखेरीस तुमची आम्हाला नितांत गरज आहे. कारण भारतात उदयास येऊ घातलेल्या सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण महान आधारस्तंभ (Pillar of the great movement towards social democracy)आहात, असे गौरवोद्गार बाबासाहेबांनी काढले आहेत. राजर्षींच्या समग्र कार्याचे एका वाक्यात यथोचित मूल्यमापन करणारे असे हे बाबासाहेबांचे उद्गार आहेत.
६ मे १९२२ रोजी महाराजांचे निधन झाल्याची वार्ता समजताच बाबासाहेबांचे हृदय विदीर्ण झाले. अत्यंत दुःखी आणि उद्विग्नावस्थेत त्यांनी राजाराम महाराजांना सांत्वनाची तार पाठविली. त्यामध्ये महाराजांच्या निधनाने व्यक्तीगत पातळीवर माझी अपरिमित हानी झाली आहेच, पण अस्पृश्य समाजाने आपला महान तारणहार गमावला, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.
महाराजांच्या निधनानंतरही राजाराम महाराज, कोल्हापूर संस्थान यांच्याशी बाबासाहेबांचा स्नेह राहिला, तरी शाहू महाराजांइतकी जवळीक मात्र त्यात प्रस्थापित होऊ शकली नव्हती. महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूर दरबारच्या दिवाणांना आर्थिक मदतीची विनंती करण्यासाठी लिहीलेल्या पत्रात बाबासाहेब लिहीतात की, शाहू महाराज हयात असते तर आपल्याकडे मदतीसाठी याचना करण्याची वेळ आली नसती. पण, आपले नवीन महाराजही शाहू महाराजांसारखेच कृपाळू आहेत. त्यामुळे आमची निकड त्यांच्या कानी घालून काही मदत देता आली, तर पाहावे, असे बाबासाहेब लिहीतात. महाराजांच्या जाण्याने हा फरक निश्चितपणे पडला होता. बाबासाहेबांचा अर्धपुतळा त्यांच्या हयातीमध्येच कोल्हापूरच्या बिंदू चौकात बसविण्यात आला, हा नगरीने त्यांच्या कार्याला केलेला मानाचा मुजरा आहे.
बाबासाहेब महाराजांना माय डियर महाराजासाहेब असे संबोधन लिहीत, तर महाराज त्यांना माय डियर डॉ. आंबेडकर असे लिहीत. एका पत्रात मात्र महाराजांनी बाबासाहेबांना लोकमान्य डॉ. आंबेडकर असे संबोधले आहे. महाराजांच्या लेखी डॉ. आंबेडकर हे सच्चे लोकमान्य व्यक्तीमत्त्व होते. पुढे बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराजांना अभिप्रेत असणारे आपले लोकमान्यत्व सिद्ध केले.

(लेखक फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे अभ्यासक आहेत.)

1 टिप्पणी:

  1. लेख चांगला आहे. राजर्षी शाहू छत्रपती यांनी बाबासाहेबांना लोकमान्य हे संबोधन वापरणे ही अतिशय महत्त्वाचे होते.

    उत्तर द्याहटवा