गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

'धम्म'दीपंकर!



दि. ६ डिसेंबर १९९५! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३९ वा महापरिनिर्वाण दिन! याच दिवशी कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि विजापूर अशा सीमाभागातील बौद्ध जनतेने आपले आणखी एक मायेचे छत्र गमावले, ते म्हणजे भन्ते दीपंकर! उद्या (दि. ६ डिसेंबर २०१९) त्यांच्या निर्वाणाला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. भन्तेजींच्या कार्याचा, विशेषतः त्यांच्या संस्कारांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. भन्तेजींनी स्वीकारलेला बौद्ध धम्म प्रसाराचा महान वसा आणि प्रदान केलेला वारसा यांचा हा संक्षिप्त मागोवा!


भन्ते दीपंकर यांचे मूळ नाव लिंगाप्पा थरकार. त्यांचा जन्म चिकोडी तालुक्यातील (कर्नाटक) खडकलाट या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. कष्टकरी आईवडील त्यांना केवळ दुसऱ्या इयत्तेपर्यंतचेच शिक्षण देऊ शकले. त्यानंतर लिंगाप्पा यांनी आपल्या घरच्या आणि शेताच्या कामाला हातभार लावण्यास सुरवात केली. कालांतराने घरच्या लोकांनी त्यांना लग्नाच्या बेडीतही अडकवले. त्यांना दोन मुलंही झाली. इथंपर्यंतचं त्यांचं जीवन एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणेच होतं. आपल्या हातून महान धम्मकार्य घडावयाचे आहे, याची त्यावेळी त्यांनाही कल्पना नसेल, आणि —
लिंगाप्पांच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग आला. १९५२ साली निपाणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी लिंगाप्पांचे वय साधारण पंचवीसेक असेल. ऐन तारुण्याचा काळ.. कोणत्याही ध्येयाप्रती स्वतःला समर्पित करण्याचे वय.. बाबासाहेबांच्या प्रखर व्यक्तिमत्त्वाची छाप या गरीब शेतकऱ्याच्या मनावर उमटली. विशेषतः त्यांच्या जातिअंत आणि बौद्ध धम्माविषयीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धम्मच असला पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या गोष्टी जगाच्या उद्धारासाठी आवश्यक असतील, तर त्या बौद्ध धम्मातच सापडतील. बौद्ध धम्म हा जागतिक ऐक्याचा असा एकमेवाद्वितिय धम्म आहे. हा धम्म नव्या जगाला साजेसा असून तो इहलोकीच मनुष्यमात्रांस मुक्त करण्यास सर्वतोपरी समर्थ आहे. बाबासाहेबांचे हे आणि असेच विचार लिंगाप्पांच्या मनात रुंजी घालू लागले. त्या अवस्थेतच ते सभेहून घरी परतले. याच विचारांचा त्यांच्या मनाने ध्यास घेतला.
एका बाजूला संसार तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण समाज. त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं. पण एका क्षणी कुटुंबापेक्षा समाजोद्धाराचे कार्यच महत्त्वाचे, असा कौल त्यांच्या मनानं दिला आणि संसारातून हळूहळू लक्ष काढून घेण्यास त्यांनी सुरवात केली. ही गोष्ट सहजी शक्य नव्हती, पण संसारातून विरक्ती घेण्यात ते यशस्वी ठरले. आता त्यांना आवश्यकता होती, ती योग्य मार्गदर्शकाची! योगायोगानं त्यांची भेट निपाणीच्याच ॲड. दत्ता कट्टी यांच्याशी झाली. कट्टींच्याच मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगलीतील बौद्ध धम्माचे निष्ठावान उपासक एकनाथ दादू ऊर्फ ए.दा. कांबळे (गुरूजी) यांची भेट घेतली. गुरूजींच्या पहिल्या भेटीतच लिंगाप्पांनी त्यांना गुरू मानले. लिंगाप्पांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करून, त्यांनी स्वीकारलेल्या मार्गातील अडीअडचणी सांगितल्यानंतरही त्यांच्या मनाची तयारी पाहून गुरूजींनी त्यांची रवानगी बुद्धगयेला केली. १९७३-७४ साली त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि भिक्षू बनून धम्मप्रसार करण्याचे कठीण व्रत स्वीकारले. सहा महिने बुद्धगयेतच राहून त्यांनी बौद्ध धम्मविषयक विविध ग्रंथांचा अभ्यास केला. अनेक भिक्षूंचे मार्गदर्शन घेतले. आणि अखेरीस गयेच्या बुद्धविहारात शिरलेले लिंगाप्पा थरकार भन्ते दीपंकर होऊनच बाहेर पडले. मुंबई येथील भिक्खू संघाचेही त्यांनी मार्गदर्शन घेतले. तेथून ते सांगलीला गुरूंकडे परतले. ज्या ठिकाणी धम्माबद्दलची कल्पना बाबासाहेबांनी आपल्या मनी रुजविली, त्या निपाणी परिसरातील गावांमध्ये धम्मप्रचार व प्रसार करण्याचा मनोदय भन्तेंनी गुरूजींना बोलून दाखविला. गुरूजींच्या संमतीने त्यांनी आपल्या धम्मकार्याला प्रारंभ केला. कोणत्याही ठिकाणी जास्तीत जास्त दोन रात्रींपेक्षा अधिक मुक्काम न करता त्यांनी निपाणी, मिरज, शिरोळ, करवीर, कागल, राधानगरी, चिकोडी, बेळगाव, विजापूर, खानापूर, धारवाड, हुबळी, गडहिंग्लज, गारगोटी इत्यादी तालुके आणि त्यांमधील अनेक गावांमधून त्यांनी प्रवचने दिली. आपल्या अभ्यासातून त्यांनी मराठी, हिंदी, कन्नड भाषांवर प्रभुत्व मिळविले होते. कोणतेही विधान सोदाहरण पटवून देण्याची हातोटी त्यांना लाभली होती. विविध दाखले देऊन आपले म्हणणे ते लोकांच्या मनांवर बिंबवत असत. पण आपले म्हणणे इतरांवर लादण्याची सक्ती त्यांनी कधीही केली नाही. त्यांच्या शांत, संयमी आणि मृदू स्वभावामुळे लोकांनाही त्यांचे व्यक्तिमत्त्व आवडू लागले. बुद्ध आणि त्याचा धम्म यांच्याविषयी यत्किंचितही माहिती नसलेल्या आणि मागासलेल्या विचारसरणीच्या लोकांमध्ये हळूहळू जागृती होऊ लागली. लोक आपणहून भन्तेंना आपल्या गावी येण्याचे निमंत्रण देऊ लागले. लोकांचा हा प्रतिसाद पाहून भन्तेही सुखावले. त्यांचा हुरूप वाढला. बौद्ध धम्म प्रसारासाठी एखादे कायमस्वरुपी स्मारक, व भिक्खू निवासासाठी विहार उभा करावा, असे त्यांच्या मनी आले. विहार उभारण्यासाठी भन्तेंनी आपले मूळ गाव- खडकलाटचीच निवड केली. त्यांचा हा विचार उपासकांनीही उचलून धरला. भन्तेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्यामध्ये उपासकांनी मोठा वाटा उचलला. भन्तेनी उपासकांच्या आग्रहाखातर मूर्ती प्रतिष्ठापना आणि विहाराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. बुद्ध वंदना, परित्राण पाठाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. भगवान बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता करण्याचे ठरले होते. त्यानुसार मिरवणूक झाली. पण, मिरवणुकीच्या दरम्यान, भन्तेना अपमानास्पद वाटतील, अशा काही घटना, गोंधळ काही हितशत्रूंनी घडविला. इतर ठिकाणचे उपासक आपला योग्य तो मान राखत असताना स्वतःच्या गावकऱ्यांकडून घडलेल्या त्या प्रसंगानं भन्तेंच्या मनाला खूप वेदना झाल्या. त्याच क्षणी त्यांनी मनात एक निर्धार केला. ती संपूर्ण रात्र भन्ते नव-विहारात समाधी लावून बसले. दुसऱ्या दिवशी पहाटे बुद्ध मूर्तीसमोर वंदना घेऊन ते विहाराबाहेर पडले. विहाराकडे पाठ न करता हात जोडूनच गावच्या वेशीबाहेर आले. अखेरचा प्रणाम करून त्यांनी गावाकडं पाठ फिरवली, ती कायमचीच! ते पुन्हा कधीही गावी गेले नाहीत.
पुन्हा त्यांनी धम्मकार्याला जोमानं सुरवात केली. धम्म परिषदा, धम्मदेसना, धम्मोपदेश असे कार्यक्रम त्यांनी सातत्यपूर्ण रितीने घडवून आणले. सरवडे (ता. राधानगरी), एकसंबा (ता. चिकोडी) तसेच जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील उपासकांनी वर्षावासासाठी भन्तेंना विहार उपलब्ध करून दिले, ही भन्तेजींच्या कार्याची मोठी पोचपावती होती. भन्तेंनी आपले कार्य उत्साहाने पुढे सुरू ठेवले.
जयसिंगपूर येथील १९९५चा वर्षावास त्यांचा अखेरचाच ठरला. आपल्या अखेरच्या क्षणी आपले समस्त उपासक उपस्थित असावेत, अशी इच्छा त्यांनी वारंवार बोलून दाखविली होती. ६ डिसेंबर १९९५ रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी जयसिंगपूर येथे धम्म परिषद भरविण्याचे ठरले होते. ठिकठिकाणच्या उपासकांना निमंत्रणेही पाठवण्यात आली होती. या दिवशीच भन्ते दीपंकर यांना मोक्षप्राप्ती झाली. अत्यंत ध्येयनिष्ठेने स्वीकारलेले आपले जिवितकार्य पूर्ण करून भन्ते गेले. ज्या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वानं आणि वाणीनं भारावून जाऊन भन्तेंनी धम्मप्रसाराचे अपूर्व काम केले, त्यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनीच निर्वाणास जावे, हा मला निव्वळ योगायोग वाटत नाही.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा