शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

संस्कृतप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 



 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्त्वाचे, विद्वत्तेचे अनेकानेक पैलू आहेत. या पैलूंकडे अद्यापही आपले म्हणावे तितकेसे लक्ष गेल्याचे दिसत नाही. बाबासाहेबांना विद्यार्थीदशेत गीर्वाणवाणी असलेली संस्कृत भाषा शिकविण्यास शिक्षकाने नकार दिला होता. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव पर्शियन भाषा शिकावी लागली. पुढे आयुष्यात त्यांनी अत्यंत परिश्रमाने संस्कृत भाषा अवगत केलीच, पण, त्याचबरोबर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषांवरही प्रभुत्व प्राप्त केले. मराठी, हिंदी, गुजराती तर त्यांना अवगत होत्याच. प्रस्तुत लेखात बाबासाहेबांच्या संस्कृतप्रेमाविषयी विवेचन करण्याचा मानस आहे.

दि. १९ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेत तत्कालीन परराष्ट्र मंत्री डॉ. बी.व्ही. केसकर, नजिरुद्दीन अहमद यांनी संस्कृत राष्ट्रभाषा करण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला होता. त्याला कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सुमारे १५ सदस्यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामध्ये टी. टी. कृष्णम्माचारी (मद्रास), जी. एस. गुहा (त्रिपुरा- मणिपूर आणि खासी राज्य), सी. एम. पूनाचा (कूडग), व्ही. रामैया (पुदुकोट्टै), व्ही. आय. मुनिस्वामी पिल्ले (मद्रास), कल्लूर सुब्बा राव (मद्रास), व्ही. सी. केशव राव (मद्रास), डी. गोविंद दास (मद्रास), पी. सुब्बारायन (मद्रास), डॉ. व्ही. सुब्रमण्यम (मद्रास) आणि दाक्षायनी वेलायुधन (मद्रास) यांचा समावेश होता.


त्या काळात संविधान सभेत राष्ट्रभाषा हिंदी की हिंदुस्थानी, याभोवती चर्चा केंद्रित झालेली होती. वादविवादाच्या फैरी झडत होत्या. या पार्श्वभूमीवर संस्कृतचा प्रस्ताव दाखल होणे आणि त्याला बाबासाहेबांनी पाठिंबा दर्शविणे, ही अनेकांसाठी आश्चर्याची बाब होती. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (पीटीआय) प्रतिनिधीने त्यांना या संदर्भात छेडलेही. त्यावर बाबासाहेबांनी त्यालाच उलट विचारले होते की, व्हॉट इज राँग विथ संस्कृत?” (संस्कृत राष्ट्रभाषा होण्यात गैर काय?) बाबासाहेबांच्या या प्रश्नाचीच दुसऱ्या दिवशी देशभरात बातमी झाली. दि हिंदू, दि टाइम्स ऑफ इंडिया, नॅशनल हेराल्ड, दि स्टेट्समन यांनी ठळकपणाने या बातम्या छापल्या. १५ सप्टेंबर १९४९च्या हिंदुस्थानमध्ये तर हा ठराव सादर होत असताना पंडित लक्ष्मीकांत मैत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांशी संस्कृतमधून संवाद साधताना दिसले, अशी चौकट छापली.

बाबासाहेबांची पूर्वपिठिका ज्यांना माहिती असेल, त्यांना हेही माहिती असेल की, त्यांचे वडील रामजी सकपाळ यांची, बाबासाहेबांनी संस्कृत शिकावे, अशी तीव्र इच्छा होती. मात्र, संस्कृतच्या मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकविणार नाही, असा हट्ट धरल्याने त्यांना निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले.

संस्कृत भाषेविषयी बाबासाहेबांच्या मनातील भावना त्यांनी त्यांच्या चरित्रात शब्दबद्ध केल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात, मी जेव्हा चौथ्या इयत्तेत आलो, तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मला भोवणार, हे नक्की असल्यामुळे मला निरुपायाने पर्शियन भाषेकडे धाव घेणे भाग पडले. मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे आणि मला ती चांगली यावी, अशी माझी अजूनही इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू-समजू शकतो. नाही, असे नाही. पण, त्या भाषेत पारंगत व्हावे, अशी माझ्या अंतःकरणाची तळमळ आहे. तो सुदिन उगवेल तेव्हा खरा!

मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला व मला शंभरापैकी ९०-९५ मार्क मिळत असले तरी, हे कबूल करायला हवे की, संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे. संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्यमीमांसा आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये आहेत. तत्त्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, गणित आहे. आधुनिक विद्येच्या दृष्टीने पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे. पर्शियन वाङ्मयात मात्र तशी स्थिती नाही. संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी, याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असताही शिक्षकाच्या कोत्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टीकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले. असे तळमळीचे उद्गार बाबासाहेबांनी काढले आहेत.

बाबासाहेब जरी म्हणत असले की ते संस्कृतमध्ये पारंगत नाहीत; मात्र, प्रत्यक्षात मनुस्मृती, वेदांचा, रामायण-महाभारताचा चिकित्सक अभ्यास करून त्यांचा अर्थ लावण्याइतका आणि संवाद साधण्याइतका या भाषेचा त्यांचा व्यासंग होता.

मनुस्मृतीच्या वाचनाने तर त्यांच्या अंगाचा तीळपापड झालेला होता. शूद्र आणि स्त्रिया यांना जनावराहूनही वाईट अशा ज्या हीनतेची वागणूक देण्यास मनुस्मृती सांगते, ती वाचून कोणत्याही सहृदय माणसाला यातना झाल्याखेरीज राहात नाहीत.

पिता रक्षते कौमारे, भर्ता रक्षति यौवने।

पुत्रस्तु स्यीवरे भावे, न स्त्री स्वातंत्र्यमर्हती।।

असे म्हणत स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाकारणारी आणि सातत्याने त्यांच्या शीलरक्षणाबाबत संशय घेणारी तसेच शूद्रातिशूद्रांना तर माणूसपणाचे, समानतेचे हरेक प्रकारचे हक्क नाकारणारी मनुस्मृती भारतीय जातिव्यवस्थेच्या पायाशी असल्याची बाब लक्षात आल्यानंतरच बाबासाहेबांनी आपल्या चळवळीची सुरवात १९२७मध्ये मनुस्मृतीच्या दहनाने केली. गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे या बाबासाहेबांच्या चित्पावन ब्राह्मण सहकाऱ्यानेच मनुस्मृती दहनाचा ठराव मांडला आणि सत्यशोधक साधूंकरवी त्यांनी हे दहन करविले.

बाबासाहेबांनी महाभारताचाही किती चिकित्सक अभ्यास केला होता, याचे आणखी एक उदाहरण देणे अतिशय अगत्याचे व प्रस्तुत आहे. बाबासाहेबांनी भारतीय जातिव्यवस्थेचा सर्वंकष वेध घेत असताना त्यांच्या हयातीत चार महत्त्वाचे ग्रंथ लिहीले. कास्ट्स इन इंडिया: देअर जेनेसिकॉस, मॅकेनिझम अँड डेव्हलपमेंट (भारतीय जाती: त्यांची व्युत्पत्ती, रचना आणि विकास) या आद्य शोधनिबंधासह जातिनिर्मूलन’ (अॅनिहिलेशन ऑफ कास्ट्स), शूद्र कोण होते?’ (हू वेअर शूद्राज?) आणि अस्पृश्य मूळचे कोण? आणि ते अस्पृश्य का बनले?’ (अनटचेबल्स: हू दे वेअर? व्हाय दे बिकेम अनटचेबल्स?) हे ते चार ग्रंथ होत.


यातल्या
शूद्र कोण होते?’ या ग्रंथात बाबासाहेबांनी चातुर्वर्णातील अंतिम वर्ण असलेल्या शूद्रांच्या अस्तित्वाचा सर्वंकष मागोवा घेतलेला आहे. शूद्र हे पूर्वाश्रमीचे क्षत्रिय असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचताना ते दुसऱ्या वर्णापासून चौथ्या वर्णापर्यंत अवनत का झाले, याचा शोधही बाबासाहेब घेतात.

या ग्रंथातील बाबासाहेबांचे निष्कर्ष असे आहेत-

१.      सूर्यवंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या, त्यातील एका जमातीचे नाव शूद्र होते.

२.      एक काळ असा होता की, ज्यावेळी आर्य समाज फक्त तीन वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मानत होता.

३.      शूद्रांचा स्वतंत्र असा वर्ण नव्हता. हिंदी आर्य समाजातील क्षत्रिय वर्णाचा एक भाग, असा शूद्रांचा दर्जा होता.

४.     शूद्र राजे आणि ब्राह्मण यांच्यात एकसारखे झगडे चालू असत. या झगड्यांमुळे ब्राह्मणांवर अनेक अत्याचार आणि अपमानास्पद दुराचार करण्यात आले होते.

५.     शूद्रांनी आपल्यावर अत्याचार व जुलूम केले, ही जाणीव ब्राह्मणांच्या अंतःकरणाला टोचण्या देत होती. म्हणून ब्राह्मण शूद्रांचा द्वेष करू लागले. या द्वेषामुळे शूद्रांचे उपनयन करण्याचे त्यांनी नाकारले.

६.      शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे शूद्र आपल्या मूळच्या क्षत्रिय पदापासून च्यूत झाले व सामाजिक दृष्टीने त्यांची अधोगती झाली. त्यामुळे त्यांचा दर्जा वैश्यांच्या खालचा झाला आणि या प्रमाणे त्यांचा स्वतंत्र चौथा वर्ण उत्पन्न करण्यात आला.


उपरोक्त निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुराण, वेदांतील असंख्य संस्कृत ऋचा, श्लोक व कथांचा आधार घेतला. शूद्रासंदर्भातील सर्वात महत्त्वाचा दुवा त्यांना सापडला तो महाभारतातील शांतिपर्वाच्या साठाव्या अध्यायातील सुदास ऊर्फ पैजवन नावाच्या शूद्र राजाच्या कथेमध्ये. प्राचीन काळी पैजवन नावाच्या ऐंद्राग्नी विधीप्रमाणे यज्ञ करून एक लक्ष पूर्णपात्रे दक्षिणा दिली होती, असे आपल्या ऐकिवात असल्याचे भीष्म युधिष्ठिराला सांगतात. अशी ही कथा.

या पुराव्याच्या महत्त्वाविषयी बाबासाहेबांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतच म्हटले आहे की, जर व्यासाने पैजवन शूद्र असल्याचे सांगितले नसते तर शूद्राच्या उगमाचा पुरावाच नष्ट झाला असता. मी महाभारताच्या लेखकाचा आभारी आहे. त्यांच्या या सुगाव्याविना मी हा ग्रंथ लिहू शकलो नसतो. या कथेवरुन बाबासाहेब पुढील तीन गोष्टी मांडतात.

१.      पैजवन शूद्र आहे.

२.      शूद्र पैजवन यज्ञविधी करीत आहे.

३.      ब्राह्मणांनी यज्ञविधी करून त्याच्या हस्ते दक्षिणा मिळविली आहे.

पैजवन शूद्र, आर्य व क्षत्रिय राजा असणे ही क्रांतीकारक बाब असून शूद्र हे क्षत्रिय जमातींपैकीच एकीचे विशेषनाम असल्याचे सांगून त्याचे पुरावेही ते सादर करतात.

अशा प्रकारे संस्कृतच्या अभ्यासातून बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेचा वेध अत्यंत सूक्ष्म पातळीवर घेतल्याचे दिसते.

संशोधन करीत असताना आपल्या म्हणण्यापुष्ट्यर्थ पूरक व प्रभावी पुराव्यांची जमवाजमव करणे हा अत्यंत महत्त्वाचा तसेच वेळखाऊ भाग आहे. त्याचप्रमाणे भाषेची जाण नसेल तर पुरावा डोळ्यासमोर असला तरीही त्याचा काडीमात्र उपयोग संशोधकाला होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेतली असता संस्कृतप्रचुर अशा वेद, पुराणे, उपनिषदांतील आणि महाभारतासारख्या महाप्रचंड अशा महाकाव्यातील प्रत्येक ऋचा वा श्लोकाचा अभ्यास करून आपल्या संशोधनाला पूरक पुरावे जमा करणे ही म्हणावी तितकी सहजसोपी बाब नाही. मात्र, बाबासाहेबांनी ती साध्य केली. संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व असल्याखेरीज हे शक्य होणार नाही. अर्थात, बाबासाहेबांनी आपल्याला संस्कृत भाषेचे ज्ञान अद्याप म्हणावे तितके नाही, असे प्रांजळपणाने म्हटले असले तरी संशोधनपूरक पुरावे मिळविण्याइतके महत्तम प्रभुत्व त्यांनी संस्कृतभाषेवर प्राप्त केले होते, हे मान्य करावेच लागते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा