गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

‘आकंठ’ नावाची साहित्यिक चळवळ



'आकंठ'च्या सन २०१९च्या ४०व्या दिवाळी विशेषांकाचे कलात्मक मुखपृष्ठ

रंगनाथ चोरमुले हे माझे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातले वरिष्ठ सहकारी. त्यांच्यासमवेत वृत्त शाखेसह उपमुख्यमंत्री कार्यालयात काम करता आले. त्यांचे काम खूप जवळून पाहता आले. अत्यंत ऋजू स्वभावाचे चोरमुले सर तसे मितभाषी. चेहऱ्यावर सतत एक मंद स्मित विलसणारं. वाचन दांडगं. लोकसंपर्क, त्यातून सामाजिक काम यांचा व्यापही तितकाच मोठा. राजकीय क्षेत्रातील दिलीप वळसे-पाटील यांच्यापासून ते प्रशासनातील रंगनाथ नाईकडेंसारखे एकदम रॉयल स्वभावाचे लोक स्वाभाविकपणे त्यांच्या मित्रयादीत मोठ्या संख्येनं. पण, चोरमुले सरांचं एक साहित्य-संपादक म्हणून मराठी भाषेसाठी जे योगदान आहे, ते आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मला अधोरेखित करावंसं वाटतं. चोरमुले सरांनी मराठी साहित्याला त्यांच्या आकंठ या दिवाळी अंकाच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षांत जी मेजवानी दिलेली आहे, तिचं ऋणही या निमित्तानं अधोरेखित करणं अनुचित ठरणार नाही.
मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे यंदाच्या ४५व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. किंबहुना, आज (दि. २७) सायंकाळीच दादरच्या सार्वजनिक वाचनालयात पुरस्कार वितरण समारंभही होतो आहे. त्यामध्ये आकंठला का.र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.
रंगनाथ चोरमुले
या आकंठची सुरवात चोरमुले सरांनी ४० वर्षांपूर्वी अलिबाग येथे केली. त्यानंतर हटाळे, रामानंद नगर, किर्लोस्करवाडी असा प्रवास करत करत तो लोअर परेलला येऊन २५ वर्षे स्थिरावला. पॉप्युलर प्रेसकडेच तेव्हापासून त्याची छपाई असते. आकंठ हा दिवाळी अंक शेकडो मराठी दिवाळी अंकांच्या गर्दीतही आपलं वेगळेपण राखून राहिला. संत साहित्य, स्त्री साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य याचबरोबर केवळ कविता, केवळ अभंग-ओव्या, केवळ गजल अशा साहित्य प्रकारांवर उत्तमोत्तम विशेषांक सादर करण्याचं धाडस आकंठनं दाखवलं. सन २००४मध्ये गत शतकातील मराठी साहित्य या ५४० पानांच्या रौप्यमहोत्सवी अंकाने तर शतकातील मराठी साहित्याचा धांडोळा मराठी वाचकांपुढं ठेवलाच, शिवाय एकाच वर्षात सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे पाच राज्यस्तरीय पुरस्कार एकाच वर्षी पटकावण्याचा विक्रमही आकंठनं नोंदविला. साहजिकच त्या प्रत्येक अंकाचं संग्रहमूल्य आजही कायम आहे.
या रौप्यमहोत्सवी अंकानंतरच थांबण्याचा निर्णय चोरमुले सरांनी घेतला होता. पण, वाचकांच्या अत्याग्रहामुळं त्यांनी पुढंही ही साहित्यसेवा सुरू राखली. आकंठच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये अन्य भारतीय भाषांमध्ये काय साहित्यिक हालचाली आहेत, प्रवाह, अंतःप्रवाह काय आहे, हे चिकित्सकपणे पाहण्याचा प्रयत्न केला. तसं हे खूपच अवघड काम होतं. ज्या त्या राज्यातलं दर्जेदार साहित्य, साहित्यिक आणि त्यासाठी मराठीतले चांगले अनुवादक निवडून जवळपास सर्व भारतीय भाषा मराठीला जोडण्याचं काम आकंठनं या काळात केलं. कन्नड, पंजाबी, ओडिया, बंगाली, गुजराती, मल्याळी, हिंदी, तेलुगू, तमिळ, सिंधी, असमिया, काश्मिरी, भारतीय नेपाळी, राजस्थानी इत्यादी भाषांमधील निवडक साहित्य मराठी वाचकांना त्यांनी सादर केलं. सन २०१९मध्ये आकंठचा ४०वा सांगता विशेषांक चोरमुले सरांनी प्रकाशित केला आहे. या सुमारे ६००हून अधिक पृष्ठांच्या अंकात २४ भारतीय भाषांतील निवडक कथा, कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
मंत्रालयात असताना आकंठच्या काही अंकांसाठी काम करण्याची संधीही मला लाभली. त्या अर्थानं या परिवाराचा मी एक छोटासा घटक आहे. त्यामुळंही आणि एक वाचक म्हणूनही आकंठचं बंद होणं, माझ्यासाठी वेदनादायी आहे. आकंठनं भारतीय भाषांशी मराठीला जोडण्याचं केलेलं काम अतुलनीय आहे. आज अस्मितेच्या नावाखाली आपण आपल्या मातृभाषेचा टेंभा जरुर मिरवतो, पण त्याखाली अन्य भाषांचं अज्ञान दडवण्याचा प्रयत्न कोठे तरी केला जातो आहे का, याचाही विचार या निमित्तानं व्हायला हवा. तेरा तेरा भाषांचे ज्ञान असणारे पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासारखे ज्ञानी पंतप्रधान आपल्याला लाभलेले होते. आपण मातृभाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे, पण अन्य भारतीय अगर परदेशी भाषा यांचा सन्मानही आपल्याकडून राखला जाणे आवश्यक आहे. त्यातल्या एक-दोन अतिरिक्त भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? भाषिक तुटलेपण, भाषिक भेद एकदा आपल्यामध्ये आले की, भौगोलिक सीमा कितीही एक असू द्यात, मानसिक दरी आपण कधीही सांधू शकणार नाही, हे भाषेची अनाठायी अस्मिता बाळगणाऱ्यांना सांगायला हवं. भाषेवर प्रेम असावं, ते असलंच पाहिजे, पण ते प्रेम अन्य भाषांच्या, अन्य भाषिकांच्या तिरस्कारातून निर्माण झालेलं असता कामा नये. तसल्या बेगडी प्रेमाला काडीचा अर्थ नाही. भाषाबंधुत्व वा भाषाभगिनित्व यांचं एक अत्यंत आदर्श असं उदाहरण आकंठनं गेल्या ४० वर्षांत आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यामुळं त्याचा निरोप घेताना हृदय जड होतं आहे. आकंठचा वारसा जपण्याची जबाबदारी आता आपण वाचक मंडळी कशी निभावणार, हाच खरा प्रश्न आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा