मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

गावाच्या प्रेमाने चिंब झालो; तो दिवस...

जत्राट येथे झालेल्या शिवजयंती उत्सवात शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना युपीएससी उत्तीर्ण झालेले असि. कमांडंट ऑफिसर प्रीतम जनार्दन मेस्त्री व डॉ. आलोक जत्राटकर


जत्राट येथील शिवजयंती उत्सवात डॉ. आलोक जत्राटकर यांचा युवा प्रेरणा पुरस्काराने गौरव करताना ज्येष्ठ विचारवंत अॅड. अविनाश कट्टी. छायाचित्राच दलित क्रांती सेनेचे अशोककुमार असोदे दिसत आहेत.

जत्राट येथील शिवजयंती उत्सवात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर.

जत्राट येथील शिवजयंती उत्सवात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर.

जत्राट हे माझ्या गावचं नाव मी अभिमानानं माझ्या आडनावात मिरवतो आहेच; पण, गावानं परवाच्या (दि. २२ फेब्रुवारी) शिवजयंती उत्सवात त्यांच्या प्रेमानं मला चिंब करून सोडलं. माझ्या वडिलांच्या नंतर पीएच.डी. प्राप्त करणारा या गावचा मी दुसराच व्यक्ती. (म्हणजे पाहा, एकीकडे विद्यापीठांतून पीएच.डी. होऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली असताना माझ्या गावचा मी दुसराच, तेही माझ्या वडिलांनंतर... सुमारे ३० वर्षानंतर... ही बाब आपल्या समाजातील शैक्षणिक स्थितीवर पुरेसे बोलके भाष्य करते...) त्यामुळे गावकऱ्यांनी युवा प्रेरणा विशेष सत्कार करून गौरवलं, ही बाब माझ्यासाठी खरोखरीच अभिमानास्पद... शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं हा सत्काराचा घाट घालणारे माझे लाडके किरण मेस्त्री, एकनाथ उर्फ रविंद्र कांबळे, किशोर कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचा मी खरोखरीच ऋणी आहे कारण आपल्या कामाची गावानं म्हणजे आपल्या माणसांनी दखल घेण्यासारखं दुसरं कौतुक नाही. दलित संघर्ष समितीचे अध्यक्ष व माझे सन्मित्र अशोककुमार असोदे यांच्यासह गावचे नेते श्री. एम.पी. पाटील अण्णा, श्री. रमेश भिवशे, श्री. सुधाकर थोरात आणि ग्रामपंचायत अध्यक्ष नीलम जबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ विचारवंत विधिज्ञ अॅड. अविनाश कट्टी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी युपीएससी क्रॅक करून असिस्टंट कमांडंट ऑफिसर पदावर विराजमान होणाऱ्या प्रीतम मेस्त्री यानंही विपरित परिस्थितीवर मात करीत घवघवीत यश संपादन केलं, त्याचाही गौरव करण्यात आला. त्याच्यासह क्रीडा, शिक्षण क्षेत्रात आकर्षक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आलं. त्यांचं यश गावातल्या युवकांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहेच, पण मला त्यात दोन सत्कार मनापासून भावले, ते म्हणजे आनंदा मारुती कांबळे आणि हाजी बेबीजान बाबाजी फकीर यांचे!
आनंदा कांबळे तथा नाना हे गावातलं बुजूर्ग व्यक्तीमत्त्व. नाना म्हणजे गावात कोणाचाही कार्यक्रम असो, कामाला पुढे असणारच. विशेषतः मयताच्या विधीदरम्यान नानांचा वावर उठून दिसणारा. मर्तिकेच्या सगळ्या कामात पुढे होऊन भाग घेणारा, दुःखात बुडालेल्या नातेवाईकांना दिलासा देण्याबरोबरच अति करणाऱ्या नातेवाईकांना ताळ्यात ठेवून अंत्यसंस्कार वेळेत, व्यवस्थित होईल, याची दक्षता घेणारे नाना हे काम अनेक वर्षे अत्यंत निरपेक्षपणे आणि सामाजिक दायित्वाच्या भावनेतून करीत आहेत. अलिकडेच माझी आजी गेली, तेव्हा तिच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आमच्यापेक्षा जणू नानांच्याच खांद्यावर अधिक असल्याप्रमाणे त्यांनी सारं काही सुरळित होईल, याची काळजी घेतलेली. तेव्हाच नानांचं व्यक्तीमत्त्व मनाला स्पर्शून गेलेलं. त्यांचा शिवजयंतीच्या व्यासपीठावर सत्कार म्हणजे शिवरायांच्या खऱ्या मावळ्याचाच गौरव वाटला मला.
दुसऱ्या व्यक्ती म्हणजे हाजी बेबीजान फकीर. ही वयस्कर महिला गावात कित्येक वर्षांपासून आया, दाई म्हणून काम करते आहे. गावातल्या जवळपास अडलेल्या सर्वच महिलांची सुटका भाभींनी केलेली. त्यामुळं गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर. जात-धर्म या भावनांच्या पलिकडे माणुसकीचे, आपुलकीचे नाते म्हणजे काय, याचे प्रतीक म्हणजे जत्राट आणि भाभींचे नाते. कुठल्याही सत्काराची वगैरे अपेक्षा न ठेवता काम करीत असणाऱ्या या सत्कारानेही माझ्या मनात आयोजकांविषयी आदराची व कौतुकाची भावना निर्माण झाली. ती मी माझ्या भाषणात बोलूनही दाखविली.
यावेळी शिवरायांच्या कार्याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. भारताचे पहिले स्वातंत्र्ययोद्धे म्हणजे छत्रपती शिवराय, या अंगाने मांडणी केली. आमचे अत्यंत लाडके व्यक्तीमत्त्व गारगोटीचे डॉ. राजीव चव्हाण यांचा प्रबोधनात्मक शाहिरी पोवाडा म्हणजे तर आईसिंग ऑन द केकच ठरला.
या कार्यक्रमानंतर लाडकी अलका आत्ती, मामा, भरतमामा आणि नितीन यांनी निपाणी येथील त्यांच्या हॉटेल बैठक येथे बोलावून केलेला सरप्राईजसत्कार सुद्धा आनंदात भर टाकणाराच!
ग्रामस्थांच्या या ऋणातून उतराई होणे, कसे बरे शक्य आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा