रविवार, १४ जून, २०२०

नोंद एका महान 'स्मृतितरंग'लहरीची!

प्रा. डॉ. आर.व्ही. भोंसले


आज अभिनेता सुशांतसिंह रजपूत यानं अवघ्या ३३व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची बातमी आली. एक अतिशय चांगला अभिनेता असणाऱ्या सुशांतमध्ये परिपक्व होत जाईल, तसतसा उत्तम आणि महान अभिनेता होण्याच्या परिपूर्ण शक्यता असतानाही त्यानं असा निर्णय का घेतला असावा, अशी हळहळ मन कुरतडत असतानाच कोल्हापूरचे महान अवकाश संशोधक प्रा. डॉ. आर.व्ही. भोंसले (दि. १२-११-१९२८ ते १४-६-२०२०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी आली. आणि एका विरोधाभासानं मला ग्रासलं. पहिला यशाची चव चाखूनही भौतिकतेच्या साऱ्या सुखसुविधांमध्ये लोळत असतानाही असा जीवन संपविण्याचा निर्णय घेतो. आणि दुसरा त्याच्या संशोधनाच्या क्षेत्रातही प्रचंड महान असूनही अत्यंत साधं जीवन जगतो. अगदी नव्वदीमध्येही या जगाला काही उत्तम देण्यासाठी धडपडतो आणि अत्यंत संपृक्त, समाधानी आयुष्य जगून, जगाला चांगलं योगदान देऊन निघून जातो. ही प्रत्येकासाठीच आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. असो! सुशांतला माझी भावपूर्ण श्रद्धांजली...

आता थोडेसे डॉ. भोंसले यांच्या योगदानाविषयी...

प्रा. भोंसले यांना ते विद्यापीठ कार्यालयात मा. कुलगुरूंना भेटण्यासाठी आले असताना मला व्यक्तीशः एकदाच भेटता आले होते. मात्र, त्यांच्या स्मृतितरंग या चरित्र ग्रंथामुळे मात्र मला त्यांनी भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला दिलेल्या महान योगदानाची कल्पना आली. एखादा माणूस कार्याने प्रचंड मोठा असून जमिनीशी किती नाते जोडून राहू शकतो, याचे ते मूर्तीमंत प्रतीक होते. (ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे हे सुद्धा कोल्हापूरचे असेच एक महान नररत्न आहे.)

जागतिक स्तरावर अवकाश विज्ञानाच्या अतिगहन क्षेत्रात कार्य करीत असताना आणि त्याची उल्लेखनीय म्हणून तेथे नोंद घेतली जात असतानाही डॉ. भोंसले यांच्या मनातील मातृभूमीची ओढ त्यांना येथे खेचून घेऊन येते आणि येथे परतल्यानंतरही कोल्हापूरचे ऋण फेडण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये अवकाश संशोधन केंद्र स्थापन होऊन त्याचा लाभ इथल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अथक आणि अखंड परिश्रम करतात, ही कहाणीच मोठी विस्मयजनक आहे. खरे तर, प्रा. भोंसले यांच्या या परिश्रमाला आता गोड फळे येऊ लागलेली आहेत. त्यांचे हे ऋण कधीही विसरता न येणारे आहे.

खरे तर स्मृतितरंग या नावापासूनच मी या चरित्रग्रंथाकडे आकृष्ट झालो. आयुष्यात पहिल्यांदा रेडिओ पाहिल्यापासून तरंगलहरींबद्दल मनात कुतूहल चाळविले जाऊन त्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी बजावणाऱ्या एका शास्त्रज्ञाच्या चरित्रनामामध्येही त्या तरंगांचा समावेश होणे, हे अतिशय औचित्यपूर्ण आहे. चरित्रकार पी.टी. पाटील यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक हा चरित्र ग्रंथ साकारला आहे.

डॉ. भोंसले यांचे जीवनकार्य म्हणजे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राचा आणि शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधनाचा जणू संक्षिप्त समग्रपटच आहे. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. एकनाथ चिटणीस यांच्यापासून ते अगदी डॉ. जे.पी. नाईक, डॉ. जगदीश शिर्के, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. यु.आर. राव, डॉ. कस्तुरीरंगन, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. अलूरकर, डॉ. देगावकर अशा अनेक महान शास्त्रज्ञांच्या समवेत त्यांनी कार्य केले. किंबहुना, या शास्त्रज्ञांनी डॉ. भोंसले यांच्या समवेत काम केले, असेही आपल्याला म्हणता येईल. डॉ. भोंसले यांनीही आपल्या अनुभवाचा पुरेपूर लाभ या सर्व शास्त्रज्ञांना होऊ दिला. ही फार महत्त्वाची बाब आहे. भारतीय अवकाश संशोधनाचा एक संक्षिप्त आलेख यामधून वाचकाच्या नजरेसमोर साकारला जातो आणि त्यातून डॉ. भोंसले यांचे आपल्या देशासाठीचे योगदानही अधोरेखित होत जाते.

देशासाठी योगदान देत असतानाच कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ देण्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जे असाधारण प्रयत्न केले, त्याला तोड नाही. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीतच असलेल्या या विद्यापीठात काळाच्या पुढे जाऊन अवकाश संशोधनाची पायाभरणी करण्याचे एक अतिशय महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.

पन्हाळा येथे अत्यंत द्रष्टेपणाने अवकाश संशोधन केंद्रासाठीच्या जागेचे प्रयोजन करून ठेवणे आणि त्यासाठी सातत्याने वीस वर्षांहून अधिक काळ पाठपुरावा करणे, या कामी त्यांनी दिलेले योगदान अपूर्व आहे. म्हणूनच आज शिवाजी विद्यापीठाच्या या केंद्रात भारत सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा आय.आर.एन.एस.एस. या उपग्रह प्रकल्पामधील सॅटेलाईट रिसिव्हर बसविण्यात आला आणि तो अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत आहे. येथे मिळणारी निरीक्षणेही भारतातील अन्य रिसिव्हर्सपेक्षा अधिक अचूक असल्याचे इस्रोने कळविले आहे. हे केंद्र अधिकाधिक सक्षम करण्याचे प्रयत्न विद्यापीठाकडून सुरू आहेत.

या चरित्राच्या माध्यमातून डॉ. स्मृतिका पाटील या शिवाजी विद्यापीठातून अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात सर्वप्रथम पीएच.डी. झालेल्या विद्यार्थिनीची माहिती माझ्या वाचनात येऊ शकली, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते.

पीएचडीचे संशोधन करीत असताना डॉ. भोंसले यांनी भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप तयार केला. ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. त्यासाठी त्यांनी चरित्रातील दोन चार पाने खर्ची घातली असती, तरी चालण्यासारखे होते. मात्र, ही बाब ते अवघ्या तीन वाक्यांत सांगून रिकामे होतात. इतका प्रांजळपणा त्यांच्या व्यक्तीमत्त्वात होता. त्याचप्रमाणे सूर्यावरील महास्फोटांमुळे रेडिओ लहरींचे आयनोस्फेरिक शोषण दाखविणारा जागतिक पातळीवरील एकमेव पुरावा मिळविणारे पहिले शास्त्रज्ञ असूनही त्याविषयीचा उल्लेखही अवघ्या एका वाक्यात करून रिकामे होतात. त्या दृष्टीने या चरित्राच्या मलपृष्ठावरील कॉस्मिक नॉइज दर्शविणारा आलेख संशोधकीयदृष्ट्या फार महत्त्वाचा दस्तावेज आहे.

स्मृतितरंग हे डॉ. भोंसले यांचे चरित्र म्हणजे अवकाश संशोधनातील नोंदींचा एक अमूल्य ठेवाच आहे. एक शास्त्रज्ञ जागतिक पातळीवर प्रचंड मोठी कामगिरी बजावल्यानंतर सुद्धा त्या लोकप्रियतेच्या लहरींवर तरंगत वर आकाशात न उडता जमिनीशी किती अतूट नाते जोडून राहतो, याचे प्रत्यंतर म्हणजे डॉ. आर.व्ही. भोंसले यांचे जीवन व कार्य होय. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्त्वापासून युवा पिढीने प्रेरणा घेऊन आपल्या देशासाठी योगदान द्यायला सज्ज होण्याचा संदेश घेण्याची गरज आहे. डॉ. भोंसले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा