शुक्रवार, १९ जून, २०२०

हेअर कटिंगचे सेल्फ अप्रायझललॉकडाऊनच्या कालखंडात तमाम लोकांनी तमाम कलाकौशल्ये आत्मसात केली, तमाम वेबिनारमध्ये सहभाग घेतला, तमाम प्रमाणपत्रे मिळविली, तमाम पाककला साध्य केल्या, अशा तमाम गोष्टी तमाम केल्या. आम्ही मात्र अशा तमाम गोष्टींच्या मागे न लागता जिथे अडले, तिथे केले, या पंथाने वाटचाल राखली. अशी एक मोठ्ठी अडवणूक करणारा अत्यावश्यक घटक होता, तो म्हणजे केशकर्तन... अद्यापही त्यासंदर्भातले नर्तन अन् चर्वितचर्वण सुरू असताना बालक सम्यक आणि त्याचा बाप यांच्या केसांनी आपला ग्रोथ रेट सातत्याने वाढता ठेवला होता. एके क्षणी- याचा तो, त्याचा तो अशा पद्धतीने कोणी कोणी साऱ्या दक्षता घेऊन घरी येऊन कर्तन करून जातो, असे संदेशही प्राप्त झाले. मात्र, त्या संदेशांनी मनातील संदेह मात्र कमी झाला नाही. त्यामुळे तो पर्याय बाजूला ठेवला. घरात कात्रीही एकच- किचनची. पोरांच्या कागद कापायच्या कात्र्या पार बोथट झालेल्या, निरुपयोगी साऱ्या. घरात पोरांच्या आईनं जीव उठवलेला, पोराचे केस खूपच वाढलेत, कापायला पाहिजेत... मग प्रश्न पडला, आता काय क्रावे ब्रे? अखेर एका सुरम्य रंगीत रविवारच्या सकाळी उठलो... कीचनमधली कात्री पार निर्जंतूक करून घेतली... पोराला हलवून उठवलं... तोंड धुवून केस ओले करून खुर्चीवर बसवलं... सम्यक- गुणाचं पोर. बापाला प्रोत्साहन देत होतं, ‘बाबा, जमतंय तुम्हाला.. कापा... करा सुरू...’ कंगवा, कात्री घेऊन [मनात ‘नामा’चं (हे नामा माझे निपाणीचे मित्र; मी त्यांच्याकडेच केस कापतो.) स्मरण करून] केली सुरवात साइड कटपासून... पहिले दोन कट पडले बरोबर... पुढे मात्र ओल्या केसांतून लागली की कात्री घसरायला... मग लक्षात आलं, घरात उपलब्ध साधनांच्या सहाय्याने केस कापत असताना केस ओले न करता कोरड्यानेच कापायला हवेत... त्या दिवशी जमेल तसे केस कापले... सम्यक आंघोळ करून आला, डोक्यात केसांच्या लाटा तयार झालेल्या... माझाच धीर खचलेला, पण पोर तरीही आरशात बघून मला सांगतंय कसं, ‘चालतंय हो बाबा, आता कुठं शाळेला जायचंय? पहिल्यांदा असूनही तुम्ही चांगलेच कापलेत.’ भाऱ्यासाठी गवत कापल्यावर जमिनीत खुंट राहावेत, तसे बिचाऱ्याचे डोके मी केलेले... पण, आता म्हटलं पुढच्या खेपेस चूक सुधारायची... डोक्यात केस कापण्याचे विविध पैंतरे घोळू लागले, ट्रीमर वगैरे तमाम साधनसामुग्री अमॅझॉनवरुन मागविण्याचाही पर्याय पडताळून पाहिला. लगेच परवडणारा नव्हता... केस कापायची कात्री सुद्धा साडेतीनशेच्या पुढची... जाऊ दे म्हटलं... आता सारं काही कॉन्फिडन्सच्या बळावर करायचं... यावेळी मात्र पाणी न लावता आणि कंगव्याऐवजी केवळ दोन बोटांच्या मध्ये केसांच्या बटा धरून एकदम बयाजवार कर्तन केलं... एकदम परफेक्ट हेअरस्टाईल जमलेली... आणखी पुढच्या खेपी म्हणजे अगदी परवाच पावसाळ्याच्या तोंडावर पोराचे केस एकदम सुपरफाईन बारीक केले... तीच कात्री अन् तीच दोन बोटे...
मधल्या काळात गरीबाचे (कोण म्हणुनी काय पुसता?) केसही वाढलेले... बायकोला रिक्वेस्ट केली, "जरा मदत करता का?" आमची विनंती साफ अव्हेरली गेली... “असंच कापलंय, तसंच कापलंय, म्हणून पुढच्या कटिंगपर्यंत ऐकून घ्यायची अजिबात इच्छा नाही...” असे शीशाच्या रसासारखे तप्त शब्द कानात ओतले गेले... घ्यावा हातात वस्तरा आणि करून टाकावं आपल्या डोक्याचं मुंडण, असा महाभयंकर विचार मनी आला... पण, तो लगेच आवरता घेतला गेला... कारण टक्कल आणि टोपी, या दोन्ही गोष्टींत आपण खूपच चंपक टाइप दिसतो, असे गरीबाचे स्वतःविषयीचे निरीक्षण आहे... 
गरीबास त्यांचे मोहनलाल दोशी विद्यालयातले पी.के. जोशी सर आठवले... जबरदस्त माणूस आणि शिक्षकही... अभ्यास न करणाऱ्या तमाम पोरांना ते न्हावी (त्या काळात सामाजिक अस्मिता अशा शब्दांशी निगडित नव्हत्या, विषमतापूर्ण वर्तनाशी होत्या.) संबोधत... जसे की, शिंत्रे न्हावी.. जत्राटकर न्हावी... म्हणायचे कसे- ‘मास्तर, तुमी शाणपणा सांगू नका... आमी काय शिकणार न्हाई... आमी न्हावीच होणार... चौकाचौकात दुकानं टाकणार... समोरनं मास्तर सायकलवर टांग टाकून जाताना दिसला की दोरी टाकून त्येला पकडणार... म्हनणार... या मास्तर, तुमची हजामत करतो... मास्तरला खुर्चीवर बशीवनार... तोंडाला साबण फासणार आनि शेवटी मास्तरच्या गळ्यावर वस्तरा ठेवनार... आता मास्तराची दाढी करनार का गळा कापनार, हे आता त्यो हजामत कशी करायला शिकलाय, त्यावर अवलंबून राहनार...’ सरांचा हेतू एकच असायचा की, पोरांनी रोजच्या रोज अभ्यास करावा... पण, त्याबरोबरच शाळा न शिकता एखादं कौशल्य शिकला, तरी ते सुद्धा प्रामाणिकपणानंच आणि परफेक्ट शिकण्याची गरज त्यातून अधोरेखित होत होती, हे आत्ता कळतंय....
गरीबाला त्याचा सायंटिस्ट दोस्त भालूची (भालचंद्र काकडे) सुद्धा आठवण झाली... भालू जपानला असताना अधेमधे आला असताना त्याची हेअरस्टाईल बघून मी म्हटलं, “भाल्या, एकदम जपानी स्टाईलचा हेअरकट झालाय बघ तुझा...” त्यावर खो खो हसत भाल्या उत्तरलेला, “आरं, कुठली स्टाईल न काय? ती जपानी सगळी एकसारखी कशीबी क्येस कापत्यात... स्टाईल बिईल सगळं आपल्याकडंच...” माझ्या डोक्यात त्यावेळी प्रकाश पडला... आपण डोक्याच्या वरच्याच भागाचा विचार करतो नुस्ता... जपानी माणूस मात्र त्या डोक्याच्या वरच्या भागापेक्षा आतल्या मेंदूच्या मशागतीकडं लक्ष देतो, म्हणून जवळजवळ सर्वच क्षेत्रांत ती जगात भारी आहेत...
अशा इन्स्पिरेशनल श्टोरीज आठवत चिडलेले गरीब मग- करतो माझं मीच कटिंग, असं म्हणून तीच कात्री अन् तीच दोन बोटे घेऊन आरशासमोर उभे राहिले... दणादण वाढलेल्या केसांची लेव्हल करीत सुटले... समोरुन लूक चांगला झालेला... प्रश्न मागच्या केसांचा होता... इथे कन्या मदतीला धावली... खुर्ची घेऊन उभी राहिली... आता तिचे डोळेच माझा आरसा बनले... ‘बाबा, इथे... थोडं खाली... हां... हां... करेक्ट’ असं म्हणून मार्गदर्शन करू लागली. आणि काय सांगावे, जमलं की ब्वा... लॉकडाऊनच्या काळात एकदा नव्हे, दोनदा... तेही बऱ्यापैकी परफेक्ट... 
“केशकर्तन ही एक प्रयत्नसाध्य कला आहे... कमीत कमी उपलब्ध साधनांमध्ये ती साधता येते... स्वतःचे केस स्वतःच कापणे, ही दुसऱ्याची हजामत करण्याइतकीच अवघड बाब आहे...” असे अनेक साक्षात्कारही या दरम्यान झाले आहेत... गरीबाचा कॉन्फिडन्स एव्ढा वाढलाय की काय सांगावे... जावेद हबीबकडे महिनाभराचा कोर्स करून सगळ्या जगाच्या हजामती करायला सज्ज होण्याचे मांडे आता तो मनातल्या मनात खातो आहे....

२ टिप्पण्या:

 1. वा सर ,
  खुप सुंदर आणि खुसखुशीत लेख.
  भाषा शैली अप्रतिम.
  डोई वरचा भार वाढल्यावरच मला कळले कि माझ्या ही घरी अनुष्का आहे और शर्मा के कबूल करते है की त्यामुळे च डोके ठिकाणावर राहिले.

  बाळासाहेब पाटील , पुणे

  उत्तर द्याहटवा