सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

चांगल्याचं बोचकं बांधणारा ‘माणूस’

 (शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व प्राचार्य डॉ. अशोक भोईटे नुकतेच पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. भोईटे सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या सेवा गौरव विशेषांकासाठी लिहीलेला लेख वाचकांसाठी शेअर करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर 'दै. लोकमत'च्या कार्यालयास आम्ही सदिच्छा भेट दिली, त्यावेळचे छायाचित्र.


प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचे नाव प्रथमतः मी ऐकले तेच मुळी त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी निवड झाल्याची बातमी आली, तेव्हा! त्यापूर्वी केवळ कवी अशोक भोईटे यांना वाचून-ऐकून होतो. त्यावेळी हे कवी आणि प्राचार्य एकच तर नव्हेत, असाही प्रश्न माझ्या मनात आला. पण माहिती घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय समर्पित भावनेने योगदान देणारे प्राचार्य भोईटे हे वेगळे असल्याचे समजले. प्र-कुलगुरूपदाची सूत्रे घेण्यासाठी भोईटे सर हजर होत असताना शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात आणले होते. मुले काही कोणासाठीही ढोलताशे वाजवत नाहीत. ज्या व्यक्तीवर ते प्रेम करतात, तिथेच त्यांची ही उत्स्फूर्तता ओसंडून वाहात असते. त्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातच डॉ. भोईटे यांच्या लोकसंग्रहाची मला पुरेपूर कल्पना आली. केवळ रयत शिक्षण संस्थेतीलच नव्हे, तर समाजातल्या विविध स्तरांतील मंडळी त्यांच्या स्वागतासाठी तेथे उपस्थित होती.

पुढे सरांनी चार्ज घेतला आणि कामाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात जाणे येणे सुरू झाले. तेव्हापासून या माणसाच्या विविध गुणांची, कार्यक्षमतेची वेळोवेळी प्रचिती येत राहिली. भोईटे सर हे रसायन खूप वेगळे आहे. कर्मवीर अण्णांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर प्रचंड पगडा आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमधून, निर्णयामधून ते दिसून आले. इथे आपण कोणासाठी आहोत? तर, विद्यार्थ्यांसाठी!  मग, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत असताना कोणी कितीही आडवे पडण्याचा प्रयत्न केला, अडथळे आणले, तरी त्याची फिकीर न करता संबंधित निर्णयावर ठाम राहात त्यावर कार्यवाही ते करीत. जे सहकारी काम करतात, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारा, जे कमी पडतात, त्यांना प्रोत्साहित करणारा आणि काम टाळणाऱ्यांचे कान पिळणारा एक कर्तव्यकठोर प्रशासक म्हणूनही मी त्यांच्याकडे पाहतो. आपण जर एखादे काम चांगल्या भावनेने, शुद्ध हेतूने हाती घेतले आहे; कदाचित जे कोणासाठी अडचणीचे देखील असू शकते, अशा वेळी आपण कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ते काम तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील राहिलेच पाहिजे. अशी ठाम भूमिका त्यांची असते. प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले असते, यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणून प्रत्येकामधल्या त्या चांगूलपणाला आवाहन करीत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे.

भोईटे सरांच्या सहवासातील सुमारे अडीच वर्षे ही खरेच अत्यंत आनंददायी स्वरुपाची होती. कधी रागावणे नाही की आरडाओरड नाही; पण, फालतूपणाला थारा सुद्धा नाही, असे त्यांचे रुप मी बरेचदा अनुभवले. एकदा एक मराठवाड्यातल्या विद्यार्थी संघटनेचा नेता इथल्या मुलांचे जे प्रश्न नाहीत, अशाच गोष्टी घेऊन त्यांच्या केबीनमध्ये बराच वेळ त्यांच्याशी तंडत होता. परीक्षा नियंत्रकांपासून सारे अधिकारी हवालदिल होऊन बसले होते. भोईटे सरही त्याची खूप प्रेमाने समजून घालण्याचा प्रयत्न करीत होते, तरीही तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यावेळी सरांनी त्याला निर्वाणीचे निक्षून सांगितले, मी इतका वेळ तुमचे ऐकून घेतो आहे, समजून सांगतो आहे; पण तुम्ही ऐकून घेत नाही आहात. प्र-कुलगुरूंना इतर काही कामे नाहीत, असा जर तुमचा समज असेल, तर तसे नाही. तुम्ही जी भूमिका घेऊन इथे आला आहात, तिला माझे स्थानिक विद्यार्थी थोडीफारही भीक घालणार नाहीत. तुम्ही आताच्या आता माझ्या केबीनमधून निघा आणि काय करायचे ते करा. त्याला सरांनी जवळजवळ हाकलूनच लावला. धुसफूस करीत तो तथाकथित नेता तिथून बाहेर पडला. आणि तो खरेच इथल्या विद्यार्थ्यांमध्ये थोडीही फूट पाडू शकला नाही. नंतर तो कधीही विद्यापीठाकडे फिरकला नाही की त्याचा इथे काही नामोनिशाण उरला. ही कठोरता, मुत्सद्देगिरी, विद्यार्थ्यांवरील विश्वास या साऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. आता तसे फार क्वचित दिसते. संघटना नेते आले म्हटले की उगीचच त्याची दहशत घेऊन त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला जातो आणि मुद्देविहीन राजकारणाला शैक्षणिक क्षेत्रात चालना प्राप्त होते. मात्र, भोईटे सरांसारखे प्रशासक असल्यानंतर तसे होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून त्यांची उणीव आणि त्यांच्यासारख्या माणसाची गरज प्रशासनाला नित्य भासत असते.

भोईटे सरांचे आणि माझे नाते अधिक जवळिकीचे होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे त्यांच्या आई- ज्यांना ते ताई म्हणतात. एकदा सरांनी थोड्या निवांत क्षणी मला केबीनमध्ये बोलावले आणि आखीव तावांची काही पाने हातात ठेवली. त्यावर सरांच्या अक्षरात बऱ्याच ओव्या लिहीलेल्या होत्या. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शंकरराव भोईटे या जात्यावर बसल्यानंतर ओव्या म्हणत असत. गावी आईकडे गेल्यानंतर सरांनी तिच्याशेजारी बसून त्या ओव्या टिपून घेतल्या होत्या. बहिणाबाईंच्या नंतर इतक्या अप्रतिम ओव्या मी प्रथमच वाचत होतो. मी थक्क झालो. मी म्हटलं, सर, हा किती मोठा लोककलेचा ऐवज आहे, आपण तो प्रकाशित का करीत नाही?’ त्यावर सर उत्तरले, त्यासाठीच तर तुम्हाला बोलावलंय. तुमची प्रतिक्रिया काय ते आजमावायची आणि एखाद्या दैनिकात त्यावर काही लेख वगैरे देता येईल का पाहा.’ ‘ठीक आहे, असं म्हणून ते कागद घेऊन मी बाहेर पडलो. रात्री घरी गेल्यानंतर शांत चित्ताने पुन्हा साऱ्या ओव्या वाचून काढल्या. इतक्या ओव्या होत्या की, नुसत्या ओव्या जरी एकाखाली एक लिहील्या तरी कोणतेही दैनिक त्या मोजक्या जागेत छापू शकले नसते. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. एकच लेख छापण्याऐवजी याची मालिका केली तर मजा येईल. मी लगोलग शेतीप्रगती मासिकाचे संपादक मित्रवर्य रावसाहेब पुजारी यांना फोन लावला आणि त्यांना विषय सांगितला. ओव्यांचा विषय ऐकल्यानंतर ते जणू वेडावूनच गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते विद्यापीठ कार्यालयात दाखल झाले आणि मी त्यांना घेऊन सरांकडे गेलो. सरांना म्हटलं, सर, एका लेखासाठी या ओव्या खूपच आहेत. त्यामुळे त्याची मालिका आपण शेतीप्रगतीमध्ये दरमहा प्रसिद्ध करू या. सहा-सात भाग झाले तरी हरकत नाही. पुजारी सर तर हा ऐवज वाचक शेतकरी बंधूभगिनींपर्यंत पोहोचविण्यासाठी एका पायावर तयारच होते. पुढील महिन्यापासून ताईंच्या ओव्या ही लेखमाला शेतीप्रगतीमध्ये सुरू करण्याचे ठरले.

आता माझी जबाबदारी वाढली होती. मी ओव्यांचे वर्गीकरण केले. पांडुरंगाच्या ओव्या वेगळ्या, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेगळ्या, बहिण-भावाच्या वेगळ्या, सामाजिक संदेशाच्या वेगळ्या, नव-परिवर्तनाच्या वेगळ्या अशा अनेक विषयनिहाय त्यांचं वर्गीकरण केलं. मग सरांच्या आणि माझ्या बैठका सुरू झाल्या. ताईंच्या ओव्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास आम्ही घेतला. आणि माय माझी बहिणाबाई, मी तिचा सोपान या पहिल्या भागापासून सुरवात झाली. सोपानदेवांनी जशा बहिणाबाईंच्या ओव्या टिपून घेऊन तो ठेवा जगासमोर आणला, तेच काम नेमकं भोईटे सरांनी केलं, म्हणून त्यांनी तिथपासूनच सुरवात केली. ताईंची विठ्ठलावर प्रचंड भक्ती, त्यामुळं एका बैठकीत मी सरांना विचारलं, सर, ताई दरवर्षीच वारीला जात असतील नाही का?’ त्यावर सर हसले आणि उत्तरले, आलोक, माझी आई एकदाही वारीला अगर पंढरपूरला गेलेली नव्हती. हा माझ्यासाठी खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. ज्या माऊलीच्या ओठी

जाते मी पंढरीला, गरुड खांबाला दिली पाठ।

देवा माझ्या विठ्ठलाची, सुरत सगळी दिसे नीट।

संसार परपंच, सर्वा गंगेला वाहिला।

प्रितीचा पांडुरंग, माझ्या हृदयी राहिला॥

 

अशी ओवी येते, तिच्या सर्जनशीलतेबद्दल माझ्या मनात अतीव आदर दाटून आला. वारीला जाऊन आलेल्या बायाबापड्यांकडून पंढरपूरचं, सावळ्या विठुरायाचं केवळ वर्णन ऐकून पंढरीला प्रत्यक्ष गेल्याचीच भावना जिच्या मनात झरते, त्या माऊलीचं हृदय किती कोमल, संवेदनशील असेल, या कल्पनेनंच मी थरारून गेलो आणि मी त्या ओव्यांच्या अधिकच प्रेमात पडलो. अशा माऊलीच्या पोटी जन्मलेले भोईटे सर सुद्धा तसेच कोमलहृदयी असावेत, यात आश्चर्य ते काय बरे? ताईंच्या ओव्या मालिकेचे केवळ सहा सात भाग होतील, असे जे मला वाटत होते, ते सपशेल चुकीचे ठरले. तब्बल पंधरा भाग म्हणजे सुमारे सव्वा वर्षे ही मालिका चालली. भोईटे सरांनी आपल्या माऊलीप्रती कृतज्ञताच जणू या माध्यमातून व्यक्त करण्याचे काम केले. या दरम्यान जणू मी ताईमय आणि विठ्ठलमयच होऊन गेलो होतो, इतका आनंद त्यांचे शब्दांकन करताना मला लाभला. पुढे आम्ही ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. विश्वनाथ शिंदे यांना त्या ओव्या आणि त्यांचे निरुपण दाखविले. त्यांचा अभ्यास केल्यानंतर यातील सुमारे ९० टक्के ओव्या या ओरिजिनल आहेत, असा अभिप्राय त्यांनी दिला. अर्थात, ताईंच्या ओव्या या स्वरचित अधिक होत्या. अन्य ओव्यांचा प्रभाव त्यांवर कमीत कमी आहे. ही तर त्या माऊलीबद्दलचा आदर दुणावणारी बाब होती. या ओव्यांचे पुस्तक करण्याचे पुजारी सरांनी योजिले आहे. आता निवृत्तीनंतरच्या कालखंडात भोईटे सरांनी त्याकडे लक्ष द्यावे, एवढे आमचे मागणे आहे.

या साऱ्या बाबी इतक्या सविस्तरपणे सांगण्याचे कारण एवढेच की, भोईटे सर आणि मी यांना जोडणारा फार महत्त्वाचा सांधा म्हणजे ताईंच्या ओव्या आहेत. त्या माऊलीप्रती कृतज्ञता म्हणूनच अत्यंत निरपेक्ष भावनेने झपाटून आम्ही हे काम केले आणि त्याद्वारे आमची मनेही खूप जवळ आली. भोईटे सरांमधला माणूस, सहृदय सुपुत्र मला सातत्याने अनुभवता आला. आईविषयीचा ओलावा, नात्यांमधील हळुवारपणा या साऱ्याच गोष्टींच्या बाबतीतला भोईटे सरांचा हळवेपणा मी जवळून पाहिला आहे. पुढे भोईटे सर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू सुद्धा झाले. पण, मी मात्र जोडला गेलो, ते त्यांच्यातल्या माणसाशी. ताई सरांना नेहमी सांगत असत की, चांगल्याचं बोचकं बांधावं नि वाईट गंगार्पण करावं. सरांनी त्यांच्या आयुष्यभर ताईंचं हे तत्त्व प्राणपणाने जपलं, म्हणूनच जिथे जाईल तिथे चांगल्या माणसांचा घोळका त्यांच्याभोवती गोळा होत राहिला आणि नेहमीच त्यांच्यासोबत राहिला. सरांच्या त्या चाहत्यांच्या गर्दीतलाच मीही एक आहे. सरांनी त्यांच्या उत्तरायुष्यातही हे चांगल्याचं बोचकं अधिक समृद्ध आणि संपन्न करीत जावं. चांगल्याचं ओझं कधीच होत नाही; उलट त्यात वृद्धीच होत राहते. या चांगल्याचं बोचकं बांधत जाणाऱ्या आणि अशी बोचकी लादण्यासाठी डोकी तयार करणाऱ्या सहृदयी माणसाला माझा मनःपूर्वक सलाम!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा