शनिवार, १० जुलै, २०२१

चंबुखडी ड्रीम्स: युवांसाठी पथदर्शक स्वप्नदीप

 



एखादी व्यक्ती चिरपरिचित असते. तिचं आयुष्य, त्यातल्या घडामोडी बऱ्याचशा आपल्याला ठाऊक असतात. अशी व्यक्ती जेव्हा आत्मपर स्वरुपाचं काही लिहीते, तेव्हा त्या परिचयाच्या खुणा आपण त्यात शोधू लागतो. आत्मपर लेखनाचे हेतू अनेक असतात. आपल्या आयुष्यातील घडामोडींची नोंद घेणं, वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर एका तटस्थ, त्रयस्थ नजरेनं गतायुष्याचा पुनर्वेध घेऊन त्यातील भल्याबुऱ्याचा हिशोब मांडणं इत्यादी इत्यादी. मात्र, डॉ. जगन्नाथ पाटील यांच्यासारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संज्ञापक वयाच्या अगदी मधल्या टप्प्यावर आत्मपर लेखनाचा घाट घालतो, तेव्हा त्या लेखनातील संप्रेषण-संदेशाकडे अधिक सजगपणे पाहावे लागते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांचे चंबुखडी ड्रीम्स हे आत्मलेखन वाचनात आले आणि उपरोक्त विचारतरंग मनात निर्माण झाले. तथापि, त्यांनी सुरवातीलाच हे काही माझं संपूर्ण आत्मकथन नव्हे, असं सांगतानाच यातून प्रेरणा आणि स्वप्नं घेणारे आणखी काही युवक-युवती निर्माण झाले, तर या लेखनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल, अशी भूमिका मांडली आहे.

डॉ. पाटील यांच्याशी माझा गेल्या वीस-बावीस वर्षांचा स्नेह आहे. एक उमदा शिक्षक, मार्गदर्शक आणि सन्मित्र असं हे सख्य तिहेरी पद्धतीनं फुललं आहे. त्यामुळं या कालखंडातील त्यांच्या वाटचालीचा, संघर्षाचा आणि प्रगतीचा त्यांच्या भल्या थोरल्या मित्र परिवारापैकी मी एक साक्षीदार. पण, चंबुखडी ड्रीम्स मी जसजसा वाचत गेलो, तसतसा त्यामधील संघर्षात मी अधिकाधिक गुंतत गेलो. आपण ज्या ओळखतो, असं आपल्याला वाटतं, ते किती वरवरचं असतं, ते जाणवलं. माझा सरांशी परिचय होण्यापूर्वीच्या कालखंडातला आणि अगदी या नजीकच्या काळातलाही त्यांचा संघर्ष वाचताना अचंबित झालो, पुन्हा नव्यानं प्रभावित झालो आणि खरोखरीच आजच्या तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे एक पथदर्शक स्वप्नदीप आहे, अशी भावना निर्माण झाली.

ज्याचा जन्म होण्यापूर्वीच वडील सीमेवर शहीद झाले, ज्याच्या आईनं प्रचंड कष्टानं आणि संघर्षमय परिस्थितीतून त्याला वाढवलं, जो प्रचंड हुशार होता, पण बिघडण्याच्याही सर्व शक्यता ज्याच्यात ओतप्रोत भरलेल्या होत्या, अशा विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षकांचा परीसस्पर्श लाभला, तर त्याचं किती सोनं होऊन जातं आणि पुढं हा मनुष्य केवळ देशाच्याच नव्हे, जगाच्या शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्तावर्धनासाठी किती असोशीनं योगदान देतो, या साऱ्याचं कथन म्हणजे चंबुखडी ड्रीम्स.

मला या कथनामध्ये आवडलेली बाब म्हणजे, यामध्ये मोठेपणाचा अभिनिवेश नाही, तर अत्यंत ओघवत्या शैलीत त्यांची कारकीर्द आपल्यासमोर ते मांडत राहतात. विविध ठिकाणी काम केल्याच्या तसेच काम करीत असल्याच्या मर्यादांमध्ये राहून त्या त्या संस्था, संघटनांचं श्रेय ते त्यांच्या त्यांच्या पदरात टाकतात. प्रसंगी दोन पावलं मागं येऊन संधी प्राप्त होताच चार पावलं पुढं टाकण्यासाठीची तयारी करणं, चूक झाल्याचं लक्षात येताच पटकन क्षमा मागून रिकामं होणं, अगर समोरच्याबद्दल काही मनात न ठेवता पटकन त्यालाही माफ करून टाकणं, हे स्वभावविशेष दिसतातच, पण या बाबींचं आयुष्याच्या वाटचालीतलं मोलही अधोरेखित करतात. राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर प्रांतवाद, वंशभेद, वर्णभेद या साऱ्या बाबींचा सामना करावयास लागूनही जगन्मैत्री प्रस्थापित करण्यात त्यांनी मिळविलेलं यश वादातीत आहे.

आजकाल तरुणांची नोकरी, व्यवसाय, रोजगारासाठी आपले सुरक्षा क्षेत्र सोडण्याची तयारी नसते. विशेषतः महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील सधन, संपन्न परिसरातील युवकांच्या बाबतीत तर ही बाब प्रकर्षानं जाणवते. देश-विदेशात फिरताना डॉ. पाटील यांनी देशाच्या इतर प्रांतांतील युवकांमध्ये आपले घर, कुटुंब, जिल्हा, राज्य इतकेच नव्हे तर विदेशांतही करिअरसाठी जाण्याची मानसिक तयारी दिसते. महाराष्ट्रीय युवक-युवतींमध्ये क्षमता असूनही भाषाविषयक तसेच अन्य क्षमतांबद्दल न्यूनगंडाची भावना अधिक डोकावते. सर्वप्रथम ते मनातच पराभव स्वीकारून मोकळे होतात. परिस्थितीला भिडण्यासाठी तयार होत नाहीत. यातून बाहेर पडण्याची गरज डॉ. पाटील स्वानुभवातून व्यक्त करतात.

नॅक, एपीक्यूएन, इन्क्वाहे यांसह जगभरातल्या अनेक शैक्षणिक गुणवत्ता निर्धारण क्षेत्रांत कार्यरत संघटनांमध्ये अध्यक्षपदासह विविध पदे भूषविल्यानंतर आणि सुमारे साठहून अधिक देशांचा दौरा केल्यानंतरही त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण-परिसरातही आपल्या परिचयाच्या खुणा शोधण्याचा डॉ. पाटील यांचा गुणविशेषही फार प्रकर्षानं जाणवत राहतो. लंडनचा ट्रायफलगर स्क्वेअर पाहताना त्यांना बिंदू चौक आठवतो. बार्सिलोनाच्या जगप्रसिद्ध ला-रांबला रोडवर फिरताना महाद्वार रोड आठवतो. जगभरातले महाकाय तलाव पाहताना मनात रंकाळा तरळतो. लंडन ब्रिज पाहताना पंचगंगेवरचा शिवाजी पूल, सिडनी हार्बर पाहताना गेटवे ऑफ इंडिया तर पॅरिसमधला श्वांझेनिझे चौक आणि भव्य रस्ता पाहताना राजपथ आठवतो. इंग्लंडमधील विविध पॅलेस, भव्य राजवाडे पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा खजिना त्यांना आठवतो आणि त्यांना वेदना होतात. विदेशाला आपल्या समृद्ध वारशांचे महत्त्व कळले आहे, मात्र आपण त्या बाबतीत जागे कधी होणार, ही दुरवस्था दूर होऊन या साऱ्या वारशाला उर्जितावस्था कधी येणार, असा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत राहतो. त्यांची ही संवेदनशील सजगताही आपल्याला हलवून जागे करते.

भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दलचं चिंतन हा स्वाभाविकपणे या कथानाचा एक महत्त्वाचा गाभा आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांना प्राप्त झालेलं विदारक व्यावसायिक स्वरुप आणि त्यांचं झालेलं बाजारीकरण, त्यातून विकसित झालेली खाजगी शिकवण्यांची मक्तेदारी आणि तिनं विद्यार्थी-पालकांसह शिक्षण व्यवस्थेभोवती आवळलेला पाश याबद्दल तर ते सचिंत खंत व्यक्त करतातच. पण, भारतातील आजच्या आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक या सर्व समस्यांचे मूळ म्हणजे शैक्षणिक कुपोषण असे एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण ते नोंदवितात. किंबहुना, त्यापुढे जाऊन दारिद्र्य, बेरोजगारी, नैतिक अधःपतन अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी हेच कारण असल्याचा दावाही करतात. ही थिअरी ऑफ एज्युकेशनल मालन्युट्रिशन हे या पुस्तकाचे फलित आहे, असे मला वाटते. कारण हा धागा आपल्याला थेट महात्मा फुले यांच्यापर्यंत मागे घेऊन जातो आणि पुन्हा नव्याने आपण शिक्षणाच्या बाबतीत मिळवलं काय अन् गमावलं काय, याविषयी नव्यानं विचारप्रवण करतो. हे कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची मांडणीही डॉ. पाटील इथे करतात. सध्याची शिक्षककेंद्री, संस्थाकेंद्री शिक्षणव्यवस्था बदलून पूर्णपणे विद्यार्थीकेंद्री आणि देशकेंद्रित शिक्षणव्यवस्था आणावी लागेल, असे सांगतानाच त्यासाठी स्वतःची प्रतिबद्धताही ते व्यक्त करतात.

केवळ समस्या मांडणं हे कोणाही प्रभावी संवादकाचं काम असत नाही, तर त्यावरील उपायांचं सूचन करणं, हे त्या संवादाला पूर्णत्व देत असतं. त्यामुळं डॉ. पाटील यांनी युवक-युवतींना एक जगभरारीचं, यशस्वितेचं टूलकीटही दिलेलं आहे. त्यांच्या भात्यात जागेपणी पाहावयाची स्वप्नं, उत्तम आणि दर्जेदार वाचन, संवाद कौशल्याचं परिश्रमपूर्वक विकसन, भाषाप्रभुत्व आणि कृतज्ञता, समर्पण, त्याग, निसर्गप्रेम इत्यादी मूल्यांची जोपासना अशी पंचसूत्री ते देतात. हे सारं काही लेखकाच्या स्वानुभवातून आल्यामुळं त्याचं मोल मोठं आहे. चहुबाजूंनी नैराश्यानं ग्रासलेल्या परिस्थितीत आजच्या युवकाला त्याच्या भाषेत, त्याच्या शैलीत काहीएक सांगण्याचा डॉ. पाटील यांची ही स्वप्नगाथा अपेक्षेपलिकडे यशस्वी झाली आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणं- हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है..। असे अनेकानेक ट्रेलर त्यांच्या हातून निर्माण व्हावेत आणि अंतिमतः गुणवत्तापूर्ण शिक्षणाधिष्ठित भारताचं भव्यदिव्य पिक्चर साकार व्हावं, ही अपेक्षा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा