शनिवार, १० जुलै, २०२१

स्वागत ‘समतेशी करारा’चे!


सामाजिक जाणीव म्हणजे काय? माझ्यावर अन्याय झाला, तसा इतर कोणावर होऊ नये, होत असेल तर त्याविरोधात मी उभा राहीन, ही भावना म्हणजे सामाजिक जाणीव. जातिव्यवस्थेने ठरविलेल्या उच्च वर्णीयांमध्येही गरीबी, बेकारी वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, ही स्थिती कोणाला तरी आरक्षण दिले म्हणून निर्माण झाली का? तर नाही. अस्पृश्यांच्या गरीबीचे मूळ जसे समाजव्यवस्थेत आहे, तसेच खुल्या प्रवर्गातील गरीबीचे मूळ हे मला राजकीय व्यवस्थेत दिसते. चुकीच्या राजकीय धोरणांचा हा परिपाक आहे. परंतु दोष आरक्षणाला दिला जातो. त्यातून सतत एक सामाजिक संघर्ष सुरू राहतो.

ज्यांना जातिव्यवस्था संपवायची आहे, त्यांची तरी जातीय मानसिकतेतून सुटका झाली आहे का? ज्याला समता अभिप्रेत आहे, तो बहुजन-अभिजन असे समाजाचे दोन तुकडे कसे करू शकतो? बरे, या नवबहुजनांमधील प्रत्येक जातीला वाटते, आपल्या डोक्यावर कोणी नसला पाहिजे; परंतु खाली कोणी तरी हवे, कारण त्याला वरचा व्हायचे आहे. म्हणजे नवबहुजनवाद वर्चस्ववाद नाकारत नाही आणि वर्चस्ववाद हा समताविरोधी आहे. समतेच्या चळवळीच्या संकल्पना स्पष्ट असायला हव्यात. ज्या चळवळीला लोकशाही मान्य आहे, तिने प्रथम हुकूमशाही-सरंजामशाही मानसिकतेतून मुक्त व्हायला हवे. ज्या चळवळीला बंधुभाव हवा आहे, तिने आधी वैरभाव सोडून दिला पाहिजे. ज्या चळवळीला समता हवी आहे, तिने आधी विषमतामूलक जातीय मानसिकतेतून सुटका करून घेतली पाहिजे. पण, प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. म्हणून मी अस्वस्थ...

अशा एका मनस्वी अस्वस्थतेतून आणि सजग समाजभानातून साकारला आहे, ज्येष्ठ पत्रकार आणि सुहृद मधु कांबळे यांचा समतेशी करार. सामाजिक जाणिवांनी समृद्ध असणारे महाराष्ट्राच्या भूमीत जे काही थोडे पत्रकार आहेत, त्यामध्ये मधु कांबळे यांचे स्थान खूपच वरचे आहे. मी स्वतःला अतिशय संपन्न मानतो की त्यांच्यासारख्या अत्यंत निर्मळ, सहृदयी व्यक्तीचे मैत्र, सहवास प्रदीर्घ लाभला. पत्रकारिता करीत असताना कोणत्याही प्रश्नाकडे माणुसकीच्या भावनेतून कसे पाहावे, संबंधित प्रश्नाचा बाजार न होऊ देता नैसर्गिक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्याची सोडवणूक कशी करता येईल, याचा विचार करणारे मधु कांबळे. लोकसत्तेतील समाजमंथन या मालिकेतून त्यांनी अशाच काही समकालीन सामाजिक प्रश्नांचा अतिशय चिकित्सक वेध घेतला. त्याचे प्रचंड स्वागत राज्यभरातून झाले. याचे कारण म्हणजे आरक्षण, अट्रॉसिटी आणि जातीय व्यवस्था यांचा कोणत्याही जातिनिष्ठ जाणीवांतून वेध न घेता त्यांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर आणि भारतीय संविधान यांच्या मानवी मूल्याधिष्ठित बाजूने घेतला. स्वाभाविकच त्यांच्या लेखनातून सामोरे आलेले पर्याय हे संवैधानिक स्वरुपाचे आहेत. ते सर्व प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांना पटतीलच, असे नाही; ते पटवून घेतीलच, असेही नाही. मात्र, हे पर्याय नैसर्गिक न्यायाच्या बाजूने झुकलेले, समतेच्या दिशेने घेऊन जाणारे निश्चितच आहेत. संपादक गिरीष कुबेर यांनी या लेखनासाठी त्यांना दिलेले स्वातंत्र्य, प्रोत्साहन आणि मुबलक जागा आजच्या भोवतालात फार म्हणजे फारच महत्त्वाच्या बाबी आहेत.

मधु सरांच्या या लेखमालेचे पुस्तक झाले, ही बाबच माझ्यासारख्या चाहत्याला प्रचंड सुखावणारी आहे. दोनच दिवसांपूर्वी साक्षात डॉ. गौतमीपुत्र सरांच्या हस्ते ते घेताना झालेला आनंद अवर्णनीय. पुस्तक पाहिले आणि एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊसचे आमचे प्रकाशक सन्मित्र आयु. अर्जुन देसाई यांच्याबद्दलही कौतुक दाटले, इतकी उत्तम निर्मितीमूल्ये त्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीत जपलेली आहेत. सरांनी पुस्तक दिले, त्यावेळी औरंगाबादचे ज्येष्ठ चित्रकार प्रा. दिलीप बडे, त्यांचे आर्किटेक्ट चिरंजीव शोमित आणि उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा