संत तुकाराम (प्रातिनिधिक छायाचित्र) |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होतो. त्यावेळी गांधीजींच्या तत्त्वज्ञानाच्या
अनुषंगाने बोलताना बोलून गेलो की, ‘महात्मा गांधी यांचे
तत्त्वज्ञान जितके सोपे वाटते, तितकेच ते अंगिकारण्यास अवघड आहे. गांधी
तत्त्वज्ञान आचरणात आणणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. याचे कारण म्हणजे आपल्या
सर्वांभोवती चढलेली भौतिकवादाची, चंगळवादाची पुटे होय. जोवर आपण ती दूर करीत नाही,
तोवर गांधींची सत्य, अहिंसा आणि मानवतावादी मूल्ये यांपासून आपण दूरच राहू...’ असे मला समजलेल्या
गांधींबाबत मी बोलून गेलो. कार्यक्रम झाला. उत्तमच झाला.
रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास साताऱ्याहून एका ‘अॅकॅडेमिशियन’ व्यक्तीचा फोन आला.
इतक्या उशीरा फोन केला म्हटल्यावर त्यांनी मोठ्या कष्टानेच माझा क्रमांक शोधला
असावा. त्यांनी बोलायला सुरवात केली. म्हणाले, ‘सर, कार्यक्रम चांगला
झाला. मात्र, इतक्या मोठ्या अॅकॅडेमिक कार्यक्रमात तुम्ही अत्यंत
नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरलात. विशेषतः गांधीजींच्या संदर्भात हा शब्द वापरल्याने तो
अधिक खटकला.
तुम्हाला कदाचित दिवसभरातही अनेकांचे फोन आले असतील त्यासाठी. पण म्हटले आपणही
सांगायला हवे, म्हणून फोन केला.’
इकडे त्याच्या शब्दागणिक माझी हवा टाइट होत
चाललेली. फोन तर इतर कोणाचाही नव्हता आलेला. सध्याचा काळ काही
बोलण्या-लिहीण्यासाठी अत्यंत बेकार स्वरुपाचा आहे. कोणाच्या भावना कुठे दुखावल्या
जातील अन् कोणाच्या अस्मितांना कधी धक्का पोहोचेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे
नाही म्हटलं तरी मी टेन्शनमध्ये येत चाललो होतोच. मी विचारलं, ‘अहो, कोणता शब्द, ते
तरी सांगा.’ त्यावर महोदय उत्तरले, ‘येरागबाळा हा शब्द
तुम्ही वापरलात, हे काही योग्य केले नाहीत. विद्यापीठासारख्या अॅकॅडेमिक
व्यासपीठावरुन असा नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरला जाणेच मुळात आक्षेपार्ह आहे.’ मनात म्हटलं, ‘बाप रे! आता या शब्दाचा
वापर ज्या संदर्भात केला आहे, ते लक्षात न घेता या महोदयांची गाडी या शब्दावरच
अडून बसलेली आहे.’ आजकाल असा ट्रेन्डच झालाय म्हणा. एखाद्या
वाक्याचा मागील पुढील संदर्भ काढून टाकायचा आणि आपल्याला हव्या त्या संदर्भानं तो
पेश करायचा की झालं. आपली ठरविलेला मोहीम यशस्वी होते. इथे मात्र यांचा रोख तसा
थेट नव्हता. नसला तरी त्यांनी फोन करून सांगण्याची भूमिका मला आजच्या भोवतालात
स्वागतार्ह वाटली. म्हणून मग त्यांचं निरसन करायचं ठरवलं. सुरवातीला उद्धृत केलेलं
वाक्य आठवून मी पुन्हा त्यांना सांगितलं. आणि मग म्हणालो, येरागबाळा हा काही नॉन-अॅकॅडेमिक
अथवा असंसदीय शब्द आहे, असं म्हणता येणार नाही. संत तुकोबारायांनी योजलेला शब्द
आहे तो. पर्यायी इंग्रजीत सांगायचं तर, गांधी तत्त्वज्ञानावर बोलणं आणि त्याहूनही
ते आचरणात आणायचं म्हणजे कोणाही ‘टॉम,
डिक वा हॅरी’चं
काम नाहीये ते! हिंदीमध्ये
आपण त्यांना ‘लल्लू-पंजू’ असंही म्हणतो. मी त्यांना असं बरंच काही सांगत राहिलो. त्यांचं
समाधान झालं की नाही, त्यांनी समाधान मानून घेतलं की नाही, माहीत नाही. पण, या
शब्दाच्या नॉन-अॅकॅडेमित्वात मात्र मी गुरफटला गेलो.
कोणत्याही विद्यापीठात न शिकलेले
तुकोबाराया हे स्वतःच एक संतपीठाचे महान विद्यापीठ बनून राहिले आहेत. त्यांच्यावर,
त्यांच्या गाथेतील शब्दावर नॉन-अॅकॅडेमित्वाचा आरोप करणाऱ्या तथाकथित अॅकॅडेमिशियन्सच्या
तुकाराम शिकवायच्या अधिकारावरचंच प्रश्नचिन्ह वाटलं ते मला. अनुभवाशिवाय बोलणाऱ्यांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेताना संत
तुकारामांनी म्हटले आहे की,
नका
दंतकथा येथे सांगू कोणी।
कोरडे
ते मानी बोल कोण।।
अनुभव
येथे व्हावा शिष्टाचार।
न
चलती चार आम्हांपुढे।।
निवडी
वेगळे क्षीर आणि पाणी।
राजहंस
दोन्ही वेगळाली।।
तुका
म्हणे येथे पाहिजे जातीचे।
येरागबाळाचे
काय काम।।
अर्थात, कोणत्याही विषयातले (विशेषतः
अध्यात्मातील) तुम्हाला काहीही कळत नसताना आपल्याला खूपच कळते, असा आव आणून
त्यासंदर्भात कपोलकल्पित कथा रचून लोकांना सांगणारे वाचाळवीर खूप असतात. त्यांना
फटकारताना तुकोबाराय म्हणतात की, तुम्ही मंडळी, येथे लोकांना दंतकथा सांगत बसू
नका. अनुभवविरहित असे ते आपले बोलणे कोण बरे ऐकत बसेल? अनुभव असेल तरच बोलावे, हाच शिष्टाचार बनला पाहिजे. अन्यथा
अनुभवाविना बोलणाऱ्यांची आमच्यापुढे काही खैर नाही.
राजहंस जसा पाण्यात मिसळलेले दूध
पाण्यापासून वेगळे काढून पितो, त्याप्रमाणे अनुभवी व्यक्ती भल्याबुऱ्याचा विवेकाने
विचार, निवाडा करतात. असा राजहंसीय नीरक्षीरविवेक करण्यासाठी असा जातीचाच (अर्थात
अनुभवी) व्यक्ती लागतो. ते कोणाही येरागबाळ्याचे काम नाही.
आता साक्षात संत तुकारामांनीच अधिकृत
केलेल्या या शब्दाला अशैक्षणिक, असंसदीय मानावे तरी कसे बरे? त्यानंतरच्या गेल्या शेकडो वर्षांत तुकारामांचा हा शब्दप्रयोग अनेक संत,
साहित्यिक, पत्रकार, लेखकांनी आपापल्या लेखनामध्ये आवर्जून वापरल्याची अनेक
उदाहरणे आहेत. ज्येष्ठ अभिनेते नीळू फुले यांनी ‘येरागबाळ्याचे
काम नोहे’ या
शीर्षकाच्या नाटकातूनच मराठी रंगभूमीवर तसेच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते,
हेही लक्षात घ्यावे लागेल. खरे तर तुकारामांचे लेखन हा सार्वकालिक संदर्भाचा
प्रमुख स्रोत आहे, असे म्हणता येईल इतका सुवचनांचा, शब्दप्रयोगांचा, वाक्प्रचार,
म्हणींचे त्यात उपयोजन आहे.
तुकारामांचा विषय येथे ताणवण्याचे कारण
नाही, मात्र हे सारे विवेचन यासाठीच की आपली शैक्षणिक आणि अशैक्षणिकत्वाची समज
खुरटत, खुंटत चालली आहे का, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. आपण आपली समज
विवेकापेक्षा सध्या भोवतालात सुरू असलेल्या गदारोळाच्या दावणीला बांधू लागलो आहोत
का, याचा विचार करण्याचीही नितांत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ‘अॅकॅडेमिक्स’भोवती
आधीच घोंघावू लागलेले मळभ अधिकच दाट होऊन काळोख वाढण्याचीच शक्यता
अधिक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा