ज्येष्ठ संशोधक प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे प्रतिपादन
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटनपर पुष्प गुंफताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. |
कोल्हापूर, दि. ३ मे: पर्यावरणपूरक व स्वच्छ
ऊर्जानिमिर्तीसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये डॉ. भालचंद्र काकडे यांनी
मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे संशोधनाच्या क्षेत्रात मोठी पोकळी
निर्माण झाली, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ संशोधक व शिवाजी
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आज येथे केले.
‘भालू’ज् फ्रेंड्स वॉट्सअप ग्रुप’ आणि आ’लोकशाही युट्यूब वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
ऑनलाईन ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाले’चे उद्घाटनपर पुष्प गुंफताना ते बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या शुभेच्छापर संदेशाने झाले.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, तरुण,
हुशार आणि बुद्धीमान अशा डॉ. काकडे यांनी शाश्वत ऊर्जेच्या विकासाच्या दिशेने आपल्या
संशोधनाची दिशा केंद्रित केलेली होती. जैविक इंधनाच्या अतिरेकी वापरामुळे
निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होते. ते कमी करण्याची गरज लक्षात
घेऊन डॉ. काकडे यांनी केवळ सौर आणि पवन ऊर्जाच नव्हे, तर त्यापुढे जाऊन
पर्यावरणपूरक व स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्यासाठी नवीन स्वदेशी तंत्रज्ञान विकास
करण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी चेन्नईच्या एस.आर.एम. विद्यापीठात
अगदी अल्पावधीत अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा विकसित केली होती. फ्युएल सेल,
सुपरकपॅसिटर, कार्बन नॅनोट्यूब्ज, ग्राफिन, मेटल नॅनो पार्टिकल कम्पोझिट्स
निर्मिती अशा विविधांगांनी त्यांनी तेथे प्रयोग आरंभले होते. त्रिमितीय नॅनो
मटेरियलच्या माध्यमातून पृष्ठीय क्षेत्रफळ अत्यधिक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या
निर्मितीसाठी ते प्रयत्नरत होते, ज्याद्वारे अधिकाधिक उत्तम क्षमतेचे फ्युएल सेल
निर्माण करणे शक्य होणार होते. यामध्ये केवळ पाण्यापासून स्वच्छ अशी हायड्रोजन
ऊर्जा मिळवून त्याआधारे वीजनिर्मिती करण्याचे ध्येय त्यांनी बाळगलेले होते. या
ऊर्जेच्या सहाय्याने छोटी मोठी वाहनेच नव्हे, तर अगदी रेल्वे सुद्धा आपण चालवू
शकतो, असा दुर्दम्य विश्वास त्यांच्या मनात होता आणि त्या दिशेने त्यांचे संशोधन
चालू होते. अशा प्रयोगांसाठी तज्ज्ञ संशोधकांचा चमू जमविणे हे सुद्धा आव्हानास्पद
होते कारण या विषयावर संशोधन करणारे खूप कमी संशोधक देशात आहेत. मात्र डॉ. भालचंद्र
काकडे यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन.सी.एल.), आयआयटी, मुंबई आणि चेन्नई
येथील उत्तम तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ यांना एकाच मंचावर आणून स्वच्छ ऊर्जा
निर्मितीसाठी भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी उचलली होती. त्यासाठी
आवश्यक असणारी बौद्धिक प्रगल्भता आणि आर्जव यांचा अतिशय अनोखा संगम डॉ. काकडे
यांच्या व्यक्तीमत्त्वात आढळतो.
डॉ. पी.एस. पाटील पुढे म्हणाले, नुकतेच अखिल
मानवजातीने कोरोनासारख्या संकटाचा सामना केला, पण आजघडीला त्याहीपेक्षा भयावह असे
संकट आपल्या अस्तित्वाला आव्हान म्हणून उभे आहे आणि ते आहे पर्यावरण बदलाचे.
जागतिक तापमानवाढीचे हे संकट थोपविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता
आहे. आज जगभरात अब्जावधी वाहने, प्रचंड औद्योगिक कारखाने यामुळे वातावरणात मोठ्या
प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होते आहे. जगाचे सरासरी तापमान गेल्या हजारो वर्षांत
कधी बदलले नव्हते, मात्र १९६५नंतर औद्योगिकीकरणाचा वेग प्रचंड वाढल्याने कार्बन
उत्सर्जनाबरोबरच जगाचे सरासरी तापमानही वाढू लागले आहे, ही चिंतेची बाब आहे. याला
कोळसा, तेल आणि वायू या जैविक इंधनांचे ज्वलन कारणीभूत आहे. निसर्गाचे संतुलन
बिघडण्यामागेही हीच कारणे आहेत. त्यामुळेच महावादळे, महापूर, भूस्खलन आदी
आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणजे कार्बन उत्सर्जनाचे
प्रमाण कमी करणे आणि त्यासाठी जैविक इंधनाऐवजी सौर, पवन या अपारंपरिक
ऊर्जास्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वच्छ ऊर्जेचे
नवनवीन पर्याय शोधणेही आवश्यक आहे. त्या दृष्टीने फ्युएल सेल हा एक महत्त्वाचा
पर्याय म्हणून सामोरा आला आहे. त्याच्या संशोधनाकडेच डॉ. काकडे यांनी लक्ष पुरविले
होते.
भारताला स्टार्टअप राष्ट्र बनवू या!
डॉ. भालचंद्र काकडे यांचा आदर्श घेऊन
युवकांनी संशोधनाच्या क्षेत्रात येऊन नवनिर्मितीच्या कामी योगदान देण्यासाठी पुढे
येणे आवश्यक असल्याचे सांगून प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, समाजाला उपयुक्त अशा
स्वरुपाची एखादी नवकल्पना, नवसंकल्पना घेऊन त्याद्वारे नवीन ज्ञाननिर्मिती करावी,
नवसंशोधन करावे. या नवसंशोधनाचे नवोन्मेषात रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच
उद्योजकता विकास होय. याच माध्यमातून पुढे त्या उद्योगाचे रुपांतर स्टार्टअप
कंपनीमध्ये करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी केवळ पैसा मिळविण्याचे उद्दिष्ट न
बाळगता समाजाभिमुख दृष्टीकोन असायला हवा. अन्यथा भ्रमनिरास होण्याचीच शक्यता आहे. आपल्या
युवकांत नवनिर्माणाची इतकी क्षमता आहे की आपला भारत संपूर्णतः ‘स्टार्टअप राष्ट्र’ बनू शकेल. त्यासाठी युवकांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्यांचा पुरेपूर
वापर करण्याची तयारी मात्र ठेवायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. काकडे यांच्या संशोधनकार्याचा वसा जपू
या!: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती
व्याख्यानमाले’चे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के यांच्या शुभसंदेशाने झाले. डॉ. काकडे हे शिवाजी विद्यापीठाचे माजी
विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले,
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपली शैक्षणिक कारकीर्द घडविलेल्या डॉ. काकडे यांनी
आपला संशोधकीय कारकीर्दीचा आलेखही सातत्याने उंचावत ठेवला. या क्षेत्रात मोठी
कामगिरी करून दाखविण्याची त्यांची क्षमता त्यांनी सिद्ध केली होती. त्यांच्या
निधनामुळे एका महत्त्वाच्या संशोधकाला देश मुकला आहे. त्यांच्या वैज्ञानिक
कार्याचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेणे ही आपली जबाबदारी आहे. त्या
दृष्टीने ही व्याख्यानमाला उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्याख्यानमालेत उद्या (दि. ४)
वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे
दि. ४ मे हा डॉ. भालचंद्र काकडे यांचा
स्मृतिदिन आहे. या दिवशी सायंकाळी ७ वाजता सदर स्मृती व्याख्यानमालेत बारामती
येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे हे ‘जैविक विज्ञानाचे मानवी
जीवनातील महत्त्व आणि उपयोजन’ या विषयावर व्याख्यान देणार
आहेत. व्याख्यान ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी आ’लोकशाही युट्यूब
वाहिनीला www.youtube.com/c/DrAlokJatratkar
या लिंकवर भेट द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा