डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना डॉ. अजित तेळवे |
कोल्हापूर, दि. ४ मे: निसर्गाने मानवाला भरभरून
साधनसंपत्ती दिली आहे. तिचा आस्वाद घ्या, पण तिला ओरबाडून नष्ट करू नका, असे आवाहन
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे
यांनी आज येथे केले.
संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांच्या ४ मे
या स्मृतिदिनानिमित्त ‘भालू’ज् फ्रेंड्स वॉट्सअप ग्रुप’ आणि आ’लोकशाही युट्यूब वाहिनी यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाले’त ‘मानवी जीवनातील जैविक विज्ञानाचे महत्त्व आणि
उपयोजन’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. तेळवे म्हणाले, निसर्गचक्रात मानवी
हस्तक्षेपामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अन्य प्राणी आणि वनस्पतींप्रमाणेच
आपणही निसर्गचक्राचा एक घटक आहोत, हे विसरून माणूस आपण या साऱ्यांचे मालक
असल्याच्या आविर्भावात वागू लागला, तिथेच सर्व समस्यांचे मूळ आहे. वनस्पती
त्यांच्यावर सोपविलेले अन्न-उत्पादनाचे कार्य पूर्ण करतात, अन्य जैविक घटकांकडे
सोपवितात आणि शेवटी निसर्गातच मिसळून जातात. निसर्गातून येऊन पुन्हा निसर्गातच
मिसळून जाण्याचा हा गुणधर्म मानव विसरला. त्याने प्लास्टीकसारखे निसर्गबाह्य घटक
निर्माण केले, ज्यांच्या विघटनाला लाखो वर्षे लागू शकतात. त्यांच्यावर किमान
पुनर्प्रक्रिया करून निसर्गाचे अस्तित्व जपण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.
गरजेपेक्षा अधिक ओरबाडण्यापेक्षा शाश्वत विकासाची वाट धरणे आज नितांत गरजेचे आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज स्पष्ट
करताना डॉ. तेळवे म्हणाले, वनस्पती आपल्याला अन्नासह चारा, औषधे, रंग, डिंक
इत्यादी जीवनावश्यक पदार्थ देतात. प्राणीमात्रांच्या सर्व गरजा त्यातून पूर्ण
होतातच, पण त्याचबरोबर प्रत्येक झाडाच्या परिसरात प्राणी, पक्षी, कीटक यांची एक
स्वतंत्र परिसंस्था साकार झालेली असते. जगात अशा साडेचार लाख वनस्पती आहेत आणि
प्रत्येक वनस्पती ही तितकीच उपयुक्त आहे. अन्नाचे उत्पादक असल्यामुळे वनस्पतींची
परिसंस्थेत मूलभूत भूमिका आहे. आपल्या दैनंदिन आहारात मीठ वगळता इतर सर्व पदार्थ
हे वनस्पतीजन्य असतात. एखादी वनस्पती जर नष्ट झाली, तर आपण तिच्यासारखी दुसरी
पर्यायी वनस्पती निर्माण करू शकत नाही, हे तिचे महत्त्व असते. त्याखेरीज आपले
पर्यावरण आल्हाददायक बनविण्याबरोबरच कार्बन डायऑक्साईडचे संतुलन राखणे, प्रदूषणाचे
प्रमाण कमी करणे, जमिनीची धूप रोखणे या बाबीही वनस्पती करीत असतात. त्यांच्या या
महत्त्वपूर्ण योगदानाकडे आपण दुर्लक्ष करतो.
भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असल्याचे
सांगताना डॉ. तेळवे म्हणाले, जगामध्ये जैवविविधतेने संपन्न व समृद्ध अशी अवघी २४
ठिकाणे आहेत. त्यापैकी दोन एकट्या भारतात आहेत. एक म्हणजे हिमालय पर्वतरांग आणि
दुसरी म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. या सह्याद्रीच्या पट्ट्यातील रहिवासी म्हणून
आपण स्वतःला सुदैवी समजायला हवेच, मात्र त्याचबरोबर या जैवविविधतेचे संरक्षण आणि
संवर्धन करणे, ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या
पर्यावरणाचे शक्य तितके संवर्धन करावे. आयुष्यात किमान एक झाड लावून ते वाढवावे,
असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात सुरवातीला डॉ. भालचंद्र
काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. विरेंद्र बाऊचकर (जयसिंगपूर), अभियंते
श्रीनिवास व्हनुंगरे (बेळगाव) आणि सौ. सुलेखा सुगते-अटक (पुणे) यांनी आदरांजलीपर
मनोगते व्यक्त केली. डॉ. काकडे यांच्याविषयी ‘अनुप जत्राटकर मोशन पिक्चर्स’च्या
वतीने निर्मित विशेष ध्वनीचित्रफीतही यावेळी प्रदर्शित करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा