सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

‘वाणी’प्रभू तरुणाईच्या सान्निध्यातला एक प्रसन्न दिवस












जेव्हाही मला संधी मिळते तरुणांच्या समवेत वेळ घालवण्याची, त्यासाठी मी कधीही तयार असतो... कालचा पुण्यातला दिवसही असाच माझ्या आवडीचा होता... इथल्या परिवर्तन वक्तृत्व वाद मंडळाच्या वतीनं ‘परिवर्तन युवा वक्ता-२०२२’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेचं हे सहावं वर्ष. यंदाच्या स्पर्धेला परीक्षक म्हणून मला बोलावण्यात आलेलं... मुळात या स्पर्धेची आयोजक मंडळीच खूप वेगळी आहेत... म्हणजे हे लोक लौकिकार्थानं अद्याप फार कुठं फार माहितीत आलेली नसतील, पण खऱ्या अर्थानं ती भारीयत... हे सारे युवा आयोजक म्हणजे अगदी लगतच्या काळात कुठल्या ना कुठल्या वक्तृत्व स्पर्धेत चमकलेली... बक्षीस मिळविलेली आणि कधी कधी हरलेली सुद्धा! पण, महत्त्वाचं म्हणजे वक्तृत्वकलेवर मनापासून प्रेम करणारी... या आयोजक तरुणांचा सर्व्हायवलसाठीचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. पण, या कलेवरल्या केवळ सच्च्या प्रेमाखातर राज्यातल्या ठिकठिकाणाहून ती या एका दिवशी एकत्र येतात... पदरमोड करतात... इकडून-तिकडून निधी जमवतात आणि राज्यातली एक महत्त्वाची ठरू पाहणारी वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणानं घेतात... असं हे सहा वर्षं चाललंय... महत्त्वाचं म्हणजे अगदी पहिल्या वर्षापासून ५०पेक्षा जास्तच स्पर्धक यात राज्यभरातून सहभागी होतात... प्रा. पांडुरंग कंद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी स्वामिराज भिसे, प्रवीण शिंदे ही यातली महत्त्वाची लीडर नावं असली तरी त्यांना खांद्यावर उचलून धरणारी शेखर सोनार, आशुतोष बच्छाव, विशाल जगदाळे, अश्विनी टाव्हरे आणि परिवर्तनची संपूर्ण टीमही तितकीच तोलामोलाची आहे... प्रचंड धावपळ करून अत्यंत नियोजनबद्धरित्या स्पर्धा पार पाडण्याच्या कामी या चमूचं फार महत्त्वाचं योगदान असतं, हे यंदा प्रत्यक्षच अनुभवलं...
यंदाच्या स्पर्धेचं समन्वयकपद शेखरकडं असलेलं... त्यानंही ते नेटानं निभावलं. प्रवीणची धावपळ म्हणजे तर त्याच्या घरचं लगीन असल्याप्रमाणंच! या स्पर्धेचं सुरवातीपासूनचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेसाठीचे विषय... ते कधीच सरधोपट वा अगदी सरळमार्गी नसतात... स्पर्धकानं वाचन, मनन, चिंतन जर योग्य रितीनं केलं नाही, तर तो घरंगळलाच म्हणून समजा! पण, तसं फार क्वचित होताना दिसलं. कारण, कोणत्याही तरुणाईला चॅलेंजेस घ्यायला आवडतात... यंदाच्या स्पर्धेत साठहून अधिक स्पर्धकांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि उत्तमरित्या निभावलंही... यंदाचे विषय ऐकाल, तर आपणही थक्क व्हाल... आपलं बेसिकच गंडलेलं आहे, वुई आर एट वॉर- देअर इज नो टाइम फॉर रोमान्स..., आम्ही फँड्रीतला जब्या तंतोतंत जगलेली मुलं आहोत, सबंध महाराष्ट्र पुरोगामी कधीच नव्हता, वाटते बंदिस्त केलेय मला कुणीतरी युगायुगांचा कैदी म्हणून, बरे झाले देवा निघाले दिवाळे... असे खणखणीत सहा विषय होते. मुलांनी अवघ्या सहा-सहा मिनिटांत आपापल्या परीनं इतकं काही भारी सांगण्याचा प्रयत्न केला की कित्येकदा परीक्षक असूनही टाळ्या वाजवण्यासाठी हात शिवशिवत... कंट्रोल करावं लागलं... पारदर्शकता तर इतकी, की आम्हा परीक्षकांना प्रत्येक स्पर्धकासाठी स्वतंत्र स्कोअरकार्ड दिलेलं होतं... त्यावर त्याचे गुण, त्याच्या सकारात्मक बाजू आणि सुधारणेची क्षेत्रे ही प्रत्येक परीक्षकाच्या स्वाक्षरीनं देण्यात आली. दर पाच स्पर्धकांनंतर ती स्कोअरकार्ड गोळा केली जात. अंतिम प्रमाणपत्रासोबत ही सर्व स्कोअरकार्ड प्रत्येक स्पर्धकाला देण्यात आली. त्यामुळे स्पर्धक विद्यार्थ्याला पुढील तयारीसाठी अधिक ‘तयार’ करण्याचा आयोजकांचा हेतू स्वच्छपणानं सामोरा आला. परीक्षकांची ओळख बक्षीस वितरण समारंभापर्यंत गोपनीय ठेवण्यात आली, हे आणखी एक विशेष!
पारितोषिक वितरण समारंभासाठी ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. प्रवीण दवणे सर आणि ‘रिंगण’चा संपादक सन्मित्र सचिन परब उपस्थित राहिले. या दोघांची खूप दिवसांनी भेट झाल्याचा आनंद अवर्णनीयच... त्याशिवाय, लातूरचे सरकारी वकील श्री. गिरवलकर सर आणि पत्रकारितेत उत्तम काम करणारी हालिमा कुरेशी यांचा या परीक्षणाच्या निमित्तानं नवपरिचय झाला, हे महत्त्वाचं! उमेश कुदळे हे आणखी एक अवलिया व्यक्तीमत्त्व भेटलं... त्याविषयी तर स्वतंत्र पोस्टच लिहावी, इतकं भारावून टाकणारं काम ही व्यक्ती करते आहे... पुण्यातली ही परिवर्तन युवा वक्ता स्पर्धा म्हणजे परीक्षक असूनही मला एकूणातच समृद्ध करणारी अनुभवयात्रा ठरली, असं म्हणायला हरकत नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा