आजची सकाळ पुन्हा एकदा तरुणाईच्या सान्निध्यात, त्यांच्यासमवेत संवादामध्ये घालविता आली, ती सन्मित्र प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांच्यामुळे!
डिसोझा सरांनी त्यांच्या वारणानगरच्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचालित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आज ‘शिक्षण, उद्योग-व्यवसायातील समान संधी आणि सामाजिक समता’ या विषयावर माझं विशेष व्याख्यान आयोजित केलं. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वंचित घटकांना न्याय देण्यासाठी समान संधी केंद्र प्रत्येक महाविद्यालयात स्थापन करण्याचे आवाहन केलं. त्यानुसार या महाविद्यालयातही ते स्थापन करण्यात आलं. समान संधी म्हणजे नेमकं काय? इथंपासून ते या केंद्रानं नेमकं काय करणं अभिप्रेत आहे आणि त्यातून कोणता परिणाम अपेक्षित आहे, इथंपर्यंत अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरांसह विषयाची व्याप्ती आणि परीघ इथल्या शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी यांच्यासमोर मांडण्याची जबाबदारी घेऊन त्यांच्यासमोर मी उभा होतो. मुळात भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यापासूनच ज्या दर्जा व संधींचं सुतोवाच करण्यात आलंय आणि समानतेच्या, स्वातंत्र्याच्या हक्काची कलमं जिथं पानोपानी आहेत आणि कलम ४६नुसार देशातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन व हितरक्षणाची ग्वाही देण्यात आली आहे, त्या समान संधींचा परीघ हा केवळ कोणाही एका कॅम्पसपुरता मर्यादित राहण्याची शक्यताच असू शकत नाही. व्यक्ती हे मूल्य आणि त्या व्यक्तीचा विकास हे ध्येय घेऊन अखिल भारत देशामध्ये समता प्रस्थापनेचा हा एक हुंकार म्हणून या विषयाकडे पाहण्याची गरज आहे. एक माणूस आणि या देशाचा नागरिक म्हणून आपलं अस्तित्व, जगणं, आपलं असणं, आपलं बोलणं, आपला विवेक, आपलं शहाणपण हे सारंच तर संविधानानं अधोरेखित केलेलं आहे. हे आपल्या जाणिवेतच नाही, तर नेणिवेत कोठून येणार? त्यामुळं या जाणीवा विकसनाच्या दृष्टीनं आज या तरुणाईशी सुमारे तासाभराहून अधिक काळ संवाद साधला. ही मुलं खूप प्रांजळ होती... मुलं तशी असतातच. संविधानाच्या तमाम अधिकारांचा, हक्कांचा पुरेपूर वापर करीत असूनही त्याविषयी आपण अनभिज्ञ असल्याचं त्यांनी मान्य केलं, मात्र ते समजून घेण्याची असोशीही त्यांनी दाखविली. फुले, शाहू, आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी संविधान सभेतल्या तमाम दिग्गजांचं योगदान आणि भूमिका त्यांनी समजून घेतली. सरनाम्यातल्या ‘आम्ही’ची जाणीव त्यांच्यामध्ये विकसित होताना मला त्याच क्षणी दिसली. या देशातल्या तमाम वंचित, शोषित वर्गाला त्यांचे समानतेचे न्याय्य हक्क प्रदान करण्याची ग्वाही जणू आम्ही सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून दिली आणि ते हात कधीही न सोडण्याची प्रतिज्ञाही!
या कार्यक्रमास बोलावल्याबद्दल डॉ. डिसोझा यांच्यासह डॉ. अमोल शेरीकर, त्यांच्या सहकारी प्रा. उमा माळी यांना तर धन्यवादच द्यायला हवेत. पण, ज्यांच्या प्रेरणेतून सर्वत्र हा उपक्रम घेतला जातो आहे, ते सामाजिक न्याय विभागाच्या कोल्हापूर विभागाचे आयुक्त आमचे मित्र विशाल लोंढे यांचंही या निमित्तानं अभिनंदन करायला हवं. त्यांना धन्यवादही यासाठी की या समान संधी उपक्रमामुळे तरुणाई संविधानाशी जोडली जातेय, नाते मजबूत करू पाहत्येय. शेवटी सामाजिक न्यायाच्या कोणत्याही उपक्रमाचा हेतू हा माणसं जोडणं, हाच तर आहे... आणि संविधान हाच त्यासाठीचा सेतू आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा