रविवार, ११ जून, २०२३

... शहर में शायद दंगा होने वाला है।(मुंबईस्थित 'दै. नवशक्ति'च्या रविवार, दि. ११ जून २०२३ रोजीच्या अंकात 'दखल' या सदरांतर्गत प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रसारित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)

भारतीय संविधान या देशातील नागरिकांना आम्ही म्हणायला शिकविते. आम्ही, भारताचे लोक या शब्दांनी संविधानाची सुरवात होते. त्यात एकत्व, एकराष्ट्रीयत्वाची ठाम भावना आहे. ती जातधर्मादी अशी कोणत्याही प्रकारच्या भेदांहून निरपेक्ष आहे. त्यामध्ये कोठेही आम्ही आणि तुम्ही किंवा आम्ही आणि ते अशा सापत्न, भेदसूचक भावनांना थारा नाही. असे असले तरी व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रवृत्ती आणि विकृती असतातच. अशाच काही विकृतींची कीड या सांविधानिक भावनेला जाणीवपूर्वक ग्रासू लागल्याच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार सामोऱ्या येत आहेत. काही प्रवृत्तींचे हेतूच जणू कट्टरतावाद आणि सामाजिक, जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या बळावर पोसलेले असते. त्यांना त्यांच्या स्वार्थापुढे सलोख्याशी काही देणेघेणे नसते. समाज सातत्याने अशांत, अस्वस्थ कसा राहील, या दिशेनेच अशा प्रवृत्तींचे समग्र प्रयत्न एकवटलेले असतात. त्या अर्थाने ते एक्स्ट्रीमिस्टच (अतिरेकी) म्हणायला हवेत. अतिरेकी म्हणजे काही कोणी तुमच्या छातीवर एक-४७ रोखूनच उभारायला हवा, असे नसते. इथे एक अप्रत्यक्ष स्युडो-नॅशनॅलिझमचे अस्त्र संपूर्ण सामाजिक शांतता, सौहार्द आणि सलोख्यावर डागण्यात आलेले असते, ज्याद्वारे जनमानस भयभीत होऊन त्यांच्या दुर्हेतूंची पूर्तता करण्याकडे समाजाचा कल झुकू लागतो. जोपर्यंत हा सामाजिक फुटीरतेचा हेतू साध्य होत नाही, तोवर असे प्रयत्न वारंवार केले जात राहतात; समाजातली, समाजमानसातली दरी वाढवत नेली जाते आणि ज्या क्षणी ते साधले जाते, तेव्हा समाज पूर्णतः दोन टोकांवर दुभंगावस्थेत लोंबकळू लागल्याचे आपल्याला दिसते.

आजकाल अशा फुटीरतावादी प्रवृत्ती अनेकविध बाबींचे मॅग्नीफिकेशन करून समाजमानस परस्परांप्रती कलुषित करण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहेत. भारत-पाकिस्तान करता करता आता हा अजेंडा लव्ह जिहादपर्यंत येऊन ठेपला आहे. द केरला स्टोरी याचे उत्तम उदाहरण ठरावे. केरळमध्ये असे अवघे तीन प्रकार नोंद झाले. मात्र, चित्रपटात त्या तीनाचे तीस हजार करून दाखविण्यात आले. चित्रपटाच्या निर्मात्याने हायकोर्टामध्ये मान्य केलेले हे तथ्य आहे. म्हणजे या मॅग्निफिकेशनचे प्रमाण एक-दोन नव्हे, तर तब्बल तीस हजार पट अधिक आहे. हेतूपुरस्सर, फूस लावून होणारी प्रकरणे होत नसतील, असे अजिबातच नाही. पण, त्यांचे जे प्रमाण इथे वर्धित करून सांगितले जाते, ते घातक आहे. प्रेमात पडण्याच्या वयात माणूस जात, धर्म वगैरे थोडेच पाहातो? एखादी व्यक्ती आवडते आणि तिच्या साथीत एखाद्याला राहावेसे वाटते. मात्र, यातील एक परधर्मीय असेल, तर ती व्यक्ती लव्ह जिहादी ठरते, मग त्याला लव्ह जिहाद माहिती असो अगर नसो!

पूर्वी सामाजिक अशांतता बिघडवायची म्हटलं की, हिंदू-मुस्लीमांत तेढ पसरवायची आहे की, सवर्ण-दलितांत दंगल माजवायची आहे, त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापैकी एकाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार घडवून आणल्याची उदाहरणे आहेत. अगदी आजही कुठे-कुठे या घटना जाणीवपूर्वक घडविल्या जाताना दिसतात. मात्र, आज या दंगली पसरविण्याचे काम आणखीच सोपे बनले आहे. फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटसवर कोण, काय लिहीतो, कोणाचा फोटो पोस्ट करतो, यावरुनच आता दंगली घडवून आणल्या जात आहेत. मुळात ते स्टेटस ठेवणाऱ्याचे स्टेटस काय, ते पाहणारा समुदाय किती, ते स्टेटस या विरुद्ध गोटापर्यंत पोहोचते कसे, या गोष्टींचा विचार येथे होत नाही. मात्र, त्याचा आधार घेऊन कोट्यवधींचे नुकसान येथे केले जातेच, पण विशिष्ट समाजघटकांना लक्ष्य करून ज्या गोष्टी केल्या जातात, त्यातून समाजस्वास्थ्याचे मात्र दूरगामी नुकसान होते. एखादा कोणी तरी अविवेकी व्यक्ती काही तरी स्टेटस लावतो म्हणून संपूर्ण समाजच त्याला जबाबदार कसा असू शकतो? मात्र, ती जबाबदारी या ध्रुवीकरणोत्सुक प्रवृत्तीच निश्चित करीत असून त्यासाठी पाठीराख्यांची मोठी फौज घेऊन रस्त्यावर उतरून सामाजिक-धार्मिक असंतोष, विखारी विद्वेष निर्माण करीत आहेत.

मध्यंतरी कोल्हापूरमध्ये एका बिर्याणी सेंटरमध्ये बादशहा बहादूरशाह जफर यांचे पोस्टर लावले होते. केवळ बिर्याणीशी देणेघेणे न राखता काही युवकांनी औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर लावले म्हणून त्या सेंटरची मोठी तोडफोड केली. आता बहादूरशहा जफर यांचे १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात किती महत्त्वाचे योगदान होते, हे त्यांना कोणी सांगावे? बहादूरशहा आणि त्याच्या अपत्यांना याची किती मोठी किंमत चुकवावी लागली, हे तरी कोण लक्षात घेणार? बहादूरशहाला इंग्रजांनी रंगूनला नजरकैदेत ठेवले, तेथेच त्याचा मृत्यू झाला. शाही खानदानातल्या २९ युवकांची हत्या करण्यात आली. पळून जाण्यात यशस्वी झालेल्या त्याच्या दोन शहजाद्यांना उदयपूर आणि टोंक इथं भिकाऱ्याचं जीणं वाट्याला येऊन त्याच अवस्थेत मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. हा बहादूरशहाचा भारतीय स्वातंत्र्यासाठीचा त्याग नव्हे काय? मात्र, तो औरंगजेबाच्या घराण्यातील औलाद म्हणून केवळ इथे तिरस्कारास पात्र ठरतो. मग, अकबराचं काय करणार आहोत आपण? दीन-ए-इलाहीसारखा सर्वधर्मसमभावाधिष्ठित धर्म जगाला सांगणारा हा बादशहा लवकरच औरंगजेबासारख्याचा बापजादा म्हणून या देशात आपण तिरस्करणीय ठरविणार काय?

कोलाहल, गोंगाट इतका वाढवित न्यायचा की कोणालाही काहीही समजेनासे झाले पाहिजे. गोंधळ निर्माण झाला पाहिजे. जनमानस संभ्रमित झाले पाहिजे. अशा संभ्रमितांचा गदारोळ निर्माण करून आपले हेतू त्या लाटेवर साध्य करून घ्यायचे, असा हा सारा माहौल आपल्या सभोवताली वावटळीसम गरगरविला जातो आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामित्वाला हरताळ फासण्याच्या प्रक्रियेची सुरवात शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे आणि ही आग शांत न होता, धुमसत, धुमसत तिचे राष्ट्रव्यापी असंतोषात रुपांतर करण्यासाठी या ध्रुवीकरणवादी प्रवृत्तींची जी धडपड सुरू आहे, ती योग्य नाही. एखाद्या समाजाला दैनंदिन पातळीवर त्याची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागणे, त्याला अतिरेकी, लव्ह जिहादी, देशद्रोही ठरविणे यातून एखाद्या क्षणी त्या समाजामध्ये तसेच वर्तन करून दाखविण्याची ऊर्मी उसळी मारुन वर आली, तर तो क्षण या फुटीरतावादी प्रवृत्तींच्या विजयाचा असेल. त्यामुळे भारताची सामाजिक-धार्मिक सौहार्दाची घडी विस्कटवण्याच्या प्रयत्नांना भीक न घालता एकी कायम ठेवण्याचा संदेश देशभरात पाठवणे, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहणे, हीच आजघडीची मोठी गरज आहे. शायर परविंदर शोख़ यांनी आपल्याला इशारा देऊन ठेवलाच आहे की-

नाम पे मज़हब के जमघट है लोगों का,

शहर में शायद दंगा होने वाला है


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा