शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे
माजी प्राध्यापक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे माजी संचालक
डॉ. भगवान माने लिखित व संपादित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते
धम्मचक्र प्रवर्तन’ हे एक महत्त्वाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले
आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात सन १९१९पासून ते १९५६ पर्यंत सामाजिक न्याय
प्रस्थापनेसाठी केलेल्या चळवळींचे समग्र दस्तावेजीकरण करण्याचे काम या पुस्तकाने
केले आहे.
बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या
सर्व चळवळींच्या मुळाशी सामाजिक-आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापनेचे तत्त्व होते.
अगदी धम्मक्रांतीच्या मुळाशीही सामाजिक-राजकीय परिवर्तन साध्यतेचा हेतू होता.
विषमता हाच स्थायीभाव असलेल्या भारतीय समाजाला लोकशाही मूल्यांचा परिचय करून देऊन
मूल्याधारित समता व सामाजिक न्यायासाठी आग्रही चळवळींचे बीजारोपण खऱ्या अर्थाने या
भूमीमध्ये बाबासाहेबांनी केले. साऊथबरो फ्रॅंचाईज कमिशनसमोरील साक्षीपासूनच बाबासाहेबांचा
हा मूल्याग्रह प्रकर्षाने सामोरा येत राहतो. तो पुढे टप्प्याटप्प्ने अधिकाधिक
टोकदार होत गेलेला आहे. सायमन कमिशनसमोरील साक्षीपासून पुढे बहिष्कृत हितकारिणी
सभेची स्थापना, महाडचा सत्याग्रह, अंबादेवी मंदिर सत्याग्रह, मनुस्मृती दहन,
पर्वती मंदिर सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, तीनही गोलमेज परिषदांतील
कामगिरी, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट
फेडरेशन पक्षाची स्थापना आणि धम्मचक्र प्रवर्तन या चळवळींचा सर्वंकष आढावा घेऊन
त्यांचा अन्वयार्थ समजावून देण्याचा प्रयत्न येथे दिसतो. त्याच बरोबर त्यांच्या
प्रस्तुततेच्या अनुषंगानेही चर्चा केली आहे.
‘भारताला स्वातंत्र्य
मिळाल्यानंतर भांडवली विकासाचे आधुनिकीकरणाचे नेहरू प्रारूप आपण स्वीकारले.
त्यामध्ये समाजवादाचा विचार अभिप्रेत होता. सन १९९२पासून नवीन आर्थिक धोरणाचे पर्व
सुरू झाले. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणामुळे बेरोजगारी,
खाजगी उद्योगधंदे, राखीव जागांच्या विरोधी धोरण, गरीब, वंचित वर्गाच्या विकासासाठी
राबविण्यात येणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. दलित पँथरने नुकतीच पन्नाशी
पूर्ण केली, परंतु त्या अगोदरच धगधगत्या चळवळीचा ऱ्हास झाला. मार्क्सवादी आणि
गांधीवादी चळवळी आंबेडकरी चळवळीत दुही निर्माण करतात आणि मूळ डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या आणि बुद्धांच्या विचारात संभ्रम निर्माण करतात. याचा बोध आंबेडकरी
चळवळींच्या अन्वयार्थातून घेतला पाहिजे. नव्या संरचनेत बाबासाहेबांच्या
विचारधारेवरील चळवळी गतिमान केल्या पाहिजेत आणि आंबेडकरी चळवळी गटाचे ऐक्य ही
काळाची गरज आहे.’ असे नेमके विश्लेषण डॉ. माने यांनी केले आहे.
बाबासाहेबांनी केलेल्या चळवळी या विद्यार्थ्यांसह
चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभ्यासपूरक आहेत. त्यासाठी त्यांचे संकलन केले आहे.
वेगळे काही केलेले नाही, असे डॉ. माने प्रांजळपणे सांगतात. तथापि, बाबासाहेबांचे
जीवनकार्य, त्यांच्या चळवळी यांचा कालसुसंगत अन्वयार्थ लावत असतानाच त्यांच्या
प्रस्तुतता सातत्याने अधोरेखित करीत राहणे, ही आजघडीची महत्त्वाची गरज आहे. हे
अधोरेखन सदर पुस्तक पुन्हा नव्याने करते, म्हणूनच त्याची नोंद आवश्यक ठरते.
पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते धम्मचक्र
प्रवर्तन
लेखन व संपादन : प्रा. डॉ. भगवान
माने
प्रकाशन : रुपी पब्लिकेशन्स
प्रा.लि., गडहिंग्लज
पृष्ठसंख्या : २२४
किंमत : रु. २५०/-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा