सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

'मानवमुक्तीच्या पथदर्शका'चा गौरव

प्रा. गौतमीपुत्र कांबळे

प्रा. गौतमीपुत्र कांबळे

प्रा. गौतमीपुत्र कांबळे







प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त 'संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी' आणि 'मानवमुक्तीचा पथदर्शक' या दोन ग्रंथांच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) प्रा. अविनाश सप्रे, डॉ. आलोक जत्राटकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस, डॉ. कांबळे आणि सतीश बनसोडे. (वरील छायाचित्रांत, या समारंभातील विविध क्षणचित्रे...)

 

(फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कृतिशील विचारवंत, साहित्यिक आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त रविवार, दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित सन्मान समारंभातील ग्रंथ प्रकाशन सोहळ्यामधील माझ्या भाषणाचा संपादित अंश...)

समकाळातील या महत्त्वाच्या समतादूताच्या गौरव समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे जाणीवासमृद्ध कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. अविनाश सप्रे, आयु. सतीश बनसोडे, आज प्रकाशित होत असलेल्या संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी आणि मानवमुक्तीचा पथदर्शक या दोन्ही ग्रंथांच्या संपादक मंडळाचे सदस्य डॉ. शशिकांत खिलारे, डॉ. हरिष भालेराव, प्रा. साहेबराव नितनवरे, प्रा. मिलींद वडमारे, डॉ. भरत नाईक, डॉ. प्रवीण चंदनशिवे, संजय पाटील, महेश कराडकर आणि प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्यावरील प्रेमापोटी उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर जन हो,

या समारंभासाठी उपस्थित राहात असताना आणि त्यातही सदर प्रास्ताविक करीत असताना मला अतिशय आनंद होतो आहे. ही संधी मला दिल्याबद्दल संयोजन समितीला मी सुरवातीलाच धन्यवाद देतो.

मित्र हो, आज या प्रसंगी काही व्यक्तीगत आठवणी माझ्या मनी येत आहेत. प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या वाटचालीचा मी माझ्या लहानपणापासूनचा साक्षीदार आहे. काहींना माहिती असेल, कित्येकांना नसेलही की, सांगली ही माझी जन्मभूमी आहे. माझं सुरवातीचं शिक्षणही इथल्याच केसीसी प्राथमिक शाळेत झालं. धम्माचे ज्येष्ठ अभ्यासक कालकथित ए.दा. कांबळे गुरूजी हे माझे आजोबा. त्यांचं घर हे भिक्षू, धम्म विचारवंत आणि चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी चर्चेचं हक्काचं ठिकाण. त्यात प्रा. कांबळे आणि माझे वडील यांचंही चळवळीतल्या मैत्रीचं नातं. त्यामुळं सांगलीतील घरी मी माझे अण्णा आणि प्रा. कांबळे यांच्या चर्चा अनेकदा ऐकलेल्या आहेत. त्यावेळी फारसं समजायचं कारण नसलं तरी हे काही तरी वेगळं आणि गंभीर बोलताहेत, ते आपण ऐकायला हवं, असं वाटायचं. ऐंशीच्या त्या दशकातला तो कालखंड गौतमीपुत्र सरांच्या ऐन उमेदीचा होता. तेव्हाही त्यांच्यातील उमेद आणि उत्साह हा प्रेरणादायी होताच; आणि आजही तो तितकाच प्रेरक आहे.

सरांचं साधं राहणीमान, प्रकृती, शरीरयष्टी, बोलण्यातला ठाशीवपणा, हे इतक्या वर्षांत अजिबातच बदललेलं नाही. उलट काळानं आणि चळवळीप्रती त्यांच्या निष्ठेनं त्याला अधिकच प्रभावशीलता प्रदान केली आहे. आंबेडकरी मूल्यांप्रती त्यांची असणारी निष्ठा ही मला त्यांच्या विचार व कार्याकडं सातत्यानं आकर्षित करणारी बाब ठरली आहे. त्यांच्या विचारांतील स्पष्टता, संयत आणि तरीही आग्रही, आक्रमक अशी थेट राजाभाऊ ढाले यांच्याशी नातं जोडणारी प्रभावी मांडणी, हे मला त्यांच्या एकूण आंबेडकरी चळवळीतील यशाचं इंगित वाटतं. सरांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यक्तीमत्त्वातली व्यापकता आणि प्रचंड सकारात्मकता. तत्त्वज्ञानाचा आणि आंबेडकरी मूल्यांचा पाया लाभलेला असल्यानं त्यांचे विचार आणि कार्य हे केवळ आंबेडकरी समाजापर्यंत सीमित नसून सर्वच समाजघटकांच्या हिताचा, कल्याणाचा विचार करणारं आहे. त्यांचं बोलणं, लिहीणं यांमध्ये शोषक व्यवस्था आणि तिला खतपाणी घालणारी शोषणमूल्यं, सनातनत्व यांविषयी चीड जरूर आहे, पण त्याचवेळी मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेचा आग्रह धरताना समग्र समाजघटकांमधील चांगुलपणाला ते सतत आवाहन करीत राहतात. त्यांचा विद्रोह हा नकाराचा नाही; तर, सर्वसमावेशक स्वीकाराचा आहे. म्हणूनच, तो खऱ्या अर्थानं बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारकार्याशी नातं सांगत राहतो.

रॅशनॅलिझम आणि सेक्युलॅरिझम यांच्या पायावर समताग्रही समाजाची मूल्यात्मक निर्मिती व्हावी, यासाठी केवळ राजकीय अथवा सामाजिकच नव्हे, तर सांस्कृतिक अभिसरणही महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांनी आपली ही चळवळ सामाजिक-सांस्कृतिक विकासाच्या दिशेनं केंद्रित केल्याचं दिसतं. यातून आपल्या मूल्यव्यवस्थेशी अधिक प्रत्ययकारितेनं जोडलं जाता येऊ शकतं, हे त्यांनी सेक्युलर मूव्हमेंट आणि सेक्युलर आर्ट मूव्हमेंटच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. सांविधानिक मूल्यांचाच आधार घेऊन स्तरित, विखंडित समाजनिर्मितीचे अश्लाघ्य प्रयत्न होत असल्याच्या या काळात तर त्यांच्या या कामाचं मोल खूप मोठं आहे.

सरांविषयी बोलण्यासारखं खूप आहे. मात्र, वेळेचं भान राखून प्रकाशित होऊ घातलेल्या ग्रंथांविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. त्यांच्याविषयी डॉ. सप्रे आणि आयु. बनसोडे विस्तारानं बोलणार आहेतच, पण, थोडी प्रास्ताविकपर माहिती मी इथं देतो.

आज आपण प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांच्या सन्मान सोहळ्याच्या अनुषंगानं संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी आणि मानवमुक्तीचा पथदर्शक या दोन महत्त्वाच्या ग्रंथांचं प्रकाशन करीत आहोत. महत्त्वाचे अशासाठी की हे दोन्ही ग्रंथ ‘ANOTHER TWO BOOKS’ अशा स्वरुपाचे नाहीत किंवा गौतमीपुत्र सरांचं केवळ गौरवीकरण करणं, असाही त्यांचा हेतू नाही. त्यापलिकडं एका मोठ्या व्यापक, उदात्त सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

यातील संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी हे सुमारे १८० पृष्ठांचं पुस्तक आहे. यामध्ये प्रा. गौतमीपुत्र सरांची प्रदीर्घ मुलाखत आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील एका सच्च्या कार्यकर्त्याची ही मुलाखत फार द्रष्टेपणातून आणि धोरणीपणाने घेण्यात आलेली आहे. केवळ गौतमीपुत्र सरांच्या कार्याचंच नव्हे, तर समग्र चळवळीचंच या निमित्ताने तत्त्वज्ञानात्मक डॉक्युमेंटेशन करण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

आजचा काळ हा माणसांचं वास्तव कार्य आणि स्मृतींच्या विस्मरणाचा; तर, आभासी आणि फेक (बनावट) स्मृतींच्या निर्मितीचा आहे. माणसं, माणसांचं अस्तित्व यांना नकार देणारा, त्यांना नाकारणारा हा कालखंड आहे. या कालखंडात अनेक हाडामांसाची काम करून गेलेली माणसंही myth बनून राहतील की काय, अशा पद्धतीचा सारा भोवताल आहे. या पार्श्वभमीवर, सदर डॉक्युमेंटेशनचं महत्त्व आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये मधु कांबळे सर आणि भरत शेळके यांच्या संकल्पनेतून प्रा. गौतमीपुत्र सरांची सुमारे वीस तासांहून अधिक काळ मॅरेथॉन मुलाखत घेण्यात आली. कृतीशील विचारवंत-साहित्यिक, कला, क्रांती, चळवळ आणि वैयक्तिक आवड, चळवळ, साहित्य आणि धम्मक्रांती, इतिहास तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र अशा विविध पैलूंच्या अंगानं माझ्यासह संजीव सोनपिंपरे, प्रभाकर कांबळे, बबन चहांदे, अॅड. कविता, रक्षित सोनवणे, डॉ. प्रवीण चंदनशिवे, सतीश बनसोडे, प्रा. भरत नाईक, मधु कांबळे, भरत शेळके, प्रा. प्रशांत गायकवाड, प्राचार्य डॉ. अशोक बाबर, डॉ. वि.दा. वासमकर, प्रा. मोग्गलान श्रावस्ती, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. राजन गवस या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ही मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीमध्ये स्वाभाविकपणे वैयक्तिक स्वरुपाचे प्रश्न आहेतच; पण, ते केवळ सरांच्या वाटचालीचा मार्गवेध निश्चित करण्यासाठी! ही मुलाखत वाचायला सुरवात केल्यानंतर आपल्या निश्चितपणानं असं लक्षात येईल की, त्यातली वैयक्तिकता मागं पडून गेल्या शतकभरातल्या; नव्हे, गेल्या अडीच हजार वर्षांच्या चळवळीचंच डॉक्युमेंटेशन आपल्यासमोर उभं ठाकतं आणि भौतुक चळवळींच्या पलिकडं त्या चळवळींच्या तत्त्वज्ञानाशी ते आपल्याला जोडतं. खरं तर, या मुलाखतीसाठी प्रा. गौतमीपुत्र सरांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो कारण ही मुलाखत देऊन त्यांनी आमच्यासह भावी पिढ्यांसाठी एक फार मोलाचं संचित निर्माण करून ठेवलं आहे. संपादक मंडळालाही मी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की, त्यांनी या डॉक्युमेंटेशनसाठी अफाट परिश्रम घेतलेले आहेत. अत्यंत विक्रमी वेळेत शब्दांकन, लेखन आणि संपादनाचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्या कष्टाखेरीज हे देखणं ग्रंथरुप साकार झालं नसतं.

आज प्रकाशित होणारं मानवमुक्तीचा पथदर्शक हे दुसरं पुस्तकही फार अभिनव स्वरुपाचं आहे. सन्मान समितीनं ठरवलं असतं, तर प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्याविषयी केवळ वैयक्तिक गौरवग्रंथ ते आज लीलया निर्माण करू शकले असते.पण, हा गौरव समारंभ साक्षात प्रा. गौतमीपुत्र सरांचा असल्यानं चळवळीचा समग्र वेध घेणारा एक संशोधनग्रंथच त्यांनी वाचकांना सादर केला आहे. २७६ पृष्ठांच्या या ग्रंथात सोळा मान्यवर विचारवंत, साहित्यिक, संशोधकांचे लेख आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सुप्रसिद्ध मुक्ती कोण पथे?’ हे भाषण या संशोधन ग्रंथाचं दिग्दर्शन करतं. डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, शांताराम पंदेरे, डॉ. मच्छिंद्र सकटे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. सुनिता बोर्डे-खडसे, बबन चहांदे, गंगाधर अहिरे, प्रा. एम.आर. कांबळे, डॉ. हरिष भालेराव, मधु कांबळे, भरत शेळके, सतीश बनसोडे, प्रभाकर कांबळे, डॉ. प्रकाश भोगले आणि डॉ. गिरीष मोरे या मान्यवरांनी हे लेखन केलेलं आहे. यामध्ये गौतमीपुत्र सरांविषयीही काही लेख आहेत; मात्र, ते केवळ गौरवीकरण करणारे नसून त्यांचं संशोधनाच्या कसोट्यांवर यथोचित मूल्यमापन आणि चळवळीसह विविध क्षेत्रांतील योगदानाची चिकित्सा करणारे आहेत. त्यामुळं हे पुस्तकही केवळ सरांनाच नव्हे, तर चळवळीच्या विविध पैलूंना जाणून घेऊ इच्छिणाऱ्या तमाम संशोधक-अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणारे आहे. या संपादक मंडळासही आपण धन्यवाद द्यायला हवेत.

मित्र हो, समारोपाकडे येत असताना इतकेच सांगतो की आजचा समारंभ हा आपल्या सर्वांच्याच दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण कोणत्याही चळवळीमध्ये जेव्हा एखादा माणूस येतो, तेव्हा त्याला सातत्याने नेतेपदच साद घालत असते. केव्हा एकदा नेता होतो आणि उदोउदो करणारे पाठीराखे निर्माण होतील, याकडे त्याचे लक्ष लागून राहिलेले असते; किंबहुना, सारा खटाटोप त्यासाठीच चाललेला असतो. नेता होणं वाईट नाही, ते असलेच पाहिजेत; पण, नेतृत्व करीत असताना आपलं कार्यकर्तेपण जपायला लोक विसरतात आणि त्यामुळंच त्यांचं नेतृत्व उणावतं. पण, याची जाणी त्यांना होत नाही.

प्रा. गौतमीपुत्र कांबळे या व्यक्तीनं मात्र फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतलं आपलं कार्यकर्तेपण सतत कायम राखून चळवळीला दिशा देण्याचं, तिचं चिंतन करण्याचं आणि तिचं तत्त्वज्ञान मांडण्याचं काम करीत राहून चळवळीला सातत्यानं दिशा देण्याचं काम केलं आहे आणि त्यातून स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं आहे. राजा ढाले यांच्यानंतर त्यांच्या पथदर्शनानुसार चळवळीमध्ये प्राण फुंकत राहणारा हा एक फार मोठा माणूस आहे. त्यांनी ते मोठेपण कधीच मिरवलं नसलं तरी त्यांचं हे योगदान मला या निमित्तानं अधोरेखित करावंसं वाटतं. आपण ही दोन्ही पुस्तकं विकत घ्यावीत, वाचावीत, समजून घ्यावीत, पुनःपुन्हा समजून घ्यावीत कारण हे तत्त्वज्ञान आपल्याला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, हेच त्यांचं औचित्य, प्रयोजन आणि प्रस्तुतता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा