शनिवार, ४ जानेवारी, २०२५

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजमाध्यमे

 ('दै. पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्ताने 'कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष पुरवण्यांमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख येथे माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



(दै. पुढारी, बेळगाव आवृत्ती, दि. १ जानेवारी २०२५)

(दै. पुढारी, कोल्हापूर आवृत्ती, दि. २ जानेवारी २०२५)


(दै. पुढारी, कोल्हापूर आवृत्ती, दि. ४ जानेवारी २०२५)


जर कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपले ध्येय असेल आणि मानवता त्याच्या आड येत असेल, तर कोणताही मागचा पुढचा विचार न करता कृत्रिम बुद्धिमत्ता तिचा नाश करेल. - एलॉन मस्क

सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्टया डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचा केवळ मानवाच्या बाबतीत विचार करून उद्या पृथ्वीवर एखादे जीवघेणे संकट आल्यास मानवातील सर्वोत्कृष्ट (अर्थातच, ज्या ग्रहीय स्थलांतराचा खर्च करू शकतील अशा) प्रजातींनाच वाचवून अन्य ग्रहावर नेऊन त्यांचे पुनर्वसन करून तेवढ्याच टिकविण्याचा दूरगामी विचार करणारा स्पेसएक्स, टेस्ला आणि एक्स या कंपन्यांचा मालक, व्यावसायिक असलेल्या मस्क यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा उपरोक्तप्रमाणे आहे.

काही वर्षांपूर्वी केवळ आस्तित्वात येऊ घातलेली वैज्ञानिक कल्पना असणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.) हे आजचे वास्तव आहे. चहूबाजूंनी आपण ए.आय.ने घेरले गेलेलो आहोत. विशेषतः ज्या समाजमाध्यमांवरील आपला वावर हा जवळपास आपल्याही नियंत्रणाबाहेर जाऊ पाहतो आहे, किंबहुना गेलेला आहे, त्या माध्यमांद्वारे आपल्या सर्वंकष वर्तनाचे आकलन करवून घेऊन त्यावर ए.आय.द्वारे नियंत्रण मिळवले जात आहे- आपली व्यावसायिक गणिते साध्य करवून घेण्यासाठी. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आज जगावर कोणतीही उत्पादक कंपनी राज्य करीत नाही, तर जगभरातल्या वापरकर्त्यांचा डाटा सहजी हाताशी उपलब्ध असणाऱ्या समाजमाध्यम कंपन्यांचे वर्चस्व सर्वदूर प्रस्थापित झाले आहे. यामध्ये गुगल, मेटा, एक्स, मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि अॅमेझॉन या कंपन्यांमध्ये त्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या वापरकर्त्यांच्या डाटावर अधिकार प्रस्थापित करून त्या डाटाच्या आधारे बाजारपेठेवरील आपापले वर्चस्व अबाधित राखण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे यातील प्रत्येक कंपनीने आपला संशोधन व विकास हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने केंद्रित केला आहे.

माहितीची देवाणघेवाण, संवाद साधणे आणि लोकांशी जोडले जाणे यासाठी समाजमाध्यमे निर्माण झाली. पण आता ए.आय.ची जोड मिळाल्याने या संवादाची अवघी दिशाच बदलून गेली आहे. समाज माध्यमांची केवळ संवादाची पद्धतच बदलली नाही, तर त्याचा व्यवसाय, मनोरंजन, आणि सामाजिक बदलांवरही मोठा परिणाम झाला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेने संगणकीय प्रक्रियांना मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे कार्य करण्याची क्षमता प्रदान केली आहे. यामध्ये मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP), आणि इमेज/व्हिडिओ प्रोसेसिंग, ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअॅलिटी यांसारख्या अनेक उपशाखांचा समावेश आहे. समाज माध्यमांमध्ये ए.आय.चा वापर प्रामुख्याने डाटा व्यवस्थापन, ग्राहकांचे वर्तन विश्लेषण आणि आभासी संवादासाठी होतो. समाज माध्यमे ही आता केवळ संवादाचे साधन न राहता, ब्रँड मार्केटिंग, राजकीय प्रचार आणि व्यक्तिगत ओळख निर्माण करण्यासाठीचे प्लॅटफॉर्म बनले आहेत. एआयने या क्षेत्रात अनेक मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या बाबींचा आढावा येथे घेऊ.

कंन्टेंट निर्मितीमध्ये क्रांती:

ए.आय.च्या सहाय्याने कंन्टेंटची निर्मिती अधिक सोपी, स्वयंचलित आणि पर्सनलाइज्ड (वैयक्तिक अगर व्यक्तीसापेक्ष) होऊ शकते. म्हणजे कोट्यवधी ग्राहकांच्या वर्तन व्यवहाराचे निरीक्षण करून त्यातील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार अगदी स्वतंत्र असा कंन्टेंट सादर करणे आजघडीला शक्य झाले आहे ते केवळ ए.आय.मुळे. पूर्वी ट्रेंडिंग म्हटले की, जे सर्वाधिक अॅक्सेस केले जायचे, ते दर्शकाला सादर केले जात असे. आता त्या ट्रेंडिंगला एआयची जोड मिळाल्याने वैयक्तिक पातळीवर आपण काय पाहता, पाहू इच्छिता, त्याची जोड देऊन हा ट्रेंड अधिक पर्सनलाइज्ड करून दाखविल्याने ग्राहक तेथे अधिक वेळ व्यतित करण्याच्या शक्यता वृद्धिंगत होतात.

टेक्स्ट जनरेशन: आज एखाद्या विषयावर माहिती, लेख लिहीण्यासाठी ग्राहकाला इंटरनेटवर सर्फिंग करण्याची, योग्य माहिती शोधण्याची अगर ती शोधून नव्याने लिहीण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तर, चॅटजीपीटी, जॅस्पर-एआय इतकेच नव्हे तर अगदी मेटा कंपनीने वॉट्सअॅपमध्येही एआय असिस्टंट दिला आहे, त्यांच्या सहाय्याने वापरकर्त्याला लेख, कॅप्शन्स, ब्लॉग पोस्ट अगदी काही क्षणांत तयार करून मिळतात.

व्हिडिओ आणि फोटो एडिटिंग: नव्या पिढीच्या मोबाईल फोन्समध्ये कॅमेरा आणि फोटो व व्हिडिओ अॅप्लिकेशन्सना ए.आय.ने मोठा सपोर्ट दिला आहे. फोटो आकर्षक दिसण्यासाठी आणि सुव्यवस्थित उमटण्यासाठी फोटो काढत असतानाच फोटो एनहान्समेंट केली जाते. त्याखेरीज फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग अॅप्समध्ये AI-आधारित टूल्सही समाविष्ट केली आहेत, ज्यांच्या सहाय्याने मॅन्युअली एडिटिंगची प्रक्रिया बहुतांशी कमी-जवळपास शून्य झालेली आहे. अगदी फोटो क्रॉपिंगसाठी सुद्धा सजेशन दिले जाते. कॅन्व्हा, रनअवे-एमएल इत्यादी अॅप्स फोटो आणि व्हिडिओ संपादनासाठी सर्जनशील टेम्प्लेट, डिझाइन्स पुरवितात.

ऑडिओ निर्मिती: विविध विषयांवरील पॉडकास्टिंगसाठी आता स्क्रीप्टची निर्मिती, आवाजाची जोड, ऑडिओचे संपादन इत्यादी सर्व बाबी आता एआयच्या सहाय्याने अधिक सहजसोप्या झालेल्या आहेत. एआय पॉडकास्ट्ससाठी स्वयंचलित ऑडिओ स्क्रिप्ट तयार करते. रॉयल्टी फ्री संगीत, आवाजाचे विविध इफेक्ट्सची जोडही त्याला दिली जाते. वीड.आयओ सारखा व्हॉईस जनरेटर त्यासाठी उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे वंडरक्राफ्ट, पॉडकॅसल, औफोनिक, रिसाऊंड, एडोब पॉडकास्ट एआय असे अनेक प्लॅटफॉर्म आज उपलब्ध आहेत.

हे तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, संगीतकार ए.आर. रेहमान याने आपल्या एका गीतामध्ये एआयच्या सहाय्याने दिवंगत गायक सहूल हमीद आणि बांबा बाक्या यांचे आवाज वापरल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराबाबत मोठेच वादळ निर्माण झाले.

सोशल मीडिया मॅनेजमेंट: प्रभावी व्यक्तीमत्त्वांसह अनेक लहानमोठ्या व्यावसायिक कंपन्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अनिवार्य आहे. मात्र विविध समाजमाध्यमांवरील वावराचे स्वतंत्र व्यवस्थापन करण्याऐवजी ते एकाच वेळी एकाच ठिकाणावरून करणे अधिक सोयीचे असते. त्यासाठी हूटसूट, बफर आदी प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. आता एआयमुळे सर्व समाजमाध्यमे एकाच डॅशबोर्डवर असण्यापलिकडे यांची उपयुक्तता वाढली आहे. या एआय आधारित साधनांच्या सहाय्याने विविध समाजमाध्यमांवरील आपल्या पोस्ट्स शेड्यूल करणे, तेथील ट्रेंडिंग टॉपिक्स शोधणे आणि विश्लेषण करणे अधिक सोपे झाले आहे. या पोस्ट्सचे वेळापत्रकही निर्धारित करता येते. एआयमुळे हॅशटॅग आणि ट्रेंड्सचा अंदाज देखील बांधणे सोयीचे झालेले आहे.

डाटा विश्लेषण आणि ग्राहक वर्तनाचा अभ्यास: सुरवातीला म्हटल्याप्रमाणे एआयचा मोठा वापर ग्राहक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी केला जात आहे. समाजमाध्यमांकडे वापरकर्त्यांचा डाटा उपलब्ध आहे. वापरकर्ते काय पाहतात, कोणत्या पोस्टवर ते काय प्रतिक्रिया देतात, कोठे किती वेळ घालवतात, त्यांच्या आवडीनिवडी काय, त्याचा कल काय, या साऱ्या बाबी समाजमाध्यमांवरील त्यांच्या वावरातून समोर येत असते. या साऱ्या माहितीचे सखोल विश्लेषण करून अधिक नेमकेपणाने वापरकर्त्याचा अर्थात ग्राहकाचा कल ओळखला जातो. त्या प्रकारच्या अनुषंगिक उत्पादन आणि सेवांच्या जाहिराती त्याला सादर केल्या जातात. तसेच एआयच्या मदतीने ग्राहकांचे वय, आवड आणि भौगोलिक ठिकाण यानुसार अचूक जाहिराती दाखविल्या जातात. गुगल अॅडसेन्स आणि फेसबुक अॅड्स यांसारखे प्लॅटफॉर्म एआयच्या सहाय्याने या जाहिरातींची अचूकता वाढवतात. एआयमुळे विविध ब्रँड्सना अधिकाधिक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (ROI) मिळतो. अर्थात टार्गेटेड ग्राहकापर्यंत जाहिरात पोहोचल्यामुळे संबंधित उत्पादन अथवा सेवा खरेदी केली जाण्याची शक्यता वृद्धिंगत होते. त्यातून या कंपन्यांचे अर्थकारण साधले जाते. तसेच, आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याला अधिक वेळ गुंतवून ठेवण्यासाठी एआयच्या आधारे त्याच्या आवडीनुसार फीड दाखविण्यात येतात. फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपण काही विशिष्ट व्यक्ती वा विषयांच्या पोस्ट अथवा रील पाहू लागलो की पुढे सातत्याने त्याच प्रकारच्या पोस्ट आपल्या स्क्रीनवर यायला सुरवात होते, यामागे एआय फीड ऑप्टीमायझेशनची कारागिरी करीत असते.

प्रभावी संवादासाठी: आजकाल आपण पाहतो की आपण कोणत्याही सेवा पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली, तर तेथे अधिकांश उजव्या कोपऱ्यात वर किंवा खाली मे आय हेल्प यू?’ किंवा आस्क मी अशा स्वरुपाचे डायलॉग बॉक्स दिसतात. तिथे कोणी माणूस नाही तर चॅटबॉट्स किंवा व्हर्च्युअल असिस्टंट्स आपल्याला माहिती देण्यासाठी असतात. ग्राहकाला आवश्यक असणारी सर्वसाधारण माहिती ते सहजी पुरविण्यास सक्षम असतात. एआय-आधारित चॅटबॉट्स ग्राहकांशी संवाद साधतात आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात. त्यांची सेवा २४x७ उपलब्ध  असते. ग्राहकांच्या तक्रारींना स्वयंचलित उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यासाठी त्यांचे उपयोजन केलेले असते. अलिकडे विविध कंपन्या ग्राहकांशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधतात. यावरही शंकासमाधानासाठी अशा एआय-आधारित यंत्रणेचाच वापर केलेला असतो. त्याखेरीज चॅट-जीपीटीसारखी यंत्रणा ओपन-एआयमार्फत तयार करण्यात आली आहे. ती वापरकर्त्यांना हवी ती माहिती अगदी क्षणांत सादर करण्याइतकी सक्षम करण्यात आली आहे.

भाषांतर आणि स्थानिकीकरण: गुगलसारखी कंपनी एका भाषेतील मजकूर जगातील अन्य भाषांमध्ये उत्तम प्रकारे सादर करण्यासाठी गेली अनेक वर्षे संशोधन करीत आहे. आता एआयमुळे या भाषांतर क्षमतेला जणू पंख लाभले आहेत. हे भाषांतर आता अधिकाधिक अचूकतेच्या जवळ जाऊ लागले आहे. एआयच्या भाषांतर क्षमतेमुळे विविध भाषांमध्ये रिअल टाईम संवाद साधणे सोपे झाले आहे. मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी आपले डिव्हाईसेस त्या पद्धतीने कॉन्फिगर केले आहेत. स्थानिक भाषांमध्ये कंटेंट तयार करण्यासाठी सुद्धा आता एआय उपयुक्त ठरते आहे. गुगल ट्रान्सलेटसारखी साधने ग्लोबल ऑडियन्सशी संवाद साधण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात.

याठिकाणी जगातील आघाडीच्या समाजमाध्यम कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा किती प्रभावी आणि गतिमान वापर करीत आहेत, हे समजून घेतल्याखेरीज तिचा आवाका आपल्या लक्षात येणार नाही.

मेटाचा कृत्रिम बुद्धिमत्तेत मोठा सहभाग

मेटा (पूर्वीची फेसबुक) ही जगातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने डिजिटल जगात क्रांती घडवून आणत आहे. मेटा ही केवळ एक सोशल मीडिया कंपनी न राहता, एआयच्या मदतीने मेटाव्हर्स, डेटा विश्लेषण, आणि वैयक्तिकृत अनुभव यांसारख्या क्षेत्रांत नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवत आहे.

मेटा तिच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या समाज माध्यम प्लॅटफॉर्म्समध्ये एआयचा वापर करतेच आहे, मात्र प्रामुख्याने नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या मेटाव्हर्स या संकल्पनेत खूप मोठ्या प्रमाणात वापरते आहे. याचा थेट परिणाम डिजिटल संवाद, डेटा व्यवस्थापन, आणि ग्राहक अनुभवावर होतो.

मेटाच्या समाज माध्यम प्लॅटफॉर्म्सवर कस्टमाइज्ड फीड, व्हिज्युअल आणि व्हॉईस रिकग्निशन, ट्रेंड विश्लेषण तसेच स्पॅम आणि गैरवर्तन नियंत्रण यासाठी एआय वापरले जाते. मात्र, मेटाच्या व्हर्चुअल रिअॅलिटीवर आधारित विश्व असलेल्या मेटाव्हर्सची संकल्पना विकसित करण्यासाठी एआयचा उपयोग अनेक प्रकारे केला आहे. तिथे एआयच्या मदतीने लोकांचे व्हर्चुअल अवतार तयार केले जातात, जे मेटाव्हर्समध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करतात. मेटाव्हर्समधील आभासी जागांना (virtual spaces) एआयच्या सहाय्याने अधिक संवादक्षम आणि स्मार्ट बनवले जाते. त्याचप्रमाणे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या सहाय्याने मेटाव्हर्समध्ये वापरकर्ते नैसर्गिक संवाद सहज साधू शकतात.

मेटाने फेअर (FAIR- फेसबुक एआय रिसर्च) या संशोधन केंद्राची स्थापना केली आहे, जिथे एआयच्या प्रगत तंत्रज्ञानावर काम केले जाते. तेथे मेटाने जगातील दोनशेहून अधिक भाषांमध्ये भाषांतर करणारी एआय यंत्रणा विकसित केली आहे. एआयच्या मदतीने मेटा स्वयंचलित रोबोटिक्स प्रणालीही विकसित करत आहे. मेटाने विकसित केलेले पायटॉर्च (PyTorch) हे एआय संशोधन आणि मशीन लर्निंगचे ओपन-सोर्स साधन आहे. शास्त्रज्ञ आणि डेव्हलपर यांच्यासाठी हे एआय मॉडेल तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. एआयच्या मदतीने मेटा जनरेटिव्ह तंत्रज्ञान वापरत आहे, ज्यामध्ये स्वयंचलित इमेज आणि व्हिडिओ निर्मिती, थ्री-डी आणि व्हर्चुअल रिअॅलिटी आधारित इमर्सिव्ह कंन्टेंट तयार केला जातो. थोडक्यात, मेटा ही आता फक्त समाज माध्यम कंपनी न राहता, एआयच्या सहाय्याने मेटाव्हर्ससारख्या नव्या जगाची उभारणी करणारी बनली आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे, ग्राहकांना अधिक चांगला अनुभव आणि व्यवसायांना वाढीची संधी मिळेल. मात्र, त्याचवेळी नैतिकता, डेटा गोपनीयता, आणि गैरवापर टाळण्यासाठी योग्य धोरणांची गरज आहे.

व्हॉट्सॲप हे मेटाचे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सोपा, सुरक्षित आणि सानुकूल बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मेसेजिंग अनुभवात सुधारणा, ऑटो-सजेशन (Smart Replies), टेक्स्ट प्रेडिक्शन, भाषांतर आणि बहुभाषिक समर्थन, रिअल टाइम भाषांतर, एंड-टू-एंड एनक्रिप्शन लागू करून वापरकर्त्यांच्या संदेशांची सुरक्षा आणि गोपनीयता, स्पॅम आणि फ्रॉड अलर्ट, फेक अकाउंट्सचा शोध, व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये एआयच्या सहाय्याने व्यवसायांसाठी सुलभ संवाद, चॅटबॉट्स सेवा, कस्टमाइज्ड अनुभव, मल्टीमीडिया सुविधा, स्पॅम मिडिया फिल्टर, मेसेज फिल्टरिंग, व्हॉईस असिस्टंट इंटिग्रेशन, एआय-आधारित फॉरवर्ड लिमिट असे अनेक नवनवे फीचर मेटाने एआयच्या सहाय्याने वापरकर्त्यांना प्रदान केले आहेत.

गुगलची आधुनिक तंत्रज्ञानात क्रांती

गुगल ही जगातील सर्वात प्रगत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. तिच्या यशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे. गुगलने एआयचा वापर विविध सेवा सुधारण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, आणि ग्राहकांना अधिक चांगले अनुभव देण्यासाठी केला आहे. गुगलच्या कोअर सर्च इंजिनमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. रँकब्रेन (RankBrain) हा गुगलच्या सर्च अल्गोरिदमचा एआय आधारित भाग आहे, जो युजरच्या सर्च क्वेरीचा अर्थ समजावून घेऊन अचूक परिणाम शोधतो. गुगलने बर्ट (BERT- Bidirectional Encoder Representations from Transformers) या मॉडेलच्या आधारे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग पद्धती विकसित केली असल्याने गुगल सर्चला वापरकर्त्याच्या क्वेरीचा अधिक चांगला संदर्भ समजतो. एआयमुळे वापरकर्त्याच्या शोध इतिहासावर आधारित अधिक वैयक्तिकृत परिणाम दाखवले जातात. गुगलची ट्रान्सलेट ही भाषांतर सेवा एआय आणि मशीन लर्निंगवर आधारित आहे. ती शंभरहून अधिक भाषांचे अचूक आणि वेगवान भाषांतर करू शकते. न्यूरल मशीन ट्रान्सलेशनद्वारे भाषांतर अधिक सुसंगत बनते. टेक्स्ट, आवाज आणि प्रतिमांमधूनही भाषांतर करण्याची क्षमता गुगलने विकसित केली आहे.

गुगल असिस्टंट हा गुगलचा एआय-आधारित सहाय्यक स्मार्टफोन, स्मार्ट होम डिव्हाइसेससह विविध उपकरणांवर उपलब्ध आहे. व्हॉईस रेकग्निशन आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या मदतीने ते वापरकर्त्याच्या आदेशांचे अचूक पालन करते. वैयक्तिकृत सूचना, वेळापत्रक व्यवस्थापन आणि विविध माहिती शोधण्यास मदत करते. गुगलच्या सर्वच अॅप्समध्ये एआयचा वापर करण्यात आला असून त्यांचे कार्य अधिक अचूक, प्रभावी व गतिमान करण्यात येत आहे.

गुगल फोटोज या अॅपमध्ये फोटो व्यवस्थापनासाठी एआयचा मोठ्या प्रमाणावर केला जातो. एआयचे अल्गोरिदम चेहऱ्यांची ओळख, वस्तू वर्गीकरण आणि फोटो टॅगिंगही करतात. एआय-आधारित टूल्स फोटो संपादनासाठी ऑटोमॅटिक सुधारणा आणि फिल्टर्स देतात. मेमरी फीचर हे वापरकर्त्याच्या जुन्या फोटोंमधील महत्त्वाचे क्षण ओळखून ते एकत्रित संकलित करते.

गुगलचे युट्यूब हे व्हिडिओ कंन्टेंट सेवा पुरविणारे मंच आहे. येथे एआय वापरकर्त्याच्या कंन्टेंट पाहण्याच्या सवयीचा अभ्यास करून कस्टमाइज्ड कंन्टेंटची शिफारस करते.  स्पॅम नियंत्रण, अपमानास्पद किंवा अवांछित टिप्पण्या फिल्टर करणे, व्हिडिओचे स्वयंचलित ट्रान्सक्रिप्ट तयार करणे इत्यादीसाठी एआय उपयुक्त ठरते.

डीपमाईंड (DeepMind) ही गुगलची एआय संशोधन संस्था आहे. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी एआय-आधारित समाधान शोधण्याच्या कामी उपयुक्त ठरते आहे. विशेषतः एआयच्या मदतीने कर्करोग, नेत्ररोग, आणि हृदयविकार ओळखणे सोपे झाले आहे. अल्फागो (AlphaGo) आणि अल्फाफोल्ड (AlphaFold) यांसारखी अत्याधुनिक एआय प्रणाली विकसित करणे ही कामे इथे केली जातात. त्याचप्रमाणे टेन्सरफ्लो (TensorFlow) हे गुगलने विकसित केलेले एआय आणि मशीन लर्निंगसाठीचे ओपन-सोर्स सॉफ्टवेअर आहे. संशोधक आणि डेव्हलपर्स यांच्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे न्यूरल नेटवर्क्स तयार करण्यासाठीही ते प्रभावी साधन आहे.

गुगल-बार्ड हा गुगलचा जनरेटिव्ह एआय प्रकल्प आहे, जो चॅटबॉटसाठी वापरला जातो. वापरकर्त्याच्या तो प्रश्नांना सर्जनशील आणि अचूक उत्तरे देतो. कंटेंट जनरेशन आणि संवाद व्यवस्थापनात उपयुक्त आहे. तसेच, गुगलने विकसित केलेले वेमो (Waymo) हे स्वयंचलित वाहनांसाठी उपयुक्त आहे. यात एआयचा वापर वाहतूक नियंत्रण, मार्ग नियोजन आणि ड्रायव्हिंगविषयक निर्णय अधिक अचूक व सुरक्षित बनवले जातात. अशा प्रकारे एआयच्या सहाय्याने गुगलने अक्षरशः क्रांती घडविली आहे.

उद्योग-व्यवसायांना मायक्रोसॉफ्टच्या एआयचे बळ

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफ्ट ही विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे, ग्राहकांशी संवाद साधण्याबरोबरच विविध व्यावसायिक प्रक्रियांना सुलभ करण्याच्या कामी आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यात ती पुढे आहे. विशेषतः विविध उद्योग-व्यवसायांना आपल्या एआयचे पाठबळ मायक्रोसॉफ्ट पुरविते.

मायक्रोसॉफ्ट ३६५ को-पायलट हा मायक्रोसॉफ्टचा एआय-चालित सहाय्यक वापरकर्त्यांना दस्तऐवजांचा सारांश तयार करणे, डाटा विश्लेषण करून अहवाल तयार करणे तसेच ईमेल लिहिण्यासही मदत करतो. विविध सादरीकरणे तयार करण्यासाठी, कार्यसूची आणि वेळापत्रकाचे व्यवस्थापन यांसाठी देखील मदत करतो, ज्यामुळे वापरकर्त्याची उत्पादकता साधने अधिक प्रभावी आणि सुलभ बनतात.

अॅझ्यूर एआय हा मायक्रोसॉफ्टची क्लाउड प्लॅटफॉर्म असून तो जो व्यवसायांना आणि विकसकांना अॅप्लिकेशनमध्ये एआय तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात मदत करतो. याच्या विविध एआय सेवांमध्ये मशीन लर्निंग, कॉग्निटिव्ह सर्विसेस अर्थात पूर्व-निर्मित एआय मॉडेल्स, बॉट सर्व्हिसेस, प्रतिमा व व्हिडिओ विश्लेषणासाठी संगणक दृष्टी (Computer Vision) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) समाविष्ट आहेत, ज्यामुळे व्यवसायांना एआय आधारित उपाय तयार करणे आणि ते अंमलात आणणे सोपे जाते. विकासकांना उच्च गुणवत्ता असलेल्या एआय ओपन डेटासेट्सही प्रदान करण्यात येतात, जे त्यांच्या एआय मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी वापरू शकतात. व्यवसाय व्यवस्थापन, ग्राहक सेवा, आरोग्य सेवा, (वैद्यकीय माहिती विश्लेषण), सुरक्षाविषयक डेटा विश्लेषण तसेच कार्बन क्रेडिट्स मॅपिंगच्या व्यवस्थापन आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्येही हे उपयुक्त आहे. कोकाकोलासारख्या कंपन्या एआय-चालित विपणन मोहिम तयार करण्यासाठी अॅझ्यूर ओपनएआय वापरतात, ज्यामुळे ग्राहकांच्या अनुभवांमध्ये आणि संवादात सुधारणा होते.

गिटहब को-पायलट विकसकांसाठी एक महत्वपूर्ण साधन आहे, जे त्यांना अधिक जलद, कार्यक्षम आणि प्रभावी कोड लिहिण्यात मदत करते. हे एआय-चालित कोड कंप्लीशन टूल विकसकांना कोड पूर्ण करण्यासाठी संबंधित कोड ब्लॉक्स सुचवणे, त्यातील त्रुटी शोधणे आणि कोड गुणवत्ता सुधारणे यासाठी मदत करतो. त्याचप्रमाणे सामान्य कोड लेखन कार्ये ऑटोमेट करून वापरकर्त्याचा वेळ वाचवून कार्यक्षमता वाढवतो. कोपायलट विकसकांना नवीनतंत्रज्ञान, टूल्स आणि सर्वोत्तम पद्धती शिकवतो.

याखेरीज मायक्रोसॉफ्ट आरोग्य सेवा व्यावसायिकांना वैद्यकीय माहिती प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषित करण्यासाठी एआयची मदत पुरविते. ज्यामुळे आरोग्यविषयक निर्णय अधिक चांगले घेता येतात आणि रुग्ण परिणामांमध्ये सुधारणा करता येते.

मायक्रोसॉफ्टच्या एआय उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय परिणाम साध्य होत आहेत. अनेक फॉर्च्युन-५०० कंपन्या या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत.

अॅपलमध्ये इनोव्हेशनचा नवा टप्पा

अॅपल ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपल्या उत्पादनांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी सातत्याने संशोधन व विकासात अग्रेसर राहिली आहे. आयफोन, आयपॅड, मॅकबुक यांसह आपल्या विविध सेवांमध्ये अॅपलने एआयचा वापर करून डिजिटल जगात क्रांती घडवून आणली आहे.

सिरी हा अॅपलचा एआय-आधारित व्हॉईस असिस्टंट असून जो वापरकर्त्यांना विविध कामे सोप्या पद्धतीने पार पाडण्यास मदत करतो. नॅचरल लँग्वेज प्रोसिंगचा वापर करून युजरच्या बोलण्याचा अर्थ समजून त्याला अचूक उत्तर देतो. युजरच्या सवयी, दिनचर्या, आणि आवडीनुसार सेवा सादर करतो. आयफोन आणि आयपॅडसाठी अॅपलने चेहरा ओळखणारी अत्याधुनिक प्रणाली विकसित केली गेली आहे. फिंगरप्रिंट किंवा पासवर्डच्या तुलनेत ती अधिक सुरक्षितता प्रदान करते. वापरकर्त्याचे लक्ष ओळखून डिव्हाइस अनलॉक करता येते.

अॅपलच्या नवीन डिव्हाइससाठी खास तयार केलेल्या A-सिरीज (A16 Bionic) आणि M-सिरीज (M1, M2) प्रोसेसर्समध्ये एआय आणि मशीन लर्निंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. न्यूरल इंजिनमुळे एआय-आधारित कामे जसे की, फोटो प्रोसेसिंग, भाषा ओळख आणि आवाज विश्लेषण इ., जलद आणि प्रभावी होतात. वापरकर्त्याचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अॅपल विशेष काम करते.

अॅपलच्या कॅमेरा प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. स्मार्ट एचडीआर फीचर प्रकाश, छायाचित्र आणि रंग अधिक नैसर्गिक बनवतो. डीप फ्यूजनमुळे कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे फोटो घेणे शक्य होते. कंन्टेंट अवेअर एडिटिंगमुळे फोटोमधील अनावश्यक घटक काढून टाकणे किंवा त्यात बदल करणे सहजशक्य होते. अॅपल म्युझिक एआयच्या सहाय्याने वापरकर्त्याला वैयक्तिकृत संगीत सिफारशी देते, आवडीनुसार प्लेलिस्ट तयार करते, संगीताचा प्रकार, मूड आणि वापरकर्त्याच्या ऐकण्याच्या सवयींचा अभ्यास करते.

अॅपलच्या विविध उपकरणांत आरोग्य आणि फिटनेस तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जातो. अॅपल वॉच आणि हेल्थ अॅपमध्ये एआयचा वापर केला जातो. हृदयाचे ठोके ओळखून आरोग्यविषयक सूचना करणे, झोपेच्या सवयींवर आधारित वैयक्तिक आरोग्य सल्ला देणे, वापरकर्त्याचा अचानक पडण्याचा प्रसंग ओळखून मदतीसाठी संपर्क साधणे इत्यादी बाबी यामध्ये आहेत.

अॅपलच्या उत्पादनांसाठी वापरकर्त्याची गोपनीयता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी ऑन-डिव्हाइस प्रोसेसिंगसाठी एआय वापरले जाते, ज्यामुळे वापरकर्त्याला डेटा इंटरनेटवर अपलोड करण्याची गरज उरत नाही. डेटा एनक्रिप्शनच्या मदतीने वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते. त्याचप्रमाणे अॅपलने एआयच्या मदतीने आयफोन, मॅकबुक, अॅपल वॉच आणि होमपॅडसारख्या डिव्हाईसअंतर्गत अखंडित संवाद साधणारी इकोसिस्टीम विकसित केल्याने एअरपॉड्स वापरताना कॉल आला तर यापैकी कोणत्याही उपकरणावर तो सहजपणे स्वीकारता येतो.

दिव्यांग व्यक्तींसाठी अॅपलने स्क्रीनवरील मजकूर वाचून दाखविणारी व्हॉईसओव्हर, आवाजाचे रिअल टाइम ट्रान्सक्रिप्शन दाखविणारी लाइव्ह कॅप्शन्स, फक्त डोळ्यांच्या हालचालींनी नियंत्रित होणारी स्वीच कन्ट्रोल इत्यादी प्रणाली विकसित केल्या आहेत.

अॅपलने आपल्या संशोधन व विकास प्रकल्पांत सिरी (Siri)च्या पुढील पिढीचा विकास करण्याचे ठरवून त्याच्या अल्गॉरिदममध्ये सुधारणा चालविली आहे. वैयक्तिक डाटा सुरक्षेच्या अनुषंगाने तर सातत्याने काम करण्यात येत आहे. अॅपलची ऑगमेंटेड रिअलिटी यंत्रणा असणाऱ्या आर्किट (ARkit) मध्येही एआयचा वापर सुरू केला आहे. याच्या सहाय्याने वास्तविक जगात व्हर्च्युअल घटक अधिकाधिक समायोजित करता येतील. गेमिंग, शिक्षण आणि डिझाइनमध्येही याचे उपयोजन करण्याचे संशोधन आहे.

ऑटोमोटिव्ह एआय हे तंत्रज्ञान अॅपल विकसित करीत आहे. अॅपलच्या स्वयंचलित कार प्रकल्पामध्ये मार्ग नियोजन, अपघात टाळण्यासाठी प्रेडिक्शन आणि चालकविरहित वाहतुकीसाठी एआयचा प्रभावी वापर करण्याचेही संशोधन सुरू आहे.

एक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

एक्स (पूर्वीचे ट्विटर) कंपनीने समाजमाध्यमांच्या संवाद पद्धतीत आमुलाग्र बदल केले आहेत. एआयच्या सहाय्याने एक्सने आपल्या सेवा अधिक प्रभावी, वैयक्तिकृत आणि सुरक्षित केल्या आहेत. कंन्टेंट मॉडरेशन, हेट स्पीच, फेक न्यूज आणि गैरवर्तन यांचा शोध, त्यांवर स्वयंचलित अॅक्शन, ट्रेंड्स आणि अल्गोरिदम मॅपिंग, ट्रेंडिंग हॅशटॅग्स, कस्टमाइज्ड फीड, स्पॅम आणि बॉट्स नियंत्रण आदी प्रक्रियांच्या आधारे ग्राहक संवादात सुधारणा करण्यात एक्स यशस्वी ठरते आहे. ग्राहकांसाठी चॅटबॉट्स आणि ऑटोमेटेड रिप्लाय सिस्टिमही विकसित केल्या आहेत. एक्सही मेटाप्रमाणे डाटा विश्लेषण, ग्राहक वर्तनावर आधारित मार्केटिंग धोरण आखणे, नैसर्गिक संवादासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर, जाहिरातींचे व्यवस्थापन, रिअल-टाईम विश्लेषण यांसाठी एआयचा प्रभावी वापर करते.

उपरोक्त उदाहरणांवरुन आपल्या लक्षात येईल की, आपण सारेच कसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांनी आणि तंत्रज्ञानाने घेरले गेलेलो आहोत. त्यामुळे याचे काही धोकेही सामोरे आलेले आहेत, येत आहेत. तेही याठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे.

धोके आणि आव्हाने:

समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्म्सवर एआयचा वापर सकारात्मकतेसाठी होत असला तरी त्याच्यामुळे काही आव्हाने आणि धोकेही निर्माण झालेले आहेत. त्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे चुकीच्या माहितीचा प्रसार होय. एआयच्या सहाय्याने फेक न्यूज किंवा थेट डीपफेक व्हिडिओ सुद्धा तयार करून प्रसारित करण्यात येत आहेत. विशेषतः राजकीय प्रचारासाठी चुकीच्या बातम्या पसरवण्याचे प्रकार वारंवार होताना दिसतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा देखील डीपफेक व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे माहितीच्या, माध्यमाच्या विश्वासार्हतेचा मोठा प्रश्न समोर उभा राहतो. दुसरी बाब म्हणजे एआय वापरताना लोकांचा वैयक्तिक डाटा गोळा केला जातो, ज्यामुळे गोपनीयतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. डाटा चोरीचे प्रकार वाढले आहेत. ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या माहितीचा वापर होतो. या पार्श्वभूमीवर, एआय-निर्मित कंटेंटमुळे खऱ्या आणि बनावट माहितीमधील सीमारेषा पुसली जाते. एआय जनरेटेड फोटो किंवा व्हिडिओ वास्तवातील माहितीशी विसंगत असू शकतात. समाजमाध्यम कंपन्या अशा प्रकारच्या कंन्टेटला रोखण्यासाठी काम करीत असल्या तरी अंतिमतः माहिती, व्हिडिओ, छायाचित्रे यांची शहानिशा करण्याची जबाबदारी वापरकर्त्यावरच येते. त्यामुळे कोणतीही माहिती समोर आली की लगोलग त्यावर विश्वास न ठेवता अन्य माध्यमांमध्ये त्याची पडताळणी करून मगच ते पुढे पठवायचे की जागीच डिलीट करून रोखायचे, याचा निर्णय वापरकर्त्याच्या सारासार विवेकावर अवलंबून आहे.

भविष्यातील संधी:

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे समाज माध्यमांमध्ये अनेक नवनवीन संधी निर्माण होत आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी काम करता येत असल्यामुळे अत्यंत सुस्पष्ट आणि व्यक्तिशः ब्रँडिंग शक्य होते. एआयच्या साथीने ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) यांचा समावेश केल्याने ग्राहकांसाठी अधिकाधिक आकर्षक व अभिनव अनुभव तयार करता येऊ शकतात.

भविष्यात एआय-आधारित साधनांचे ऑपरेशन, व्यवस्थापन आणि मॉडरेशन यासाठी तज्ज्ञांची मोठी आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे तरुणांनी एआयलाच आपल्या प्रगतीची शिडी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कंन्टेंट मॉडरेशन आणि एथिकल एआय या क्षेत्रातही नव्या भूमिका आणि संधी निर्माण होणार आहेत.

थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमे यांचा एकत्रित वापर संवादाचे स्वरूप बदलत आहे. एआयचा योग्य वापर केला तर व्यवसाय, संवाद, आणि सामाजिक कार्य यामध्ये क्रांती घडवून आणता येईल. पण, या तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी आणि नैतिकता जपण्यासाठी योग्य धोरणे आखणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. नजीकच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांमधील एकत्रित कामगिरीने नव्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे दिग्दर्शन होईल. त्याचा अखिल मानवी समुदायाच्या उन्नतीसाठी वापर केला तरच त्याचे सकारात्मक फलस्वरुप निदर्शनास येईल. अन्यथा, महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनीही इशारा देऊन ठेवला आहेच की,

कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा टप्पा असू शकेल; पण त्याचे धोके ओळखून त्यांचे निराकरण वेळीच केले नाही, तर तो कदाचित अखेरचाही ठरू शकेल.