शनिवार, २५ जानेवारी, २०२५

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘फुले-आंबेडकरी समकालीन राजकारणा’विषयी चिंतन

 

कोल्हापुरात 'फुले-आंबेडकरी समकालीन राजकारण' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डॉ. राजन गवस, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, दशरथ पारेकर, डॉ. प्रकाश पवार, सुरेश शिपूरकर, मधू कांबळे, भरत शेळके आणि डॉ. भरत नाईक.

कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका


आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यानी संकलित आणि संपादित केलेल्या ‘फुले-आंबेडकरी समकालीन राजकारण’ या पुस्तकाचे आज (दि. २५ जानेवारी २०२५) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात प्रकाशन झाले. सेक्युलर मुव्हमेंट आणि सेक्युलर आर्ट मुव्हमेंटतर्फे हे प्रकाशन करण्यात आले आहे.

पुस्तकाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचा असा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, ज्यात ज्येष्ठ राज्यशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश पवार, सेक्युलर मुव्हमेंटचे कार्याध्यक्ष भरत शेळके आणि ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांनी पुस्तकाच्या अनुषंगाने मांडणी केली. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. हरिष भालेराव, डॉ. राजन गवस, सुरेश शिपूरकर प्रमुख उपस्थित होते.

प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये या पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली. फुले-आंबेडकरी संज्ञेची व्याप्तीही त्यांनी स्पष्ट केली. या मध्ये पुरोगामी भूमिका घेणारे समग्र विचारविश्व सामावले असल्याचे अभिप्रेत असल्यामुळे केवळ संज्ञात्मकतेच्या दृष्टीने त्याकडे पाहून कोणी भेदी भूमिका घेण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ एक तात्त्विक प्रयोग नसून त्याचे प्रात्यक्षिकही करण्याचा प्रयत्न राहणार असून त्यासाठीच या परिसंवादाचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक म्हणजे एक डॉक्युमेंट आहे, जे विधायक दुरुस्ती, सुधारणा, सूचना यांसाठी खुले असून सामाजिक जबाबदारीचे भान असणाऱ्या सर्व विचारी लोकांनी त्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुस्तकात प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांचे ‘आंबेडकरी पक्ष निवडणुकीच्या राजकारणात प्रभावहीन का?’, ‘आंबेडकरी रिपब्लिकन राजकारण: डावे की उजवे?’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोणातून ‘राजसत्ता’ व ‘धर्मसत्ता’ आणि सेक्युलर मुव्हमेंटची भूमिका’ असे तीन अतिशय विचारप्रवण करणारे चिंतनशील लेख आहेत. त्यासह सतीश पारमित यांचा ‘फुले-आंबेडकरी राजकारण समजून घेऊ या’, डॉ. डी.एस. सावंत यांचा ‘आपणही राजकीय इतिहास घडवू शकतो’ आणि मधू कांबळे यांच्या ‘प्रस्थापित राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात जातिनिर्मूलनाचा विषय का नाही?’ या प्रदीर्घ मुलाखतीचे शब्दांकन आहे. याखेरीज, स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा (१९३७), अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन निवडणूक जाहीरनामा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय जनतेस खुले पत्र (रिपब्लिकन पक्ष: ध्येय धोरण) अशी परिशिष्टे आहेत.

या अनुषंगाने परिसंवादात पुढे वक्त्यांनी सुमारे दीड तास सविस्तर मांडणी केली. डॉ. भरत नाईक यांनी भूमिका स्पष्ट केली. मधू कांबळे यांनी राजकीय लोकशाहीमध्ये सध्या प्रचलित मतदान पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रमाणबद्ध मतदान पद्धतीचा स्वीकार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले आणि चर्चेला दिशा दिली. भरत शेळके यांनी जातिनिर्मूलनाच्या मूलभूत मुद्द्याच्या अनुषंगाने मांडणी केली आणि लोकशाहीच्या केंद्रस्थानी माणूस कधी येणार, असा प्रश्न उपस्थित केला. प्रा. प्रकाश पवार यांनी सांगितले की, समस्या सोडविण्यासाठी पुनःपुन्हा प्रयोग करणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते. त्यांनी राजकारणही त्याच प्रयोगशील पद्धतीने केले. गौतमीपुत्र कांबळे हा तसा प्रयोग या पुस्तकाद्वारे करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे प्रयत्न आता निवडक नव्हे, तर भल्यामोठ्या समूहाला उच्चरवाने आणि सातत्याने सांगत राहायला हवेत. मर्यादित समुहापलिकडे व्यापक समुदायाला अगदी परप्रांतीय व्यापारी जातीजमातींनाही यामध्ये आवाहन करून सामावून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मतपरिवर्तन आणि मतनिर्मिती या बाबींना प्राधान्य देत असताना महिला वर्ग, मुस्लीम समुदायासह सर्व समाजघटकांमध्ये सहिष्णू संवाद निर्माण करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने राजकारणाची भाषा, परिभाषा नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. आजघडीला ३० टक्क्यांपेक्षा जास्त उच्च मध्यमवर्ग या कोणत्याही संवादाच्या कक्षेत येत नाही. त्याची भूमिका स्वकेंद्री आणि वेगळी असल्याचे दिसून येते. त्यात परिवर्तन करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्या दृष्टीनेही काम करावे लागेल, असे त्यांनी सूचित केले.

अध्यक्षीय मनोगतात दशरथ पारेकर यांनी, देशाच्या राजकारणात सेक्युलॅरिझमचे भान हरपले असून जातींचे बळकटीकरण होत चालले आहे, तर राजकारण आणि राजकारणी दिवसेंदिवस खुजे होत चालले आहेत, याविषयी चिंता व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा