( ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ पुस्तकाविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रतिक्रिया...)
डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा चिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांच्या नावातच ‘लोक’ हा शब्द आहे आणि त्यांच्या सहवासातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण ‘लोक’ आहेत. शिवाय, ते संवेदनशील आणि जबाबदार पत्रकार असल्यामुळे त्यांच्या डोक्यात ‘लोक’ म्हणजे ‘people and their problems’ नेहमीच असतात. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’च्या शोधात, त्यांच्या समस्यांमध्ये आलोकना स्वारस्य आहे.
डॉ. आलोक यांच्या या संग्रहात, पहिल्याच लेखात ते निपाणी या आपल्या शहराबद्दल मनापासून लिहिताहेत. सजग जाणीवांचं हे गाव आलोक यांच्या जाणिवा जागृत करणारं गाव आहे. अनेक प्रकारच्या लढ्यांचे केंद्र असलेले गाव, तेथील लढवय्ये लोक, त्यांना भेटलेले आणि त्यांना प्रभावित करणारे शिक्षक, त्यांच्या आठवणी या सर्व गोष्टी आत्मीयतेने या लेखात त्यांनी मांडल्या आहेत.
सांगलीच्या राजवाड्यातील शाळेतील शिक्षिका आणि पुढे कागलच्या राजाच्या शाळेत दाखल झालेल्या आलोक यांच्या आई, त्यांचे इंग्रजीचे अध्यापन, इंग्रजी साहित्याचा अभ्यास आणि विस्तृत वाचन या सर्वांमुळे ‘मी कसा घडलो’ याचे कृतज्ञतापूर्वक वर्णन ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात आहेत. लेखन, वाचन, वक्तृत्व या सर्वच गोष्टींचे धडे आईने त्यांना कसे दिले, याची संपूर्ण हृद्य माहिती ते या लेखात मांडतात. दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे.
डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. लेखसंग्रह अनेक विषयांवरील लेखांचा असला तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा या लेखांना आहेत. या सर्व लेखांना व्यक्तिगत संदर्भ असला तरी तो सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.
डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. लेखसंग्रहातील अनेक लेखांना चिंतनाची बैठक आहे. पत्रकारितेतून कधीकधी डोकावणारा उतावीळपणा, प्रचारकी स्वरूप आलोक यांनी या लेखसंग्रहात येऊ दिलेले नाही.
‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. त्यांना या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच असावे, असे वाटते. Coloured life and Colourful life यावरचे रंगभाष्य या लेखात आहे. या लेखसंग्रहात अनेक व्यक्ती आलेल्या आहेत. नात्यांमधील भावबंध आहेत; पण, एकूणच लेखसंग्रह सामाजिक समावेशकता, विवेक, विचार, संवेदनशीलता या गोष्टी ठळकपणे अधोरेखित करणारा आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरलेले डॉ. आलोक आणि आता विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी असलेले डॉ. आलोक या भूमिकांमुळे हा लेखसंग्रह जबाबदार माणसाने, अत्यंत जबाबदारीने, महत्त्वाच्या विषयांवर गांभीर्याने भाष्य करणारा असा लिहिलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा