मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

संवेदनशील माध्यमकर्मीचे जाणिवासमृद्ध लेखन

('दै. सकाळ'च्या साप्ताहिक 'सप्तरंग' या रविवार विशेष पुरवणीमध्ये 'समाज आणि माध्यमं' व 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकांविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी लिहीलेला परिचयपर लेख...)



शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि लेखक, वक्ते डॉ. आलोक जत्राटकर यांची ‘समाज आणि माध्यमं’ आणि ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. एका संवेदनशील आणि जबाबदार माध्यमकर्मीने केलेले अत्यंत जाणिवासमृद्ध आणि समाजभान विस्तारणारे असे हे लेखन आहे. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’चा शोध व वेध, त्यांचे समस्यासूचन आणि निराकरण यामध्ये त्यांना स्वारस्य आहे. या जाणिवांतूनच ही दोन्ही पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. या पुस्तकांना अनुक्रमे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत, यावरून या दोन्ही पुस्तकांचा दर्जा लक्षात यावा.

डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा मुक्तचिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. विविध विषयांवरील लेख असले तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा त्यांत आहेत. लेखांमधील व्यक्तिगत संदर्भ व्यापक सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.

संग्रहातील पहिल्याच लेखात ते निपाणी या शहराबद्दल, त्याने दिलेल्या संस्काराबद्दल ते आत्मीयतेने लिहितात. ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. ‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच जपावे, असे त्यांना वाटते. डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. यातील लेखांना सजग चिंतनाची बैठक आहे.

डॉ. जत्राटकर यांनी लिहिलेले 'समाज आणि माध्यमं' हे आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो. भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देणारे आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.

माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे. मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया अॅडिक्ट होत चाललेल्या समाजाने विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला हवे. दुभंगलेली माणसे, कुटुंबे, समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यम वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते. पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य केले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, महिला, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचायलाच हवे.

१.      ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे- १२६

किंमत- रु. २५०/-

 

२.      समाज आणि माध्यमं

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

अक्षर दालन, कोल्हापूर

पृष्ठे- १८४

किंमत- रु. ३००/-


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा