उत्क्रांतीनंतरच्या कालखंडात मानवाच्या प्रगतीची सुरवात ही खऱ्या अर्थानं शेतीपासून झाली. सुरक्षिततेसाठी टोळया करून राहणाऱ्या मानवानं उपजिविकेसाठी शेती करण्यास प्रारंभ केला आणि एका वेगळया संस्कृतीची मूळ या पृथ्वीतलावर रुजली. मातीची मशागत करत मानवानं तेथपासून आजतागायत आपल्या प्रगतीचा विस्तार केला. पुढं त्याला औद्योगिकीकरणाची, माहिती तंत्रज्ञान क्रांतीची जोड मिळत गेली असली तरी या सर्व प्रगतीचा मूळ पाया हा शेतीकरणात होता, किंबहुना आजही मानवी जीवनाचा प्रमुख पाया हा शेतीच आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
जमिनीची मशागत करण्याचा शोध लावण्यामागं मानवाची विचारशक्ती ही खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. विचार करण्याची, आपल्या भावभावना वेगवेगळया माध्यमांतून व्यक्त करण्याची, अभिव्यक्त होण्याची शक्ती मानवाला लाभली. त्याचा प्रगत होत जाणारा, अधिकाधिक विचारक्षम होत जाणारा मेंदू हा त्यामागं आहे. या विचारशक्तीच्या, मन:शक्तीच्या बळावर माणसानं साऱ्या पृथ्वीवर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. इतर प्राण्यांना एकतर त्यानं आपला गुलाम केलं किंवा त्यांची निवासस्थानं असलेली अरण्यं प्रगतीच्या नावाखाली गिळंकृत करून त्यांच्या आस्तित्वालाच धक्का पोहोचवला. कित्येक वनस्पती-प्राण्यांच्या स्पेसीज त्यानं आजपर्यंत नष्ट करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
मानवाचं मन हे एक असं प्रकरण आहे की सातत्यानं ते आपल्या प्रगतीसाठी (की स्वार्थासाठी?) सातत्यानं वेगवेगळया क्लृप्त्या शोधण्यात मग्न असतं. मानवी जीवनाच्या इतिहासाच्या सुरवातीपासून पाहिलं तर असं लक्षात येईल की मातीची मशागत सुरू होण्यापूर्वी मानवाच्या मनाच्या मशागतीला सुरवात झाली होती. ही प्रक्रिया आजतागायत अखंडितपणे सुरू आहे. मानवाच्या सो कॉल्ड प्रगतीला त्यानं केलेली मनाची मशागतच पूर्णत: कारणीभूत ठरली आहे. काहीवेळा ही मशागत चुकीच्या मार्गानं गेली आणि मानवी इतिहासाला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडून गेल्या आणि जिथं उत्तम मशागत झाली त्यावेळी अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टी मानवी इतिहासात नोंदल्या गेल्या.
म्हणजेच लौकिकार्थानं मानवी संस्कृतीची सुरवात ही मातीच्या मशागतीपासून सुरू झाली, असं आपण ढोबळ मानानं मानत असलो तरी त्यापूर्वी त्याच्या मनाच्या मशागतीपासूनच, त्याच्या विचार करण्याच्या शक्तीमधूनच त्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग मानव शोधत गेला, चोखाळत गेला, असं म्हणता येईल.
मानवाच्या या प्रगतीला विज्ञानाच्या विविध शोधांनी नवे आयाम प्राप्त करून दिले. औद्योगिकीकरणानं तर त्याच्या आकांक्षांना भरारी मारण्यासाठी नवे पंख दिले. कष्ट करून जीवनाची वाटचाल साध्यासरळ पध्दतीनं करणाऱ्या मानवाला औद्योगिकीकरणानं कमी कष्टात भरपूर सुखं मिळविण्याचा राजमार्ग दाखवला. त्या मार्गानं वेगवान वाटचाल करणाऱ्या मानवानं मग इकडंतिकडं न पाहता केवळ भौतिक सुखांची पाठ धरली. लाइफस्टाइल अधिकाधिक उच्च दर्जाची करण्याकडं त्याचा कल वाढला, अधिकाधिक भौतिक सोयीसुविधा आणि साधनांच्या तो मागं लागला. मानवाला या दिखावटी, कचकडयाच्या दुनियादारीचा मोठा मोह पडला आहे. विवध माध्यमांमधून हीच लाइफस्टाइल खरी आणि योग्य म्हणून या महागडया लाइफस्टाइलचं प्रचंड स्तोम माजवत मार्केटिंग सुरू आहे. या गोष्टी पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या अथवा परवडणाऱ्या आणि न परवडणाऱ्या अशा सर्व प्रकारचे लोक तिचा स्वीकार करत आहेत. स्वीकार न करणारे लोकही तिला प्रतिकार अथवा प्रतिवाद करू शकत नाहीत, इतकी तिचा भुरळ समाजमनावर पडली आहे. अशा गोष्टींच्या मागं लागत असताना मानवतावाद किंवा माणुसकी मात्र मागं पडू लागली आहे, ही खेदाची बाब आहे.
मानवी मन काळाबरोबर प्रगत आणि प्रगल्भ होत गेलं असलं तरी आज या प्रगल्भतेलाही संकुचिततेची एक काळी किनार लाभताना दिसत आहे. माणूस भौतिक अर्थानं कितीही मोठा होत गेला तरी मनानं मात्र आक्रसत असलेला दिसतो आहे. आजचा जमाना शहरीकरणाचा आहे, मात्र शहरात माणसं वाढत चालली असली तरी या शहरांतून माणुसकी मात्र हद्दपार होत चाललेली दिसते. जागतिकीकरणानं या शहरी माणसाला लाइफस्टाइलच्या एका अभेद्य चक्रव्यूहात असं काही बांधून टाकलं आहे की तो अखंडितपणे फिरत राहिला तरी तो भेदणं त्याला शक्य होत नाही. या लाइफस्टाइलच्या नादाता आणि स्वत:च्या व्यापात तो इतका गुंतून गेला आहे की स्वत:चा शेजारी कोण, हेही त्याला माहित नसतं. माहिती तंत्रज्ञानानं जगात मोठी क्रांती झाली. मार्शल मॅक्लुहानच्या म्हणण्यानुसार सारं जग एक खेडं बनलं. सारं जग जवळ आलं, मात्र आपला शेजारी मात्र दुरावला. आता हे दुरावणं शेजाऱ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर मोबाईल क्रांतीनं त्याच्याही पुढची मजल मारली आहे. घरातल्या माणसांतही आज संवाद राहिलेला नाही. मोबाईल कंपन्यांना पैसे देऊन त्यावरून एकमेकांशी तासंतास गप्पा मारणारी मंडळी समोरासमोर आल्यावर हाय-हॅलो च्या पलीकडं सरकू शकत नाहीत, ही या माहिती क्रांतीच्या युगातली सर्वात खेदजनक अशी बाब आहे.
सर्व प्रकारच्या नात्यांना आपण हाताच्या अंतरावर ठेवता ठेवता काही किलोमीटरपर्यंत नेऊन ठेवतो आहोत. कोणालाही कोणाविषयी ऍटेचमेंट राहिली नाही. नात्यांचे बंध-अनुबंध सुटे होत चालले आहेत. एकत्र कुटुंबं तर आता टीव्हीवरच्या मालिकांपुरतीच आणि ती सुध्दा एकमेकांविषयी द्वेषभाव जोपासण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहेत. सर्वच नातीगोती आपण व्यावहारिक पातळीवर नेऊन ठेवली आहेत. आईबापाचं नातंही त्याला अपवाद राहिलेलं नाही. आईबाप जे करतात, ते त्यांचं कर्तव्य असतं. मुलं जन्माला घातली तर ही कर्तव्यं त्यांनी पार पाडायलाच हवीत, अशी भावना आजच्या मुलामुलींमध्ये बळावत चाललेली दिसते. आईवडलांविषयी एवढी कृतज्ञता असेल, तर अन्य नात्यांच्या विषयी बोलायलाच नको? निस्वार्थ मैत्र तर हल्ली पाहायलाच मिळत नाही. मिळालेल्या मोकळिकीला स्वैराचाराचं आणि पुढं व्यभिचाराचं रुप येताना दिसतं आहे. आणि त्याचंही कुणाला काही वाटेनासं झालंय, इतका कोरडेपणा सर्वत्र निर्माण होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकांचा कल देवाकडं वाढू लागलाय, ही चांगली बाब आहे, असं म्हणावं तर त्यातही भक्तीपेक्षा स्वार्थाचाच अधिक वास येतो. धकाधकीच्या जीवनातली वाढती असुरक्षितता ही त्याला सर्वाधिक कारणीभूत असल्याचं दिसतं. गरीबाला जिथं पोट भरण्यासाठी पोटोबाच्या मागं धावावं लागतं, तिथं पोटं भरलेल्या, करू भागलेल्या लोकांनी अशा लोकांनाही आपल्याबरोबर या देवाच्या भजनी लावण्याचा उद्योग चालवलाय. या जाळयात सारेच सापडू लागलेत. प्रसारमाध्यमंही अशा प्रवृत्तींचं उदात्तीकरण करू लागली आहेत. त्यामुळं डोळे झाकून अशा लोकांचं अनुकरण करणाऱ्याचं प्रमाणही वाढीस लागलं आहे.
अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आपली डोकी गहाण ठेवली आहेत की काय, असा प्रश्न भेडसावू लागला आहे. माणसानं सुरवातीच्या टप्प्यापासून आपल्या मनाची जी मशागत केली होती, ती मनाची जमीन क्षारपड होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुसऱ्यांच्या चकचकीत मानसिक गुलामगिरीच्या मॉलमधला माल उसना घेण्यापेक्षा आपल्या मनाच्या जमिनीवर सातत्यानं विचार करून जितकं मिळेल तितकं पीक आपण घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर ही प्रक्रिया सुरू झाली तरच तिला एखादेवेळेस सामूहिक, सामाजिक शक्तीचं स्वरुप प्राप्त होईल. अन्यथा ज्या चाकोरी मोडत, उध्वस्त करत आपण वाटचाल करत इथवर आलो आहोत, पुन्हा त्या चाकोरीमध्ये बांधून टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवाच्या सर्वच पातळीवरील प्रगतीच्या वाटा त्यामुळं अधिक व्यापक होतीलच शिवाय त्या वाटचालीला एक ठोस असं अधिष्ठान प्राप्त होईल.
माती हाच शेतीचा जीव की प्राण. पण माणसाच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्तीमुळं मातीचा कस कमी होत चालला आहे आणि मातीशी नातं सांगमारी माणसंही कमी होत चालली आहेत. मातीचा कस आणि तिच्याशी इमान कायम राखण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढं आहे. हावरटपणामुळं मातीचा कस जसा कमी होत आहे, तशी नातीसुध्दा दुरावत चालली आहेत. मातीचं आणि नात्यांचं सारखंच आहे. अधिकारांविषयी आपण फार जागरूकता दाखवतो; कर्तव्यांना मात्र सोयीस्कररित्या विसरतो. जमिनीतून वारेमाप पीक घेताना तिला योग्य त्या प्रमाणात आणि योग्य ते घटकही परत द्यावे लागतात. पण आपण ते देत नाही. तसंच नात्यांच्या व्यवहारात आपण फक्त अधिकार जाणतो, कर्तव्यच विसरतो. हीच सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून आता दोन्ही ठिकाणी नव्यानं खतपाणी आणि मशागतीची आवश्यकता आहे.
अप्रतिम...
उत्तर द्याहटवा