शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स


जपान बँक फॉर इंटरनॅशनल कॉ-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेच्या मदतीने अजिंठा येथे पर्यटनाच्या वृध्दीसाठी व पर्यटकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प टुरिस्ट कॉम्प्लेक्सच्या रुपाने साकार होत आहे. या प्रकल्पाविषयी...

बौध्द धर्म... इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भगवान बुध्दाने शांती, करूणा, अहिंसेचा दाखविलेला मार्ग... भारताने जगाला दिलेली एक महान देणगी... आज व्हिएतनाम, जपान, श्रीलंका, नेपाळ, तिबेट, भूतान, दक्षिण कोरिया, तैवान, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, चीन अशा अनेक देशांनी या मार्गाचा अंगिकार केला... जगभरात बुध्दाचे अनुयायी 33 कोटीच्या घरात आहेत... पण मधल्या काळात उद्गात्या भारतातच बौध्द धर्माने अस्ताचल पाहिला... मुस्लीम चढाया, हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन... कारणे काही असोत, बौध्द धर्माची पीछेहाट झाली. धर्माचा प्रसार कमी झाला तरी एके काळी अत्यंत भरभराट पाहिलेल्या या धर्माच्या भिक्षूंनी, अनुयायांनी, प्रचारकांनी धर्मप्रसारासाठी केलेले प्रयत्न आजही साहित्य, चित्रे, कलाकृती वा भग्नावशेषांच्या रुपात का असेना पाहता येतात... या धर्माच्या तत्कालीन लोकप्रियतेची जाणीव आपल्याला नक्कीच होते. या धर्माचा अमूल्य ठेवा आपल्या महाराष्ट्रात अजिंठा, वेरुळ, घारापुरी, औरंगाबाद येथे लेण्यांच्या स्वरुपात उभा आहे.
अजिंठा हा तर केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक दर्जाचा प्राचीन वारसा असल्याचे युनेस्कोनेही जाहीर केले आहे. अशा या ठिकाणाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील बौध्द अनुयायी अत्यंत भाविकतेने येत असतात. त्यामध्ये जपानी अनुयायांची संख्याही लक्षणीय असते. जपानच्या जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेने अजिंठा-वेरुळचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व जाणूनच त्याच्या जतनासाठी पुढाकार घेतला आणि भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयास 7331 दशलक्ष येन इतक्या खर्चाचा प्रस्तावही सादर केला. हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांना एक्झिक्युटीव्ह एजन्सी नेमण्यात आले. जेबीआयसीमार्फत देण्यात येणारा काही निधी पुरातत्त्व खात्याकडेही जतनाच्या कार्यासाठी देण्यात आला असून अन्य निधीच्या माध्यमातून अजिंठयानजीक अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स व व्हिजिटर सेंटर साकार करण्यात येत आहे.
अजिंठयाच्या पायथ्याशी टी-जंक्शन येथे सध्या एल ऍन्ड टी कंपनीतर्फे भव्यदिव्य असे टुरिस्ट कॉम्प्लेक्स उभे राहात आहे. सुमारे 56 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे स्वरुप अत्यंत भव्य, देखणे व आकर्षक असे आहे. पाच म्युझियम, चार गुहांच्या प्रतिकृती, सायक्लोरामा, ऍंम्फी थिएटर, स्टडी सेंटर, रेस्टॉरंट अशा अनेक अभिनव गोष्टींचा या प्रकल्पात समावेश आहे. सुमारे 45 हजार चौरस मीटरच्या लँडस्केप जागेवर 15 हजार चौरस मीटरवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. सुमारे 55 हजार घनमीटर इतका दगड खोदल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाचा ढाचा उभा राहिला असून लवकरच काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पातील सायक्लोरामा ही एक अभिनव अशी संकल्पना आहे. यामध्ये एक दुमजली घुमटाकार इमारत आहे. त्या घुमटावर भगवान बुध्दाच्या चरित्रातील प्रसंग, जातक कथा, अजिंठा-वेरुळच्या गुहांची माहिती, भारतीय कला-संस्कृती आदी विविध विषयांबाबत अत्याधुनिक ऑडिओव्हिज्युअल तंत्रज्ञानाच्या साह्याने सातत्याने प्रदर्शन केले जाणार आहे. ते पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना बसण्यासाठीही आरामदायी आसनव्यवस्था असेल.
अजिंठा येथील गुहा क्र.1, 2, 16 व 17 या चार गुहांच्या प्रतिकृती हा तर या प्रकल्पाच्या ठळक आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. या गुहांचे अंतर्गत व बाह्य स्वरुप, त्यांची रचना, बुध्दमूर्तींसह अन्य शिल्पाकृती, चित्रकृती, ध्यानगृह, निद्रागृह आदी सर्व गोष्टी अगदी हुबेहुब साकारण्यात येणार आहेत. या गुहांतील खांबांवर हेडफोन बसविण्यात आलेले असतील. त्याठिकाणी जगातल्या प्रत्येक प्रमुख भाषेत तत्कालीन इतिहास व माहिती ऐकविण्याची व्यवस्था करण्यात येईल. पाच संग्रहालयांत बौध्द तसेच अन्य पुरातन भारतीय साहित्य, कला आदींची माहिती देणारे विभाग असतील. गॅलरी, एक्झिबिशन सेंटर, मल्टिमिडिया ऑडिटोरिया, गाईड पोस्ट, कल्चरल प्लाझा आदींचा यामध्ये समावेश आहे. देशी परदेशी अभ्यासकांना तेथे संशोधन करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. खुल्या ऍम्फी थिएटरमध्येही संध्याकाळच्या वेळी विविध मनोरंजनाचे व स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम करता येतील.
याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी एक प्रशस्त रेस्टॉरंट, शॉपिंग कोर्ट, बैठक व्यवस्थेसह सज्ज कॉरिडॉर, उद्यान, ऍडल्ट्स व किड्स ओरिएंटेशन, एस्केलेटर, लिफ्ट्स अशा सुविधा असतील. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या कॉरिडॉरमध्ये विविध सुविधा पुरविणाऱ्या दुकानांसाठी गाळयांचीही व्यवस्था आहे. या संपूर्ण बांधकामाला प्राचीन काळाच्या बांधकामाचा लूक देण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात गुहांचे डिझाईन, पेंटिंग आदी जिकीरीची कामे करण्यात येणार आहेत. या केंद्राच्या रुपाने अजिंठयाच्या पायथ्याशी एक आकर्षक पर्यटनस्थळ साकार होत आहे, एवढे निश्चित!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा