गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

अनमोल अजिंठा


प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून साऱ्या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...

कोणत्याही गोष्टीची एक वेळ यावी लागते, असं म्हणतात. त्यावर विश्वास बसावा, अशी माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट म्हणजे माझी अजिंठा लेण्यांना भेट. बी.एस्सी. एफ. वाय.च्या सहलीपासून म्हणजे साधारण 1995पासून एप्रिल 2008पर्यंत अशा सुमारे तेरा वर्षांच्या काळात अजिंठा-वेरूळ लेण्यांना भेट देता येईल, अशा अनेक संधी माझ्याकडे चालून येत होत्या. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं योग जुळून येत नव्हता. या काळात औरंगाबादलाही कितीतरी वेळा गेलो पण परिसरातील प्राचीन कला-संस्कृतीच्या या अनमोल खजिन्याचं दर्शन मी घेऊ शकलेलो नव्हतो. मात्र लोकराज्य पर्यटन विशेषांकाच्या निमित्तानं ही बहुप्रतिक्षित व बहुप्रलंबित संधी मी घेण्याचं ठरवलं. याला आणखीही एक महत्त्वाचं कारण होतं ते हे की अजिंठयाला मी प्रथमच जाणार असल्यानं तिथल्या सर्वच गोष्टी माझ्यासाठी नवीन असणार होत्या, तिथल्या प्रत्येक गोष्टीचं मला अप्रूप असणार होतं आणि या दृष्टीनंच मी तिथल्या प्रत्येक कलाकृतीकडं पाहू शकणार होतो, तिचा आस्वाद घेऊ शकणार होतो आणि जमेल तितकं, जमेल तसं वाचकांना सांगू शकणार होतो. माझ्या दृष्टीनं ही जमेची बाजू होती.

या अजिंठा भेटीच्या निमित्तानं आणखीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे अजिंठयाला जोडून नेहमीच वेरूळचं नाव येत असल्यानं (अजिंठा-वेरूळ असं) अत्यंत धावपळीत या ठिकाणांना भेट देऊन जाणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या मनात या दोन्ही लेण्यांबद्दल संभ्रम आढळतो. औरंगाबादला गेलेल्या माझ्या काही मित्रांनी अजिंठयापेक्षा तुलनेत जवळ असलेल्या वेरूळ लेण्या पाहिल्या होत्या. मी अजिंठयाला जातोय असं समजल्यावर त्यांनी मला कैलास लेण्यांपासून अन्य काही लेण्यांमध्ये छायाचित्र काढण्यासारखं काय काय आहे, याची माहिती दिली होती. साहजिकच ती माझ्या (निदान आता तरी) उपयोगाची नव्हती. अजिंठयाची माहिती काढत असताना ही गोष्ट माझ्या लक्षात आली, तेव्हाच मी ठरवलं की यावेळी आपण फक्त अजिंठा एके अजिंठाच पाहायचा. वेरूळ फिर कभी देखा जाए।

युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून 107 किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचावरील घोडयाच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठयाच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठयापर्यंतच्या दोन-अडीच तासांच्या प्रवासात मी प्रत्येक डोंगराकडे पाहायचो, कुठे एखादी लेणी दिसत्येय का म्हणून. पण अजिंठयाच्या कर्त्या-करवित्यांनी माझी पूर्ण निराशा केली. टी- जंक्शनपासून अजिंठयाच्या डोंगरावर एमटीडीसीच्या एसी-बसने गेलो तरी एखादा कोरीव दगडही दिसला नाही. तिथून काँक्रीटच्या बांधीव रस्त्यावरुन वर चढून गेलो अन् एका क्षणात साऱ्या लेण्या दृष्टीपथात आल्या. त्याच जागी कित्येक वेळ उभा राहून ते शेकडो वर्षांपूर्वीचं देखणं कोरीव रुप मी मनात साठवत राहिलो आणि थोडया वेळानं कॅमेऱ्यात. त्याक्षणी मी ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन यालाही शतश: धन्यवाद दिले कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं या परिसरात आला असताना त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौध्द लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं मला खरंच कौतुक वाटलं. बौध्द भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण असतं. अंधाऱ्या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.
या तीस लेण्यांपैकी 9, 10, 19, 26 व 29 या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बौध्द धर्माच्या हीनयानपंथाच्या काळात झाली. यामध्ये 9, 10 या चैत्यगृहांसह 12, 13 व 15 अ या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुध्दप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर 19 क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुध्दप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुध्दप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणि केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.
बुध्दाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास 26 व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.
पहिल्या गुहेतील भगवान बुध्दाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहऱ्यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहऱ्यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहऱ्यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच.
याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं. याठिकाणी एक सांगावसं वाटतं ते म्हणजे 14-15 व्या शतकात मायकेल एंजेलोनं चित्रकलेत द्विमितीचा आभास निर्माण केला आणि तो महान ठरला. त्याच्याही आधी आठशे वर्षे अशा कलाकृती निर्माण करणारे ते अज्ञात कलाकार किती महान असतील!
पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहे. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वाऱ्याच्या झुळुकीसरशी फडफडणाऱ्या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृध्द व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते. आज आपल्याकडे साहेबाच्या पोशाखावरुन ज्या रंगाची पँट, त्या रंगाचे मोजे घालावेत, असा संकेत रूढ झालाय, पण इथल्या चित्रांवरुन त्या काळात ज्या रंगाचा फेटा, त्या रंगाचे मोजे घालावेत, इतकी पोषाखी टापटीप सांभाळल्याचं दिसतं. बहुरंगी, बहुआयामी मानवी प्रवृत्तीचं दर्शन इथल्या विविध जातक कथा घडवतातच, त्याचबरोबर कलियुगाविषयी भाष्य करायलाही इथली शिल्पं कमी पडत नाहीत. पत्नीचे पाय चेपणारा पती हे शिल्प याचंच द्योतक.
बौध्द लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुध्दांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील 24 फुटी बुध्द मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत. केवळ एका संपूर्ण दिवसातच अजिंठयाविषयी सांगण्या-बोलण्यासारखं इतकं काही मला मिळालं की कितीही लिहीलं तरी शब्द तोकडे पडतील. संध्याकाळी परतताना वाटत होतं की अजूनही या शिल्पचित्रांकडून पुष्कळ काही समजून घ्यायचं, पाहायचं राहून गेलंय. माझी रितेपणाची ही भावना लिहीताना अजिंठयाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांना मला एकच सांगायचंय, ते म्हणजे अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठया आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते. या शिल्प-चित्रांना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी जिवाचे रान करत आहेत. या कामगिरीत आपणही असा हातभार नको का लावायला?

--

अजिंठा येथील गुहांची यादी

पहिला टप्पा : ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तपूर्व पहिले शतक लेणी क्र. 9 व 10 : चैत्यगृह लेणी क्र. 12, 13 व 15 अ : विहार
दुसरा टप्पा : इसवी सन 5 ते 6वे शतक लेणी क्र. 19, 26, 29 : चैत्यगृह लेणी क्र. 1 ते 7, 11, 14 ते 18, 20 ते 25, 27 व 28 : विहार
अपूर्ण लेणी : 3, 5, 8, 23 ते 25, 28 व 2
--
कसे जावे अजिंठयाला?
मुंबई- अजिंठा अंतर : जळगावमार्गे 491 कि.मी., मनमाडमार्गे 487 कि.मी. व पुणेमार्गे 499 कि.मी.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने औरंगाबाद व जळगाव येथून साध्या व लक्झरी गाडयांची सोय, अन्य खाजगी टूर ऑपरेटर कंपन्यांतर्फेही मुबलक वाहन सुविधा उपलब्ध.
नजीकचे रेल्वे स्थानक : मध्य रेल्वेचे जळगाव स्थानक (58 कि.मी.), औरंगाबाद (107 कि.मी.)
नजीकचे विमानतळ : औरंगाबाद 108 कि.मी.
राहण्याची सुविधा : अजिंठा, फर्दापूर तसेच औरंगाबाद येथे एमटीडीसीची पर्यटक निवासस्थाने व हॉटेल्स आहेत. औरंगाबाद येथे आयटीडीसीचेही निवासस्थान. त्याखेरीज औरंगाबाद, जळगाव येथे अनेक खाजगी हॉटेल्स, लॉज उपलब्ध.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा