(सोबतचा लेख म्हणजे माझ्या गेल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीबाबत माझ्या मनात उमटलेले तरंग आहेत. ते शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणाला त्यामध्ये 'मी' डोकावल्यासारखा वाटेल. माझ्याच कारकीर्दीचा धावता आढावा असल्यामुळं ते साहजिकही आहे. पण हे 'मी'पण कुणावरही लादण्याचा अथवा कुणाला काही पटवण्याचाही प्रयत्न नाही. यात काही मित्रांची नावं आहेत, पण कित्येकांची नाहीत. याचा अर्थ त्यांचं सहकार्य, मार्गदर्शन मी नाकारतोय, असा मुळीच नाही. सुचेल तसं लिहीत गेल्यामुळं आणि विस्तारभयास्तवच ही नावं देता येऊ शकली नाहीयेत, इतकंच! माझ्या मनात कुणाबद्दलही काही खंत-खेद अथवा राग-द्वेष नाही. तुमचं प्रेम माझ्यावर आहेच, यापुढंही ते अबाधित राहील, याची मला खात्री आहे.- आलोक जत्राटकर)
कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव पदावर रुजू होण्यासाठी म्हणून गेल्या 31 जुलैला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून (डीजीआयपीआर) कार्यमुक्त झालो. त्यानंतर मंत्रालयातून बाहेर पडताना माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना इ-मेल आणि फेसबुकवर निरोपाचा संदेश टाकला. त्या क्षणापासून मित्र-मैत्रिणींचे अत्यंत भावपूर्ण असे शुभेच्छा संदेश येण्यास सुरवात झाली. महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूरच्या दिशेनं धावू लागली आणि मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक एसएमएस आणि इ-मेलगणिक माझं मन मागं मागं जाऊ लागलं.
जुलै 2006मध्ये 'डीजीआयपीआर'मध्ये माझी सहाय्यक संचालक (माहिती) या पदावर निवड झाल्याचं पत्र मिळालं, तेव्हा मी 'कोल्हापूर सकाळ'मध्ये उपसंपादक होतो. 'सकाळ'मध्ये चांगला रमलो होतो, सर्व प्रकारची जबाबदारी सांभाळत होतो. दिलीप लोंढे, संजय पाटोळे यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळं पत्रकारितेमधील एलेव्हन्थ अवर आव्हानांचा सामना करण्याचा आत्मविश्वासही आला होता. त्याचवेळी सामोऱ्या चालून आलेल्या या संधीमुळं थोडासा द्विधा मनःस्थितीत होतो. पण राज्य शासनात काम करण्याची नवीन संधी मिळते आहे, तर ती घेतली पाहिजे, असं सर्वांचंच मत पडलं आणि 9 जुलै 2006 रोजी माझे 'सकाळ'मधील सहकारी रवींद्र राऊत आणि विशाल ढगे यांच्यासोबत मुंबईत दाखल झालो. मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या अवमानावरुन त्याच दिवशी दादरमध्ये पेटलेल्या दंगलीनं आमचं स्वागत केलं. त्यावेळी रवीचा मोठा भाऊ आमच्या मदतीला धावला. त्यानं गिरगावमध्ये एका सुरक्षित लॉजमध्ये आम्हाला नेलं. आमची भिती मोडण्यासाठी त्याच संध्याकाळी तिथून हाजीअलीपर्यंत कम्पलसरी पदयात्रा घडवली. त्यावेळी आमची भीड थोडीशी चेपली.
दुसऱ्या दिवशी, १० जुलै २००६ रोजी सकाळी आम्ही सारे 'डीजीआयपीआर'मध्ये जॉइनिंग देण्यासाठी दाखल झालो. जॉइनिंग दिलं की सोडतील, असं आम्हाला वाटलं होतं. पण तिथं थेट आमच्या ट्रेनिंग सेशनला सुरवात झाली. महासंचालक मनिषा म्हैसकर, संचालक प्रल्हाद जाधव आणि श्रद्धा बेलसरे, उपसंचालक देवेंद्र भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र सुरू झालं. आणि दुसऱ्या दिवशी ११ जुलै रोजी संध्याकाळी माधवाश्रमाकडं परतत असताना दुसरा जोरदार दणका आम्हा सर्वांना बसला. वेस्टर्न रेल्वे लाइनवर लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली, ज्यात कित्येक निष्पाप जीवांना नाहक प्राण गमवावे लागले. मुंबईत नव्यानंच आलेल्या आम्हा सर्वांचं मॉरलच या दुर्घटनेमुळं खच्ची झालं. मोबाइल नेटवर्क जॅम झाल्यामुळं घरच्यांशी संपर्क नाही, कुठं बाहेर जेवायला जायचे वांधे आणि बाहेर अस्ताव्यस्त पसरलेले गर्दीचे लोंढे, यामुळं आमच्यातला प्रत्येकजणच मनात अस्वस्थ होता. आता घरी परत गेल्यावर कोणी परत येईल की नाही, अशीही शक्यता वाटू लागली- इतकं भीतीनं मन व्यापलं होतं.
पण दुसऱ्या दिवसापासून आमच्या बॅचमधला प्रत्येकजण शासनाच्या क्राइसिस मॅनेजमेंट यंत्रणेचा भाग बनला. पत्रकारितेतला अनुभव पणाला लावून प्रत्येकानं यावेळी काम केलं. 'दोन मिनिटे श्रद्धांजलीची!' ही मोहीम यशस्वी झाली. संपूर्ण मुंबई शहरानं आपलं कामकाज दोन मिनिटं थांबवून बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यानच्या काळात 13 जुलै 2006 रोजी आमच्या पोस्टिंगची ऑर्डर निघाली. मला न्यूज सेक्शनमध्ये देण्यात आलं. मला बरं वाटलं. म्हटलं, आपला मूळचा एडिटिंगचाच जॉब इथं करता येऊ शकेल. पण साधारण महिनाभरातच पुन्हा झालेल्या फेररचनेमध्ये मला डीएलओ (विभागीय संपर्क अधिकारी) पदाची जबाबदारी देण्यात आली. माझ्याकडं उद्योग, ऊर्जा, वस्त्रोद्योग, रोजगार आणि स्वयंरोजगार या विभागांची जबाबदारी होती. उद्योग आणि ऊर्जा हे विषय त्यावेळी एकदम हॉट होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उद्योगमंत्री अशोक चव्हाण, उद्योग सचिव व्ही.के. जयरथ, त्यांचे ओएसडी चंद्रहास चारेकर आणि प्रमोद राठोड त्याचप्रमाणं एमआयडीसीचे सीईओ राजीव जलोटा ही टीम एकदम ॲक्टीव्ह होती. नवीन विशाल प्रकल्प धोरण, 2006मध्ये नव्यानं आखण्यात आलेलं नवीन औद्योगिक व गुंतवणूक धोरण आणि अतिशय चर्चेत असलेलं सेझ धोरण यांचं वारं वाहात होतं. उद्योग विभागाची नवीनच जबाबदारी माझ्यावर असली तरी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जयरथ साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर अतिशय मोठा विश्वास दाखवला. आणि त्यानंतरच्या काळात सुमारे 1 लाख 32 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या साधारण 40 ते 45 प्रकल्पांच्या सामंजस्य करारांच्या कार्यक्रमांचं नियोजन, समन्वयन आणि वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली. ही संधी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली कारण या नियोजनाच्या निमित्तानं मुंबईतल्या सर्व महत्त्वाच्या पत्रकार मित्रांशी माझा जवळ जवळ दैनंदिन संपर्क प्रस्थापित झाला आणि तेव्हापासून निर्माण झालेला हा जिव्हाळा आजतागायत कायम आहे.
ऊर्जा विभागाचे मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा अत्यंत कार्यक्षम! परंतु, त्यावेळी राज्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळं विरोधक अतिशय आक्रमक झालेले होते. त्यावेळी मंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, वीज कंपन्या, एमईआरसी या सर्व घटकांशी सातत्यानं संपर्कात राहून वीजेच्या संदर्भात सातत्यानं होत असलेल्या बैठका आणि वीज निर्मितीसाठीचे राज्याचे प्रयत्न या बाबतीतही अतिशय प्रामाणिक मांडणी आणि वार्तांकन करण्याचा मी प्रयत्न केला. 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' या कार्यक्रमांसाठीही मी माझ्या परीनं योगदान दिलं. 'दिलखुलास'मध्ये तत्कालीन अपारंपरिक ऊर्जा मंत्री विनय कोरे यांच्या रुपानं मंत्री महोदयांची पहिली मुलाखत घडवून आणता आली, या गोष्टीची नोंद मला इथं आवर्जून घ्यावीशी वाटते. तत्पूर्वी, या कार्यक्रमात सचिवांच्या व अन्य मान्यवरांच्या मुलाखती होत होत्या.
त्यावेळचे वस्त्रोद्योग सचिव श्री. सिन्हा साहेब आणि रोजगार व स्वयंरोजगार सचिव गोरख मेघ यांचंही मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं. कधीही त्यांच्याकडं गेलो की, अतिशय आपुलकीनं विचारपूस करणारे आणि वेळ असला तर आवर्जून विविध विषयांवर खास गप्पा मारण्यासाठी बोलावणारे असे आयएएस अधिकारी मला लाभले, ही फार मोठी गोष्ट होती.
डीएलओ सेक्शनमध्ये असतानाच मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांचा महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी तसंच अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अमेरिका दौरा ठरला. त्या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी 'एमआयडीसी'मध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता. महासंचालक मनिषा म्हैसकर आणि संचालक प्रल्हाद जाधव यांनी या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी समन्वयक म्हणून माझी नियुक्ती केली. दौऱ्याच्या बातम्या आणि छायाचित्रे यांना तत्काळ राज्यभर प्रसिद्धी देण्यासाठी मी माझ्या परीनं शंभर टक्के प्रयत्न केले. याच दौऱ्यात त्यांनी बिल गेट्स यांच्या मुख्यालयाला भेट दिली होती. ती छायाचित्रं तर जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. मुख्यमंत्री महोदय दौऱ्यावरुन परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यभरात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा बाऊंड अहवाल त्यांना सादर करण्यासाठी म्हैसकर मॅडम आणि मी त्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनात गेलो. मुख्यमंत्र्यांनी सर्व अहवालांवरुन नजर फिरवली आणि इतकी जोरदार प्रसिद्धी यापूर्वी कधीही झाली नव्हती, असे प्रशंसोद्गार काढले, म्हैसकर मॅडमचं अभिनंदन केलं. तेथून बाहेर पडताना मॅडमनी माझ्या पाठीवरही शाबासकीची थाप दिली. ही शाबासकी आणखी चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करणारी ठरली.
पुढं आणखी एकदा मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे दाव्होस (स्वित्झर्लंड) इथं होणाऱ्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' या जागतिक महत्त्वाच्या परिषदेसाठी आणि जर्मनीतील महत्त्वाच्या उद्योग समूहांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर गेले होते. या परिषदेच्या वार्तांकनाचं समन्वयन आणि 'लोकराज्य'च्या विशेषांकाचं नियोजन करण्याची जबाबदारीही म्हैसकर मॅडमनी माझ्यावर सोपविली होती. या विशेषांकासाठी राजीव जलोटा यांची मुलाखत घेण्यासाठी म्हणून मी त्यांच्याबरोबर त्यांच्या मोटारीतून मुंबई ते पुणे असा प्रवास केला.
'लोकराज्य टीम'चा एक महत्त्वाचा घटक असलेला अभिजीत कुलकर्णी त्याचवेळी मिडियात परत जाण्यासाठी म्हणून बाहेर पडला. त्याच्या जागी 'लोकराज्य टीम'चा घटक होण्याची संधी मला मॅडमनी दिली. साधारण सात महिन्यांच्या या कालावधीत पर्यावरण, उद्योग आणि ऊर्जा अशा विशेषांकाच्या निर्मितीमध्ये मला योगदान देता आलं. या अंकांच्या पेजिनेशनच्या निमित्तानं अंधेरी इथल्या 'कालनिर्णय'मधील सहकाऱ्यांशीही चांगलं मैत्र प्रस्थापित झालं.
याचवेळी म्हैसकर मॅडमच्या मनात विभागाचं 'महान्यूज' नावाचं एक वेब पोर्टल तयार करण्याची कल्पना घोळत होती. त्यासाठी त्यांनी डॉ. गणेश मुळे, डॉ. किरण मोघे, मनिषा पिंगळे, देशपांडे मॅडम अशा सिन्सिअर अधिकाऱ्यांची निवड करून त्यांना खास मुख्यालयात पाचारण केलं होतं. थोड्याच दिवसांत माझाही या टीममध्ये समावेश केला गेला. बी.के. झवर, नंदू वाघमारे, संतोष तोडकर, प्रमोद धोंगडे, अंजू कांबळे, आर्टिस्ट सुनिल, संजय ओरके, जक्कल हे सुद्धा या टीमचे घटक झाले. साऱ्यांनी अतिशय झपाटल्यासारखं काम केलं आणि चार महिन्यांत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 'वर्षा' बंगल्यावर अगदी डिजिटल पद्धतीनं या वेबसाइटचं प्रकाशन झालं. सर्वच स्तरांतून पोर्टलचं स्वागत झालं. त्यामुळं दर्जा टिकवून ठेवण्याचं आव्हान आम्हा सर्वांसमोर होतं. दररोज दुपारी तीन वाजता बेलसरे मॅडमच्या केबीनमध्ये म्हैसकर मॅडम स्वतः आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन घ्यायच्या, नियोजन करायच्या. पुन्हा पाच वाजता अंतिम आढावा घेतला जायचा. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या हिट्सनी आमचा आत्मविश्वासही वाढला आणि 'महान्यूज'ही चांगल्या पद्धतीनं एस्टॅब्लिश झालं.
दि. 26-11-2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. मुंबई पोलिसांच्या शौर्यानं आणि बलिदानामुळं कसाबच्या रुपानं दहशतवादाचा चेहरा प्रथमच जगासमोर आला. त्यावेळी तातडीची गरज म्हणून म्हैसकर मॅडमनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी 'डीजीआयपीआर'चा विशेष प्रेस ब्रिफिंग सेल नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान तयार केला आणि त्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. मुंबईमध्येही हा सेल कंटिन्यू झाला. कल्याणहून पहाटे 3.35 वाजताची पहिली ट्रेन पकडून सीएसटी स्टेशनला पोहचणं, पेपरचा गठ्ठा घेऊन रायडरच्या मागं मोटारसायकलवर बसून 5.55 वाजता मंत्रालयात दाखल होणं आणि सव्वासात वाजता प्रेस कटिंग वर्षा बंगल्यावर पोहोचवणं, अशी अतिशय महत्त्वाची कामगिरी मी सहा महिन्यांहून अधिक काळ पाहात होतो. हाही एक वेगळा आणि जबाबदारीचा अनुभव महासंचालनालयात मला घेता आला.
दि. 2 जुलै 2009 रोजी म्हैसकर मॅडमची मुंबई महानगरपालिकेच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्याच सायंकाळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून माझीही नियुक्ती झाल्याचा आदेश मला प्राप्त झाला. निवृत्त जनसंपर्क अधिकारी वसंत पिटके आणि तत्कालीन जनसंपर्क अधिकारी रंगनाथ चोरमुले यांच्या मार्गदर्शनाखाली माझं उपमुख्यमंत्री कार्यालयातलं काम सुरू झालं. पीएस मलिकनेर, ओएसडी सतिश सोनी (आपल्या सबॉर्डिनेट अधिकाऱ्याच्या प्रमोशनबद्दल संपूर्ण स्टाफला पार्टी देणारा हा अधिकारी शासकीय यंत्रणेमधला अतिशय कॉ-ऑपरेटिव्ह व्यक्ती आहे. कुणी काहीही काम घेऊन येवो, रिक्त हातानं कधी तो परत जाणार नाही. कुणालाही परोपरीनं मदत करण्याची वृत्ती यांच्या नसानसात भिनलेली आहे.) आणि संदीप बेडसे या अधिकाऱ्यांनीही मला सातत्यानं मार्गदर्शन केलं. पत्रकार मित्रांशी तोपर्यंत माझा चांगला संपर्क प्रस्थापित झाला होताच, त्यामुळं इथंही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा जनसंपर्क सांभाळताना फारशी अडचण उद्भवली नाही. बातम्या पाठविण्यासाठी जास्तीत जास्त इमेलचा वापर, कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी एसएमएस आणि ऑनलाइन छायाचित्रे आणि बातम्या उपलब्ध करण्यासाठी ब्लॉग अशा प्रकारे इंटरनेट सुविधेचा पुरेपूर वापर करण्यास सुरवात केली. त्याचं पत्रकार मित्रांनी स्वागतही केलं.
पुढं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले. भुजबळ साहेबांवर सार्वजनिक बांधकाम व पर्यटन या विभागांच्या मंत्रीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यावेळी भुजबळ साहेबांनी मला 'रामटेक'वर बोलावलं, आणि एक वाक्य उच्चारलं. ते म्हणाले, 'तू माझ्यासोबत काम करावंस, अशी माझी इच्छा आहे.' पिटके साहेब आणि हरि नरके सर साक्षीदार आहेत, या प्रसंगाचे! 'तू माझ्याबरोबर काम कर रे', असा आदेशही ते देऊ शकले असते, पण त्यांच्या या अतिशय सौहार्दपूर्ण वाक्यानं मी हेलावलो. मी तसा कोण होतो त्यांच्यासमोर? चाळीस वर्षांहून अधिक- अतिशय संस्मरणीय आणि वादळी राजकीय कारकीर्द असलेल्या भुजबळ साहेबांसमोर तसं माझं काय मोठं आस्तित्व होतं? जेमतेम सहा वर्षांची पत्रकारितेतली आणि चार वर्षांची शासनातली नोकरी. पण त्यांच्या सन्मानपूर्वक बोलण्यामुळं मी त्यांना होकार दिला. खोटं सांगत नाही, दुसऱ्या दिवशी 'रामटेक'वर जेव्हा पर्यटन सचिव, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, सह-व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक झाली, त्यावेळी 'एमटीडीसी'वर व्यवस्थापक (जनसंपर्क) या पदावर माझी नियुक्ती करण्याबाबतच्या पत्रावर साहेबांनी पहिली सही केली. 'एमटीडीसी'तही तत्कालीन एमडी किरण कुरुंदकर, जॉइंट एमडी अविनाश ढाकणे, दिलीप शिंदे यांच्याबरोबरच सध्याचे एमडी जगदीश पाटील, महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनीही मला वेळोवेळी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं.
भुजबळ साहेबांसोबत काम करताना खूप मजा आली. रात्री बारा बारा वाजेपर्यंत कित्येकदा भाषणं करत बसलो मंत्रालयात. पण त्यावेळीही ऑफिसबाहेर पडताना एक उत्तम भाषण आपल्या हातून तयार झाल्याचं समाधान असायचं. भुजबळांसारख्या वक्तृत्वावर प्रचंड प्रभुत्व असणाऱ्या मुलुखमैदानी तोफेला शब्दरुपी दारुगोळ्याची रसद पुरवण्याची संधी मला मिळाली आणि माझे शब्द त्यांच्यासारख्या मास-लीडरच्या तोंडून लाखोंच्या जनसमुदायाला नादावून सोडताहेत, हे दृश्य कित्येकदा पाहण्याचं भाग्य मला मिळालं. जे एरव्ही कदापिही शक्य नव्हतं, ते या शासकीय नोकरीमुळं शक्य झालं. भुजबळ साहेबांशी कामाचं ट्युनिंगही खूप उत्तम प्रकारे जमलं होतं. एखाद्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर केवळ 'जत्राटकर' असं लिहून खाली सही करून ती माझ्याकडं आली, की त्याचं काय करायचं ते मला क्लिअर व्हायचं. अगदी महत्त्वाचा विषय असला की मी त्यांना काय मुद्दे अपेक्षित आहेत, त्याची चर्चा करायचो आणि त्यांच्या सूचनेनुरुप भाषण तयार करायचो. कित्येकदा वेळेअभावी सभेच्या मंचावर गेल्यावरच साहेबांना भाषणाची कॉपी वाचायला मिळायची आणि ते डायरेक्ट भाषण करायचे. इतका त्यांचा विश्वास माझ्यावर होता. भुजबळ साहेबांचा हा विश्वास मला जिंकता आला आणि त्याला कधीही धक्का देण्याचं काम माझ्याकडून झालं नाही. ही त्यांच्यासोबतच्या कारकीर्दीतली फार मोठी उपलब्धी वाटते मला. विश्वास जिंकणं सोपं असतं, पण त्याला क्षणात तडा जाऊ शकतो. सुदैवानं माझ्या विश्वासार्हतेला कधीही तडा जाणार नाही, याची सातत्यानं दक्षता घेतली. 'डीजीआयपीआर'मधून रिलिव्ह होत असताना मी साधारण तीन-साडेतीन वर्षांत भुजबळ साहेबांसोबत आणि त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा जेव्हा आढावा घेतला, तेव्हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी मिळून सुमारे साडेतीनशे भाषणं, साधारण तितक्याच बातम्या आणि सुमारे सव्वा पाच हजार छायाचित्रं, त्याखेरीज सप्लीमेंटरी आर्टिकलच्या स्वरुपातल्या सतराशेहून अधिक फाइल्स इतका डाटा रेकॉर्ड मला आढळून आला. एरव्ही ठरवलं असतं तरी इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण होणं, ही अशक्यप्राय गोष्ट होती माझ्यासाठी!
दि. 21 जून 2012 रोजी मी रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. दुर्दैवानं त्याच दिवशी दुपारी मंत्रालयाला अग्नीप्रलयानं वेढलं. त्यामुळं इमर्जन्सी ड्युटी म्हणून दोन दिवसांत पुन्हा भुजबळ साहेबांसोबत दाखल झालो. तिकडं रायगडचं कामही सुरूच होतं. दोन्हीकडचं काम करत होतो. रायगड कार्यालयातल्या सहकाऱ्यांनीही मला अखेरच्या दिवसापर्यंत उत्तम सहकार्य केलं. शेवटच्या दिवशी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन मला सदिच्छाही दिल्या.
या नोकरीनं मला जगदीश मोरे, वसंत पिटके, विशाल ढगे, प्रशांत सातपुते, किशोर गांगुर्डे, अजय जाधव, युवराज पाटील, आकाश जगधने, शिवाजी सोंडुलकर, संजय नाईक, अभिनंदन मोरे, अविनाश पाटील, शैलेश चांगले, दत्तात्रय खिल्लारी, विनोद निकम, विजय मोरे असे कित्येक लाइफटाइम, एजलेस मित्र दिले. मैत्रीच्या धाग्यानं जोडल्या गेलेल्या पत्रकार मित्रांची संख्या तर अगणितच! तीच माझी आयुष्याची खरी मिळकत!
मनिषा म्हैसकर, प्राजक्ता लवंगारे, विजय नाहटा या आयएएस अधिकाऱ्यांमुळं आणि संचालक प्रल्हाद जाधव, श्रद्धा बेलसरे यांच्यामुळं मला 'डीजीआयपीआर'अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांमध्ये तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री कार्यालय आणि महामंडळावरही काम करण्याचा अनुभव मिळाला. वीस-तीस वर्षं सेवा झाल्यानंतर सुद्धा कित्येकांना जी संधी मिळत नाही, जो अनुभव मिळत नाही, तो मला केवळ सहा वर्षांत मिळाला. जिल्ह्यावर काम करणं बाकी होतं; तो अनुभवही शेवटच्या 40 दिवसांत घेता आला. त्यामुळं इथं आपल्याला परिपूर्ण, संपृक्त अनुभव आल्याची माझी भावना झाली. त्याचवेळी शिवाजी विद्यापीठात काम करण्याची संधी चालून आली. ती नाकारावी, असंही त्यात काही नव्हतं. घरापासून जवळच आणि स्वतःच्या विद्यापीठात काम करता येणार होतं. शिवाय बदलीही नाही. म्हटलं, चला, हाही अनुभव घेऊन पाहू या पुढची काही वर्षं. वन शूड कीप मूव्हिंग अहेड!
नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पेलण्यास मनुपूर्वक शुभेच्छा
उत्तर द्याहटवाThank you so much!
हटवाप्रिय आलोक,
उत्तर द्याहटवातुम्हारी ऐसी अदाओं पे तो फ़िदा हम है!
जे काम करत असतो आपण, ते ग्रेट वा किरकोळ असे नसतेच.
पण त्याकडे ज्या पद्धतीने पाहतो आपण, त्यावर अवलंबून असते बरेच, किंबहुना सगळेच.
मला ठाऊक आहे, तुम्ही किती मनापासून, नितांत आवडीने, पूर्णत्वाच्या ध्यासाने काम करीत होतात!
सरकारी या शब्दाची माझ्या मनातली व्याख्या प्रथम बदलून टाकली ती मनीषा म्हैसकर यांनी.
नंतर तुम्हा मित्रांना पाहताना तर बदलाची खात्रीच पटली.
किती झपाटून काम केलेत, ते ठाऊक आहे मला.
शिवाय, हे करताना विश्लेषक डोळसपणा होताच.
उद्याचे तुमचे आत्मचरित्र किती रंजक (आणि भंजकही) असू शकते, याची चुणूक या छोट्या निवेदनात आहे.
मी म्हटले रायगडात आलात म्हणजे आपल्याला मैफली रंगवता येतील.
पण कसचे काय, तुम्ही पाहुणे कलावंत निघालात.
आता जात आहात कोल्हापूरला.
तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित,
कोल्हापूर हे माझे पहिले प्रेम.
माझे सर्वात लाडके गाव. (शहर म्हटले की कोल्हापुरी नाही वाटत)
इथेच मी माझे पहिले पावसाळे अनुभवले.
कॉलेज शिकलो की नाही माहीत नाही, पण बरेच काही शिकलो.
कृषी महाविद्यालय आमचे, तुमच्या विद्यापीठाजवळ.
अवघ्या कॉलेजात पोरी पाच. (आता स्थिती सुधारलीय म्हणे. )
त्यामुळे विद्यापीठ हाच तो आधार, आम्हा बापड्यांना. राजाराम कॉलेजने तर केवढा दिलासा दिला होता त्यावेळी!
पण, विद्यापीठ म्हणजे तर हब! तो आधार एवढा धारधार की तेवढ्यासाठी नाट्यशास्त्र अभ्यासक्रमाला रीतसर प्रवेश घेतला मी विद्यापीठात.
दोन वर्षांचा नाट्यशास्त्र डिप्लोमा केला चक्क तिकडे बी.एस्सी. सुरु असताना.
किती नाटके सांगावीत अशी!
त्या विद्यापीठाचे तुम्ही कुलसचिव वगैरे झालात, याचा अभिमान प्रचंड आहे.
आता हे विद्यापीठ खरेच मला माझेही वाटेल.
असेच भरभरून काम करत राहा. मजा करा. आणि, हो, व्यक्त होणे सोडू नका. खूप शुभेच्छा.
- संजय आवटे
प्रिय संजय सर,
हटवाआपल्या दोघांचं काय नातं आहे, कोणास ठाऊक? पण पत्रकारितेत सुरवात केल्यापासून ते आजतागायत वेगवेगळ्या नात्यानं होत राहिलेल्या भेटी हा निव्वळ योगायोग नाही वाटत मला! एमजेसीची डिग्री घेऊन विद्यापीठातून बाहेर पडलो, निपाणीत परतलो तर दैनिक संचारमध्ये निपाणी प्रतिनिधी म्हणून संधी देणारे पहिले वृत्तसंपादक आपणच होता. पण निपाणीत 'संचार' येत नसल्यानं आऊटपुट मिळणं तसं अवघडच होतं. नागजचा मित्र आणि प्रतिनिधी समाधान पोरे याला माझ्यासाठी महिनाभराचे पेपर घेऊन ठेवण्याचं कंत्राटच जणू मी दिलं होतं. पण तुम्ही माझ्या बातम्या, लेख आणि वार्तापत्रांना अप्रतिम कव्हरेज दिलं, ज्यामुळं खरंच आत्मविश्वास उंचावला. त्यावेळी कोणत्याही आर्थिक लाभाखेरीज हा आत्मविश्वास हीच माझी खरी प्राप्ती होती. पुढं विजय चोरमारे सरांच्या फेलोशीपसाठी सर्व्हे करण्यासाठी आणि 'निपाणी दर्शन' या निपाणीतल्या पहिल्या केबल न्यूजसाठी वृत्तसंपादक म्हणून काम करण्यासाठी मी संचारचा जॉब सोडला. पण आपल्याशी जुळलेलं नातं कायम राहिलं. वेगवेगळ्या भूमिकांतून आपला संपर्क येत राहिला आणि आपल्या प्रेमाचा ओलावा मला नेहमीच मिळत राहिला. असं निर्व्याज प्रेम जगात प्रत्येकालाच लाभलं असतं, तर काय बहार आली असती. पण तसं होत नाही. रायगडमधली आपली भेटही माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
आता कोल्हापुरात तुमच्या हक्काचा एक माणूस आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. कृषी महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ, शिवाय राजाराम महाविद्यालयाचा कॅम्पसही आता अतिशय 'देखणा आणि प्रेक्षणीय' झाला आहे. निसर्ग'सौंदर्या'ची उधळण इथं आजही कायम आहे. एकदा खास पाहण्यासाठी वेळ काढून या. दोघे मिळून फिरू, काय?
आपल्या शुभेच्छा तर सोबत आहेतच. त्या बळावरच मी वाटचाल करतोय. हातून नेहमी चांगलंच काम व्हावं, अशाच आशीर्वादाची गरज आहे.
आपल्या प्रेमाचा अंकित,
आलोक
प्रिय आलोक,
उत्तर द्याहटवातुही आम्हाला एक चांगला मित्र मिळाला. तुझ्या भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
जगदीश, मित्रा तुझ्या प्रेमातून कसा उतराई होऊ, तेच समजत नाही. नेहमीच माझ्यासोबत राहिलास, राहणार आहेस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद!
हटवाआलोक आम्ही नाराज आहोत तुझ्यावर.... तुला मी, वर्षा पाटोळे, किरण सयाईस यांची आठवण नाही झाली लेख लिहीतांना... आम्ही तुझे जे डोके खाल्ले म्हणजे जो त्रास दिला तो तु गोड मानून घेतला. कधीही त्रागा केला नाही. खरंतर जेव्हा तुझी निवड झाल्याचे कळले तेव्हा खुप आनंद झाला पण वाईटही वाटले. एक चांगल्या मित्राचे डोके गमावल्याचे अन टेन्शनही आले वैचारीक उपासमारीचे. पण हे लक्षात आले समोर बसून नाही डोके खाता आले तरी मोबाईल आहे की मग दिलासा मिळाला. शेवटचे डोके खाण्यरचह सेधी मात्र तु वेळेअभावी दिली नाही पण घाबरू नकोस मी ती नक्कीच मिळवणार आहे.
उत्तर द्याहटवाएक मात्र खात्री आहे मनिषा नावाच्या डँबिस मैत्रिणीची जेव्हा वैचारिक उपासमार होवून ती बारिक झाली आहे हे जेव्हा तुला कळेल तेव्हा मात्र तु माझा मोबाईल नंबर डायल केल्याशिवाय राहणार नाही.......... हा.. हा... हा... हा....
खुप खुप शुभेच्छा नव्या कामासाठी
Dear Manisha,
हटवाHow can I forget all of you. Kiran's sad demise is still a shock to me. I can not believe that she is not among us. Varsha is here only, so whenever want we can catch up. Thats why I wrote the top note, that I have mentioned few but not many. I enjoy friendship and love of you all. So be in touch and take care. Thanks a lot.
प्रिय आलोक, तुझ्या डीजीआयपीआर प्रवासाचा तू घेतलेला वेध आज वाचला. मित्रा, कुठल्याही कामात झोकून घेण्याची वृत्ती मला अगदी पहिल्या दिवसापासूनच माहित आहे. आपली भेट पहिल्यांदा जॉईनिंगच्या दिवशी झाली असली तरी आपण सारे माधवाश्रमचे (सुरुवातीचे काही दिवस) रहिवासी असल्याने आपल्याला एकमेकांना चांगलंच ओळखता आलं. ज्या अशोक चव्हाण आणि दिलीप वळसे पाटील साहेबांचा तू डीएलओ होता, त्याच काळात तुझ्याबरोबर मी देखील त्यांचा डीएलओ होतो. (तुझ्याकडे उद्योग तर माझ्याकडे सांस्कृतिक कार्य, तुझ्याकडे ऊर्जा तर माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षण) तुझी काम करण्याची स्वतःची एक स्टाईल आहे आणि तीच स्टाईल मला नेहमीच आवडली. मित्रा, नवीन ठिकाणी असेच झोकून काम करशील यात कुठलीही शंका नाही. तुझ्या नवीन जबाबदारीसाठी आमच्या सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
उत्तर द्याहटवाकिशोर, मित्रा, तुझ्या माझ्याबद्दलच्या प्रेमळ भावना मी जाणून आहे. मला नेहमीच तुझे सहकार्य लाभले. या पुढील काळातही तुझे प्रेम आणि सदिच्छा माझ्यासोबत राहतील, असा मला विश्वास आहे. मनापासून धन्यवाद..!
हटवाDear Alok congratulation yar... i am proud of you....its my pleasure to work with you...u r very nice person as will as good human being....Best of luck for your new inning..and i hope u will also done very good job there....
उत्तर द्याहटवाyours
Ravi Gite
9403239207
Dear Ravi ji, I am very lucky to get a very nice friend like you. Today we may not be coligues, but we'll remain friends forever. Thank you for your well wishes. Keep in touch.
हटवाआलोक
उत्तर द्याहटवातुझा लिख खूप आवडला , खूप जुन्या आठवणी आल्या. तू एक चांगला आणि कर्तबगार अधिकारी आहेस. तू कुठेही चांगलेच काम करशील असा माझा विश्वास आहे.
मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
श्रद्धा बेलसरे खारकर
आदरणीय मॅडम,
हटवाआपल्या मौल्यवान मार्गदर्शनाखेरीज आणि प्रोत्साहनाखेरीज 'डीजीआयपीआर'मध्ये काम करण्याचा इतका उत्कृष्ट अनुभव मला मिळूच शकला नसता. त्याबद्दल मी नेहमीच आपला ऋणी आहे. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, हीच अपेक्षा. धन्यवाद!
-आलोक