गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१२

अश्रूंची फुले!


अमेरिका दौऱ्यावेळी बिल गेट्स यांच्या निमंत्रणावरुन विलासराव देशमुख यांनी मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयास भेट दिली होती. त्यावेळचे छायाचित्र.

काल... नव्हे; गेले तीन दिवस मन अस्वस्थ आहे. विलासराव देशमुख यांचं अकाली जाणं मनाला खरोखरीच चटका लावणारं आहे. काल त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेली गर्दी हे त्यांच्या अमाप लोकप्रियतेचं द्योतक ठरलं. माणूस गेल्यानंतर त्याचं खरं मोठेपण हे त्यानं कमावलेला पैसा आणि भूषविलेल्या सत्तेपेक्षा त्यानं मिळविलेल्या माणसांवरुन ठरत असतं, या विधानाची प्रचिती साऱ्या बाभूळगावानं काल अनुभवली. विलासराव प्रचंड मोठे झाले, पण बाभूळगाव आणि तिथल्या नागरिकांशी त्यांनी जपलेलं नातं अखेरपर्यंत जोपासलं. ही गोष्ट प्रत्येकाला सहजसाध्य नसते. किंबहुना, आपल्याच लोकांवर आपलं मोठेपण लादण्याचा प्रयत्न केला जात असतो. विलासराव मात्र त्याला सन्माननीय अपवाद होते, ही बाब तिथल्या नागरिक आणि माता भगिनींनी अश्रूंच्या फुलांद्वारे त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून प्रत्ययास येत होती.

विलासरावांच्या अंत्यसंस्काराची दृष्ये वृत्तवाहिन्यांवर पाहात असताना माझं मन सातत्यानं भूतकाळात धावत होतं. विलासरावांशी माझा प्रत्यक्ष संवाद दोन-तीन वाक्यांपलिकडं झाला नसेल, पण पब्लिसिटी ऑफिसर म्हणून त्यांच्या अनेक कार्यक्रमांच्या वार्तांकनाच्या निमित्तानं त्यांना अतिशय जवळून पाहण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य मला लाभलं.

विलासरावांच्या संदर्भातला माझ्या आयुष्यातला एक अतिशय मजेशीर किस्सा  सांगण्यासारखा आहे. पण तो मंत्रालयातला नाही, तर माझ्या लहानपणी कागलमध्ये घडलेला आहे. माझी आई कागलमधल्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये शिक्षिका असल्यानं आम्ही कागलमध्ये राहायचो. मी त्यावेळी पाचवीत होतो. त्यावेळी कागलमध्ये एसटी महामंडळानं नवीन आगार बांधलं- तेही अगदी माळावर. तेव्हा आम्हा मुलांमध्ये चर्चा व्हायची, की आता एसटीचं गावातलं स्टॅन्ड बंद करणार आणि बस पकडायला इथून पुढं माळावर जावं लागणार. डेपो आणि स्टॅन्डमधला फरक त्यावेळी कुठून कळणार? त्यावेळी आतासारख्या बाईक, गाड्या किंवा रिक्षाही नव्हत्या. आम्हाला एकदा माळावरच्या कोणा नातेवाईकांकडं काही कार्यक्रमाला जायचं होतं, तर पलिकडं राहणाऱ्या रेळेकरांची रिक्षा (किराणा माल दुकानाच्या निमित्तानं त्यांनी घेतलेली होती आणि त्यावेळी कागलमधली ती बहुधा एकमेवच रिक्षा होती.) भाड्यानं घेऊन गेलो होतो. त्यामुळं आता एसटी पकडणं भयंकर जिकीरीचं होणार, असं माझ्या बालमनाला राहून राहून वाटत होतं. त्यामुळं नव्या आगाराचं उद्घाटन हा माझ्या दृष्टीनं प्रचंड कुतुहलाचा विषय होऊन बसला होता. कोल्हापूरहून येताना मस्त पिस्ता कलरमध्ये रंगलेलं आणि उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेलं आगार दिसलं की टेन्शन यायचं.

अखेर आगाराचं उद्घाटन ठरलं. उद्घाटनासाठी त्यावेळी परिवहन मंत्री असलेले विलासराव देशमुख येणार आहेत, असं समजलं. आमच्या शाळेतल्या काही मुलांची त्यांच्या स्वागतासाठी निवड झाली. तेव्हा काही मुलांनी माझ्या आईला विचारलं, बाई, आम्ही मंत्र्यांना कधी पाहिलेलं नाही. त्यांना ओळखणार कसं आणि हार-तुरे देणार कसे? (त्यावेळी चॅनेल, जाहिराती यांचं प्रमाण आणि प्रभाव खूप मर्यादित होता. वर्तमानपत्रंही मोजक्याच लोकांच्या घरी येत. त्यामुळे त्या मुलांचा प्रश्न स्वाभाविक होता.) त्यावर माझ्या आईनं त्यांना दिलेलं उत्तर आजही मला लख्ख आठवतं. ती म्हणाली होती, मुलांनो, समोरुन शंभर लोकांचा घोळका जरी चालत येत असला तरी त्यातल्या सर्वात उठून दिसणाऱ्या देखण्या आणि राजबिंड्या व्यक्तीच्या गळ्यात बिनधास्त हार घाला. तेच विलासराव देशमुख असतील.

विलासरावांच्या व्यक्तिमत्त्वाचं आईनं केलेलं वर्णन अतिशय सार्थ होतं, हे त्यांना खर्डेकर चौकातल्या सभेत पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं. माझ्या आयुष्यातली पहिली राजकीय सभा जर मी कोणाची ऐकली असेल तर ती विलासरावांची आणि ती सुद्धा कागलच्या खर्डेकर चौकात! तेव्हापासून आजतागायत मी विलासरावांचा फॅन आहे- विशेषतः त्यांच्या वक्तृत्वाचा! विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आणि मुंबईमध्ये जिथं मिळेल तिथं त्यांची भाषणं ऐकण्याची संधी मी कधीही दवडली नाही. खुसखुशीत भाषेची, मार्मिक कोपरखळ्यांची आणि त्याचबरोबर प्रगल्भ, अभ्यासू विवेचनाची एकत्रित मेजवानी म्हणजे विलासराव देशमुखांचं भाषण असायचं.

उद्योग आणि ऊर्जा विभागाचा डीएलओ म्हणून वार्तांकनाच्या निमित्तानं विलासराव देशमुख यांची कार्यपद्धती अगदी जवळून मला पाहता आली. त्यावेळी उद्योगमंत्री जरी अशोक चव्हाण असले तरी बहुतेक महत्त्वाचे सामंजस्य करार हे मुख्यमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत होत असत. राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग स्थापन झाले, आंतरराष्ट्रीय प्रकल्प आले तर राज्याच्या औद्योगिक विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी त्यांची धारणा होती आणि त्या दृष्टीने विलासराव देशमुख हे प्रामाणिकपणे प्रयत्नरत होते. त्यांच्या कारकीर्दीत झालेले औद्योगिक सामंजस्य करार, विशाल प्रकल्प धोरण, औद्योगिक व गुंतवणूकविषयक धोरण, गृहनिर्माण धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प यांवरुन त्यांच्या या क्षेत्राच्या विकासासाठीच्या तळमळीची प्रचिती आपल्याला येईल. परदेशात महाराष्ट्रातील उद्योग व गुंतवणूकविषयक संधींचं मार्केटिंग असो, की 'महाराष्ट्र कॉलिंग' म्हणून इथं येण्यासाठी गुंतवणूकदारांना केलेलं प्रेमाचं आवाहन असो, विलासरावांचा त्यामागचा हेतू उदात्त होता, याविषयी तीळमात्रही शंका नाही. त्यामुळंच त्यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्र हे औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य होऊ शकलं, ही बाब नाकारता येणार नाही.

ऊर्जा क्षेत्राच्या विकासाच्या बाबतीतही त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका ठेवली. तत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या वीजनिर्मितीसाठी आणि भारनियमन कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. ऊर्जा विभागाच्या कित्येक बैठका त्यांनी वर्षा बंगल्यावर अगदी दोन तासांपासून आठ-आठ तासांपर्यंत सलग घेतल्याचा मी साक्षीदार आहे. राज्याचा विजेचा प्रश्न सुटला पाहिजे, या दृष्टीनं आवश्यक ते आणि हातात असलेले सर्व प्रयत्न करण्याची त्यांची
तयारी असायची.

एकदा एका बैठकीच्या वार्तांकनासाठी म्हणून मी त्यांच्या समिती कक्षात गेलो होतो. बैठक गोपनीय होती, हे मला नंतर समजलं, जेव्हा तिथं मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त केवळ ऊर्जामंत्री आणि तीन वीज कंपन्यांचे सीईओ उपस्थित झाले. त्यांच्या व्यतिरिक्त त्या कक्षात मी एकटाच होतो. मुख्यमंत्र्यांनी आमच्या फोटोग्राफर, कॅमेरामनलाही बाहेर जायला सांगितलं. त्यावेळी मी द्विधा मनःस्थितीत सापडलो. बाहेर जावं की कसं, असा विचार करत असतानाच त्यांनी माझ्याकडं पाहिलं आणि त्यांच्या विशिष्ट मिस्कील स्टाइलमध्ये म्हणाले, 'ओ पब्लिसिटीवाले, बसा मिटिंगला पण पब्लिसिटी नको! काय?' असं म्हणून त्यांनी मिटींग सुरू केली. तो तासभर मी त्या बैठकीत होतो. पण, दोन गोष्टींची जाणीव त्यावेळी मला झाली. भले, मुख्यमंत्र्यांना माझं नाव ठाऊक नसेल, पण मी पब्लिसिटीचा आहे, हे त्यांना माहिती होतं. त्याचप्रमाणं, मुख्यमंत्री, एक मंत्री आणि तीन आयएएस अधिकारी यांच्या बैठकीला मला बसण्याची परवानगी देऊन एक प्रकारे मोठा विश्वासच त्यांनी माझ्यावर दाखवला होता. नाही तर, त्यांनी मला बाहेर निघून जायला सांगितलं असतं, तरी काहीच बिघडलं नसतं. पण आपलं काम सीएमकडं रजिस्टर झालंय, एवढं मात्र माझ्या लक्षात आलं.

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगल्या कामासाठी प्रेरित करणं, हा त्यांचा अतिशय मोठा गुणविशेष होता. त्यांच्या अमेरिका आणि दाव्होस दौऱ्याचं डीजीआयपीआरनं (माध्यम- मी’) केलेलं वार्तांकन असो, न्यू लूक लोकराज्यचं लॉंचिंग असो, दिलखुलास, जय महाराष्ट्रचे ओपनिंग एपिसोड्स असोत, ऊर्दू लोकराज्यचं प्रकाशन असो की महान्यूज वेबपोर्टलचं लोकार्पण असो, या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावून त्यांनी जे प्रोत्साहन आणि बळ दिलं, त्या प्रत्येक क्षणांचे डीजीआयपीआरमधील आम्ही सर्वच अधिकारी साक्षीदार होतो.
माणूस म्हणून तर विलासराव मोठे होतेच, पण महाराष्ट्राच्या विकासासाठीची त्यांची तळमळही अगदी 24 कॅरेट शुद्ध होती. विलासरावांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्रानं खरंच खूप काही गमावलं आहे.. खूप काही...!

२ टिप्पण्या:

  1. आलोक , सुंदर लेख .. विलासरावांसारख्या कसलेल्या राजकारण्याला इतक्या जवळून पाहणारा माणूसच त्यांच्या बद्दल इतक्या अधिकार वाणीने बोलू /लिहू शकतो. वेगवेगळ्या लेखातून .तुझी ओघवती भाषाशैली जाणवत असते ...लिहित राहा ...आम्ही वाचत राहू

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रिय अजित,
      तू वेळात वेळ काढून वाचतो आहेस, प्रोत्साहन देतो आहेस, ही बाब माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मनापासून धन्यवाद!

      हटवा