शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

इथं मिस्ड कॉल ठरवतोय ग्रेटनेस!फायनली.. फायनली.. फायनली... गेल्या 15 ऑगस्टला सीएनएन-आयबीएनच्या हिस्टरी चॅनलनं बीबीसीच्या द ग्रेटेस्ट ब्रिटॉनच्या धर्तीवर घेतलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन (आफ्टर महात्मा.. हे महत्त्वाचं!) या महा जनमत चाचणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि पुन्हा (कितव्यांदा तरी!) देशातल्या तमाम आंबेडकर प्रेमींचा ऊर (नको तितक्या!) अभिमानानं भरून आला. माझं मन मात्र खिन्नतेनं दाटून आलं. मुळात बाबासाहेबांचं मोठेपण, त्यांची महानता सिद्ध करण्यासाठी अशा कुठल्याही पोलची, चाचणीची गरज असण्याचं कारण नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. पण जूनमध्ये या जनमत चाचणीच्या पहिल्या फेरीसाठी मतदान सुरू झालं, तेव्हा आंबेडकरांना मत देण्यासाठी मिस कॉल द्या, असं सांगणारे किमान शंभर एसेमेस तरी मला आले असतील, त्यातला एक एसेमेस चेक करताना चुकून माझ्याकडून तो नंबर डायल झाला आणि बहुतेक माझंही मत तिथं रजिस्टर झालं असावं, असं वाटतं. पण, त्यातल्या एकाही वेळा मला त्या नंबरला डायल करून किंवा सातत्यानं ऑनलाइन असतानाही साइटवर जाऊन आपलं मत नोंदवावं, असं मला अजिबात वाटलं नाही. याचा अर्थ माझं आंबेडकरांवर प्रेम नाही किंवा त्यांच्याबद्दल मला आदर नाही, असा मुळीच होत नाही. त्याउलट, त्यांच्याविषयी नितांत आदर असल्यामुळंच मला त्यांचं मोठेपण पटवून घेण्यासाठी किंवा पटवून देण्यासाठी असल्या बेगडी, ग्लोरीफाईड, बाजारीकरणाच्या मार्गानं जाणाऱ्या गोष्टींची गरज वाटत नाही.
या जनमत चाचणीचा विषयच मला मुळात रुचला नाही. ग्रेटेस्ट इंडियन आणि तोही आफ्टर गांधी. इथं महात्मा गांधींच्या महानतेविषयी शंका घेण्याचा माझा अजिबात हेतू नाही. कारण त्या माणसानं युद्धाशिवाय सुद्धा गौतम बुद्धाच्या शांती, करूणा आणि अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य प्राप्त करता येऊ शकतं, हे साऱ्या जगाला दाखवून दिलं. पण त्याचबरोबर डॉ. आंबेडकर यांना गांधींनंतरचा ग्रेटेस्ट इंडियन म्हणण्याला माझा खरा आक्षेप आहे. बाबासाहेब हे महात्मा गांधींच्या काळातले, त्यांच्या बरोबरचे आणि त्यांच्या नंतरच्या काळातलेही ग्रेटेस्ट इंडियन होते, असं म्हणता येईल हवं तर. राजकीय स्वातंत्र्याआधी सामाजिक स्वातंत्र्याचा आग्रह (त्या काळात तो त्यांचा दुराग्रहच मानला जात होता.) धरून डॉ. आंबेडकरांनी त्या दिशेनं देशाच्या सामाजिक स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं. पण राजकीय स्वातंत्र्याच्या झंझावातात आंबेडकरांच्या सच्च्या देशप्रेमाला मात्र देशद्रोही ठरवण्यात आलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय केलं, याचं वारंवार स्पष्टीकरण त्यांच्या अनुयायांना द्यावं लागतंय. तिथंच त्यांना ग्रेटेस्ट इंडियन म्हणून मान्यता मिळाली, हेही नसे थोडके.
हा विषयाचा भाग थोडा वेळ बाजूला ठेवू या. या जनमत चाचणीसाठी लीडरशीप, जिनिअस आणि कम्पॅशन या तीन गुणांच्या कसोटीवर उतरणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि क्रीडा या क्षेत्रांतील एकूण शंभर व्यक्तींची निवड करण्यात आली. 28 जणांच्या ज्युरी पॅनलनं त्यातल्या 50 जणांची यादी निवडली. ती नावं मी मुद्दामहून इथं देतो.

Dr B.R. Ambedkar, Atal Behari Vajpayee, Indira Gandhi, Jawaharlal Nehru, Jayaprakash Narayan, Kanshi Ram, Vallabhbhai Patel, Rammanohar Lohia, C. Rajagopalachari, Baba Amte, Mother Teresa, Ela Bhatt, Kamaladevi Chattopadhyay, Vinoba Bhave, Pandit Ravi Shankar, M.S. Subbulakshmi, M.F. Husain, Bismillah Khan, R.K. Narayan, R.K. Laxman, Amitabh Bachchan, Raj Kapoor, Rajnikanth, Satyajit Ray, Lata Mangeshkar, A.R. Rahman, Kishore Kumar, Dilip Kumar, Dev Anand, Mohammed Rafi, Homi Bhabha, Dhirubhai Ambani, Verghese Kurien, Ghanshyam Das Birla, J.R.D. Tata, N.R. Narayanamurthy, Vikram Sarabhai, M.S. Swaminathan, A.P.J. Abdul Kalam, Amartya Sen, Ramnath Goenka, Dr E. Sreedharan, Sachin Tendulkar, Vishwanathan Anand, Kapil Dev, Sunil Gavaskar, Dhyan Chand, Milkha Singh, B.K.S. Iyengar and Sam Manekshaw.

(या यादीत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (आठवताहेत का?) यांचंही नाव नाही, इकडं मी नम्रपणे वाचकांचं लक्ष वेधू इच्छितो.) या यादीमधूनही अंतिम फेरीसाठी त्यातल्या डॉ. आंबेडकर, पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, जे.आर.डी. टाटा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, वल्लभभाई पटेल, मदर टेरेसा आणि सचिन तेंडुलकर या दहा जणांच्या नावांची निवड करण्यात आली.
आता या नावांवर नजर टाकली तर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी ही अतुलनीयच आहे आणि त्यांच्या या योगदानामुळं देशाचा नावलौकिकही जगभरात उंचावला आहे, हेही तितकंच खरं! पण, त्यांची परस्परांशी तुलना करून त्यांच्या या योगदानाला संकुचित करून एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेलाच हरताळ फासला गेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांमध्ये तुलना होऊच कशी शकते, हा मला पडलेला प्रश्न आहे. उदा. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या दोघांमध्ये तुलना करताना किंवा त्यांच्यातल्या ग्रेटेस्टपणा ठरवताना लतादिदींनी 50 हजारांपेक्षा अधिक गाणी म्हटली तर सचिननं शंभर शतकं केली, अशी होऊ शकेल का? टाटांनी अमूक अमूक इतक्या गाड्या तयार केल्या आणि मदर टेरेसांनी इतक्या इतक्या लोकांची सेवा केली, असं होईल का? आयोजकांनी भलेही तीन निकष ठरवले असतील, पण समान क्षेत्रांमध्येच योग्य तुलना करता येऊ शकते, याचाच विसर पडला की काय, असे वाटते. त्याशिवाय, तुलना करताना, किंवा मत देताना मतदात्यानं त्या निकषांबरहुकूम मतदान केलं असेल, असं कोणी तरी छातीठोकपणे सांगू शकेल काय? शक्यच नाही. गंमत सांगतो, अंतिम दहा जणांच्या यादीत आंबेडकरांचं नाव आलं, त्यावेळी ग्रेटेस्ट इंडियनच्या यादीत आंबेडकर दुसऱ्या स्थानावर आहेत, तेव्हा त्यांना ग्रेटेस्ट ठरवण्यासाठी .... या नंबरवर तातडीनं मिस कॉल द्या, असा संदेश मला आला. (ऑनलाइन सर्व्हेबद्दल मी इथं काही लिहित नाही, कारण सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांच्या प्रगल्भतेबद्दल मला असलेल्या शंकेचं अद्याप निरसन झालेलं नाही. प्रयत्न सुरू आहे, याची खात्री असावी.) आता अशा मिस्ड कॉल्सनी माणसाचं लहानमोठेपण ठरत असतं, तर सगळंच कसं सोप्पं सोप्पं झालं असतं. बोर्डात पहिलं यायचंय, ज्याला सगळ्यात जास्त मिस कॉल त्याचा पहिला नंबर. ज्याला सर्वात जास्त मिस कॉल तो देशाचा पंतप्रधान, ज्याला त्याहूनही जास्त मिस कॉल तो राष्ट्रपती. आपली सारी लोकशाही बहुमताऐवजी बहु- मिस कॉलवर चालवली तर काय बहार येईल नाही? असा विचार केला तर काहीतरी चुकतंय असंच आपल्या लक्षात येईल. आणखी थोडा जास्त विचार केला तर आजच्या मार्केटिंगच्या युगाच्या दृष्टीनं अजिबात काही चुकत नाहीय, हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. आपल्या भावभावनांचा या मार्केटिंगच्या युगात बाजार मांडला गेलाय, हे आपल्या लक्षात येईल आणि आपल्या नकळतपणे आपण वापरले जात आहोत, ही गोष्टही लक्षात येईल. अशा बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ शकतात आपल्या, विचार केलाच तर.. त्यासाठी वेळ काढलाच तर.. पण इथ वेळ आहे कुणाकडं? मिसकॉल दिला की काम भागलं. आपली निष्ठाही राखली जाते, आपल्या महान नेत्याबद्दलचा आदरही राखला जातो, त्याची ग्रेटेस्ट म्हणून निवड झाली तर आपली मानही गर्वानं उंचावते. यापेक्षा आपल्याला तरी आणखी काय हवं असतं. आमचे बाबासाहेब नुसत्या मिस्ड कॉलच्या जोरावर ठरलेत देशात भारी. यावर "स्वातंत्र्याच्या 66व्या वर्धापनदिनी" शिक्कामोर्तब झालंय, यापेक्षा अधिक मोठी गोष्ट कोणती असू शकते आपल्यासाठी.. होय की नाही..?

२ टिप्पण्या:

 1. प्रिय मित्रा,
  छान लिहिले आहेस...
  प्रत्येक महापुरुषाने वेगवेगळ्या कारणांसाठी आणि घटकांसाठी अतुलनीय कार्य केले आहे.सर्वांच्या योगदानातूनच देश महानतेकडे वाटचाल करतो. त्यामुळे महापुरुषांमधील तुलनाच गैरलागू आहे. पण त्यातून टीआरपी नक्कीच मिळतो. कारण अपवाद सोडले तर प्रत्येक महापुरुषाच्या मागे जात चिकटवली गेली आहे. प्रत्येक जातीचे लोक आपल्या जातीच्या महापुरुषाला व्होट करण्यासाठी एसएमएस किंवा मिस्ड कॉल करणार; निदान हा शो तरी पाहणार, ही सुपिक डोक्यातली मार्केटिंग आयडिया यामागे असावी. कारण प्रत्येक जाती धर्माला एवढेच नव्हे तर राजकीय पक्षांनाही या 50 च्या यादीत स्थान दिले आहे,यावरून ते सिद्धच होते.
  जगदीश मोरे

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. जगदीश मित्रा, महापुरूषांमधली ही तुलनाच मला जास्त खटकली. लोकांच्या मनात विनाकारण एकमेकांबद्दल आणि त्या महापुरूषांबद्दलही असूया आणि द्वेष निर्माण होण्यास ही स्पर्धा कारणीभूत ठरली, असं मला वाटलं. म्हणून लिहिलं. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

   हटवा