मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

शांतिवन: विदर्भातली चैत्यभूमी

सध्या नागपूरला हिंवाळी अधिवेशन चालू आहे. गेल्या सहा वर्षांत मी प्रथमच या अधिवेशनाला उपस्थित नाहीय. त्यामुळं मित्रांचे, सहकाऱ्यांचे तिथून फोन येतायत आणि गत अधिवेशनांच्या आठवणी माझ्याही मनात येताहेत. या अधिवेशनांदरम्यान सुटीच्या काळात जवळपासच्या ठिकाणांना भेटी देण्याचा सर्वांचाच आवडीचा कार्यक्रम असतो. गेल्या वर्षी अशाच एका अतिशय अविस्मरणीय ठिकाणाला भेट देण्याचा योग मला आणि माझे ज्येष्ठ सहकारी पिटके गुरूजी यांना आला. हा योग जुळवून आणणारे नागपुरातले पत्रकार मित्र रवी गजभिये आणि कार्तिक लोखंडे यांच्याबरोबर उद्योजक संजय पाटील यांना त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो.
शांतिवन हे त्या ठिकाणाचं नाव! संजय पाटील हे त्याचे केअरटेकर!
नागपूरच्या झिरो माइल्सपासून साधारण १७ किलोमीटर अंतरावर चिचोली इथं सुमारे साडेअकरा एकरांचा शांत आणि रम्य परिसर म्हणजे शांतिवन’! भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचं संग्रहालय आणि त्यांचा अस्थिकलश असणारा स्तूप हे या शांतिवनाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दादर (मुंबई) इथल्या चैत्यभूमीनंतर केवळ या शांतिवनातच बाबासाहेबांचा अस्थिकलश आहे. त्या अर्थानं, शांतिवन ही विदर्भातली चैत्यभूमी आहे. म्हणूनच दीक्षाभूमीच्या बरोबरीनंच या ठिकाणाचं मला महत्त्व वाटतं.
स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून या देशामध्ये अलौकिक अशा लोकशाहीची प्रस्थापना करण्यामध्ये मोलाचा सहभाग उचलणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्तृत्व हा माझ्यासाठी सदैव आदर आणि अभिमानाचा विषय आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी ज्या पद्धतीनं आपली संपूर्ण कारकीर्द घडवली, तशा प्रकारे एखाद्याला अनुकूल परिस्थितीतूनही घडविता येईल की नाही, याची शंकाच आहे. बाबासाहेबांना घडविणारे त्यांचे वडील रामजी सुभेदार यांनी चाळीतल्या छोट्याशा खोलीत पहाटे उठवून त्यांना ज्या कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करायला लावला आणि ज्या प्रकाशाच्या जोरावर या महामानवानं कोट्यवधी जनतेच्या मनांत आणि घरांत ज्ञानदीप पेटवण्याचं काम केलं, तो कंदील इथल्या संग्रहामध्ये आहे. तो कंदील पाहताना किंवा इथली प्रत्येक वस्तू पाहताना बाबासाहेबांचा जीवनपट आपल्या नजरेसमोर उभा राहिल्याखेरीज राहात नाही.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दीक्षा सोहळ्याचे सूत्रधार वामनराव गोडबोले आणि बाबासाहेबांचे सेवक तथा खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्याकडील बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय स्थापन करण्याचे ठरविले. त्यांच्या या विचाराला माईसाहेब आंबेडकर यांचंही मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. सर्वात मोलाचा त्याग आणि मदत जर कोणी केली असेल तर ती श्रीमती गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी! या उच्चवर्णीय कुणबी महिलेनं बाबासाहेबांच्या या स्मारकासाठी आपली साडेअकरा एकर जागा या प्रकल्पासाठी दि. २२ एप्रिल १९५७ रोजी दान दिली.
इतक्या सर्व लोकांच्या अथक परिश्रमातून शांतिवनात साकारलं गेलंय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालय! या संग्रहालयातली प्रत्येक वस्तू ही पाहणाऱ्याला त्यांच्या आस्तित्वाची जाणीव करून देते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूर इथं बाबासाहेबांनी ज्या बुद्धमूर्तीसमोर लीन होऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ती मूर्ती इथं आपल्याला त्या धम्मचक्रप्रवर्तनाची आठवण करून देते. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिलने बाबासाहेबांना प्रदान केलेले मूळ प्रमाणपत्रही इथं आहे. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील भारतीय संविधानाच्या मूळ स्वाक्षांकित प्रती इथं आहेतच शिवाय ग्रिव्हन्सेस ऑफ द शेड्यूल्ड कास्ट, कर्मा इन बुद्धिजम तसंच बुद्ध ॲन्ड हिज धम्म या पुस्तकांच्या मूळ स्वाक्षांकित प्रतीही इथं आहेत. बुद्ध ॲन्ड हिज धम्मपाहताना अंगावर शहारे येतात कारण ६ डिसेंबर १९५६ रोजी अंतिम श्वास घेण्यापूर्वी याच पुस्तकावर त्यांनी अखेरचा हात फिरवला होता. आंबेडकरांनी टाइप केलेले विविध शोधनिबंध इथं आहेतच, शिवाय ज्या टाइपरायटरवर त्यांनी भारतीय संविधान टाइप केले, तो रेमिंग्टन टाइपरायटरही इथं आहे. मजूरमंत्री म्हणून बाबासाहेबांनी कामगार व महिला वर्गाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांप्रती कृतज्ञता म्हणून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनसह विविध कामगार संघटनांनी बाबासाहेबांना प्रदान केलेली मानपत्रंही इथं आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं आपल्या या विद्वान विद्यार्थ्याच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या विद्वत्तेचा सार्थ गौरव करणारं गौरवपत्र अर्पण केलं, ते गौरवपत्रही इथं पाहायला मिळतं.
बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय उच्च अभिरुचीसंपन्न अशा प्रकारचं होतं. कला-संगीताची त्यांना उत्तम जाण होती. त्यांच्या आवडीच्या ग्रामोफोनच्या रेकॉर्ड्स त्याची साक्ष देतात. बर्मा, श्रीलंका आदी देशांतून उत्तमोत्तम पेंटिग्ज त्यांनी सोबत आणली. ती चित्रंही इथं आहेत.
वयाच्या ६५व्या वर्षी त्यांना चित्रकलेविषयी इतकी आवड निर्माण झाली की ते त्या वयातही चित्रकला शिकले. तथागत भगवान बुद्धाचं बाबासाहेबांनी तयार केलेलं पेन्सिल स्केच त्याची साक्ष पटवतं. बाबासाहेबांचा हा बुद्ध जगातल्या इतर बुद्धमूर्ती अथवा चित्रांसारखा डोळे मिटलेला नाही; तर, या बुद्धाचे डोळे उघडे आहेत. अशा प्रकारचं हे जगातलं एकमेव चित्र असावं. बुद्धाइतक्या डोळसपणे जगाकडं अन्य कुणी पाहिलं नसावं. त्याला थेट परिमाण देण्याचं काम बुद्धाकडं डोळसपणे पाहणाऱ्या महामानवाच्याच हातून झालं, यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती?
बागकामाची बाबासाहेबांना आवड होती. त्यांनी ज्या कोयत्या-खुरप्याने बागकाम केलं, ते सुद्धा इथं आहेत.
बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड वाचन-लेखन केलं. त्यांच्या विविध प्रकारच्या लेखण्या, शाईचे दौत, टाक, स्टँप, कंपासबॉक्स, पेन्सील सेट, मॅग्नीफाईंग ग्लासेस, टेबलटॉप नेमप्लेट इथं पाहता येते.
टापटीप आणि नीटनेटक्या पोषाखाच्या बाबतीतही बाबासाहेब अतिशय चोखंदळ असल्याचं त्यांच्या छायाचित्रांतून आपल्याला दिसतंच. बाबासाहेबांचा बॅरिस्टरीचा कोट, त्यांचे मेड इन लंडन शर्ट्स, कोट, ओव्हरकोट, टाय, पँट्स यांच्यासह झब्बे, विजारी, सॉक्स, कोटाची बटणे इथं आहेत. विविध प्रकारच्या टोप्याही बाबासाहेब आवडीनं वापरत असत. त्या सर्व टोप्याही इथं आहेत. प्रत्येक टोपी पाहिली की, त्या टोपीसह असलेलं त्यांचं छायाचित्र आपोआपच आपल्या नजरेसमोर तरळतं. बाबासाहेबांनी वापरलेली घड्याळं, त्यांचे वेगवेगळे चष्मे आणि त्यांच्या केसेस, ट्रीमिंग मशीन, अडकित्ता इतकंच नव्हे तर त्यांच्या इंजेक्शनच्या सिरिंज, शेव्हींग ब्रश आणि छत्री सुद्धा या संग्रहात आहे.
बाबासाहेब वाचीत बसत ती खुर्ची आणि पाय ठेवत ते स्टूलही इथं आहे. या स्टुलाशेजारी दुसरा स्टूल टाकून वामनराव बाबासाहेबांच्या पायाशी बसत, तेही स्टूल आहे. बाबासाहेबांच्या घरातला वातीचा स्टोव्हही इथं ठेवण्यात आलाय. त्यांच्या अनेक दुर्मिळ छायाचित्रांसह विविधवृत्त, सिद्धार्थ, रविवासरीय वृत्तांत आदी वृत्तपत्रांतील त्यांच्यासंदर्भातील बातम्यांबरोबरच महापरिनिर्वाणानंतर मराठा वृत्तपत्रांत आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या मृत्युलेखांचे अंकही या संग्रहात पाहता येऊ शकतात.
डॉ. आंबेडकरांचे वस्तू संग्रहालय हे शांतिवनाचे प्रमुख वैभव असले तरी केवळ तेवढेच वैशिष्ट्य नाही, हेही तितकेच खरे आहे. शांतिवनातील बुद्धविहार हा खरोखरीच मनाला शांती मिळवून देईल, असा आहे. प्रशांत, सस्मित बुद्धमूर्तीसमोर एखादा ध्यानाला बसला तर संपूर्ण जगाचं भान हरपून त्याला निश्चितपणे समाधान लाभेल. या विहाराची मोजमापं ही बुद्ध-आंबेडकरांच्या जीवनातील विविध सन आणि आकड्यांवर आधारित आहेत. 
वामनराव अखेरच्या क्षणापर्यंत याच परिसरात निवास करायचे. त्यांची शांतिकुटीही इथं पाह्यला मिळते. शांतिवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी इथं विश्रामगृह आहे. त्याशिवाय, इथं मुद्रणालयाबरोबरच नियोजित धम्म प्रचारक प्रशिक्षण केंद्रासाठीही (बुद्धिस्ट रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) जागा राखून ठेवण्यात आली आहे.
नावाप्रमाणंच शांतता हे शांतिवनाच्या संपूर्ण परिसराचंच वैशिष्ट्य आहे. गर्दी, कोलाहलाची सवय असलेल्या शहरातल्या विशेषतः मुंबईकरांसाठी तर ही शांतता अगदी अंगावर येण्याइतपत तीव्र भासू शकते. आपण शहरात राहून नेमकं काय गमावतो आहे, ते शांतिवनाला एकदा भेट दिल्याखेरीज नक्कीच समजणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा