गुरुवार, १४ मार्च, २०१३

कल आणि कौल..!



('शेती-प्रगती' मासिकाच्या मार्च २०१३च्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला माझा प्रासंगिक लेख...)

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं आणि माध्यमक्रांतीमुळं साऱ्या देशालाही ते ऐकायला-पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरचा भारतीय जनता पक्षाचा नवा विकासाभिमुख चेहरा म्हणून सामोरे आणण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहेत. वाजपेयींच्या धर्मनिरपेक्ष म्हणा किंवा सर्वसमावेशक प्रतिमेचा तत्कालीन एनडीए सरकारला मोठ्या प्रमाणात लाभ झाला होता. बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसेतर सरकार केंद्रात (तारेवरची कसरत करत) पाच वर्षे चाललं. मात्र, फील गुड कँपेनच्या अतिरेकी लाटेमध्ये पुन्हा काही सत्तेत येण्याची संधी त्यांना मिळाली नाही, आणि भाजपच्या उमा भारतींसारख्या नेत्यांसह त्यांचे घटक पक्षही त्यानंतर दुरावत गेले. महत्त्वाचं म्हणजे ज्या राममंदिराच्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेत आलं, त्या मुद्द्याबाबत या पाच वर्षांच्या काळात त्यांना काहीही करता येऊ शकलं नाही. गेल्या दहा वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. वाजपेयी वयानुसार अज्ञातवासात गेले. अडवाणींच्या रथयात्रेची बोथट झालेली धार, त्यांनी पुन्हा रथयात्रा काढून अनुभवली. मुरलीमनोहर जोशीही शांत झालेत. सुषमा स्वराज यांच्यासारख्या महिलेमध्ये क्षमता असूनही (कदाचित केवळ महिला म्हणून?) पक्षाच्या नेते पदापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. गडकरी आले, पायउतार झाले. जेठमलानी दुरावले. राज्य स्तरावरही पक्षाची मोर्चेबांधणी कमी पडू लागली. कर्नाटकात यादवी माजली.
या सर्व पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी मात्र विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं चंग बांधला. प्रत्यक्षात विकास किती झाला हे मोदी आणि गुजरातची जनताच जाणो; परंतु प्रसारमाध्यमांना हाताशी धरून तसं वारं निर्माण करण्यात मात्र मोदींना यश आलं, एवढं खरं. गोध्रा हत्याकांडाचा कलंक कुणी कितीही प्रयत्न केला तरी मोदींना पुसता येणार नाही; या हत्याकांडामुळं भारतीय समाजमनावर झालेली तीव्रतर जखम सहजी भरून येण्यासारखी नाहीय. या कृत्याबद्दल मोदी यांना भारतीय समाजमन माफ करेल, असंही नाहीय. दरम्यानच्या काळात मोदी यांनी उपोषणादी प्रकार करून सर्वधर्मीयांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी इस्लाम धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी भेट आणलेला ताकिया मस्तकी धारण करण्यास नकार दिला. यावरुन मोदींच्या सहिष्णु आणि दांभिक सर्वधर्म समभावाचं दर्शनच यातून झालं. पण पुन्हा एकदा त्यांच्या या प्रयत्नांना देशभरात व्यापक प्रसिद्धी मिळाली (देण्यात आली.).
याखेरीज दरवर्षी गुजरातमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी एनआरआय उद्योजकांची प्रचंड मोठी अशी परिषद मोदी भरवतात. राज्याचे सारे अधिकारी तिथं उपस्थित असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगांना जाग्यावर मंजुरी आणि त्यासाठी आवश्यक सर्व शासकीय बाबींची पूर्तता करवून घेतात. जगभरात पसरलेल्या गुजराती उद्योजकांना मायभूमीची हाक म्हणून ते अगत्यानं बोलावतात आणि गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करतात. यामुळं त्या दोन तीन दिवसांत हजारो कोटींची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक गुजरातेत होते, त्याची देशभरात चर्चा होते आणि त्या योगे गुजरातमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांना व्यापक प्रसिद्धीही मिळते.
मोदी यांची विकासपुरूष अशी प्रतिमा देशपातळीवर निर्माण झालेली आहे. सध्या आपल्या देशातला युवक मोदी यांच्या या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला दिसतोय. मात्र असं मोदींच्या प्रेमात पडत असताना सुप्रशासन आणि विकास या संकल्पनांच्या संदर्भात त्यांच्या मनात माजलेला गोंधळच अधिक अधोरेखित होताना दिसतोय.
आजच्या भारतीय युवक-युवतींना आपल्या देशाच्या विकासाखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये, राजकारणात रस नसला ही गोष्ट खरी असली तरी आपल्या नेतृत्वाच्या मात्र ही गोष्ट लक्षात येत नाहीय, असंच सध्याचं वातावरण आहे. मोदी यांना भाजपने आपल्या पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून फोकस करायला सुरवात केली. सरसंघचालक मोहन भागवतांनीही भर कुंभमेळ्यात २०१४च्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी हेच असतील, असं सांगितलं. मोदी यांची निर्माण झालेली विकासपुरूष ही प्रतिमा एन्कॅश करण्याचा संघाचा हा थेट प्रयत्न आहे. तो असू नये, असं म्हणण्याचं कारण नाही. पण, त्याचवेळी मोदी यांना तरुण वर्गाचा जो पाठिंबा प्राप्त होतो आहे, तो केवळ देशाच्या विकासाच्या मुद्यापुरता मर्यादित आहे, पण ही गोष्ट सरसंघचालकांच्या ध्यानात आल्याचं काही दिसत नाही. कारण मोदी यांच्या नावाला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देत असताना त्यांनी पुन्हा राममंदिराची शर्त त्यांच्यापुढं ठेवली आहे. मोदींच्या लोकप्रियतेच्या आडून किंवा आधारे आपला मूळ अजेंडा पुढं दामटण्याचा त्यांचा हा प्रयत्न सहजी यशस्वी होण्याची शक्यता नाही. मात्र, त्याचा नकारात्मक फटका बसण्याची शक्यताच अधिक वाटते.
गुड गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंट यांच्या स्पेलिंगमध्ये जितका फरक आहे, तितकाच या दोन संकल्पनांमध्ये आहे. चांगल्या प्रशासनाच्या माध्यमातून विकासाच्या दिशेनं वाटचाल होण्याची शक्यता अधिक वाढते, इतकंच! मोदींच्या बाबतीत तर अजूनही बूँद से.. गेलेली प्रतिष्ठा हौदानं सावरण्याचा त्यांचा अजूनही प्रयत्न सुरू असावा, असा दाट संशय येण्यासारखी त्यांची वर्तणूक दिसते. त्यांना ताकिया प्रदान करायला गेलेले मुस्लीम कार्यकर्ते हे सिंहाच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलेल्या हरिण, सशांसारखे वाटतात मला. फक्त अंदाज घ्यायला गेल्यासारखे. गुजरातमधली ही सामाजिक दरी अद्यापही सांधली गेलेली नाही, ही बाबच त्यातून प्रकर्षानं अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर गुजरातबाहेर मोदींची ग्लोरीफाइड प्रतिमा निर्माण करण्यासाठी विकासाची आस घेऊन बसलेल्या तरुणांचा वापर करणं, ही खचितच योग्य बाब नाही.
तरुणांना गृहित धरण्याचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या लाटेवर स्वार होण्याचा हा या वर्षभरातला तिसरा प्रकार आहे. गेल्या वर्षाच्या सुरवातीला अण्णा हजारे यांनी जे लोकपाल जनआंदोलन पुकारलं. त्याला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. याचं कारण म्हणजे देशात फोफावलेला भ्रष्टाचार कुठंतरी संपला पाहिजे, ही त्यांची भावना होती. आणि त्या भ्रष्टाचाराला सुरूंग लावण्याचं काम अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी करताहेत, अशी तरुणांची भावना होती. त्यामुळं त्यांच्या आंदोलनाला युवकांच्या सहभागामुळं, पाठिंब्यामुळं खऱ्या जनआंदोलनाचं स्वरुप प्राप्त झालं. पण अण्णांचे साथीदार म्हणून झोतात आलेल्या अरविंद केजरीवाल आदी प्रभृतींना मिळणाऱ्या व्यपक प्रसिद्धीचा हव्यास निर्माण झाला. आणि त्यावेळी निर्माण झालेल्या लोकप्रियतेच्या वाटेवर स्वार होत त्यांनी पुन्हा राजकीय पक्ष काढण्याचा मार्ग अनुसरला आणि युवा वर्गाच्या पदरी निराशा आली. भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून हाती काही पडण्याऐवजी आपल्याला वापरून घेतलं जातंय, हे तरुणांच्या लक्षात आलं आणि पुढच्याच वेळी या आंदोलनाला मिळालेल्या थंड्या प्रतिसादातून त्याची प्रचिती आली.
नवी दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या विरोधातही युवा वर्ग मोठ्या संख्येनं संघटित होऊन रस्त्यावर उतरला. राजधानीत सातत्यानं वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात उमटलेली ती एक संतप्त प्रतिक्रिया होती. पण या लाटेवरही स्वार होण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षानं आणि संघटनेनं चालवला आणि दिवसागणिक हे आंदोलनही भरकटत गेल्याचंच दिसू लागलं. या आंदोलनापासूनही मग समंजस तरुणाई दूर होताना दिसली. पण सोशल मिडियासारख्या नव्या माध्यमांतून मात्र त्यांनी आपली लढाई जिवंत ठेवली.
त्यामुळं आजच्या देशातल्या युवावर्गाला कोणत्याही पक्षानं किंवा संघटनेनं गृहित धरण्याची चूक करता कामा नये. तथापि, तरुणांनाही आपला सातत्यानं वापर केला जातो आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. असं का होतं, कारण माध्यमांतून आपल्यासमोर पटकन उभ्या राहणाऱ्या किंवा उभ्या करण्यात येणाऱ्या गोष्टींवर, प्रतिमांवर ते पटकन विश्वास ठेवतात. ग्लॅमरला भुलतात. सोशल नेटवर्कवर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये अभ्यासाऐवजी अधिकतर भावनात्मकतेचंच प्रतिबिंब उमटत असतं. नेमक्या याच गोष्टीचा फायदा उचलला जातो आहे. विकासाची आस तरुणांच्या मनात आहे, म्हणजे मग त्याच शब्दाचा भुलभुलैय्या करून त्यांच्या मनात प्रतिमानिर्मिती करून पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं तरुणांच्या भावनात्मकतेचाच वापर करून घेण्याचा एक अतिशय वेगळा प्रयत्न आकाराला येतो आहे. तरुण वर्गाचा कल (Inclination) हा जणू कौलच असल्याचा आवेष आणला जातो आहे, ही खेदाची बाब आहे. या षडयंत्राची जाणीव युवावर्गाच्या मनात चेतवण्याची गरज आहे.

२ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद, यशोधन जी! आपल्या ब्लॉगलाही मी भेट दिलीय. खूप इंटरेस्टिंग आहे. धन्यवाद!

      हटवा