सोमवार, २५ मार्च, २०१३

निखळ-५: तिसरा मृत्यू!




गेल्या पंधरवड्यात दोन हृदयद्रावक मृत्यू पाहिले... मरणारे माझ्या जवळचे होतेही.. अन् नव्हतेही... दोघांचही वय मृत्यूचं नव्हतं.. मृत्यू नैसर्गिक नव्हते... दोन्ही मृत्यूंमध्ये एकच साम्य... दोघांना उपचारांसाठी उत्कृष्ट हॉस्पिटल्समध्ये दाखल केलेलं... तिथंच त्यांचा मृत्यू झाला... एकाला महिनाभराच्या उपचारानंतरही नेमकं काय झालं होतं, हे समजूच शकलं नाही... तर एकाला मृत्यूची दुरान्वयेही शक्यता आढळत नसताना अतिरेकी उपचारांनी मारलं गेलं...
***
मृत्यू पहिला
तेरा वर्षांचा चुणचुणीत मुलगा... महिनाभर कमी-अधिक होणारा ताप... महिनाभरात गारगोटीच्या (जि. कोल्हापूर) फॅमिली डॉक्टरांकडे सलग उपचार सुरू... आठ दिवस त्यांच्याकडे ॲडमिटही... एके दिवशी आपल्याकडून निदान होत नाहीसे पाहून निपाणी (जि. बेळगाव) इथल्या डॉक्टरांकडं हलविण्याचा त्यांचा सल्ला... पुन्हा निपाणी येथील दवाखान्यात आठवडाभर ॲडमिट... सतत सलाइन, आयव्ही सुरूच... तापाला उतार नाही... रक्त-लघवी तपासण्या झाल्या... पण रोगनिदान नाही... तिथलेही डॉक्टर हतबल... कोल्हापूरच्या प्रतिथयश दवाखान्यात हलविण्याचा त्यांचा सल्ला... आईवडिल अस्वस्थ... मुलाला तातडीनं कोल्हापूरला हलविलं... तिथंही पुन्हा सर्व तपासण्या- पहिल्यापासून... पण निदान नाही... तापाला उतार नाही... दरम्यान मुख्य डॉक्टरांचं परदेशी प्रयाण- एका महत्त्वपूर्ण परिषदेसाठी... पेशंट सहकारी डॉक्टरच्या स्वाधीन... इकडे मुलगा अत्यवस्थ... आईबाप चिंताग्रस्त... डॉक्टरांकडून काहीच ठोस निदानही नाही की तापाला उतारही नाही... अखेर सहकारी डॉक्टरलाही काही समजेनासे झाले... त्याने परदेशी उडालेल्या मुख्य डॉक्टरला फोन केला... त्यांनी मुलाला पाचगणी (जि. सातारा) इथं त्यांच्या मित्राच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला... कशासाठी?... तर मुंबईत उतरल्यावर त्यांना तिकडे तातडीने पोहोचणे शक्य व्हावे म्हणून (खरे खोटे तेच जाणोत)... आईबापानं पुन्हा मुलाला पाचगणीला हलवलं... तोपर्यंत मूल कोमात... एक दिवस आधी आला असतात तरी केस हातात होती... तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं... मग आता?’... पिचलेल्या आईबापाचा प्रश्न... मुलगा येईल का यातून बाहेर? की न्यावं त्याला नातेवाईकांच्या भेटीसाठी परत गावी?’... इथं ठेवलंत तर एक टक्का गॅरंटी... नेलंत तर आम्ही नाही जबाबदार...बिच्चाऱ्या आईबापानं एक टक्का गॅरंटीवर विश्वास ठेवला... आणि गॅरंटी देणारा डॉक्टरच मुंबईला एका मिटींगसाठी निघून गेला... तो दुसऱ्या दिवशी परतला... तेव्हा त्या कोवळ्या कुडीतून प्राण उडाला होता... शेवटपर्यंत त्याला काय झालं होतं, समजलं नाही... अखेरच्या श्वासापर्यंत त्याला झालेल्या आजारावर उपचारच मिळाला नाही... लाख- दोन लाख रुपयांचा खर्च करूनही... पोर मेलं अखेर... क्षयाचे विषाणू मेंदूत भिनल्यानं... कुठलाही रिपोर्ट आईबापाला पाह्यला मिळाला नाही की हातात पडला नाही... हातात पडलं ते तेरा वर्षं तळहातावर जपलेल्या मुलाचं निष्प्राण कलेवर... एका कुटुंबाचं आशास्थान, भवितव्य काळोखलं... जबाबदार कोण?
***
मृत्यू दुसरा
अठ्ठावीस वर्षांचा उमदा युवक... स्वतः एमडी... स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर... विदर्भातल्या गरीब कुटुंबातून येऊन सारी प्रगती साधलेली... गोरगरीबांच्या सेवेचं व्रत स्वीकारलेलं... त्यासाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात नोकरी पत्करलेली... रात्रंदिवस सेवा करतानाच तारुण्याची स्वप्नंही पूर्ण करण्याची अखंड धडपड सुरूच... संशोधनातही अग्रेसर... यंदा कर्तव्यपूर्ती करण्याचाही मानस होता... पण... अचानक डेंगीच्या डासानं लक्ष्य साधलं... साताऱ्याच्या फॅमिली डॉक्टरकडं योग्य उपचार... पण थोड्या मर्यादा पडल्यानं पुण्याला नामवंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा निर्णय... निर्णयप्रक्रियेत या तरुण डॉक्टरचाही सहभाग... दोन दिवसांत रक्तातल्या प्लेटलेट्स वाढून पुन्हा घरी परतू, असा अभ्यासपूर्ण आत्मविश्वास... त्याची अट/अपेक्षा फक्त एकच... मला व्हेंटिलेटर तेवढा लावू नका’… ‘आयसीयूमध्ये मॉर्निंग वॉक घेणारा हा एकमेवच पेशंट असावा... पण दुपारी काय झालं कोणास ठाऊक?... कुटुंबियांचा विरोध डावलून उपचार करणाऱ्या मुख्य डॉक्टरनं अचानक पेशंटला व्हेंटिलेटर लावण्याचा निर्णय घेतला... आधीच अँटिबायोटिक्सच्या माऱ्यानं शिथिल झालेल्या डॉक्टर कम् पेशंटचा विरोध तोकडा पडला... आणि तिथून पुढं कुटुंबियांना धक्क्यावर धक्के सहन करावे लागले... पहिल्या तासानंतर किडनी फेल्युअर... आणखी एका तासानं लीव्हर फेल्युअर... आणखी दीड-दोन तासात पेशंटचाच खेळ खल्लास... मृत्यूचं कारण काय?... डेंगी, पण ते दुय्यम कारण... प्रमुख कारण ठरलं, मल्टीऑर्गन फेल्युअर... दोन दिवसांत रिकव्हर होण्याचा आत्मविश्वास असलेल्या एमडी डॉक्टरचाच हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून अवघ्या दहा तासांत मृत्यू... या दहा तासांत त्याच्यावर ६५ हजार रुपयांच्या ॲटिबायोटिक औषधांचा अखंड भडीमार... लाखाचं बील कुटुंबियांच्या हातात देणाऱ्या हॉस्पिटलनं लाखमोलाचा जीव मात्र घेतला... एका कुटुंबाचीच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्राची आणि त्या योगे समाजाची झालेली ही हानी... कधीही भरून न येणारी... जबाबदार कोण?
***
माझ्या जवळचे, म्हणून हे दोन मृत्यू आणि त्यामागील वस्तुस्थिती मला सांगता आली... दररोज मरणाऱ्या हजारोंमध्ये असे किती असतील?... माहीत नाही... त्यांचं जीवन कुणासाठी पणाला लावलं जातंय... आणि कशासाठी?...
या दोन मृत्यूंपेक्षाही आणखी एक तिसरा मृत्यू झालाय... जो खूपच चिंताजनक आहे...
***
मृत्यू तिसरा
वैद्यकीय प्रॅक्टीसच्या नोंदणी प्रसंगी घ्यावयाची शपथ...माझे संपूर्ण जीवन मी मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होत आहे... कोणत्याही दबावाला बळी न पडता, मी माझे वैद्यकीय ज्ञान कधीही मानवतेच्या नितीनियमांविरुद्ध वापरणार नाही... मानवी जीवनाप्रती मी सदैव सर्वोच्च आदर बाळगेन... माझे कर्तव्य आणि माझा रुग्ण यांच्यामध्ये मी कधीही धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, पक्षीय राजकारण अथवा सामाजिक भेदभाव येऊ देणार नाही... माझी वैद्यकीय सेवा मी पूर्णतः सजगपणे आणि निष्ठापूर्वक करीत राहीन... माझ्या रुग्णाचे आरोग्य जपण्याला माझे प्रथम प्राधान्य राहील... सेवेच्या अनुषंगाने येणाऱ्या गोपनीयतेची मी रक्षा करेन... माझ्या गुरूंप्रती सदैव आदरभाव बाळगेन... वैद्यकीय व्यवसायाच्या आदर्श, सन्मान्य परंपरा मी सर्वार्थाने जपेन... माझ्या सहकाऱ्यांशी मी उचित सन्मानपूर्वक वागेन... इंडियन मेडिकल कौन्सिल (प्रोफेशनल कन्डक्ट, एटिकेट ॲन्ड एथिक्स) रेग्युलेशन्स, २००२ मधील सर्व वैद्यकीय नितीमूल्यांची जोपासना करण्यास मी प्रतिबद्ध राहीन...
... या शपथेच्या मृत्यूला जबाबदार कोण?

४ टिप्पण्या: