मंगळवार, १२ मार्च, २०१३

निखळ-४: ‘मार्क्स’वाद!
कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगेल्स आदी प्रभृतींनी एकोणीसाव्या-विसाव्या शतकात ज्या मार्क्सवादी, समाजवादी विचारांची रुजवात केली, त्या मार्क्सवादाशी आज मी आपल्याला सांगत असलेल्या आजच्या मार्क्सवादाचं काही देणं घेणं नाही,  याची तमाम वाचकांनी सुरवातीलाच नोंद घ्यावी. आमचा MARX वाद नाहीय, तो आहे MARKS वाद!

झालं काय की, काही दिवसांपूर्वी मी ऑफिसमधून घरी पोहोचलो. वातावरण गंभीर होतं. ज्युनिअर केजीत असलेल्या माझ्या साडेचार वर्षांच्या (पाहा, किती मोठी झालीय!) लेकीची फायनल एक्झाम सुरू होती. तिची आई (आमच्या मिसेस हो!) तिला समजावून सांगत होती, - तू हे असं लिहिलं नाहीस किंवा असं म्हटलं नाहीस, तर तुला टेन आऊट ऑफ टेन पडणार नाहीत, बरं!’ तिचं हे वाक्य ऐकून मी चक्रावलो; पण, एक जण मुलांना काही सांगत असेल, तर दुसऱ्यानं ते तोडायचं नाही, असं आमचं ठरलं असल्यानं मी काही न बोलता आवरु लागलो. नंतर बायकोच्या टेन्शन वाढण्यानं या अभ्यासाची सांगता झाली. आणि मी तिला हळूच म्हणालो, अगं, या वयात आपण शाळा बघितल्याचं तरी तुला आठवतंय का? मग मार्क मिळवणं तर दूरच!’ बायकोचं उत्तर तयार होतं, पण आता ती जात्येय ना शाळेत? तिच्या बरोबरीच्या सगळ्या मुलांनाही हे करावंच लागतं! मग तिच्याकडून करून नको घ्यायला?’ मी म्हटलं ठीक आहे, पण जरा सबुरीनं घे. तिनं तिला जमेल तेवढं केलं तरी पुरेसं आहे. मार्कांसाठी तिच्यावर बर्डन नको.
आमचा नवरा-बायकोचा संवाद इथं संपला तरी या मार्क्सवादाच्या झंझावातात आपण पुन्हा एकदा प्रवेश केल्याचं मला जाणवलं. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की, आम्ही शाळेत असताना विशेषतः दहावी-बारावीच्या वेळी याच मार्क्सवादाची कास अगदी करकचून धरली होती. बोर्ड फाड के.. पहिल्या पन्नासात येणाऱ्या मुलांचे मार्क्स ऐकून छातीत धडधडायचंच, पोटात गोळा उठायचा. आणखी बऱ्याच उद्विग्न भावना मनात दाटून यायच्या.  वाटायचं, कसं काय बुवा इतके मार्क या मुलांना पडत असतील? आणि त्यांच्या पेपरमधल्या आणि पुढं दूरदर्शनवरच्या मुलाखती पाहिल्या की आणखीच टेन्शन यायचं. कुणी चौदा तास, तर कुणी अठरा तास अभ्यास करणारं असायचं. या पार्श्वभूमीवर एखाद्यानं फक्त सहा तास मनापासून अभ्यास केल्याचं सांगितलं, तर ते काही पटायचं नाही. या बोर्ड फाडणाऱ्या मुलांना कुठल्या विषयात मार्क्स पडले, यापेक्षा त्यांचे दोन-तीन मार्क्स कुठल्या विषयात गेलेत, हे पाहण्यातही आम्हाला रस असायचा. सायन्स-गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवायचं स्वप्न आमच्याही मनात दाटून आल्याचं आठवतंय. पण कसचं काय? स्वप्नच ठरलं ते! आईवडिलांनी असं मार्कांसाठी आम्हा भावंडांवर कधी दडपण आणलं नसलं तरी त्या बोर्डवाल्या मुलांचं कौतुक त्यांच्या तोंडून ऐकताना आपणही तशा कौतुकाला पात्र होण्यासाठी म्हणून भरपूर मार्क्स मिळवावेत, असं वाटायचं. त्यासाठी तेव्हा नवीनच आलेला आणि बोर्डात आलेल्या मुलांनी रेफर केलेला दहावी दिवाळीचा अंक माझ्या एका काकांनी मला भेट दिला होता. तेव्हा आता बोर्डात मीच पहिला येणार, अशीही भावना पुन्हा कितव्यांदा तरी मनात दाटून आली. बोर्डात आलेल्या मुलांनी वापरला, म्हणून पायलट पेनालाही माझ्या कंपास बॉक्समध्ये मानाचं स्थान लाभलं होतं. पण आमची झेप कुंपणापर्यंतच! (हे काय सांगायला हवं?) एक होतं, आर्थिक, सामाजिक हालाखीच्या परिस्थितीतूनही ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम मार्क्स मिळवलेत, त्यांचं उदाहरण मात्र माझे आईबाबा आवर्जून देत. अशा मुलांविषयी मात्र मनात आदर निर्माण व्हायचा. त्या मुलांकडं कोणतंही पाठबळ नसताना ती कष्ट करून, अभ्यास करून इतके मार्क मिळवतात. आपल्याला तर तशी कोणतीच झळ नाही, फक्त अभ्यास एके अभ्यास करायचाय. मग आपण नेटानं प्रयत्न करायला काय हरकत आहे, अशा सकारात्मक विचारांनी मन भारुन जायचं.
आमच्या मार्क्सवादाच्या काळात एक झालं की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे गुरू मात्र भेटत गेले. मग ते कॉलेज-विद्यापीठात असो की नोकरीच्या ठिकाणी! तुम्हाला सांगतो, आयुष्यात हा गुरू भेटणं फार महत्त्वाचं असतं. अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक खूप असतात, पण सुसंस्कृत बनविणारा, जगण्याच्या लढाईला समोरं जाण्यासाठी पाठीवर हात ठेवून फक्त लढ.. म्हणून प्रोत्साहन देणारा, सावरणारा गुरू मात्र दुर्मिळ झालाय. चांगला गुरू करायलाही मुलांना शिकवायला हवं. गुरूही असा की, शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाला, याची खंत वाटण्याऐवजी अभिमान वाटावा त्याला; आणि शिष्यही असा की, कितीही मोठा झाला तरी गुरुच्या चरणी त्यानं नतमस्तक व्हावं! (अपवाद असणाऱ्या सर्व गुरूवर्यांची मी क्षमा मागतो, पण, आजच्या बाजारीकरणाच्या काळात माझ्या मुलांना असा गुरू भेटेलच, याची शाश्वती खरंच वाटत नाही.)
या पार्श्वभूमीवर, पुन्हा हा मार्क्सवाद माझ्या घरात नव्यानं प्रविष्ट झालाय. कदाचित, मी ही माझ्या आईबाबांप्रमाणं मुलांवर दडपण आणणार नाही, पण या सिस्टीमचं प्रेशर- जे त्यांच्या बालमनावर येतच राहील, त्याला मी कसा प्रतिबंध वा प्रतिरोध करणार? त्या प्रेशरवर मात करण्यासाठी आणि सिस्टीमशी जुळवून घेण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त कम्फर्ट करणं, एवढंच माझ्या हातात उरतं.
मग, मी काय करतो, लेकीला हळूच कुशीत घेतो, तिला थोपटतो आणि सांगतो, बेटा, उद्या तुझ्या सगळ्या मैत्रिणी ऱ्हाइम्स म्हणतील आणि तुला आली नाही तर तुलाच वाईट वाटेल कीनई? चल आपण दोघे मिळून प्रॅक्टीस करू!’ आणि आम्ही दोघंही तारस्वरात म्हणू लागतो-
                  ओल्ड मॅक्डोनल्ड हॅड अ फार्म.. इ..या..इ..या..ओ!’

८ टिप्पण्या:

 1. शिक्षणाच्या आईचा घो!
  जगण्याच्या लढाईचं बळ नाही मिळालं तरी चालेल. संस्कार नाही झाले तरी चालेल; पण मार्क्स हवेतच! शाळेत आमचं न गणित चांगल होत ना इंग्रजी. मग मराठी तरी कुठं बरं होतं? (खरं तर हे दुर्दैव) मार्क्सवाद कधी आम्हाला शिवलाही नाही. पुढच्या वर्गात ढकललेल्यांना ‘मार्क्स’वादाचं काय कौतुक असणार? पण आमचं घर, आमची शाळा, गाव, ओढे, नाले, शेतं, मंदिराचा पारं, जंगल हीच आमची शाळा होती. तिथं आनंदाचा सागर होता. दु:खांचा डोंगरही होता. नात्यांची वीण होती. जात्यावरचं गाण होतं. उणंही होतं; दुणं होतं. कुरापतीं होत्या. तरीही एकमेकांची एकमेकांकडे पत होती. ती माणसं होती. चुका होत्या. सोबतीला दुरुस्त्याही होत्या. माती होती. चिखल होता. डबकं होतं. रुतण्याची शक्यता होती. सावरण्यासाठी असंख्य हातही होते. कुठल्या तरी काका, आबा, दादा, नानाची भीती होती. झोपी जा नाही तर काका, आबा. दादा, नाना येईल, ही आईची अस्त्र होती. ते आमच्यासाठी शोलेतल्या गब्बरापेक्षा कमी नव्हते. पण त्यांच्या हातात बंदुका नसायच्या; धाक असायचा. ते मॉरल पोलिसही नव्हते. गायी- म्हैसींच्या धारा काढणंही ज्ञात होतं आणि पहिल्या धारेचीही माहिती होती. गुत्त्यावरची पुस्तकभर किस्सेही डोक्यात साचली होती. दिसभरात पिचलेल्या देहाला आणि मनाला ऊर्जा देण्यासाठी बापासाठी पावशेरभर आणून देण्याचीही सवय होती. चव चाखण्याची हिमत नव्हती. बरोबरी दूरच होती. बाप हा कायदा होता; आई त्या कायद्यातील पळवाट होती. शाळेत आणि पुस्तकात असलेलं नसलेलं दररोज शिकत होतो. अनुभवत होतो. भोगत होतो. मग आता सांगा याचा आणि ‘मार्क्स’वादाचा संबंध येतो कुठं. संबंध आला असता तर वाईट झालं नसतं. चांगलंच झालं असतं. तो आला नाही म्हणून जीवन वाया गेलं, असही मुळीच नाही. मार्क्सवादाला शंभर टक्के वाईट नाही. तो मुलांवर लादणं अन्यायापेक्षा कमी नाही. म्हणून म्हणावं लागतं, शिक्षणाच्या आईचा घो!
  -जगदीश त्र्यं. मोरे

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. तथाकथित शिक्षणाच्या नादात आपली मुलं 'शिकणंच' विसरून जातील की काय, असं वाटण्यासारखा काळ आहे. आणि मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळं या संपूर्ण यंत्रणेपुढं आपल्याला अगतिकता आणि हतबलतेचा सामना करावा लागतोय. कित्येकदा मनात प्रचंड द्वंद्व माजतं, अस्वस्थता येते, उद्विग्नता विषण्ण करते, पण आपण काहीच करू शकत नाही. एक साधी गोष्ट बघ ना, एरव्ही मोबाईलमध्ये मुलांचे खटाखट फोटो काढणारे आपण गॅदरिंगच्या दिवशी शाळेची परवानगी नसल्यानं आपल्या मुलांचे फोटो सुद्धा काढू शकत नाही. बाकी अभ्यासाची गोष्ट तर दूरच!
   बाकी, तुझी अस्वस्थताही माझ्यासारखीच पराकोटीची आहे- माझ्या लेखाला पूरक आणि अधिक आशय प्रदान करणारी! शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

   हटवा
 2. आलोक, पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मार्कांसाठी चढाओढ तेव्हाही होती आणि आताही आहे, किंबहुना जास्तचं आहे. आजच्या मुलांनी काय गमावलं आणि आपण काय कमावल किवा उलटे, याचे कोडे मात्र सुटत नाही. तुझ्या लेखामधील शेवटच्या ओळींमध्ये जे तू सांगायचा प्रयत्न केलायस नां तेच आपल्या हातात आहे. पण, लेख मात्र सुरेख आहे.
  भालचंद्र

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. हो भालू. बघ ना, गावातल्या मराठी शाळांमध्येच शिक्षण घेऊन आपण आजवर जे काही मिळवलं ते मिळवलं. शिक्षणाचा बाऊ आपल्या काळात नव्हता पण शिकवण्याची आस असणाऱ्या गुरूजींचा तो काळ होता. बाजारीकरणाच्या ओघात सारं काही वाहून आणि वाहवत चाललं आहे, हेच दुखणं आहे.

   हटवा
 3. Congrats dear Alok,
  Fantastic article, rather expression. Made me feel nostalgic.
  Keep it up brother,
  Kartik Lokhande,
  Chief Reporter,
  The Hitavada,
  Nagpur

  उत्तर द्याहटवा
 4. या सार्यावर उपाय पहायला गेल की चांगली पानभर यादी निघेल.. पण अंमलबजावणीसाठी मात्र एकसुद्धा पात्र नसेल..!!

  २१ बहुऊपयोगी संकेतस्थळे (विनामुल्य ई-पुस्तक)<a

  उत्तर द्याहटवा