मंगळवार, २१ मे, २०१३

निखळ-९: ‘आय. फि. एल.’ … सिर्फ देखने का...?शीषर्कात वापरलेल्या शॉर्ट फॉर्मचा विस्तृत फॉर्म मी सूज्ञ वाचकांना सांगायलाच हवा, अशातला भाग नाही कारण भारतीय क्रिकेट जगताला लागलेली फिक्सिंगची कीड गेल्या चार दिवसांत पुन्हा नव्यानं चर्चेत आलेली आहे.
स्पॉट फिक्सिंगचा सबळ पुराव्यानिशी आरोप ठेवून दिल्ली पोलीसांनी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि चांडिला या तिघांवर तातडीनं केलेली कारवाई अभिनंदनीय आहे. या कारवाईनंतर आयपीएलच्या बऱ्यावाईटाबद्दल पुन्हा चर्चेचं वादळ उठलं. प्रत्यक्षात ललित मोदीच्या सुपीक डोक्यातून क्रिकेटच्या टी-ट्वेंन्टी फॉर्मेटचा वापर करून त्याचं पैशाच्या वटवृक्षात रुपांतर करण्याची कल्पना बाहेर पडली आणि आयपीएलचा जन्म झाला, तिथंच खऱ्या अर्थानं आयपीएलचा मूळ उद्देशही स्पष्ट झाला. क्रिकेट आणि प्रेक्षक हे दोन घटक वगळता आयपीएलमध्ये गुंतलेल्या इतर प्रत्येक घटकाचा इथं फायदा झालेला आहे. क्रिकेट हा इथं क्रीडाप्रकार (sports) नसून  मनोरंजन (entertainment) आहे. मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जावं, तसा पैसा खर्च करून क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमवर यायचं, तीन तासांची करमणूक करवून घ्यायची, दंगामस्ती करायची आणि परत जायचं. क्रिकेटपेक्षा इतर भलभलत्या गोष्टींकडंच खेळणाऱ्यांचं आणि खेळ पाहणाऱ्यांचंही लक्ष असतं. आयपीएल हा गेम नसून रेस आहे, असं माझं सुरवातीपासूनचं मत आहे. रेसकोर्सवर जसं घोड्यांच्या शर्यती लावून त्यावर सट्टा लावला जातो आणि काही वेळातच त्यातून भरघोस कमाई केली जाते; त्याच धर्तीवर इथं खेळाडूंवर बोली लावून त्यांचा लिलाव मांडला जातो. खेळाडू स्वतःच्या मर्जीनं या लिलावाच्या घोडेबाजारात स्वतःला उभं करतात, हे विशेष. इथं एकेकावर लाखो-करोडो रुपयांची बोली लावली जाते, त्यांची खरेदी केली जाते. आता या घोड्यानं मालकाच्या (फ्रँचाइसीच्या) तालावर नाचलं पाहिजे, हा इथला अलिखित नियम. रिकी पाँटिंगसारखा क्रिकेटपटू एरव्ही फॉर्म कमी झाला तरी कसोटी, वन-डे खेळत राहिला असता, पण इथं एक दोन गेमनंतर संपूर्ण आयपीएल मैदानाबाहेर बसून पाहण्यात त्यानं धन्यता मानली, याचं कारणही हेच. लॉयल्टी खेळाशी नाहीच, ती केवळ पैसे देणाऱ्या धन्याशी. राहुल द्रविड, ज्याला आम्ही द वॉल म्हणून कौतुकानं गौरवलं, ती सुद्धा डळमळताना पाहण्याचं दुर्दैव आयपीएलमुळं आमच्या नशिबी आलं. असो!
...तर या रेसमध्ये अमाप पैसा गुंतलेला आहे. फ्रँचाइसी, टेलिव्हिजन राइट्स, स्पॉन्सरशीप यांच्या माध्यमातून आयपीएलमध्ये गुंतणारा पैसा आणि होणारी उलाढाल ही सर्वसामान्यांच्या डोक्याबाहेरची गोष्ट आहे. केवळ माहितीसाठी काही आकडे सांगतो. साधारण दहा वर्षांच्या काळात बीसीसीआयला आयपीएलमधून किमान 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. फ्रँचाइसींसाठी सुरवातीला साधारण 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी बेस प्राइस निश्चित केली होती. प्रत्यक्षात बोली लागली 723.59 दशलक्ष डॉलर्सची. पहिल्या पाच वर्षांचं (सन २००८ ते २०१२) प्रायोजकत्व डीएलएफ या भारतातील आघाडीच्या प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनीकडं होतं. त्यासाठी डीएलएफनं २५० कोटी रुपये मोजले. यंदाच्या सीझनपासून पुढच्या पाच वर्षांसाठी आता पेप्सीकोनं प्रायोजकत्व स्वीकारलंय. त्यासाठी कंपनीनं ३९६.८ कोटी रुपये मोजलेत. त्याशिवाय आयपीएलच्या प्रत्येक टीमशी ऑफिशियल बेव्हरेज सप्लायर म्हणूनही स्वतंत्र करार केलेत. सोनी वाहिनीनं दहा वर्षांसाठी सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क 8700 कोटी रुपये देऊन बीसीसीआयकडून विकत घेतले आहेत. याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांचीही वेगवेगळ्या प्रायोजकत्वासाठी आयपीएलमध्ये गुंतवणूक आहे. आयपीएल सुरू झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी महसूल दुपटीनं वाढल्याचं (सुमारे १८ हजार कोटी रुपये) निरीक्षण एका युके बेस्ड कंपनीनं नोंदवलं आहे. गेल्या पाच वर्षांत महसुलात किती वाढ झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. अशा तऱ्हेनं आयपीएलमधून निर्माण होणारा सर्व पैसा सेंट्रल पूलद्वारे एकत्र केला जातो. त्यातला 40 टक्के आयपीएलसाठी, 54 टक्के पैसा फ्रँचाइसींकडे आणि केवळ सहा टक्के पैसा बक्षीसांवर खर्च होतो. 2017 नंतर हा शेअर अनुक्रमे 50 टक्के, 45 टक्के आणि 5 टक्के असा बदलणार आहे.
आयपीएलमध्ये गुंतलेल्या या अमाप पैशांमुळंच नामांकित उद्योजक, व्यावसायिकांनी त्यात गुंतवणूक केलीय. चला, क्रिकेटच्या भल्यासाठी काही तरी चांगलं करू या, अशा टाइपची ही गुंतवणूक नक्कीच नाही. पैसा फेंको, तमाशा दिखाओ और प्रॉफिट कमाओ। हाच त्यांचा मूळ उद्देश असल्यास ते त्यांच्या व्यावसायिक प्रतिमेस साजेसंच आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आता आयपीएलमध्ये सलग दोन वर्षे स्पॉट फिक्सिंगचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळं खेळाडू आणि बुकी यांचे संबंध जगासमोर येताहेत. तथापि, आयपीएलमधील टीम्सच्या मालक कंपन्या आणि बुकी यांच्या संबंधांचीही या अनुषंगाने चौकशी होण्याची नितांत गरज आहे, असं मला वाटतं. श्रीशांतच्या एका बॉलसाठी दहा लाख मोजण्याची तयारी असणारे बुकी अखंड मॅचसाठी किती मोजायला तयार असतील? आणि तसं होतच नसेल असं छातीठोकपणे कोणीतरी म्हणू शकेल काय? म्हणूनच तपासकर्त्यांनी या दिशेनंही पुरावे गोळा करण्याची गरज आहे.
आता राहता राहिला प्रश्न आपल्या खेळाडूंचा उर्फ रेसच्या घोड्यांचा. या घोड्यांच्या हातात नको त्या वयात इतका पैसा खेळू लागतो की, अति पैशामुळं ते न चेकाळतील, तरच नवल! त्या पाठोपाठ इतर दुर्गुणही येतात. त्यामुळं श्रीशांत, अंकितला अटक केले तेव्हा त्यांच्यासोबत तरुणी सापडल्या, यात मला तरी आश्चर्य वाटत नाही. पहिल्या वर्षी आयपीएलच्या एका टीमचे सल्लागार असलेल्या क्रिकेटपटू रमेश वायंगणकरांनी आयपीएलच्या खेळाडूंच्या मॅच संपल्यानंतरच्या वर्तणुकीबाबत अतिशय खेद आणि चिंता व्यक्त केली. त्यांची ऐय्याशी आणि मौजमजा करण्याचे प्रकार पाहून दुसऱ्या वर्षीपासून त्यांनी थेट आयपीएलला रामराम केला. बीसीसीआयला आयपीएलचा फॉर्मेट वापरुन रणजी, दुलिप, इराणी, एनकेपी साळवे, विजय हजारे, देवधर अशा अनेक प्रथम श्रेणी करंडक सामन्यांचं कल्याण करता येऊ शकलं असतं, पण तिथं इतका पैसा सहजी मिळाला नसता. त्यामुळं त्यांनी आयपीएलच्या माध्यमातूनच क्रिकेटचं (की आणखी कोणाचं?) कल्याण करण्याचं ठरवलंय. आयपीएल बंद करा, अशी माझी मागणी नाही. कारण त्यातून कोणाचं भलं होणार असेल, प्रेक्षकांचं मनोरंजन होणार असेल तर होऊ द्या, पण क्रिकेटला मात्र मूठमाती मिळता कामा नये, एवढंच मागणं आहे. त्यासाठी त्यात गुंतलेल्या दुष्प्रवृत्ती मुळातूनच उखडून काढल्या पाहिजेत.

११ टिप्पण्या:

  1. this is our ancient history & we proud of it.i like yours presentations very much . in future i see this caves with my family....shital dhanawade

    उत्तर द्याहटवा