सोमवार, ३ जून, २०१३

निखळ-१०: द झिंग थिंग..!

('दै. कृषीवल'च्या 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. ३ जून २०१३ रोजी प्रकाशित झालेला भाग...)

माणूस हा प्राणी आहे.. नव्हे.. पशु आहे.. नव्हे.. जनावरापेक्षाही पशुत्व त्याच्यात ठासून भरलेलं आहे.. जनावरं सुद्धा काही कारणाशिवाय दुसऱ्या पशुला दुखापत करत नाहीत.. पण माणसाचं मात्र तसं नाही.. पोटच्या पोराबद्दलही त्याला काही वाटत नाही.. त्याचा खून करताना.. त्याच्या नरडीचा घोट घेऊन घटाघटा रक्त पिताना.. काहीच वाटत नाही...
विणीच्या हंगामाखेरीज पशुंमधील नर मादी एकमेकांशी रत होत नाहीत.. मात्र जबाबदाऱ्यांपासून फारकतही घेत नाहीत... दुर्दैवानं नर तिथंही अपवाद... कार्यभाग साधून मोकळे होणारे... माणसाबद्दल तर बोलायलाच नको... बारोमास त्याच्यातला क्रूर कामकर्मा तडफडणाराच.. फडफडणाराच... संधी मिळाली की मोका साधणारा... त्याला झुंडशाहीची साथ मिळाली की.. पशूहूनही हीन वागणारा... नातेसंबंध विसरून.. कामांध बनून... प्रत्येक स्त्रीकडं केवळ मादी म्हणून पाहणारा... दरम्यानच्या काळात पूर्वजांनी.. जाणतेपणानं सामाजिक संबंधांचे निकष ठरवले म्हणून बरं... आणि तसं ठरवूनही काय उपयोग... ते मोडीत काढण्याला खतपाणी घालणारंच वातावरण सर्वत्र... रानटीपणाकडून रानटीपणाकडे... अशीच आपली वाटचाल सुरूय... कुठला माणूस सामाजिक प्राणी आहे?... केवळ समाजशास्त्र म्हणतं म्हणून..? ... पुस्तकातलं वातावरण प्रत्यक्षात का नाही?... आणि प्रत्यक्षातलंच सारं पुस्तकांतून, पेपरांतून वाचताना... कोणालाच काही वाटत नाही...
आज सारं जग एका खिडकीत सामावलेलं.. पण या खिडकीचा आवाका कुणाला कळलाय?..  नुसतं वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज म्हटलं की भागलं?.. साध्य झाली का आपली वैश्विकता... जगाच्या खिडक्या उघडताना.. जगाच्या खिडकीत डोकावताना.. मन नावाच्या खिडकीची झडप मात्र उघडेनाशी झालीय.. आपण ती उघडण्याचा प्रयत्नच करत नाही.. की विसरलोय?.. की मुद्दामच विसरल्यासारखं करतोय?.. या झडपेची काचही हल्ली खूप धुरकटलीय.. कळकट्टच म्हणा ना.. तशी झालीय.. अलीकडं कधी तडेही गेल्यासारखे अंधुक दिसतायत... त्या तड्यांमध्येच कधी काळी उठलेल्या धुळीच्या लोळांमधले मातीचे कणही जाऊन बसलेत.. कधी मधी पडलेल्या पावसाच्या थेंबांनी.. अन् त्यानंतर पडलेल्या कडक उन्हानं.. हे तडे पक्के केल्येयत.. अगदी काँक्रिटसारखंच काम.. एकदम भक्कम.. ही काच बदलायची गरज आहे.. पण ती कधी साफ तरी होणार आहे का?.. की कधीच नाही?.. जगाच्या खिडकीत.. अन् त्या खिडकीतून.. डोकावणाऱ्यांनो.. कुणीतरी.. एखादा मोठ्ठा.. पत्थर भिरकावून मारा रे त्या काचेवर... फुटू द्या तिला खळ्ळकन्.. विखरू द्या तिचे तुकडे.. इकडे तिकडे.. जगभर.. पण.. पाहू नका त्या तुकड्यांकडं.. अजिबातच दुर्लक्ष करा त्यांच्याकडं... तिकडं वरती बघा.. त्या झडपेची काच फुटली असली तरी.. तिच्याबरोबरच.. ते सारे तडे.. तो कळकट्टपणा.. ते चिवटलेले धुलीकण... सारंच कसं नाहीसं झालंय... आणि लक्षात येतंय का?.. त्या झडपेचीही आता एक शुभ्र, स्वच्छ खिडकी झालीय... एकदम आरपार.. थेट.. जगाशी जोडणारी.. जगाला भिडणारी.. पण हे असं कधी तरी होईल का?.. की कधी होणारच नाही?.. की निव्वळ माझी कल्पनाच?.. ती प्रत्यक्षात यावी, असं वाटतं.. असं वाटणारे माझ्यासारखे आणखीही असावेत.. असतीलच बहुधा.. आणि तरीही.. कोणालाच काही वाटत नाही...
आजचा भवताल... खूप आकर्षक आहे.. अन् अनाकर्षकही... तो खूप चकचकीत आहे.. गुळगुळीत आहे.. रंगबिरंगी आहे.. भुलवणारा आहे.. भिरभिरवणारा आहे.. गरगरवणारा आहे.. म्हणून तो आकर्षक म्हणावा तर.. वस्तुस्थितीपासून खूप दूर भिरकावणारा आहे.. केवळ मनाला भुरळ आणि भूल पाडणारा आहे.. मोहाची दारु प्यायल्यागत नुस्ता झिंगवणारा आहे.. कचकडी आहे.. बेगडी आहे.. म्हणून अनाकर्षकही आहे.. पण या अनाकर्षकाचंच हल्ली खूप आकर्षण पडताना दिसतंय.. सारीकडं नुसती धुंदी.. प्रत्येकजण आपापल्या.. आणि वेगवेगळ्याही.. धुंदीत जगताना अन् झिंगताना.. नव्हे जगत झिंगताना.. की झिंगत जगताना.. की कसाबसा जगताना दिसतोय... या कशाबशांनाही झिंगवलं जातंय.. त्यांच्याही नकळत.. हे वेगळंच नार्कोसिस.. याची नशाच वेगळी.. त्यांना वाटतं.. की आपण खूप काही करतोय.. खूप सारं होतंय आपल्या हातून.. पण प्रत्यक्षात.. होत काहीच नसतं.. झालेलं काहीच नसतं.. चढवलेली झिंगच तसं वाटवून देत असते.. प्रत्यक्षात सारं काही स्तब्ध, स्थिर.. गतिहीन.. निर्विकार.. अन् तरीही खूप विकारवश.. चढवलेल्या झिंगेतून या विकारांनाही खूप मद चढतो.. गात्र न् गात्र शिथिल होण्याऐवजी.. मदमस्ततेची वाट चालू पाहतात.. साथीला सज्ज.. तसेच अन् तसलेच अनेक साथीदार.. कधीही साथ सोडू शकतील असे.. पण वाटतात मात्र अंतापर्यंत सोबत राहतील असे.. संयमाचा.. आपपरभावाचा.. सारा विवेकच नष्ट करून टाकणारे.. पण तरीही जणू काही.. खूप सूज्ञ करून सोडल्यासारखे वाटणारे.. ही सूज्ञता कसली?.. कुठला हा शहाणपणा?.. छट्.. हा तर निव्वळ देखावा.. काही क्षणांपुरता.. मौजमजेपुरता.. दाखवण्यापुरता.. नंतर त्याची पार रया जाते.. हेही नेहमीचंच!.. सारं घडतंय.. घडवलं जातंय.. त्यांना हवं तसं.. मोडेन पण वाकणार नाहीचा बाणा.. मोल्ड केला जातोय.. त्यांना हवा तसा.. पुन्हा वर त्याचंही झगझगीत पॅकेजिंग करून.. पुन्हा तेच पेश केलं जातंय.. नवं काही असल्यासारखं.. आपणही त्या नव्याचा स्वीकार करतो.. नवं असल्यासारखं.. ग्लोबलायझेशनमध्येही पुन्हा तेच.. जुन्या गोष्टींचंच नवं मार्केटिंग.. सर्वात जुनी.. मूलभूत अंतःप्रेरणा.. हो तीच.. कामभावना.. सेक्स.. तिचंच सगळीकडं मार्केटिंग.. जणू इतर साऱ्या भावना तिच्यापुढं गलितगात्र.. झिंगून पडल्यासारख्या.. हिची उत्तेजना मात्र कायम.. पुन्हा तीही चढवलेलीच.. व्हायग्राच्या पॅकेजिंगमधून नव्हे.. साध्या इडियट बॉक्समधून.. त्याच त्या मघाच्या.. ग्लोबल जगाच्या खिडकीमधून.. त्या तालावर झिंगताहेत सारे.. डोलताहेत सारे.. सारं इतकं सहज होतंय.. सोप्पं झालंय.. काही जण सोल्युशन शोधण्याच्या मागे.. सापडण्याची आशा दूरवर नाही.. कारण झडपेची कळकट्ट काच.. समाजशास्त्राच्या झालेल्या चिंध्या.. मूलभूत रानटी भावना खरंच संयत.. नव्या माणुसकीनं तिलाही काळिमा फासला.. का अन् कसा? .. सारंच अनाकलनीय... त्याचं कोणालाच काही वाटत नाही...
हे अनाकलनीय.. खरंच आकलनाच्या पलीकडलं आहे का?.. वाटत तर नाही.. पण मग हे सारं असं का?.. हे सारं आताच असं आहे की आधीपासूनचंच?.. आधीच असेल तर.. मग आतापर्यंत कुठं होतं?.. आणि आताच असं झालं असेल तर.. तसं होण्याचं कारण काय?.. मला माहिती नाही.. की आहे माहीत?.. कुणास ठाऊक.. कबूल करायची तयारी इथंही नाहीच.. कारण मला सुद्धा....... काहीच वाटत नाही..!

२ टिप्पण्या:

 1. आलोक, खूपच सुंदर लेख लिहिला आहे. वाचतेवेळी थोडा डिस्टर्ब झालो पण आतापर्यंत तू लिहिलेल्या लेखा मधील हा सर्वात उत्कुष्ट लेख वाटतो. असाच लिहित राहा.

  Bhalchandra

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद भालू. तू वेळात वेळ काढून वाचतो आहेस, हे माझ्यासाठी खरंच मोलाचं आहे. तुझ्या प्रतिक्रियेनं आणखी चांगलं लिहीण्याचं बळ मिळतं. मनापासून धन्यवाद.

   हटवा