सोमवार, १७ जून, २०१३

भरगच्च प्रतिसाद लाभलेली उत्कृष्ट कार्यशाळा!




('दै. कृषीवल'तर्फे आयोजित पहिल्या स्तंभ विचार परिषदेच्या अनुषंगाने अलिबाग येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेविषयी रविवार, दि. १६ जून २०१३ रोजीच्या 'कृषीवल मोहोर' पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला माझा लेख वाचकांसाठी सादर करीत आहे.)

दै. कृषीवलचा ७६वा वर्धापनदिन अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. दैनिकाचे मुख्य संपादक संजय आवटे यांनी कृषीवलच्या सर्व स्तंभलेखकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरविले आणि अगदी दोन दिवसांत पहिल्या स्तंभ विचार परिषदेची संकल्पना आकाराला आली. दोन दिवसांचा अतिशय भरगच्च कार्यक्रम आणि त्यामध्ये प्रा. हरी नरके, न्या. डॉ. यशवंत चावरे, प्रा. जी.एस. भोसले आदी मान्यवरांसह सर्व नवे-जुने स्तंभलेखक सहभागी झाले. परिषदेची व्याप्ती कदाचित या सहभागींपुरतीच मर्यादित राहिली असती, जर तिला रायगड जिल्हास्तरीय बातमीदारांच्या कार्यशाळेची जोड मिळाली नसती तर! आवटे सरांबरोबरच कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांची भूमिकाही त्यामध्ये खूप महत्त्वाची ठरली. रायगड जिल्ह्यातील बातमीदारांची कार्यशाळा याचा अर्थ आम्ही रायगड जिल्ह्यातील केवळ कृषीवलच्या बातमीदारांची कार्यशाळा असा घेतला होता. तथापि, प्रत्यक्षात कृषीवलव्यतिरिक्तही जिल्ह्यातील प्रत्येक बातमीदारासाठी ही कार्यशाळा खुली होती, हे या कार्यशाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले, असे मला वाटते. आणि जिल्ह्यातील सुमारे ७९ बातमीदार या कार्यशाळेला उपस्थित राहिले, यावरुन कार्यशाळेचे महत्त्व आणि कृषीवलचे जिल्ह्यातील आदराचे स्थान या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्या.
चित्रलेखा पाटील यांनी तर आपल्या मनोगतामध्ये कृषीवल माझा असला तरी जिल्ह्यातील कोणत्याही दैनिकाच्या बातमीदाराविषयी आपल्याला तितकीच आत्मियता असल्याचे स्पष्ट केले. यावरुन व्यावसायिक धोरणांच्या पलिकडे जाऊन कृषीवलचे व्यवस्थापन आजघडीलाही विचार करते आहे, पाहते आहे, याचे प्रत्यंतर आले.
सदरची कार्यशाळा पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि बातमीदारांची तयारी या विषयावर झाली. त्यामध्ये एकूण चार सत्रांमध्ये बातमी कशी लिहावी, काय लिहावी?, ग्रामीण वृत्तांकन, बदलणारी ग्रामीण पत्रकारिता, ऑनलाइन माध्यमे आणि नवे जग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मराठीत अचूक व प्रभावी कसे लिहावे?, पत्रकार आणि कायदे आणि माहिती अधिकार कायदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयांवर अनुक्रमे शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव आलोक जत्राटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार, अहमदनगरचे लोकसत्ताचे वरिष्ठ बातमीदार अशोक तुपे, प्रहार ऑनलाइनचे संपादकीय प्रमुख जयकृष्ण नायर, आरसीएफ, अलिबागचे जनसंपर्क उपव्यवस्थापक धनंजय खामकर, पत्रकार-लेखिका स्मिता पाटील वळसंगकर, अधिपरीक्षक (पुस्तके व प्रकाशने) हर्षवर्धन पवार आणि राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार-लेखक-विचारवंत प्रा. जी.एस. भोसले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या सत्रामध्ये एबीपी माझाचे अँकर प्रसन्न जोशी यांनी 'बदलणारी माध्यमे- इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विशेष संदर्भात' या विषयावर विवेचन केले तर समारोप लोकमत मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांच्या हस्ते झाला. याखेरीज कार्यशाळेला संपादक सतीश धारप, प्रफुल्ल पवार, जयंत धुळप, बळवंत वालेकर, नागेश कुलकर्णी, सुभाष म्हात्रे, उमाजी केळुसकर, हर्षद कशाळकर, सुवर्णा दिवेकर, किशोर सूद, महेश पोरे, मोहन जाधव, सचिन पाटील आदी वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते. अलिबागमध्ये पत्रकारांसाठी इतकी मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेली आणि मुख्य म्हणजे पत्रकारांकडून इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेली ही अलिकडच्या काळातील सर्वाधिक यशस्वी व एकमेव कार्यशाळा ठरली असल्याचे एका सहभागी ज्येष्ठ पत्रकारानी सांगितले.
पत्रकारितेच्या क्षेत्राच्या माध्यमातून सर्वत्र वावरत असताना बातमीदारांमध्ये सर्वज्ञतेच्या भावनेचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे हे आता काय नवीन सांगणार?’ अशी भावनाही मध्येच डोके वर काढण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना या कार्यशाळेस उपस्थित राहावेसे वाटले, ही त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती अद्याप कायम असल्याचे निदर्शक होती. जिल्हा पातळीवर किंवा ग्रामीण स्तरावर बातमीदारी करत असताना बातमीदारांमध्ये पत्रकारितेच्या मूळ प्रवाहांपासून एक प्रकारचे तुटलेपण येण्याची, गरज नसतानाही आवाका विनाकारण संकुचित होण्याची शक्यता असते. आज महाराष्ट्राच्या शहरीकरणाचा वेग ५० टक्क्यांहून अधिक आहे. या पार्श्वभूमीवर खेडी शहरीकरणाकडे तर शहरे मेगा-शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे शहरी-ग्रामीण सीमारेषा तितक्याच वेगाने पुसट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण बातमीदारांनी शहरीकरणाचे, विशेषतः पत्रकारितेमध्ये शहरीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या अनुषंगाने होत चाललेले बदल अभ्यासून ते आत्मसात करण्याची आजघडीला तीव्र गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने कृषीवलने आयोजित केलेली कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरली, असे म्हणता येईल.
उद्घाटनाच्या सत्रामध्ये उद्घाटक प्रा. भोसले यांनी पत्रकारितेमध्ये नवनवे प्रवाह, बदल येत गेले असले तरी मूलभूत सामाजिक दृष्टीकोन बदलता कामा नये, असे मत मांडले तर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा वाढता वरचष्मा आणि मनोरंजनाच्या झंझावातामध्ये बातमीचे घसरणारे मूल्य चिंताजनक असल्याचे सांगितले. प्रसन्न जोशी यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करत असताना सांभाळावी लागणारी अष्टावधाने आणि त्यामधून २४x७ बातमी देण्याचे हमखास बंधन यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील बातम्यांना इन्फोटेनमेंटचे स्वरुप आल्याचे सांगितले. त्या तुलनेत मुद्रित माध्यमांमध्ये बातमीची शहानिशा आणि अधिक तपशील देण्यासाठी उपलब्ध वेळ यामुळे या माध्यमाची विश्वासार्हता आणि वार्तामूल्ये अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळली जातात, असे सांगितले.
त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बातमीलेखनाविषयी मी मार्गदर्शन केले. केवळ शहरी भागात काम करण्याची संधी न मिळणे म्हणून ग्रामीण हा शिक्का पत्रकारांवर बसतो, तथापि, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगिकाराने ही दरी कमी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भारताच्या विकासासाठी केंर्द व राज्य शासनाच्या स्तरावर ज्या काही अनेकविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्यांच्या योग्य अंमलबजावणीचा आग्रह धरणे, त्यावर लक्ष ठेवणे आणि त्यासंदर्भात फीडबॅक देणे, अशा विकासात्मक जबाबदारी या पत्रकारांवर आहे. त्या दृष्टीने आपण सारे ग्रामीण नव्हे, तर विकास पत्रकार आहात, अशी भावना बाळगण्यास सांगितले.
यानंतर भगवान दातार सरांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून बातमी करण्याची संधी कशी डोकावत असते, फक्त आपण ती साधणे पत्रकारितेत किती महत्त्वाचे असते, ते उदाहरणांसह स्पष्ट केले. पुढच्या सत्रामध्ये स्मिता पाटील-वळसंगकर यांनी प्रभावी पत्रकारितेसाठी मराठी शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे महत्त्व मौलिक असल्याचे सांगितले. भाषा समृद्धीच्या दृष्टीने आणि व्यासंगी  पत्रकारितेच्या दृष्टीने पत्रकारांनी चौफेर, डोळस वाचन आणि प्रयोगशील लेखणी या दोन गोष्टींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जगदीश मोरे यांनी माहिती अधिकार कायद्यामुळे पत्रकारांच्या हातामध्येही माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त अस्त्र प्राप्त झाले असून त्याचा समाजहितासाठीच वापर करावा, असे आवाहन केले. केंद्र व राज्य निवडणूक आयोगांची कार्यप्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनजागृतीच्या कामी पत्रकारांचे योगदान कसे मोलाचे ठरते, याचे विवेचन त्यांनी केले. हर्षवर्धन पवार यांनी पुस्तके व प्रकाशने विभागाचे महत्त्व आणि पत्रकारांकडून, संपादकांकडून शासनाच्या अपेक्षा याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. अशोक तुपे यांनी पत्रकारितेच्या आजच्या बदलत्या स्वरुपामध्ये ग्रामीण पत्रकारांचे योगदान आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार असून त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण वार्तांकनावर त्यांनी भर देणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. धनंजय खामकर यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पत्रकारितेचे साहचर्य अतिशय अत्यावश्यक असून पत्रकारांच्या योग्य सहकार्याखेरीज कोणताही जनसंपर्क यशस्वी होऊच शकणार नाही, असे मत मांडले. जयकृष्ण नायर यांनीही ऑनलाइन माध्यमाचा स्वीकार ही काळाची गरज असून सर्वच बातमीदारांनी त्या दृष्टीने आवश्यक बदलांचा अंगिकार केला पाहिजे, असे मत मांडले.
समारोपाच्या सत्रामध्ये लोकमत, मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये स्थानिक बातमीदारांनी बदलत्या प्रवाहांचे भान स्वीकारून त्यांना अनुरुप असे बदल स्वतःच्या कार्यशैलीमध्ये करावेत, असा मौलिक सल्ला दिला. त्याचप्रमाणे पत्रकारितेमध्ये व्यवस्थापनाचे महत्त्व वाढण्याची कारणमीमांसा करत असतानाच तशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी आणि भान राखून पत्रकारिता करता येऊ शकते, हे अनेक उदाहरणांसह पटवून दिले.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील एकूणच बदलत्या प्रवाहांचा समान धागा घेऊन पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कशी जोपासता येतात, याविषयी सर्वच मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. श्री. आवटे आणि श्रीमती पाटील यांनी अवघ्या एका दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये किमान चार दिवसांच्या कार्यशाळेइतक्या माहितीचा खजिना रायगड जिल्ह्यातील बातमीदारांना उपलब्ध केला. केवळ व्याख्यानांच्या स्वरुपातच नव्हे तर लेखी टिपण, मुद्देही उपलब्ध केले, जेणे करून या कार्यशाळेतील मूलभूत माहिती सदैव त्यांच्या हाताशी राहील, याची दक्षता आयोजकांनी घेतली. या अतिशय नेटक्या, आटोपशीर कार्यशाळेला मिळालेला भरगच्च प्रतिसाद पाहता आम्हा मार्गदर्शकांनाही एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे समाधान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा