गुरुवार, २७ जून, २०१३

निखळ-११ : विश्वासार्हतेचा ‘टायर बर्स्ट’!('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)

गेल्या रविवारी रात्री अलिबागहून कोल्हापूरकडे परतत असताना साताऱ्याच्या थोडं पुढे आमची कार पंक्चर झाली. नुसती पंक्चर नव्हे तर टायरच आडवी कापली जाऊन फुटली आणि आमचे वाघमोडे आण्णा अनुभवी ड्रायव्हर म्हणूनच कार अगदी सराईतपणे रस्त्याकडेला घेऊन अर्ध्या तासाच्या आत त्यांनी टायर बदलली सुद्धा. मोठ्या प्रवासामध्ये अशी गोष्ट स्वाभाविक असल्यानं झाल्या घटनेचा आम्ही फारसा विचार केला नाही. रात्रीच्या दोन वाजता नवी टायर फुटल्याबद्दल तोपर्यंत मनातल्या मनात कंपनीलाही दोष देऊन झाला होता. टायर बदलून आम्ही त्या ठिकाणापासून अर्धा-एक किलोमीटर आलो असू, त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पंक्चर काढण्याच्या दुकानासमोरची लाइट सुरू असल्याचं दिसलं आणि आणखी दोन मोटारी त्या दुकानासमोर उभ्या असलेल्या दिसल्या. एकीचं पंक्चर काढण्याचं काम सुरू होतं, तर दुसरी प्रतीक्षेत. त्याचवेळी आणखी एक इनोव्हा आणि थोड्या वेळानं एक लक्झरी बस तशाच फटफटत आम्हाला पास करून गेल्या. तेव्हा मात्र हा पंक्चरचा प्रकार नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचं आमच्या ध्यानात आलं. दुकानापासून पलिकडं साधारण दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावर काँक्रिटच्या खाचेत मोळे आणि पत्राच उभा रोवून ठेवला तर स्पीडमध्ये असलेली मोटार पंक्चर होऊन आपसूक आपल्यापासून जवळच येऊन थांबेल आणि पंक्चर काढून, नाइट चार्ज लावून महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांची लूट करता येईल, असा थेट विचार त्या पंक्चरवाल्यानं केलेला दिसला. आमच्याकडे स्टेपनी नसती तर आम्हीही त्याच्या दुकानासमोरचे तिसरे असणार होतो. मला त्याची तुलना एखाद्या दरोडेखोराशीच करावीशी वाटली. विश्वासार्हता तर गेलीच पण सचोटी, प्रामाणिकपणा या गोष्टींना पैशांसमोर काही महत्त्व उरलेलं आहे की नाही, असा प्रश्न मला पडला.
त्याचवेळी माझ्या मनात कोल्हापूरच्या शिरोली पुलाजवळच्या केरळी आण्णाची आठवण ताजी झाली. कोरगावकर पेट्रोल पंपाला लागून एक छोटंसं खोपटं होतं आण्णाचं- पंक्चर काढून देण्याचं. राहायचाही तिथंच, एकटाच. त्यावेळी आम्ही शिरोली एमआयडीसीमधल्या सकाळ ऑफिसमध्ये कामाला जायचो. रात्रीच्या वेळी एखाद्याच्या बाईकमधली हवा गेली किंवा पंक्चर झालं, तरी आण्णाचा आधार असायचा. त्या खोपटासमोर उभं राहून आण्णाआण्णा...अशा एक-दोन हाकांमध्येच आण्णाची आतून ..’ ऐकू यायची. झोपेला टाटा करतच आण्णा टॉर्च घेऊन बाहेर यायचा. समोरच्या बाईकची वास्तपुस्त होऊन त्यानं लगेच पाण्याची पाटी घेऊन काम सुरूही केलेलं असायचं. झटक्यात पंक्चर काढून टायरीत हवा भरून हो गया.. असं हसतमुखानं सांगून नेमकेच पैसे घेऊन आण्णा त्याच्या त्या सहा बाय सहाच्या गुहेत गडपही झालेला असायचा. त्याच्यासाठी हे रोजचंच असलं तरी त्या रात्रीच्या वेळी आण्णा संबंधिताला देवासारखा वाटायचा. २००५च्या मुसळधार पावसात पंचगंगेला महापूर येण्याच्या आदल्या रात्री आण्णानं तशा प्रचंड पावसात भिजत माझ्या बाईकचं पंक्चर काढून दिल्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. दुसऱ्या दिवशी त्या महापुराच्या पाण्यात आण्णाचं ते खोपट सुद्धा पाण्याखाली गेलं होतं. आण्णा आता कुठं गेला माहीत नाही. पण त्याच्या चांगल्या स्वभावाची, सहकार्याच्या भावनेबद्दल कृतज्ञतेची भावना इतक्या वर्षांनंतर (मी पैसे मोजले असून सुद्धा!) मला व्यक्त करावीशी वाटते.
या पार्श्वभूमीवर जेव्हा गेल्या आठवड्यातल्या घटनेकडं मी पाहतो, तेव्हा मनावर निराशेचं सावट येतं. पैशाचा मोह, लालूच माणसाला काहीही करायला भाग पाडते आणि मग त्यापायी सारासार विचारही तो करू शकत नाही की काय? मग पुढचा प्रश्नही मला पडतो- असा दुसऱ्याला फसवून वाममार्गानं (वाममार्गच तो!) मिळवलेला पैसा माणसाला लाभत असेल काय? त्याला, त्याच्या कुटुंबाला समाधान मिळत असेल काय? एखादं चुकून सापडलेलं पेनही असाच कोणीतरी बँकेतला अनोळखी माणूस आपल्याकडून मागून घेतो आणि खिशाला लावून गायबही होतो, असा अनुभव आपल्याला येतोच. मला शाळेच्या ग्राऊंडवर सापडलेला एक बीआरआयबॉल सुद्धा मॅच खेळताना शॉट मारल्यावर सापडला तसाच कुठं तरी गेला. मग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा लाभेलच कसा?
मी कल्याणला राहात असतानाचा प्रसंग. घर विकत घेण्यासाठी काही नवी जुनी घरं एजंटसोबत पाहात फिरत होतो. एक घर मला आवडलं सुद्धा. पण ठराविक किंमतीचा आणि ठराविक मुदतीत व्यवहार करण्याचा त्यांचा आग्रह आहे, असं एजंटकडून समजलं. घराचा कर्ता भेटला नाही पण, घरात त्या गृहिणीसोबत तिचा छोटा निरागस मुलगाही होता, टीव्ही पाहात बसलेला. घर पाहून परतताना एजंटला विचारलं, यांना तितकीच किंमत का हवीय? आणि इतक्या तातडीनं का व्यवहार करायचाय?’ त्यावर त्यानं जे सांगितलं, त्यानं मी सुन्न झालो. घरचा कर्ता ट्रॅफिकमध्ये होता. वरकमाईचे सर्व मार्ग धुंडाळून त्याच पैशातून घर घेतलेलं. पण आता घरात जो छोकरा आहे, त्याच्या हृदयाला छिद्र आहे आणि त्याचं तातडीनं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना घर विकायचंय. त्याचवेळी असलंघर न घेण्याचा निर्णय मी घेतलाच, पण त्या परिस्थितीतही मला आश्चर्य वाटलं. जो पैसा जसा आला, त्यानं आपली वाट शोधली होती. यात त्या बालकाचा काहीच दोष नव्हता, पण त्याला माध्यम करून त्या गृहकर्त्याला अद्दल घडवायचं नियतीनं ठरविलेलं दिसलं. पण, यातून तो शहाणा झाला तर ठीक, नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या! आणि पुन्हा त्याला अद्दल घडविण्यासाठी नियतीला नवे मार्ग धुंडाळावे लागणार, हे ओघानं आलंच.
माणसाची नीती, चारित्र्य आणि हेतू शुद्ध असले तर कदाचित त्याला कमी पैसा (हां, आता तुलना कोणाशी करता, हा मुद्दाही आहेच.) मिळेल, पण तो गरजा पूर्ण होण्याइतका निश्चित असेल आणि त्यामध्ये समाधान असेल, सुखाची झोप असेल, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच घरातली तुळशी कोमेजल्यानं मनी प्लँटच्या कुंडीत अगरबत्ती पेरणाऱ्या माझ्या बायकोच्या कृतीकडं काणाडोळा करणं, मला सहजगत्या जमतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा