मंगळवार, ९ जुलै, २०१३

भीक नको पण खुनी आवर!



('शेती-प्रगती' मासिकाच्या जुलै-२०१३च्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला माझा लेख वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.)
कोल्हापुरातलं भिकारी-जगत कधी नव्हे इतकं चर्चेत आलं आहे. सिरीयल किलिंगच्या प्रकरणात दहापैकी साधारण आठ जण हे भिकारी होते. डोक्यात दगड घालून झोपलेल्या जागेवर थेट हत्या करण्यात आल्याचं हे प्रकरण. या प्रकरणी एका लहरिया नामक भिकाऱ्यालाच अटकही झाली. त्यानं दोन-तीन (अजून किती तोच जाणे!) खुनांची कबुली दिली, खुनाच्या जागा दाखवल्या आणि समोसा-पाव, वडापाव खाण्यावरुन या हत्या केल्याचं सांगितलं. अजून पुढचा तपास सुरू आहे. त्यामुळं आणखी बऱ्याच गोष्टी उजेडात यायच्या आहेत.
तसं भिकाऱ्यांच्या मरणानं आपल्या जगात कुणाचंच कधी काही बिघडत नाही. उलट एखाद्या भिकाऱ्याला बसायला एक नवी जागा (व्हॅकन्सी) त्यामुळं निर्माण होते. पण सलग आठ भिकाऱ्यांचे खून आणि तेही पोलीस गस्त सुरू असताना झाले म्हटल्यावर कोल्हापूरमध्ये टेन्शन वाढणं स्वाभाविक होतं. विकृत मनोवृत्तीचा खुनी असेल तर तो कधीही, कुणाचा खून करू शकेलच ना. आणि तसा एका प्लंबरचा खून झालाही आहे इथं. त्यामुळं वातावरण थोडंसं तणावाचं होतं. पण, या प्रकरणात एका भिकाऱ्यालाच अटक झाली म्हटल्यावर जनतेनं थोडा सुटकेचा निःश्वास टाकला. हा भिकारीही साधासुधा नाही काही- एकदम खानदानी. त्याचे नातेवाईक, आईवडिल दिल्ली-मुंबईत भीक मागतात आणि हा सुद्धा रोजी रोटीसाठी कोल्हापुरात आलेला. घराण्याची पुण्याई पाठीशी बांधून लहरिया कोल्हापुरात आला खरा, पण स्थानिक, प्रस्थापित भिकाऱ्यांशी जुळवून घेणं मात्र त्याला जमलं नाही. काही ना काही कारणानं आणि सणकी, लहरी स्वभावामुळं स्थानिकांशी त्याचे पटत नव्हते. त्यातून वादाचे प्रसंग उद्भवत आणि पुढे त्यातूनच खून करण्यापर्यंत त्याची मजल गेली. मरणाराही भिकारी आणि मारणाराही भिकारी! आपलं कुठं काय बिघडलं?

आपलं बिघडलं काहीच नाही. पण एकूणच आपल्या व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्नांचा गुंता मात्र या प्रकरणानं सामोरा आणला आहे. एक तर पोलीसांनी सोयीस्कर उपाय म्हणून साऱ्या भिकाऱ्यांना रेल्वेमधून मिरजेला पाठवून दिलं. पण, त्यानं मूळ प्रश्न सुटला, असं म्हणता येणार नाही. दुसऱ्या दिवशीच्या रेल्वेनं त्यातले बहुसंख्य परत आलेच असतील. शिवाय मिरजेतल्या स्थानिकांची आणि पोलीसांची डोकेदुखी वाढली आणि तिथल्या भिकाऱ्यांनाही या नव्यांच्या स्पर्धेला तोंड देणं आलंच.
हा मुद्दाही आपण काही वेळ नजरेआड करू. पण आपल्या देशात मुळात भीक मागणे हाच मुळी कायद्याने गुन्हा ठरविण्यात आलेला असताना आजतागायत या प्रथेविरुद्ध कोणतीही सक्षम कार्यवाही करण्यात येऊ शकलेली नाही, ही चिंतेची बाब आहे. मध्यंतरी राजधानी दिल्लीतले भिकारी म्हणजे तिच्या लौकिकावरचा कलंक आहेत, असे ठरवून राजधानी भिकारी मुक्त करण्यासाठी एक मोठे अभियान हाती घेण्यात आले होते. तत्कालीन परिस्थितीत दिल्लीतल्या भिकाऱ्यांनाही अशाच पद्धतीनं देशभर रेल्वेमधून पाठविण्यात आलं आणि राजधानी भिकारीमुक्त झाल्याचं सांगण्यात आलं. भिकारीमुक्तीचा हाच खरा अर्थ आहे काय? या भिकाऱ्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करून त्यांना रोजगार-व्यवसायाला लावणं, आजारी-कुष्ठरोगी असतील तर त्यांना योग्य वैद्यकीय उपचारासाठी दाखल करणं, मनोरुग्ण असतील, तर मनोरुग्णालयांत दाखल करणं, अन्य भिकाऱ्यांना भिक्षेकरी गृहांमध्ये दाखल करून समुपदेशनानं त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करणं, या गोष्टींसह खरं तर त्यांचं एकूणच पुनर्वसन भिकारीमुक्तीअंतर्गत अपेक्षित आहे. पण तसं होताना दिसत नाही.
दिल्लीतल्याच एका सर्वेक्षणाअंतर्गत एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. ती म्हणजे भीक मागण्याच्या या धंद्यामध्ये अगदी शिक्षित-उच्चशिक्षितांचाही सहभाग आहे. आठवडाभर नोकरी-धंदा करून वीकेंडच्या दोन दिवशी भीक मागण्याचा साइड-बिझनेस करणारेही महाभाग या सर्वेक्षणात आढळले. त्यातून दिवसाला ५० ते ५०० रुपये इतकी होणारी कमाई तुम्हाला अन्य कोणत्याही सरकारी नोकरीपेक्षा अधिक कमाई करून देते- फक्त आत्मसन्मान थोडासा बाजूला फेकला की झालं. मुंबईमध्येही सन २००६मध्ये एक धक्कादायक आकडेवारी घोषित करण्यात आली ती म्हणजे मुंबईतल्या भिकाऱ्यांचा वार्षिक टर्नओव्हर हा सुमारे १८० कोटी रुपयांच्या घरात आहे. विचार करा, एखाद्या बिझनेस ग्रुपच्या उलाढालीशीच तुलना करता येईल, अशी ही आकडेवारी आहे. या प्रमाणात संपूर्ण देशात भिकाऱ्यांच्या विश्वात किती उलाढाल होत असेल, याची कल्पनाच करता येणार नाही.
त्यामुळं काहीही न करता इतकी सहज कमाई ज्या धंद्यात होते, त्याचं आकर्षण वाटणं नाकारता येणार नाही. काही भांडवल नाही, काही गुंतवणूक नाही, एखाद्या मंदिराबाहेर, चौकात, सार्वजनिक अथवा मोक्याच्या ठिकाणी जाऊन बसलं की मिळकत सुरू. इतकं सहज होऊ लागलंय सारं.
याशिवाय, भिकाऱ्यांच्या विश्वाचा लाभ आणि आधार घेऊन संघटित गुन्हेगारी जगतही तितक्याच जोमाने फोफावले आहे. पैशांची कमाई आणि गुन्हेगारी जगताची उभारणी या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून सारं काही पद्धतशीरपणे सुरू आहे. एखादं पाकिट मारुन जेवढी कमाई होणार नाही, तेवढी एखाद्या आंधळ्या-पांगळ्या मुलाला भीक मागायला लावून करता येते. तशी अंतर्गत यंत्रणाच मोठमोठ्या शहरांत कार्यरत आहे. जोडीला गुन्हेगारीचं प्रमाणही लक्षणीय आहे. ही बाबही गंभीर आहे.
याला खतपाणी घालायचं काम आपणच करतो. देवाधर्माच्या नावाखाली, दानधर्माच्या नावाखाली तर कधी दयाभावाच्या नावाखाली आपण ही कुप्रथा पोसतो आहोत. मी सुद्धा त्याला अपवाद नव्हतो. नोकरीनिमित्त दररोज स्टॅन्डवरून बस पकडताना एका म्हाताऱ्या भिकारणीचा केविलवाणा, बापुडवाणा चेहरा पाहून मला दया यायची. ती दिसली की तिला मी आठ आणे-रुपया द्यायचो. एकदा स्टॅन्डच्या परिसरात फिरत असताना शेजारच्या पानपट्टीवर ती मला दिसली. पानपट्टीवाल्याशी हुज्जत घालत होती. तिची दिवसभरातली मिळकत टप्प्याटप्पानं ती त्याच्याकडं ठेवायला द्यायची. त्याच्याकडूनच गुटख्याच्या पुड्या घ्यायची आणि रात्री त्या पुड्यांचा आणि तिच्या मिळकतीचा हिशोब घेऊन उरलेले पैसे परत घ्यायची. त्या वरच्या पैशांवरुन तिचा वाद सुरू होता. चेहऱ्यावरचा तो ठेवणीतला केविलवाणा भाव अगदी तसूभरही कुठं दिसत नव्हता. उलट अखंड शिव्यांची लाखोली त्या पानपट्टीवाल्याला वाहताना तिच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हलत नव्हती. त्या क्षणाला मला त्या म्हातारीचा राग येण्यापेक्षा माझी स्वतःचीच कीव आली. म्हटलं, च्यायला, कधी नव्हे ते कुणाबद्दल दया वाटून काही द्यायला गेलो तर हे भलतंच पाह्यला मिळतंय. तेव्हापासून माझं हे भीक देणं एकदम बंद झालं. त्याउलट स्टेशनवर काही खाताना, पिताना कोणी मागायला आलाच तर त्याला पैसे न देता खायला वडापाव नाहीतर चहा ऑफर करतो वाटलं तर. एकदा तसं करतानाही स्टेशनवरला स्टॉलवाला म्हणालाच मला, साहेब, आताच एकानं वडापाव दिला त्याला. आता तुम्ही चहा देताय.म्हटलं, असू दे. त्याला रुपया देऊनही जे साध्य होणार नाही, ते चार रुपयांच्या वडापावनं साध्य झालं तर ठीक. नाही झालं तरी ठीक. सांगायचा मुद्दा काय, तर भीक मागूनही येणारी मस्तीखोरी फार वाईट. ती भिकेपाठोपाठ येते की, एकदा सगळंच सोडलं की कशाला कोणाची भीती, अशी मानसिकता होते, कुणास ठाऊक. पण होते एवढं खरं.
या पार्श्वभूमीवर, या भिकाऱ्यांवर कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत पोलीसांच्या मर्यादाही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आजकाल वाढत्या तंत्रज्ञानाच्या सोयीसुविधा, लाइफस्टाइलच्या वाढत्या गरजा यामुळं गुन्हेगारीचं प्रमाण आणि प्रकार वाढीस लागले आहेत. त्यांची उकल करण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहेच, पण त्याचबरोबर जनता, माध्यमे, राजकीय व शासकीय यंत्रणा यांचा दबावही त्यांच्यावर असतो. त्यामुळं पोलीसांना त्यांच्यासमोरील कामे निपटण्यासाठी वेळ अपुरा पडत असताना पुन्हा त्यांना हजारो-लाखोंच्या संख्येनं विखुरलेल्या भिकाऱ्यांना पकडण्याच्या कामाला जुंपणं प्रॅक्टीकली अजिबात शक्य नाही. आणि पकडले तरी त्यांना डांबणार कुठं? भिकाऱ्यांसाठी आवश्यक असणारी भिक्षेकरीगृहे, सुधारगृहे आदी सुविधांची वानवा आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. आपली समाजव्यवस्था भिकाऱ्यांच्या निर्मितीला पोषक आहे; त्यांच्या पोषणाला मात्र पूर्णतः अक्षम आहे. त्यामुळे आजघडीला तशा प्रकारची यंत्रणा केंद्रीय आणि राज्य पातळीवर निर्माण करण्याची आवश्यकता आहेच. पण भिकेचे डोहाळे लागलेल्या नागरिकांना त्या मानसिकतेपासून वेळीच परावृत्त करून त्यांच्या किमान मूलभूत गरजा भागविण्याइतपत, त्यांच्या कुटुंबाचा निर्वाह चालण्याइतपत योग्य रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांच्या मनावर श्रमसंस्कृतीचं महत्त्व बिंबवणं ही अत्यावश्यक बाब आहे. त्यापेक्षाही भिकाऱ्यांना भीक वाटून स्वतः पुण्य कमावल्याची भावना बाळगणाऱ्यांना आवरणं ही खरी गरज आहे. पण आवरणार कोण, हा खरा प्रश्न आहे.

२ टिप्पण्या:

  1. vada pav varun aathavala.. Shirdi devstan mottha aahe. shirdi madhalya Eka gallit sakali khanyache chan chan stall lagalele asatat. atishay chavist khana tithe milata. agadi sagala jevan pan !
    pan aapalyamage ubhe asatat te BHIKARI. 1..2.. nahi Khup jan. mag khanare tyanna paise det nahit. khayala ch detat. mage Ekada aamhi gelo teva Eka Mhatarila asach khayala deun aalo. mhatari itki barik hoti ki tila tevadha aanna dupar peryant sahaj purala asata. aamhi khalla ani 1 tasane aamchyatale bhuk lagali mhanun tyanna parat tithech gheun gelo.parat mhatari BHIKARI tithech ubhi hoti. javal javal sagalech BHIKARI tithech hote. kay te itkaka anna khat asatil? mhanaje paha !
    dhanashri palande

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मस्त किस्सा शेअर केलात, धनश्री मॅडम! आपल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असे अनेकविध अनुभव सर्वांनाच येत असतात. देवधर्माच्या नावाखाली आपण पोसतो आणि ते सोकावतात, असं म्हणावं लागेल. पण त्यांच्यासाठी ठोस काही करावं असं कुणाला वाटत नाही आणि करायला गेलं तरी एकदा अशा ऐदीपणाची सवय लागलेल्या जीवाला पुन्हा कष्ट करावेसे वाटत नाहीत. म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव- इथूनही अन् तिथूनही!

      हटवा