शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

संपादकांमधील ‘हेल्दी’ रिलेशनशीप...!




कदाचित शीर्षक वाचून बहुतेक जणांच्या भुवया उंचावल्या जातील, काही जणांचे चेहरे प्रश्नार्थक होतील तर काही जण हॅ, असं कुठं असतंय काय?’ म्हणून उडवूनही लावतील. पण, मित्रहो, गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात मला खरोखरीच (शोभा डे यांच्याप्रमाणं उपहासात्मक तर बिल्कुलच नाही.) इथल्या सर्व संपादकांमधल्या अनोख्या हेल्दी रिलेशनशीपची प्रचिती आली आणि अगदी राहवलं नाही, म्हणून माझ्या सर्व वाचक मित्रांशीही ही गोष्ट शेअर करावीशी वाटली, म्हणून (नेहमीप्रमाणे) हा लेखन प्रपंच!
कोल्हापूरचं पत्रकारितेच्या क्षेत्रातलं वातावरण हे पत्रकारांच्या किंवा फिल्डच्या पातळीवर काही अपवाद वगळता (त्यातलेही बहुतेक प्रासंगिक) चांगल्यापैकी सौहार्दाचे राहिले आहे. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये दर वृत्तपत्राच्या नव्या आवृत्तीच्या लाँचिंग-गणिक सर्वच स्तरांवर स्पर्धात्मकता निर्माण होत गेली. आणि ही गोष्ट अगदी स्वाभाविकही मानली गेली पाहिजे. कोल्हापूरच कशाला? नागपूर, औरंगाबाद पुणे आणि नाशिक इथंही अशाच प्रकारची तीव्र स्पर्धा निर्माण झालेली आपण पाहिलीच की. शेवटी आस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की मांजरी सुद्धा आपली पिल्लं पायाखाली घेतेच, ही कथा आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट हा डार्विनचा निसर्गनियमाचा सिद्धांतही अनुभवसिद्ध आहे. मुंबईमध्येही अशा प्रकारची स्पर्धा निर्माण होते, नाही असे नाही. पण मुंबईमध्ये क्वालिटी अथवा क्वांटीटीच्या बळावर कोणालाही लवकरच आपली स्पेस निर्माण करता येऊ शकते. आणि मुंबईच्या एकूणच पसाऱ्याच्या तुलनेत अशी चिक्कार जागा मिळवणंही सोपं जातं.
असो! विषय होता कोल्हापूरच्या पत्रकारितेचा. तर काही वर्षांपूर्वी इथलं वातावरण या स्पर्धेमुळं बरचसं ढवळून निघालं, बऱ्याचशा उलथापालथी इथं झाल्या, बऱ्याच घडामोडी घडल्या, वातावरण काहीसं गढूळलं सुद्धा! पण जसं वातावरण शांत होत गेलं, तसं पाणी स्थिर होत गेलं आणि उधळलेला गाळही पुन्हा आपल्या जागी म्हणजे तळाशी जाऊन बसला. प्रत्येक दैनिकानं, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक माध्यमानं आपापली स्पेस निर्माण केली, आपापला चाहता वर्ग निर्माण केला आणि सद्यस्थितीत इथलं बरंचसं वातावरण पूर्वीप्रमाणं सौहार्दपूर्ण बनलं आहे, असं माझं गेल्या वर्षभरातलं निरीक्षण आहे. (कोणाचा प्रतिवाद असला तरी, माझी चांगली भूमिका लक्षात घेऊन आपल्याकडेच ठेवावा, ही विनंती.)
तर, (नेहमीप्रमाणंच) असं नमनाला घडाभर तेल घातल्यानंतर मूळ विषयाला हात घालतो. काल दै. सकाळचा ३३ वा वर्धापनदिन केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात दिमाखदारपणानं पार पडला. त्या सोहळ्यामध्ये कोल्हापूरमधील फिल्डवरील पत्रकार मित्र-मैत्रिणी तर येतच असतात. पण विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच इथल्या सर्व दैनिकांचे संपादकही शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. सुदैवानं त्यातील सर्वच जण हे माझे गुरू असल्यानं त्या साऱ्यांना एकाच ठिकाणी, एकाच छताखाली भेटण्याचा योगही त्यामुळं जुळून आला. मला या सर्वांना पाहताना खूप बरं वाटलं.  म्हटलं, व्हाय नॉट? वृत्तपत्रीय मालकांची ध्येयधोरणे काहीही असली तरी ती सांभाळण्यासाठी कसोशीनं आणि दक्षतेनं प्रयत्न करत असताना या संपादकांमध्ये आपापसात असा सौहार्द का असू नये? आज वृत्तपत्राचे क्षेत्र व्यवसाय- उद्योग म्हणून भरभराटीला येत आहे. सामाजिक बांधिलकीची शक्य तेवढी जोपासना केली जात असली तरी नफा हा बाजारपेठीय शब्द इथं आज कळीचा बनला आहे. आणि का असू नये?, आज सेवा क्षेत्रापेक्षाही गतीनं मिडिया इंडस्ट्री वाढत असताना, प्रचंड संख्येनं मनुष्यबळ या क्षेत्रात येत असताना त्या मनुष्यबळाला पुरेसं मानधन देण्यासाठी हा व्यवसाय नफ्यात राहिला तरच शक्य आहे. नाही तर जितक्या गतीनं वाढला त्यापेक्षा दुप्पट वेगानं तो कोलमडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं या गोष्टीला विरोध असण्याचं कारण नाही. आणि मोठमोठे उद्योजक जर उद्योग-व्यवसायाशी संबंधित अन्य प्लॅटफॉर्मवर एकत्र येत असतील, तर मिडियातल्या लोकांनी तर असं एकत्र आलंच पाहिजे कारण समाजातल्या सर्वच स्तरांशी, घटकांशी आपण सर्वाधिक कनेक्ट असतो. पत्रकारांच्या संघटना मोठ्या प्रमाणात फोफावल्या असल्या तरी समूह वृत्तपत्रांच्या संपादकांमधल्या त्या समूह शब्दामुळं उभारल्या गेलेल्या अप्रत्यक्ष भिंती विरघळण्याची आज गरज आहे. तुम्ही जाईल तिथे ती भिंत सोबत नेण्याची अथवा त्याची भिती बाळगण्याचीही गरज नाही. समूहाचा इंटरेस्ट तुम्ही जोपर्यंत कसोशीने जपत आहात, त्याला धक्का लागू देत नाही, तोपर्यंत त्याबाबत काळजी करायचं कारण नाही. आणि याचंच प्रत्यंतर मला काल सकाळच्या कार्यक्रमात आलं.
आज सकाळी पुन्हा त्याच गोष्टीचा प्रत्यय आला. शिवाजी विद्यापीठानं आज विद्यापीठाचा वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभाग आणि स्थानिक प्रसारमाध्यमे यांच्यातील सुसंवाद अधिकाधिक बळकट करण्याच्या हेतूने सर्व दैनिकांच्या, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांना, ब्युरो चीफना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. आणि या बैठकीला खरंच खूप चांगला प्रतिसाद लाभला. कोल्हापुरातल्या सर्वच दैनिकांचे, अन्य मिडियाचे संपादक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले. विद्यापीठाच्या सर्वच चांगल्या उपक्रमांना इथल्या प्रसारमाध्यमांनी नेहमीच उचलून धरले आहे आणि स्थानिक मिडियाचा विद्यापीठाला असलेला पाठिंबाच त्यांच्या उपस्थितीतून अधोरेखित झाला. यातून आणखी एक खूप चांगला संदेश मिळाला, तो म्हणजे विद्यापीठ हे साऱ्या मिडियासाठी, मिडिया हाऊसेससाठी एक त्रयस्थ आणि क्रियाशील व्यासपीठ म्हणून खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि त्याला सर्वांचा पाठिंबा असेल. आजच्या बैठकीला उपस्थित असणारे बहुतेक संपादक, प्रतिनिधी हे शिवाजी विद्यापीठाचेच विद्यार्थी आहेत. काही जण शिक्षकही आहेत. त्यामुळं त्यांच्या टाइट शेड्युलमधून उपस्थित राहण्यामागे त्यांची कृतज्ञताही व्यक्त झाली आणि त्यांनी बैठकीत उपस्थित केलेल्या अने मुद्यांमधून विद्यापीठाच्या आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या विकासाची, भरभराटीची कळकळही जाणवत होती. विद्यापीठाच्या भावी वाटचालीच्या दृष्टीने, विभागाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक चांगले मुद्दे सर्वच संपादकांनी अगदी पोटतिडकीने मांडले. मुळात मा. कुलगुरूंनी सुरवातीलाच विद्यापीठाबाबतच्या क्रिटीकल सजेशन्सचीच सर्वांकडून अपेक्षा असल्याचे सांगितल्यामुळे सर्वांनीच आपली मते निर्भीडपणे (जी आपण नेहमीच दैनिकांमधून मांडतो) आणि मनमोकळेपणाने (हे खूप महत्त्वाचे!) मांडली. काहींचा बोलण्याचा सूर टीकात्मक असला तरी त्यातून विद्यापीठाविषयीची आपुलकीच पाझरत होती. इथल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी, त्यांच्याच प्रोफेशनल इंटिग्रिटी विकसित करण्याच्या दृष्टीनं खूप विधायक सूचना सर्व संपादक प्रभृतींनी केल्या. आपल्या विद्यापीठाचा विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये बेस्टच असला पाहिजे, त्यासाठी आवश्यक ते सर्व विद्यापीठाने केले पाहिजे, त्यांना पुरविले पाहिजे, असा आग्रह त्यामागे होता. ही सकारात्मकता, त्यामागची कळकळ मला खूप मोलाची वाटली.
या बैठकीमधून जाणारा मेसेजही महत्त्वाचा आहे. पत्रकारितेमध्ये कार्यरत सर्वच घटकांमध्ये स्पर्धा असली तरी हेल्दी प्रोफेशनल रिलेशनशीप विकसित करणे अजिबात अवघड नाही. आणि ती व्हायलाच पाहिजे. अशी हेल्दी रिलेशनशीप राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर टप्प्याटप्प्याने का होईना, विकसित होण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी विद्यापीठांसारख्या संस्थांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरणारे आहे.

२ टिप्पण्या:

  1. याचे खरे कारण एकच आहे, आलोक सर ... पत्रकार आणि त्यातही संपादक आता आध्यात्मिक झाले आहेत. त्यामुळे सारे नश्वर, अशाश्वत आहे, आणि, सब माया है, हे त्यांना आताशा समजून चुकले आहे. त्यातून सर्वपत्र समभावाची उदार भावना निर्माण होते आणि उदारीकरणानंतरच्या आपल्या ख-या भावाची कल्पनाही येते.... आपण सगळे एकाच बोटीत आहोत, ही भ्रातृत्वाची जाणीव कमी महत्त्वाची नाही, भावा...!
    - sunjay awate

    उत्तर द्याहटवा