मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

निखळ-15: 'मिल्खा'चं 'मल्टिप्लिकेशन' हवंय!


('दै. कृषीवल'च्या 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. १२ ऑगस्ट २०१३ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख...)
 
आतापावेतो 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट बहुतेक दर्दी रसिकांनी पाहिला असेल, अनेकांनी माऊथ पब्लिसिटीमुळंही पाहिला असेल. कारण काही असो, पण पाहिला असेल. आजपर्यंत या चित्रपटाविषयी बऱ्याच अंगांनी परीक्षणं, समीक्षणंही छापून आली आहेत. खरोखरीच एक सर्वांगसुंदर मेसेज फिल्म असं मी या चित्रपटाचं वर्णन करीन. हा चित्रपट ना केवळ मिल्खा सिंग यांची बायोग्राफी रेखाटतो, ना केवळ देशभक्तीचे धडे देतो; तर त्याही पुढं जातो. या चित्रपटामध्ये आजच्या पिढीसाठी अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, त्यांची चर्चा करणं, यासाठी हा लेखनप्रपंच!
मी चित्रपट पाह्यला गेलो, तेव्हा अखेरची पाकिस्तानमधील रेस सुरू असताना सारे प्रेक्षक (पडद्यावरची रेस असूनही आणि तो जिंकणार हे ठाऊक असूनही- क्रिकेटप्रमाणंच!) मिल्खाला ओरडून, टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. मिल्खा जिंकला आणि साऱ्याच प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला. त्याच जल्लोषात प्रेक्षक बाहेर पडले. हे ठीकच आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सनं जो परिणाम साधणं अपेक्षित होतं, तो साधला गेला. पण मिल्खाची ही रेस ना कुठल्या देशाविरुद्ध होती, ना अन्य कुणा स्पर्धकाविरुद्ध! त्याची रेस त्यानं स्वतःशीच मांडलेली आहे. 'पाकिस्तान से जब से भागे हैं, तब से भाग ही रहे हैं।' या 'भगौडे'पणाचं शल्य, बोझा आयुष्यभर वाहणारा मिल्खा, जेव्हा आपल्या मूळ गावी गोविंदपुरा इथं आपल्या लहानपणीच्या मित्राच्या मुलाला सांगतो, 'बेटा, ये तुम्हारा वही चाचा है, जो 'दौडता' है।' आणि तेव्हा खऱ्या अर्थानं चित्रपटाचं आणि मिल्खासिंगच्या जीवनातलं एक मोठ्ठं वर्तुळ पूर्ण होतं. 'भगौडे'पणापासूनचा ते 'दौडण्या'पर्यंतचा, आणि प्राक्तन असं की जिथं या भगौडेपणावर शिक्कामोर्तब झालं, तिथंच 'फ्लाइंग सिख'चं बिरुद मिळवणं, असा हा मिल्खाचा प्रदीर्घ जीवनप्रवास आहे. स्वत्वाचा, स्व अस्तित्वाचा शोध घेतानाच आपल्या उखडल्या गेलेल्या मुळांच्या भळभळत्या जखमा भरून काढण्याचा अखंड यज्ञ मिल्खानं हयातभर मांडला. त्याचा प्रत्ययकारी अनुभव हा चित्रपट देतो. म्हणूनच 1960च्या रोम ऑलिंपिकमधील रेसपेक्षाही, स्पर्धा म्हणून कमी महत्त्वाची असणारी पाकिस्तानातली रेस, मिल्खाच्या आयुष्यात महत्त्वाची ठरते.
आमच्या पिढीनं ना फाळणीच्या झळा पाहिल्या, ना सोसल्या; ना आम्ही पाकिस्तान-चीन युद्धाचे साक्षीदार वा पिडीत आहोत. एक कारगीलचा लढा आणि शेकडो दहशतवादी हल्ल्यांचे मात्र आम्ही सातत्याने साक्षीदार ठरतो आहोत. खुशवंत सिंगांना धन्यवाद की किमान त्यांच्यासारख्यांमुळं आमच्यामध्ये त्या फाळणीच्या झळांच्या जाणीवांची रुजवात तरी होऊ शकली. मानवी सामाजिक संवेदना जिथं बोथटल्या गेल्या, खुरटल्या गेला किंवा त्या संवेदनांचीच जिथं हत्या झाली, तिथं अमानुषतेचा कळस गाठला जातो, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्या अमानुषतेमुळं ज्याचं कुटुंबच्या कुटुंब, गावच्या गाव शिरकाणाला बळी पडलं, ज्याचं गाव सुटलं, देश सुटला, त्याच्याकडून भावी जीवनात कोणत्या प्रकारच्या सहृदयतेची अपेक्षा ठेवू शकता येते? त्याच्याकडं समर्थनीय कारणही आहे. पण, मिल्खा इथंच वेगळा ठरतो. त्याच्या संवेदना शाबूत आहेत, भलेही त्या संवेदनांची अभिव्यक्ती तीव्र स्वरुपात सामोरी येत असेल. आपल्या वेदना, संवेदनांना विधायक स्वरुप देण्याचा मिल्खा हयातभर प्रयत्न करतो. बदल्याच्या भावनेपेक्षाही स्वतःला सिद्ध करण्याची ऊर्मी तो तशा परिस्थितीतही बाळगून आहे, हे त्याचं खरं वेगळेपण आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लाभांसाठी अथवा ते मिळाल्यामुळं 'पॅनिक' होणाऱ्या आपल्या पिढीसाठी यापेक्षा मोठा संदेश दुसरा काय असू शकेल?
पण, 'मिल्खा' त्याहूनही आणखी पुढं जातो. घाम गाळण्याचं, कष्ट करण्याचं महत्त्वही तो खऱ्या अर्थानं पटवून देतो. आज आपण इझी मनी आणि फास्ट मनीच्या नादाला लागून भ्रष्टाचाराच्या आणि फसवणुकीच्या कित्येक प्रयत्नांना बळी पडत आहोत. कष्ट करता किंवा कमी कष्टात भरपूर पैसा मिळवण्याचं ध्येय आपण बाळगून असतो. त्यासाठी साहजिकच वाट्टेल ते करण्याची तयारी असते. अशा वेळी परिणामांची पर्वा आपण करत नाही आणि पुढे कधी तरी मग पश्चातापाची वेळ ओढवून घेतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशा वेळी मिल्खा आपल्याला ध्येयप्राप्तीसाठी घाम गाळण्याला, कष्ट करण्याला पर्याय नाही, हे प्रत्यक्ष पटवून देतो. प्रॅक्टीसच्या सुरवातीच्या टप्प्यात 'मग'भरून घाम गाळणारा मिल्खा आयुष्यभर घाम गाळतच राहतो, कारकीर्दीच्या 'शिखरा'वर असतानाही तो 'बादली'भर घाम गाळतच राहतो. (काहींना ही गोष्ट खूपच एक्झॅगरेटेड वाटू शकेल; पण सिनेमाच्या माध्यमातून त्याहूनही कितीतरी एक्झॅगरेटेड गोष्टी आपण चवीनं स्वीकारतोच की. रजनीकांत हे या बाबतीतलं सर्वाधिक महान उदाहरण ठरायला हरकत नाही.) श्रमाचं मोल आणि श्रमप्रतिष्ठा यापेक्षा वेगळी काय असते?
जाता जाता, आयुष्यात येणाऱ्या क्षणिक मोहांना, आमिषांना बळी पडून आपल्या ध्येयापासून ढळण्याचा संदेशही मिल्खा स्वानुभवातून देतो. कारकीर्दीच्या, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना असे प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतातच, पण सावधगिरी बाळगण्याचेही तेच क्षण असतात. संपूर्ण मेहनत, कारकीर्द क्षणात मातीमोल करण्याची क्षमता त्यांच्यात असते. अशा वेळी स्वतःच्या मनाला प्रयत्नपूर्वक आवर घालून, विचलित होता ध्येयापासून ढळण्याची मानसिकता विकसित करण्याचं महत्त्वही मिल्खा अधोरेखित करतो.
मिल्खा सिंग हे एक प्रतीक आहे. मात्र त्या प्रतीकाच्या माध्यमातून देण्यात आलेला संदेश हा अधिक मौल्यवान प्रभावी आहे. सुरवातीला म्हटल्याप्रमाणं अनेकांगांनी त्याचं विश्लेषण सहजशक्य आहे. केवळ भारत-पाकिस्तान यांच्यातील रेस विजेता म्हणून मात्र त्याच्याकडं नक्कीच पाहता कामा नये. तो मिल्खाचा आणि चित्रकर्त्यांच्या प्रयत्नांचाही अपमान ठरेल. कोणतीही कलाकृती ही सामाजिक अभिव्यक्तीचं माध्यम आणि प्रतिरुप आहे, असं आपण मानत असू, तर त्या कलाकृतीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या, निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रेरणांच्या स्वीकारार्हतेची मानसिकता विकसित करणं, ही देखील आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळंच अशा 'मिल्खां'च्या 'भाग'ण्याचं 'मल्टिप्लिकेशन' होणं, खूप खूप गरजेचं आहे.

९ टिप्पण्या:

  1. सिनेमा उत्कृष्टच आहे. तूझं परीक्षणही मस्त आहे. परंतु त्यात नाटकीपणाही जरा जास्तच झाला आहे, असं वाटतं. शिवाय काही प्रसंग टाळता येण्यासारखे होते. उणिवांसह सिनेमा छानच आहे. धावण्याच्या स्पर्धेतही क्रिकेटसारखी जान आणण्याचं काम या सिनेमानं केलं आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरंय जगदीश. पण नाट्यमयता ही व्यावसायिक चित्रपटाची गरज आहे. आणि या चित्रपटात ती ओढून ताणून आणलेली दिसत नाही, उलट मिल्खाचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्यासाठी त्या साऱ्या नाट्यमयतेचा वापर करण्यात आलाय. किंबहुना, त्यासाठीच अशा प्रसंगांची पेरणी करण्यात आलीय, असे वाटते. जीव मिल्खा सिंग यांच्याशी चर्चेअंतीच स्क्रिप्ट फायनल केलं असल्यामुळं अति- अतिशयोक्ती असेल, असं वाटत नाही.

      हटवा
  2. mast visleshan......univa sagli kadecha astat Jagdish.....pan halichya vyshaik spardechya kalat ha sandesh denara chitrapat mahanje ...... walvantila oyasis aahe he nishit.....!!

    उत्तर द्याहटवा
  3. भाग मिल्खा भाग हा चित्रपटाचे परिक्षण सर आपण चांगल्या पध्दतीने केले आहे.मी सुध्दा हा चित्रपट पाहिला आहे या चित्रपटातून मिल्खा सिंग यांचा जीवनपट चांगल्या पध्दतीने मांडला आहे.या चित्रपटात थोडा अतिशियोक्तीपणा असला तरी त्यामुळे चित्रपटात रंग भरला आहे.उदयोन्मुख खेळाडूसाठी हा चित्रपट प्रेरणा देणारा आहे तसेच या चित्रपटातून फाळणीनंतर उद्भवलेल्या तक्तालीन दंगल परिस्थितीची आणि निर्वासितानां सहन कराव्या लागलेल्या अन्यायाची जाणीव होते..........

    उत्तर द्याहटवा