रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

निखळ-१६: गोली मार भेजे में..!('दै. कृषीवल'मध्ये सोमवार, दि. २६ ऑगस्ट २०१३ रोजी 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)
आजवर देशात नव्हे.. जगात होऊन गेलेल्या तमाम धर्मसंस्थापक, तत्त्ववेत्ते, समाजचिंतक, साधु-संत (खरेखुरे जेन्युइन), विचारवंत, सांस्कृतिक प्रणेते आणि तत्सम कॅटेगरीतल्या लोकांनी जगातल्या प्रत्येक माणसाचा कोट्यवधी तासांचा वेळ अक्षरशः वाया घालवला आहे- त्याला विचार करायला लावून, विवेकवादाची दिशा दाखवून, नैतिकतेचा वसा देऊन! अरे, कशाला हवीत असली थोतांडं सांभाळायला? नसती बनावटगिरी सारी..! जगातल्या तमाम समस्यांवर, अडचणींवरचा उपाय आदिमानवानंच शोधून आपल्या हाती दिलेला आपण विसरुन गेलो आणि या लोकांचा मार्ग अनुसरल्यानं साऱ्या मानवजातीचाच प्रॉब्लेम होऊन बसला. आदिमानवानं शस्त्र शोधलं, स्वतःची भूक शमविण्यासाठीही आणि रक्षणासाठीही! जगातल्या सगळ्याच तृष्णा येनकेन प्रकारेण भागविण्यासाठी शस्त्राचा आधार घेता येऊ शकतो किंवा घ्यावा, असा आदर्श आपल्याला ठेवता येऊ शकतो किंवा आपण ठेवू शकलो असतो. पण (पुन्हा) उपरोक्त लोकांनी मिसगाइड केल्यानं आपल्या पिढ्यानपिढ्यांना सज्जनतेचा बुरखा पांघरून वावरावं लागलं, या जगाचा निरोप घ्यावा लागला. पण, आता ते दिवस इतिहासजमा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. विचार-बिचार सारं काही झूट असतं. अरे, आपलं जेवढं वय नाही, त्यापेक्षा जास्त वर्षे असलं काहीतरी करणाऱ्या माणसाला काही क्षणात संपवता येऊ शकतं, याचं प्रत्यंतर आम्हाला ज्या तरुणांनी घडवून आणलं, त्यांचे आपण आभार मानायला नको का? दाभोलकरांसारख्या तोळामासा प्रकृतीच्या माणसाला मारायला एक गोळीही पुरेशी ठरली असती, पण तरुण त्या बाबतीत विचारी होते (की तसं त्यांना फीडींग होतं?), तीन गोळ्या मारल्या.. न रहा बाँस (...पर बाँसुरी फिर भी बजती रहेगी!).. सारंच खतम!
हर सवाल का एक ही जवाब.. गोली.. हत्या..! किती सोप्पं सोल्युशन आहे ना! आपणही काही बोलत नाही, म्हणजे ते मान्य असल्यासारखंच की! मरणारा मरतो त्याच्या करणीनं..! आपण गेलो होतो का सांगायला त्यांना?  हे असले काहीतरी फालतू उद्योग करायला? डॉक्टरी सोडून कोणी सांगितलं होतं, नको ते उद्योग करायला? पण, आम्ही काही सांगितलं नाही आणि ते कधीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतेच- विवेकवादी ना! खाल्ली गोळी.. संपलं सारं त्यांच्यापुरतं..! त्यानंतर निषेध.. असल्या मारण्यानं विचार संपणार नाहीत.. वगैरे वगैरे नेहमीचंच.. पण पुढं काय..? काहीच नाही..! ..काहीच कसं नाही? काही तरी असायला हवं ना? अहो, आहे ना.. काय?.. गोळी.. हो, मस्त सोल्युशन आहे अगदी.. बघा, काळाचे काटे उलटे फिरवून पाहा थोडेसे..!
सत्य, शांती, अहिंसा, प्रेम असल्या कसल्या तरी भ्रामक कल्पनांचा पुरस्कार करून लोकांना नादी लावणाऱ्या धर्मसंस्थापकांनी त्याऐवजी हिंसेचा सरळसोट मार्ग स्वीकारला असता तर जगात आजघडीला कुठलाही धर्म आस्तित्वात येऊ शकला नसता. पूर्वीप्रमाणं केवळ जेते आणि जीत किंवा मरणारे आणि मारणारे, एवढे दोनच वर्ग असते आणि सारंच कसं सोपं अन् सोयीचं होऊन गेलं असतं. भगवान बुद्धांपासूनच सुरवात करू या की! त्यांनी हाती बंदूक घेतली असती आणि त्यांना पशुहत्या वगैरे पटत नाही म्हणून त्या तमाम राजांची आणि त्यांना नादी लावणाऱ्यांची गोळ्या घालून वासलात लावली असती, तर काय हरकत होती? पुढच्या काळात ना अशोकावर पश्चातापाची वेळ आली असती, ना लाखो भिक्षुंचं शिरकाण झालं असतं.. पण बुद्धानं तसं केलं नाही..!
प्रभू येशूकडं पाहा.. ज्यानं कधी पाप केलं नाही, त्यानं पहिला दगड मारावा, असलं काही तरी तत्त्वज्ञान सांगत बसण्यापेक्षा त्या लोकांवरच गोळ्यांची बरसात केली असती, तर पुढं कोण कशाला त्याच्या नादी लागलं असतं? आणि त्याला क्रूसावर देण्याचं धाडस तरी कुणी केलं असतं?.. पण येशूनं तसं केलं नाही..!
प्रेषित महंमद पैगंबरांनी बंडखोरीत रमलेल्या आणि एकमेकांचा जीव घेण्यासाठीच जणू धडपडणाऱ्या टोळकऱ्यांच्या आयुष्याला शिस्त लावण्याचा, चांगली जीवनशैली देण्याचा विचार केला आणि तिथंच खरी माशी शिंकली.. त्यापेक्षा त्या समस्त भांडकुदळांना कयामतच्या दिनाच्या आमिषापेक्षा थेट आखरी रास्ता दाखवला असता, तर साराच गुंता सुटला असता.. पण प्रेषितानंही तसं केलं नाही..!
अशा पद्धतीनं धर्मच आस्तित्वात येऊ शकला नसता, तर श्रीकृष्णालाही धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.. असं म्हणण्याची तसदी घेण्याची आवश्यकता उरली नसती. त्यामुळं त्या बिचाऱ्यावरही सध्या अधर्माचा कडेलोट कधी होतोय आणि आपण जन्म कधी घ्यायचा, याकडं डोळे लावून बसण्याची वेळ आपण आणलीय. आपण जितक्या लवकरात लवकर सगळीकडे अधर्माची बजबजपुरी करून टाकू, तितक्या लवकर श्रीकृष्णाचं याची देही, याची डोळा दर्शन होईल, अशी आशा माझ्या मनी लागून राहिली आहे. आपण अशा गोळीबारांची गती वाढवली तर या जन्मात श्रीकृष्णाचं दर्शन घेऊनच, एखाद्याच्या हातून गोळी खाऊन (झेलतो कसचे?) आपण डोळे मिटू शकू, असंही मला या दोन-चार दिवसांत सातत्यानं वाटू लागलं आहे.
जगातल्या उपरोक्त कुठल्याही तत्त्वज्ञानापेक्षा हे गोळीचं तत्वज्ञान साधं, सरळ (म्हणजे एकदम थेटच) आहे, आदमी खतम, काम खतम.. इतकं! या तत्वज्ञानाचा अंगिकार आपण केला असता, तर आज ना कुठं कुणाची मंदिरं असती, मशिदी असत्या ना कुठं चर्च असते! त्यातून ना कुठली धर्मसंस्था उभी राहिली असती ना राजसत्ता! ना कुठला भूगोल कायम राहिला असता, ना कुठलं नागरिकशास्त्र जन्माला आलं असतं! गोळी ज्याच्या हाती त्याचं राज्य असतं आणि बाकी साऱ्यांचा इतिहास झाला असता. ना कुठली संस्कृती जन्माला आली असती, ना कायम राहिली असती. ना वाढत्या लोकसंख्येची चिंता निर्माण झाली असती, ना कुणाच्या ऱ्हासाची पर्वा!
पण, तसं झालेलं नाही.. यामागं काहीतरी कारण असेल ना? माणसाचं जनावरापेक्षा वेगळं काहीतरी मूल्य असावं, त्यानं सहिष्णुपणे, शुद्ध नैतिक आचरणानं आपली वेगळी ओळख जपावी, अशी धारणा तर वेदकर्तेही बाळगून होते. म्हणूनच तर त्यांनी आखीवराखीव शिस्तबद्ध जीवनशैलीचा पुरस्कार केला. पण आपण सारं आपल्या सोयीनं वापरुन घेण्याची सवय लावून घेतलीय. त्या साऱ्या सोयीच्या आड कोणीही आला, तर त्याला आडवा करण्याची नवी संस्कृतीआपण विकसित करायच्या मागे लागलो आहोत. आपली वाटचाल उलट्या दिशेनं सुरू झालेली आहे. पण त्या वाटचालीचा शेवट आदिमानवाच्या रुपात नव्हे, तर जनावराच्या रुपात होणार आहे. मग मानवजातीनं इतकी वर्षं या धरातलावर राहून काय साधलं, याचं उत्तर पृथ्वीइतकंच मोठं शून्य बनून राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा